Tuesday, June 30, 2015


आधी शिक्षण मंडळाचा कारभार सुधारा;
मगच शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करा!
नगरसेवकांनी काढले अधिकार्‍यांचे वाभाडे

ठाणे, दि. २९ (प्रतिनिधी) - शिक्षकांची कमतरता.. शाळांच्या इमारतींची दुर्दशा.. झपाट्याने कमी होणारी पटसंख्या, विद्यार्थ्यांना अद्यापही शालेय वस्तूंचे न झालेले वाटप अशी परिस्थिती असताना शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची घोषणा आज महासभेत करण्यात आली. त्यामुळे नगरसेवकांनी संतप्त होऊन आधी शिक्षण मंडळाचा कारभार सुधारा आणि मगच शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करा, अशा शब्दात प्रशासनाला सुनावले. तसेच अधिकार्‍यांचे वाभाडे काढून त्यांच्या कारभारावरही जोरदार टीकास्त्र सोडले.
महापालिकेचे सचिव मनीष जोशी यांनी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याबाबतचे राज्य सरकारचे परिपत्रक वाचण्यास सुरुवात केली तेव्हा नगरसेवकांनी एकच गोंधळ केला. राष्ट्रवादीच्या नगरसेविका साळवी यांनी विद्यार्थ्यांची शाळा सुरू होऊन एक महिना होत आला तरी त्यांना अद्याप शालेय वस्तू मिळाल्या नाहीत असा आरोप केला. एवढेच नव्हे तर आधार कार्ड नसल्यामुळे मुलांना शाळेत बसण्याची परवानगी नाकारली जात असल्याचेही सांगितले. शिवसेनेचे नगरसेवक सुधीर भगत यांनी तर विद्यार्थ्यांना महापालिका शाळेत प्रवेश नाकारला जात असल्याची बाब निदर्शनास आणली. शिक्षक तसेच मुख्याध्यापिका वेळेवर येत नाहीत अशी स्थिती असताना सर्वेक्षण कशासाठी, असा सवाल मीनाक्षी शिंदे यांनी केला.
नगरसेविका मालती पाटील यांनी सांगितले की, महापालिका शाळा क्रमांक १६ मध्ये पहिल्या दिवशी १६० मुले होती. आता ही संख्या कमी होत असून तेथे इतिहास विषय शिकविण्यास दोन वर्षांपासून शिक्षकच नसल्याचे सांगितले. महापालिकेच्या शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती केली नसून कारभार ठप्प झाल्याचा आरोप अनेक नगरसेवकांनी केला. हिंदी व इंग्रजी शाळांच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून मराठीचा पट मात्र कमी होत असल्याचे महापौर संजय मोरे यांनी सांगितले. महापौरांच्या या विधानावरून सभागृहात बराच वेळ गदारोळ झाला.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
महापालिका सभागृहात शिक्षण मंडळाच्या कारभारावर चर्चा सुरू असताना कॉंग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी शिक्षण मंडळातील सुरक्षारक्षकांच्या पगारात झालेल्या कथित भ्रष्टाचाराबाबत भाष्य केले. तसेच महापौर संजय मोरे यांच्यावरही आरोप केले. सदर कथित भ्रष्टाचाराची फाईल अतिरिक्त आयुक्तांच्या टेबलावर तीन महिने पडून असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. याप्रकरणी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी माहिती घेऊन लेखी स्वरूपात कळवू अशा शब्दात सडेतोड उत्तर दिले.
 

सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे : म्हापसेकरांच्या घराचे पहा!
मुख्यमंत्र्यांच्या दारात मुंबईतले रोज शंभर बडे बिल्डर त्यांच्या फायली घेऊन उभे असतात. एखाद्या फायलीवर सही करताना पंडित म्हापसेकरांसारख्या पाच जणांचा विचार केला तरी राज्यात खर्‍या अर्थाने सांस्कृतिक कार्य होईल. ‘तबला’ हाच म्हापसेकरांचा श्‍वास आहे. वयाच्या ८० व्या वर्षीसुद्धा त्यांच्या बोटांतील जादू कायम आहे. हिंदी सिनेसृष्टीतील टुकार संगीतकार व कलाकारांचेही आज वर्सोवा, जुहू, वरळी परिसरात आलिशान फ्लॅट व बंगले आहेत, पण संगीताला जादुई तबल्याने समृद्ध करणारे पंडित म्हापसेकर ‘निवारा’ शोधीत आहेत. म्हापसेकर आज कुठे राहतात? यापेक्षा ते कोणत्या अवस्थेत राहतात ते पहा. एका अत्यंत जीर्ण व कधीही पडेल अशा अतिधोकादायक इमारतीत ते राहत आहेत. मालक इमारतीची दुरुस्ती करण्याच्या मन:स्थितीत नाहीत. इमारतीत राहणार्‍या भाडेकरूंची डागडुजीसाठी पैसे काढण्याची ऐपत नाही. पुन्हा ही जीर्ण इमारत मिलिट्री झोनमध्ये येत असल्याने ५०० मीटर परिसरात चार मजल्यांपेक्षा जास्त मजल्यांची इमारत बांधता येत नाही. त्यामुळे ‘फायदा’ नसल्याने बिल्डर इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी पुढे येत नाहीत.
पंडित म्हापसेकर त्या जीर्ण इमारतीत तबला व ‘बोटे’ वाचवून राहत आहेत.

इतिहास असा घडला!
पंडित म्हापसेकरांसारख्या अस्सल कलावंतांची मुंबईत घरासाठी वणवण होते व त्याची खंत महाराष्ट्राच्या एकाही राज्यकर्त्यास वाटू नये. ज्यांना ‘म्हापसेकर कोण?’ हे अजूनही कळले नसेल त्यांच्यासाठी ५० वर्षांपूर्वीचा एक प्रसंग देतो व विषय संपवतो.
१४ मे १९६९.
सकाळी ११ वाजता.
स्थळ - बिर्ला मातोश्री सभागृह.
कला जगतातील एका ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत सभागृह खचाखच भरले होते. ११ वाजता इतिहासाला सुरुवात झाली. पंडित रमाकांत म्हापसेकर यांचे तबलावादन आणि नृत्यांगना सितारादेवी यांचा पदन्यास अशी जुगलबंदी सुरू झाली आणि रंगत गेली. ही जुगलबंदी किती काळ चालेल याचा नेम नसल्याने रसिक प्रेक्षक सभागृहात जेवणाचे डबे घेऊन आले होते. सभागृहाबाहेर ऍम्ब्युलन्स व पोलिसांच्या गाड्या उभ्या होत्या. साधारण ही जुगलबंदी फार तर आठ ते नऊ तासांच्या वर चालणार नाही असा अंदाज होता, पण पंडित म्हापसेकरांची बोटे थकत नव्हती व सितारादेवींच्या पायातली बिजली विझत नव्हती. सितारादेवी नाचत होत्या व म्हापसेकरांची बोटे तबल्यावर थिरकत होती. रसिक प्रेक्षक त्या जुगलबंदीने अक्षरश: गुंग होऊन गेले होते. तब्बल पावणेतेरा तासांनंतर नृत्यबिजली थकली. सितारादेवी जागेवरच बसल्या, पण पंडित म्हापसेकरांची बोटे त्याच वेगात तबल्यावर फिरत होती.
म्हापसेकर हे खरे तबला नवाज होते व आहेत. आज म्हापसेकरांना घर नाही, पण ते कलेचे स्वामी आहेत. हायकोर्टाच्या न्यायाधीशांना निवृत्तीनंतर सरकारकडून घरांसाठी भूखंड हवे आहेत, पण म्हापसेकरांसारख्यांना घर देणार्‍यांवर त्यांनी बंदीहुकूम बजावला आहे.
हे काय सुरू आहे?

काय काय बंद करायचे?
मानवतावाद्यांच्या कुर्‍हाडीचा घाव मुंबईच्या उरल्यासुरल्या टांगेवाल्यांवरही बसला आहे.
‘हे बंद करा व ते बंद करा’ असे आदेश न्यायालये रोजच देत आहेत. मानवतावाद्यांनी जो फालतू उच्छाद मांडला आहे त्यातून मुंबईचे उरलेसुरले टांगेवालेही सुटले नाहीत. पिसाळलेले कुत्रे मारायचे नाहीत. बैलगाड्यांच्या शर्यती करायच्या नाहीत असे आदेश बजावण्यात आलेच आहेत. आता निसर्गाचा समतोल बिघडेल म्हणून पाणी पिऊ नका, नद्या आटतील. श्‍वास घेऊ नका, हवा कमी होईल, एवढेच काय ते आदेश द्यायचे बाकी आहेत. घोडेगाड्यांबद्धल जो गदारोळ माजवला जात आहे त्यावर श्री. अनिल जांभेकर यांनी टिपण पाठवले. ते म्हणतात, ‘‘माझ्या लहानपणी या गाड्या आणि टांगेच आमच्या उपयोगी पडले आहेत. या गाड्यांचे चालक, मालक एक तर अशिक्षित आणि गरीब असतात. त्यांचा हा पिढीजात व्यवसाय असल्याने सहसा दुसर्‍या उद्योगधंद्यांकडे वळत नाहीत. त्यांना हा व्यवसाय बंद करायला लावून बेरोजगार बनवण्यात काय अर्थ आहे? कोणी तरी न्यायालयात जाते व न्यायालय निकाल देऊन मोकळे होते. मुंबई व ठाण्यात पूर्वी टांगे होते. आज मुंबईत थोडे उरले आहेत. कल्याणसारख्या शहरात आजही ‘टांगा’ ही सवारी आहे. माथेरान, महाबळेश्‍वर, पाचगणीत घोड्यांच्या गाड्या आहेत व त्यातून रोजगार मिळतोय. उद्या बैलाला नांगरास जुंपू नका असेही हे मानवतावादी सांगतील. माणसांनी ढोर मेहनत केलेली चालते, पण बैल व घोडा यांच्याकडून काम करून घ्यायचे नाही, न्यायालये निर्णय देतात म्हणजे काय करतात? या प्रश्‍नाचे उत्तर रिकाम्या टांग्याचे घोडे शोधत आहेत. त्यांचा मालक बेरोजगार म्हणून तेसुद्धा उपाशी आहेत!
संजय राऊत

माणसाने कुठल्याही क्षेत्रात करियर केले तरी मानवधर्म विसरू नये’ हा विचार मनात बाळगून त्यांनी समाजकार्यातही स्वत:ला झोकून दिले. अपंगांना कृत्रिम पायाची मदत, मृत्युशय्येवरील रुग्णांना आर्थिक मदत तसेच गंभीर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना कोणताही मोबदला न घेता भरीव आर्थिक मदत देत त्यांनी त्यांच्या दातृत्वाचा झरा कधीही आटू दिला नाही.
केवळ ‘मी आणि माझा’ असा विचार करणार्‍यांच्या भाऊगर्दीत अशी काही व्यक्तिमत्त्वे उदयास येतात जी सतत इतरांचा विचार करतात. प्रवाहाविरुद्ध पोहतात आणि यशस्वीही होतात... असेच एक उमदे व्यक्तिमत्त्व नितीन साबळे मे. एस. ई. लॉजिस्टिक प्रा. लि.चे संस्थापक. महापालिका शाळेतील शिक्षण हा सध्याच्या समाजासाठी तुच्छतेचा विचार, पण गुरुदेव रवींद्रनाथांनी उभारलेले सृजनशील चैतन्याचे स्फूर्तिमंदिर अर्थात ‘शांतिनिकेतन’ हे महापालिका शाळेतही उभारले जाऊ शकते आणि लेकरांच्या प्रज्ञा, प्रतिभेतून सुंदर नवराष्ट्र उदयास येऊ शकते याचा प्रत्यय नितीन साबळेसारख्या महापालिका विद्यार्थ्यांच्या गगन भरारीतून प्रत्ययास येतो.....................................


स्मार्ट तरुणाई
कधी कधी...असंही

‘‘कॉलेज कुमारींनी मात्र फक्त स्त्रीत्व गाजवायचं, समानतेचे कौतुक सांगायचं, पण आपल्या शेजारी आपल्याच वडिलांच्या वयाचे म्हातारे सद्गृहस्थ उभे आहेत त्यांना जागा देणे सोडा, पण म्हातारे कशाला या गाडीत चढतात म्हणून हिणवायचं... काय करणार...’’
‘माझ्या तो डोक्यातच जातो... का कुणास ठाऊक... पण उगीचच त्याच्या दोन ठेवून द्याव्याशा वाटतात...’ पुढच्या सीटवर बसलेल्या त्या दोघांच्या गप्पा. खरं तर लेडीजसाठी स्वतंत्र सीट असताना आणि त्या रिकाम्या असताना या दोघी पुरुषांच्या सीट अडवून बसलेल्या म्हणून माझ्या डोक्यात जात होत्या... त्यामुळे कोणीतरी त्यांच्याही डोक्यात जाणारा बसमध्ये आहे हे ऐकून मला बरं वाटलं...
आता पुढे काय होणार... त्या सीनची मला प्रतीक्षा. बस तशी रिकामीच होती, पण दोन स्टेशनानंतर भरून गेली. अन् तो महिलांच्या सीटवर बसला. बसताना त्याने या दोघींकडे वेगळीच नजर टाकली तेव्हा तो तोच हे मी ओळखले. पोरगा बर्‍या घरचा, दिसायलाही चांगला होता. म्हणजे पहिलेच इम्प्रेशन चांगले होते..........................


आयुर्वेद
कोरफड

कॉलनीत भरपूर जणांच्या घरी कुंडीत कोरफड दिसते खरी. हिच्याविषयी भरपूर ऐकलंदेखील असतं. परंतु उपयोग करताना कोणी दिसत नाही. आजपासून नक्की कराल ही खात्री.
ज्याच्याकडे बघितल्यावर डोळ्यांना आणि मनाला अगदी प्रसन्न वाटते असे एक रोपटं म्हणजे कोरफड. डोळ्यांचा विषय निघाला म्हणून सांगतो. ज्यांचा कॉम्प्युटरशी खूप संबंध असतो अशांनी संध्याकाळी कोरफडीचा गर डोळ्यांवर ठेवावा. थंडावा मिळतो. डोळ्यावरचा ताण कमी पडतो व डोळे निरोगी राहतात. हाच कोरफडीचा गर त्वचेवर चोळल्याने कोरडेपणा जाऊन टवटवीतपणा येतो. केस धुतल्यावर केसावर चोळल्यास केस चमकदार दिसतात. हाच गर खोबरेल तेलात उकळवून तेल लावल्यास केसांचं गळणं थांबत............................


महाराष्ट्र मंडळ
देवास, महाराष्ट्र समाज

समाजाची नाट्य शाखा ही खूप ऍक्टिव आहे. समाजातील सदस्य नाटक बसवतात व सादर करतात. अनेक चांगले कलाकार इथून घडून गेलेही आहेत. अनेक सदस्य मराठीतून चांगलं लिखाण करत आहेत. त्यापैकी रमेश भावसार यांचं ‘भावतरंग’ हे पुस्तक तर चेतन फडणीस यांचं ‘चैतन्यझारा’ हे पुस्तक प्रकाशितही झालं आहे.
मध्य प्रदेशातल्या जवळ जवळ प्रत्येक छोट्या मोठ्या शहरात मराठी माणसं मोठ्या प्रमाणावर राहात आहेत. इंदूर,उज्जैनच्या जवळ असलेलं आणखी एक शहर म्हणजे देवास. देवासला कलेची भूमी म्हटलं जातं. सांस्कृतिक, धार्मिक वातावरण देवासला आहेच. देवासला १९४६ साली महाराष्ट्र समाजाची स्थापना झाली. डॉ. रामचंद्र ओक, सीताराम पुराणिक, बबन भागवत, भालचंद्र सुपेकर, वासुदेव आपटे अशा काही लोकांनी त्याकाळी मराठी लोकांनी एकत्र यावं असं मनाशी घेतलं आणि मंडळ स्थापन केलं. मध्य प्रदेशचे त्यावेळचे विधानसभा अध्यक्ष असलेले अनंत पटवर्धन यांची मोलाची मदत मिळाली, आणि त्या काळात समाजाने खूप उन्नती साधली. मराठी सणवार साजरे होऊ लागले, गणेशोत्सव तर होताच...........................


जनरेशन नेक्स्ट
ब्रॅण्डेड हुशारी

आपण वापरतो त्या वस्तूंचा ब्रँड मुलांना कळतो तसेच आपण खातो त्याचंही मूळ यांना कळायला हवं. आपण खातो तो तांदूळ, डाळी, पिठं हे कशाचे असतात. कुठून येतात याबद्दल मुलांना जागृक करायला हवं. हे कदाचित अती वाटेल पण बाह्य वस्तूंपेक्षा पोटात जाणारं अन्न आपल्याला माहीतच हवं.
माझ्या मैत्रिणीच्या पाच वर्षांच्या मुलाने एका प्रश्‍नाचं उत्तर एक सेकंदात दिलं. तो प्रश्‍न होता... आईजवळ असलेला मोबाईल कोणत्या कंपनीचा आहे? या प्रश्‍नाच्या उत्तराबरोबरच त्याने पटापट या मोबाईलने कसा फोटो काढता येतो, कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे. फ्रंटचा कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे... हे तो धडाधड सांगायला लागला. तुम्ही म्हणाल हे कौतुकास्पद आहे, पण आश्‍चर्यकारक नक्कीच नाही. आता ही पिढीच शार्प आहे. वगैरे वगैरे...
खरंच... ही पिढीच हुशार. या माझ्या बोलण्यावर एका मैत्रिणीने सांगितले... ‘अगं! त्यांच्यासमोर आपण चर्चा करतो, ती ते ऐकत असतात ‘त’ वरून ताकभात ओळखतात त्यांना सगळंच उपलब्ध आहे. जे जे उपलब्ध असते ते बरोबर लक्षात राहतं या नियमाने मी आहे............................


आस पास
शॉर्टकट

पैसा, यश, प्रसिद्धी, स्थान हे मिळवण्यासाठी प्रत्येकाने एकच मीडियम वापरलं होतं जो होता ‘शॉर्टकट’, पण त्याने ते प्रत्येक जण ‘कुप्रसिद्ध’ झालेले... ‘अपयशी’ झालेले... ‘स्थान’ व ‘पैसा’ गमावलेले.
त्या दिवशी मुंबई पावसाने तुंबली आणि प्रत्येकाची घरी जायची घाई सुरू झाली. प्रत्येक मुंबईकर हा अतिरेकी हल्ल्यांना जितका घाबरतो तितकाच मुसळधार पावसालाही. अर्थात मुंबईकरामधली माणुसकी यातल्या कोणत्याही प्रसंगाला घाबरून शांत बसत नाही, हेही तितकंच खरं! याचा प्रत्यय मला त्या पावसात आला. वेस्टर्न हायवेवर वांद्य्रात माझी गाडी बंद पडली आणि एक टॅक्सीवाले काका माझ्या मदतीला आले. मेकॅनिकशी बोलून मी गाडी सोडून निघालो आणि एकुणात समोरचं ट्रॅफिक पाहून मला काकांनी विचारलं ‘‘शॉर्टकट ले लू क्या?’’ मी त्यांना ‘हो’ म्हणालो......................


गझलाई
कुठल्या क्षणी डसलीस गझले...

पाखरांना कोणतीही जात नाही
कुंपणाची हद्द आकाशात नाही

मूळ कराडचे असलेले सदानंद बेन्द्रे उत्तम ललित गद्य लिहितात. इंग्रजीवर त्यांची बर्‍यापैकी हुकुमत आहे. तीनेक वर्षांपूर्वी ‘गझलरंग’ने त्यांना झपाटलं... ते कॉमर्सचे पदवीधर म्हणून फायदेशीर गुंतवणुकीचा सल्ला इतरांना देत असले तरी...
आपला जन्म कुठे व्हावा? गरीबाच्या झोपडीत की श्रीमंत राजवाड्यात? या जातीत व्हावा की त्या धर्मात व्हावा ?देशात व्हावा की परदेशात व्हावा? या ग्रहावर व्हावा की दुसर्‍या आकाशगंगेत व्हावा? यातलं काही म्हणजे काहीच आपल्या हातात नसतं. आणि आयुष्यभर आपलं दु:ख एकच असतं की सालं आपण मिसप्लेस झालो आहोत. नाही तर आपण यँव झालो असतो अन् त्यँव केलं असतं........................................


युवा साहस
जादुई रस्ता

हिमालयातील मोठमोठे डोंगर भवताली आणि मधोमध हा सरळ रस्ता. लोकांना अगदी सरळ दिसणारा रस्ता, पण याच रस्त्यावर एक गंमत आहे... एका ठिकाणी तो मॅग्नेटिक पॉइंट आहे. तिथे आर्मीने बोर्डही लावला आहे. ‘मॅग्नेटिक हिल...अ फिनोमेन्न दॅट डिफाईज ग्रॅव्हिटी.’
हिमालयाचे सारे काही अद्भुतच असते. प्रत्येक वेळी मला त्याच्या अद्भुतपणाची अनुभूती नव्याने मिळत आली आहे. हिमालयातील वातावरण, त्यात क्षणाक्षणाने होणारे बदल, रस्ते, नद्या, माणसं, डोंगर, दर्‍या, बर्फ... प्रत्येकाचे वेगळेपण टिपता टिपता माझा प्रवास घडत जातो... ‘मॅग्नेटिक हिल’चा रस्ता हेदेखील त्यातलेच एक अद्भुत प्रकरण.......................


जीवनगाणे
‘प्लांचेट’

सध्या मी वाचत असलेल्या ‘आठवले तसे’ या पुस्तकात दुर्गाबाई भागवतांनी ’प्लांचेट’ बाबतचे त्यांचे आश्चर्यकारक अनुभव लिहिले आहेत. त्यात प्लांचेट वर आलेल्या त्यांच्या आत्याच्या आत्म्याने दुर्गाबाई लहान असतानाच्या एका प्रसंगाचे वर्णन, जे प्लांचेट करणार्‍याला माहीत असणे अशक्य होते, ते तंतोतंत केल्याचा उल्लेख आहे.
सध्या मी वाचत असलेल्या ’आठवले तसे’ या पुस्तकात दुर्गाबाई भागवतांनी ’प्लांचेट’ बाबतचे त्यांचे आश्चर्यकारक अनुभव लिहिले आहेत. त्यात प्लांचेट वर आलेल्या त्यांच्या आत्याच्या आत्म्याने दुर्गाबाई लहान असतानाच्या एका प्रसंगाचे वर्णन, जे प्लांचेट करणार्याला माहीत असणे अशक्य होते, ते तंतोतंत केल्याचा उल्लेख आहे. ऐहीक जीवनापालीकडे असलेल्या अनाकलनीय गूढ जगाचा वेध घेण्याचा प्रयत्न मानव पुरातन काळापासून करतो आहे. त्या जगाचा प्रत्यय आल्याचे दावे अनेक जण करत असतात. अनेक जाणत्या थोरामोठयांनी देखील आपल्याला असे अनुभव आल्याचे जागोजागी लिहून ठेवलेले आढळेल. मला स्वत:ला अजून तरी असल्या कुठल्याही पारलौकिक गोष्टीचा रोकडा अनुभव नाही. परंतू मला अनुभव नाही म्हणून एखादी गोष्ट आस्तत्वातच नाही असे मानायला मी तयार नाही..........................


खुसखुशीत
तीन मूर्ती

आपल्याला जे चकचकीत दिसतं ते सर्वोत्कृष्ट आहे असं निदान आपण करून बसतो. त्यामुळे आपण सत्यापासून दोन हात लांब राहतो.
एक जुनी कथा आहे. एका गावात एक स्पर्धा भरवण्यात आली होती. स्पर्धा अशी होती की, गावाच्या कलामंदिरात तीन मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. या तीन मूर्तींपैकी सर्वोत्कृष्ट मूर्ती कोणती हे ओळखायचे होते. एक मूर्ती देवाची, दुसरी राजाची आणि तिसरी गाढवाची. देवाची मूर्ती सोन्याची, राजाची मूर्ती चांदीची आणि गाढवाची मूर्ती मातीची. मोठमोठे विद्वान मूर्तींची पाहणी करायला येत होते. आपापली मतं मतपेटीत टाकत होते. एके दिवशी कलामंदिरात भयंकर गर्दी जमली होती. एक विदुषी, एक विद्वान आणि एक किशोरवयीन पोर सर्वात पुढे मूर्ती पाहत होते. विदुषीने म्हटलं,‘‘राजाची मूर्ती किती सुंदर आहे, चांदीची आहे. काय राजबिंडा दिसतोय!’’ विद्वान तिचे वाक्य कापत म्हणाला, ‘‘छे छे, यापेक्षा देवाची मूर्ती मूर्ती उत्तम. एकतर ती सोन्याची आहे. सोने सर्वात मौल्यवान आणि राजापेक्षा देव श्रेष्ठ.’’ ते पोरगं या दोघांचं बोलणं कुतूहलाने ऐकत होतं. दोघांचेही वाद टोकाला जाऊन पोहोचले.......................


खासमखास
मिसळचा बोलबाला

दादरच्या ‘आस्वाद’मधील मिसळीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर महाराष्ट्राची ही राष्ट्रीय डिश चर्चेत आली, पण फक्त आस्वादचीच नव्हे तर मुंबईत ‘मिसळ’ खावी अशी अनेक ठिकाणे आहेत. प्रत्येक ठिकाणची चव आणि स्टाईल वेगळी, पण मुंबई-ठाणे सोडता नाशिक, पुणे, कोल्हापूरसारख्या महानगरांमधूनही मिसळीचा चमचमीतपणा रसिक आज अनेक वर्षे चाखत आहेत. त्याचीच ही जंत्री
सगळ्यांच्या पसंतीस उतरणारा पदार्थ म्हणजे मिसळ. मिसळीचे जन्मस्थानाबद्दल जेवढे विविध मतांतरं आहेत तेवढेच मिसळीचे विविध प्रकार आपल्याला पहायला मिळतात. प्रत्येक ठिकाणची वैशिष्ट्ये तिथल्या मिसळीत आपल्याला पहायला मिळते. जसे कोल्हापूरची खासियत असलेला तिखटपणा. अस्सल कोल्हापुरी झटक्याची मिसळ मिळण्याचे ठिकाण म्हणून सर्वांच्याच पसंतीचे फडतरे मिसळ. त्यानंतर मंगळवार पेठेतली जगतापांची आहार मिसळ, चव्हाण कुटुंबीयांची परंपरागत कसबा-बावडा येथील बावडा मिसळ, महालक्ष्मी मंदिराजवळची गुजरी येथील चोरघे मिसळ, खासबाग मैदाना जवळची बुचडे ह्यांची खासबाग मिसळ, इ.................................


व्हॉट्स ऍप

 
- सुरज कालबोंडे, मुंबई

दहावी पास होऊन डॉली ११ वी ला कॉलेजमध्ये गेली..
वडील : जॉली, आधी तू मला बाबा म्हणायचीस आणि आता डॅड का म्हणतेस’’?
डॉली : डॅड...ते काय आहे न की बाबा म्हंटल्यावर लिपस्टिक खराब होते..................................


आवाहन
फुलोरा म्हणजे तरुणाईचा आरसा
तरुणाईचं प्रतिबिंब टिपताना फुलोराने स्वत:लाही बदलले आहे
नवा रंग, नवा साज शेवटी फुलोरा सरताज...
म्हणून खास नवीन लेखक, नवे स्तंभ...............................



Print this page
Send This Page
Pratikriya Kalwa





Monday, June 29, 2015

‘भंडारदरा’ पाणलोटात संततधार

‘भंडारदरा’ पाणलोटात संततधार
‘भंडारदरा’ पाणलोटात संततधार
फोटो शेअर करा
अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यांवरून पाणी वाहू लागले आहे.



म. टा. वृत्तसेवा, अकोले

मुळा-भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे भंडारदरा व निळवंडे धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील पांजरे येथे मागील २४ तासांत आजपर्यंतच्या या पावसाळ्यातील सर्वाधिक म्हणजे साडे आठ इंच तर रतनवाडी येथेही आठ इंचापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. वाकी लघु पाटबंधारे तलाव भरून वाहू लागला असून मुळा परिसराला वरदान ठरणारे पिंपळगाव खांड धरण बुधवारी काठोकाठ भरून धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. हरिच्चंद्रगड परिसरात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे मुळा नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे कोतूळ येथील मोठा पूल बुधवारी पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरील वाहतूक धामणगाव पाट मार्गे सुरू आहे.दरम्यान, पिंपळगाव खांड, वारंघुशी व रतनवाडी येथील लघु पाटबंधारे तलाव भरल्याने आमदार वैभव पिचड व तालुक्यातील मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, जिल्हा परिषद सदस्य कैलास वाकचौरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मीनानाथ पांडे, तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, यशवंत आभाळे, सभापती अंजना बोंबले, शरद चौधरी, अगस्तीचे कार्यकारी संचालक व्ही. एस. बावीस्कर, एकनाथ शेळके, सयाजी पोखरकर आदी उपस्थित होते. मुळा-भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. दोन दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. तालुक्याच्या पश्चिम टोकाला असणाऱ्या पांजरे, रतनवाडी व घाटघर येथे आजपर्यंतचा सर्वाधिक म्हणजेच आठ ते साडे आठ इंच इतका पाऊस पडला. या परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात दिवसभरात १२ तासांत ३७७ दलघफू इतकी वाढ झाली असून धरणाचा पाणीसाठा बुधवारी सायंकाळी ६ वाजता २ हजार ३८७ दलघफू (२ टीएमसी)झाला होता. ११३ दलघफू क्षमता असणारा वाकी लघु पाटबंधारे तलाव बुधवारी भरून वाहू लागला. सांडव्यावरून १ हजार ५०० क्युसेकने पाणी वाहत आहे. कृष्णवंती ही प्रवरेची उपनदी दुथडी भरून वाहत आहे. भंडारदरा धरणातून सोडण्यात येत असलेले पाणी आणि कृष्णवंतीचे पाणी निळवंडे धरणात जमा होत असून बुधवारी दिवसभरात १२ तासांत २१८ दलघफू नवीन पाण्याची आवक धरणात झाली आहे. त्यामुळे निळवंडे धरणाचा साठा ९९५ दलघफू इतका झाला आहे. कळसूबाई -हरिचंद्रगड परिसरातील मुसळधार पावसामुळे या भागातील छोटे मोठे धबधबे जोमाने वाहू लागले आहेत. आजपर्यंत पावसाची अवकृपा असणाऱ्या आढळा पाणलोट क्षेत्रातही बऱ्यापैकी पाऊस पडत असल्याने आढळा नदीवरील पाडोशी हा लघुपाटबंधारे तलाव भरण्याच्या मार्गावर आहे. आढळा धरणात १७३ दलघफू इतका स्थिर पाणीसाठा आहे. या भागातील ओढे नाले वाहू लागले असल्याने आढळा नदी वाहती झाली आहे.

‘मिरुग’ देतोय मृगाची वार्ता...

‘मिरुग’ देतोय मृगाची वार्ता...
‘मिरुग’ देतोय मृगाची वार्ता...
फोटो शेअर करा
म. टा. प्रतिनिधी, नगर

ग्रामीण भागात 'मृगाचा कीटक' म्हणून आढळणारा 'मिरुग' किडा आंब्याच्या खोडावर दिसू लागला असून, तो मृग नक्षत्राच्या पावसाची वार्ता घेऊन आल्याचे समजले जाते. पाऊस सुरू झाला की बागांमध्ये दिसू लागणारा हा कीटक नगरमधील निसर्ग अभ्यासक डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांच्या परसबागेत दिसल्याने त्यांनी त्याला छायाचित्रात टिपले आहे. 'मिरुग' किड्याविषयी 'मटा'शी बोलताना डॉ. कुऱ्हाडे म्हणाले, 'मिरुग' अथवा 'मृगाचा कीटक' म्हणून ओळखला जाणारा हा आंब्याचा खोडकीडा किंवा 'भिरुड' पाऊस सुरू झाला की बागांमध्ये दिसू लागतो. त्याचे दिसणे म्हणजे मृग नक्षत्राच्या पावसाचे आगमन होण्याची चाहुल समजली जाते. आंबा, वड, पिंपळ, उंबर या झाडांमध्ये हा किडा आढळतो. ५० मिलीमीटर लांबीचा, तपकिरी पिवळा रंग व पाठीवर नारंगी ठिपके असलेल्या 'मिरुग' किड्याचे जीवनचक्र एक वर्षाचे असते. कीटक जीवनचक्रातील हे सर्वात मोठे जीवनचक्र आहे. आंब्याच्या खोडावर वा सालीच्या खाली हा कीटक अंडी घालतो. त्यातून बाहेर पडणारी अळी खोड पोखरून आत जाते. तीन ते सहा महिने आत राहून झाड आतून पोखरून टाकते व पोकळ करते. त्यानंतर परत कोषावस्थेत गेल्यानंतर चार ते सहा महिन्याने पावसाळ्याच्या तोंडावर हा कीडा खोडातून बाहेर येतो, असे सांगून डॉ. कुऱ्हाडे म्हणाले, त्यामुळेच त्याला 'मिरुग' वा 'मृगाचा कीटक' म्हणून ओळखले जाते. या किड्याने आतून पोखरलेले आंब्याचे झाड वा फांदी वादळवाऱ्यात पडते, त्यावेळी आंब्याला 'भिरूड' लागल्याचे बोलले जाते.

अंधश्रद्धेची चर्चा


शिक्षकांची शिकवणी व्हॉट्सअ‍ॅपवर

राज्यातील सरकारी, अनुदानित आदी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून सतत अपडेट ठेवण्याची तयारी प्राथमिक शिक्षण विभागाने सुरू केली आहे.
Whatsappमुंबई- राज्यातील सरकारी, अनुदानित आदी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून सतत अपडेट ठेवण्याची तयारी प्राथमिक शिक्षण विभागाने सुरू केली आहे. यासाठी प्राथमिक शिक्षणाचे धडे व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून शिक्षकांना दिले जाणार असून प्राथमिकच्या सर्व विषयांची माहिती शिक्षण विभागाकडून व्हॉटस्अ‍ॅप ई-साहित्य आणि व्हीडिओ क्लिपच्या माध्यमातून पुरविली जाणार आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि संबंधित शिक्षणाधिकारीही सतत अपडेट होतील.
राज्यात गेल्या काही वर्षामध्ये सरकारी, अनुदानित शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने त्यात सुधारणा करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून गेल्या चार वर्षापासून प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्राथमिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची शिकवण्याच्या पद्धतीत असलेल्या त्रूटी आणि अडचणी दूर केल्या जातील.
प्राथमिक शिक्षणाचे धडे येत्या काळात व्हॉट्सअपवरून शिक्षकांना मिळाल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल का?
यासाठी प्राथमिक शिक्षणाच्या अध्ययन पद्धतीत काय सुधारणा झाल्या पाहिजेत यासाठी पहिल्यांदाच शिक्षकांसोबतच शिक्षण विभागातील तज्ज्ञांकडून येत्या ५ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने माहिती मागवली जात आहे. त्या आधारे विद्यार्थ्यांच्या आकलन पातळीत वाढ करून अध्ययन स्तर उंचावण्यासाठी आणि प्रामुख्याने भाषा, गणित आणि विज्ञान या विषयातील अवघड संकल्पना शिक्षकांना सहजपणे सोडविता येण्यासाठी व्हिडीओ आणि त्यासाठी ई-साहित्य तयार केले जाणार आहे.
हे साहित्य विषयानुसार तयार केले जाणार असून यात विविध संकल्पना, प्रत्येक अध्ययन पद्धतीतील अडचणींची उकल केली जाईल. शिक्षकांच्या गरजानुसार ही माहिती तातडीने अँड्रॉईड मोबाईलवर व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून पाठविली जाणार असून यामुळे शिक्षकांना येत्या काळात व्हॉटस्अ‍ॅपद्वारे शिक्षण देणे सोपे होणार आहे.
गुणवत्तेच्या त्रुटी होणार दूर
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित १ कोटी ४ लाख प्राथमिक शाळा आहेत. या शाळांवर ७ लाख २४ हजार शिक्षक आहेत. प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात अनेक त्रुटी दूर होण्यासाठी संबंधित विषयांची व्हीडिओ क्लिप व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून प्रत्येक शिक्षकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. याची तयारी अजून प्राथमिक स्तरावर सुरू असून शिक्षक आणि संबंधितांकडून आम्ही सूचना, अभिप्राय मागवत आहोत.
- महावीर माने, संचालक, प्राथमिक शिक्षण विभाग

|

आनंदाचे आगार

सह्याद्रीतील ‘वर्षा पर्यटन’ म्हणजे निसर्गाचा हळवेपणा, प्रेमळपणा आणि थरार! अनेक रोमहर्षक अनुभवांची जाणीव करून देणारा. वा-याच्या झुळुकीबरोबर धुक्याची चादर ओढली जाऊन सर्वच अदृश्य झाल्याचा आनंद मिळतो, तो याच पावसाळयात. पावसाच्या येणा-या सरीवर सरी सुरूच असतात. निरव शांततेतही आपली बडबड चालूच ठेवत खळाळणारे ओढे, तर शुभ्र तुषार उडवत ओतणारे धबधबे म्हणजे निसर्गाची स्पंदनेच होय. या जाणिवा ओळखण्याची ज्याच्यात ताकद असेल, तोच ख-या अर्थाने वर्षा पर्यटनाचा आनंद लुटू शकेल.
maxresdefaultओल्या मातीचा नाकाला झोंबणारा गंध पावसाच्या येणा-या सरीबरोबर विरळ झाला. तहानलेल्या सृष्टीने आपली तृष्णा शमविली आणि नवे रूप धारण केले. नेत्रसुख देणारे अनोखे सौंदर्य संपूर्ण सह्याद्रीला परिधान करून निसर्गाने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. शुभ्र स्फटिकांच्या माळा सह्याद्रीने धारण कराव्यात, असे दृश्य कोसळणा-या धबधब्यांमुळे दिसू लागले आहे.
भूतलावरील दुसरा स्वर्ग अशीच या सौंदर्याची व्याख्या करावी लागेल. या सौंदर्याचे मुख्य आकर्षण असलेले धबधबे पर्यटकांना सुखावणारे पिकनिक स्पॉट ठरले आहेत. विकेंडची मेजवानी ठरणारे हे धबधबे जसे घाटमार्गावर आहेत, तसेच सह्याद्रीच्या कुशीत वावरणा-या अनेक गावांतही आहेत. पावसाळयातले रविवार धबधब्यांच्या सहवासातच आता संपू लागले आहेत.
सह्याद्रीतील ‘वर्षा पर्यटन’ म्हणजे निसर्गाचा हळवेपणा, प्रेमळपणा आणि थरार! अनेक रोमहर्षक अनुभवांची जाणीव करून देणारा. वा-याच्या झुळुकीबरोबर धुक्याची चादर ओढली जाऊन सर्वच अदृश्य झाल्याचा आनंद मिळतो, तो याच पावसाळयात. पावसाच्या येणा-या सरीवर सरी सुरूच असतात. निरव शांततेतही आपली बडबड चालूच ठेवत खळखळणारे ओढे, तर शुभ्र तुषार उडवत ओतणारे धबधबे म्हणजे निसर्गाची स्पंदनेच होय. या जाणिवा ओळखण्याची ज्याच्यात ताकद असेल, तोच ख-या अर्थाने वर्षा पर्यटनाचा आनंद लुटू शकेल.
रामघाट, अंबोली, फोंडाघाट, करुळ, भुईबावडा या घाटमार्गावर बहुतांश धबधब्यांची भेट होते. यापेक्षाही अनेक सुंदर धबधबे नैसर्गिक कलाकृती बनून वाहत आहेत. सावडाव, सैतवडे, शिराळे, नापणे अशा नामवंत धबधब्यांसह कुंभवडे, शिवापूर, रांजणगड अशा अनेक गावांतून हे शुभ्र स्फटिक ओतताना दिसतात.
गडद हिरव्या रानात व काळयाभोर खडकावरून कोसळणारे हे धबधबे आपली ओळख पाहणा-यांच्या हृदयापर्यंत पोहोचतात. फोंडाघाटातून पावसाच्या हलक्या सरीबरोबर घाट चढताना भेटणारे धबधबेही आपली अशीच ओळख सांगत आहेत.
आंबोली घाटात दरडीमुळे सुंदर अशा आंबोलीला दृष्ट लागल्यासारखी झाली आहे. घाटमार्गाच्या कडेलाच कोसळणारे धबधबे जसे आंबोलीत आहेत, तसेच ते फोंडाघाटातही मोठया प्रमाणात आहेत. दाजीपूरच्या अभयारण्याची हद्द संपते तेथेच फोंडाघाटाची खिंड कोकणातून येणा-या प्रवाशाचे स्वागत करते.
श्री देवी उगवाईचा आशीर्वाद याच ठिकाणाच्या एका वळणावर मंदिराच्या कळसाचे दर्शन होताच मिळतो. कारवीची हिरवीगर्द झालेली झुडपे एकाच उंचीवर समांतर उभी राहून नवागतांचे स्वागत करण्यास तिष्ठत असल्याचा आभास होतो. रस्त्यावरच्या प्रत्येक वळणावर धबधब्याचा भयंकर असा ऐकू येणारा आवाज आपली भयानकता सांगत असला तरी प्रत्यक्षात मात्र तो अधिकच सुकुमार वाटतो.
अंगावर थंड पाण्याचे तुषार पडताच देहभान हरपून जावे व त्या निसर्गाशी एकरूप होऊन संसाररूपी व्यवहारातील दडपण झुगारून देण्याची गुर्मी निर्माण होते. अचानक स्फूर्ती निर्माण होऊन ओतणा-या त्या धबधब्याशीच स्पर्धा करावी, असे वाटू लागते. वाहणा-या या झ-याचे मूळ शोधण्याची इच्छा मनी निर्माण होते, असे हे शक्तिस्थान थंड पाण्याच्या त्या शुभ्र तुषारांत आहे.
फोंडाघाटातून पुढे जाताना ठिकठिकाणी दिसणारे हे धबधबे हे शिवशंकराच्या मस्तकावरील गंगेचे अंश असावेत, असेच वाटतात. काळया दगडातून वाट काढत धावतानाही ते पाण्याची निळाई दाखवून देत नाहीत.
निसर्ग हा नेहमीच अनोख्या सौंदर्याची उधळण करत असतो. वसंतात जशी विविध रंगांची फुले बहरतात, तशी मृग नक्षत्राच्या सुरुवातीपासूनच जमिनीतून वर येणा-या कोंबांनी व नव्याने येणा-या पालवीमुळे डोंगर चित्रांकित झालेले दिसतात आणि या गडद पोपटी रंगामुळेच धबधब्यांची ओळख ठासून भासत असते. वा-याचा जोराचा प्रवाह सह्याद्रीवरून कोसळणा-या या धबधब्यांना अनेक वेळा उलट दिशेला फिरवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतो, मात्र असे प्रयत्न विफल ठरवत धबधबे नित्यनेमाने कोसळतच असतात.
कधी तरी पावसाचा जोर वाढला आणि पाण्यात गढुळता आली तरच त्याची शुभ्रता मलीन होते. अन्यथा, स्वत:ला मलीन होऊ न  देणारे हे धबधबे आनंदाचे आगार बनून वाहत असतात. आंबोली घाटातील वर्षा पर्यटन आणि धबधब्याखाली उभे राहून स्नानाचा आनंद घेणे पर्यटकांना धोक्याचे वाटू लागल्याने फोंडाघाट मार्गावरील या धबधब्यांना पर्यटकांनी ‘विकेंड एन्जॉय स्पॉट’ बनवले आहे.
हाच पाऊस ज्येष्ठातून, पौष, माघ नक्षत्राकडे जाताना खळखळणा-या धबधब्यात नवा जोश निर्माण करतो. वातावरणातील गारवा अधिकच वाढवतो आणि सरीवर सरी येण्याच्या थांबल्या तरी झाडांच्या पानावरून व खोडावरून टप् ऽ टप् ऽऽ टपकणा-या पाण्यातून आपले अस्तित्व सांगत असतो. अशा या सह्याद्रीत वाळून गेलेला पाचोळा पावसाच्या धारेबरोबर कुजू लागला व खेकडयाच्या छोटया पिल्लांना आधार देत वाढवू लागला आहे.
अंकुरलेल्या शेंडवेली, करांदे, घोटा, वेठ यांच्या वेली मिळेल त्याला कवेत घेत वाढू लागल्या आहेत. आपल्या उथळ पानावरील गुलाबी तपकिरी रंग बदलून त्यावर पोपटी रंगाची झळाळी मिळत आहे. या रंगसंगतीतूनच सह्याद्री नव्या रंगाचा नवा साज पांघरून निसर्गप्रेमींना साद घालतो आहे.
सह्याद्रीतील पाऊस आणि त्या ठिकाणी ओतणारे शुभ्र धबधबे ही संकल्पनाच गिरीभ्रमण करणा-यांना सुखावणारी आहे. अशा या सिंधुदुर्गातील सह्याद्रीतील उंच टेकडय़ांवरून अनेक धबधबे कोसळतात. अशा गार पाण्याच्या धबधब्याखाली उभे राहून आंघोळ करण्याचा आनंद म्हणजे स्वर्गसुखाची अनुभूतीच होय.
सिंधुदुर्गात पावसाळी पर्यटकांनी आकर्षित करणारे आंबोली, फोंडाघाट, दोडामार्ग-आंबेली, गगनबावडा, सावडाव, नापणे अशी अनेक स्थळे आहेत. पावसाळयाचे चार महिने हे धबधबे ज्या जोशाने वाहतात; तोच जोश व धुंदी या ठिकाणी येणा-या पर्यटकाला मिळत असते आणि म्हणूनच या सह्याद्रीच्या कुशीत धाव घेणा-या पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
जागतिक स्तरावर जैवविविधतेने नटलेल्या या सिंधुदुर्गाला लाभलेली ही निसर्गशोभा अनुभवण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही पर्यटकांच्या पाऊलखुणा सह्याद्री भागात दिसू लागल्या आहेत. अनेक साहसी पर्यटकांकडून या डोंगरद-या सर करण्याचा चित्तथरारक विक्रम केला जातो. सिंधुदुर्गाचा सह्याद्री आपली वेगळी ओळख निर्माण करताना या ठिकाणची जैवविविधता पावसाच्या प्रत्येक थेंबाप्रमाणे जपत आहे.

Saturday, June 20, 2015

ध्येय गाठण्यासाठी जिद्दीला परिश्रम व योग्य नियोजनाची जोड दिली की, यश आपोआप आपल्या पायाशी लोळण घालू लागते. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे जहागीरदारवाडी (ता. उस्मानाबाद) येथील संगीता राठोड (चव्हाण) यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे उपजिल्हाधिकारी पदाला घातलेली गवसनी होय. अनेक अडचणींवर त्यांनी मात करून हे यश संपादन केले, ते स्पर्धा परीक्षेबरोबरच इतरही क्षेत्रात वाटचाल करणार्‍यांना नक्कीच प्रेरणादायी आहे.
नवोदय विद्यालयात माध्यमिकपर्यंतचे शिक्षण झालेल्या संगीता यांचे आष्टी (जि. बीड) येथे डीएडचे शिक्षण झाले. डीएडच्या दुसर्‍या वर्षात असतानाच त्यांचा जहागीरदारवाडी येथील शिक्षक असणार्‍या उत्तम चव्हाण यांच्याशी विवाह ठरला. लहानपणापासूनच अधिकारी पदाचे स्वप्न उराशी बाळगणार्‍या संगीता यांना त्यांच्या स्वप्नाआड येणारा हा अनपेक्षित धक्का वाटू लागला . मात्र घरच्यांच्या शब्दांपुढे त्यांना हा मार्ग स्वीकारावा लागला. 2006 मध्ये लग्न झाल्यानंतर पूर्वीपासून सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा वेग संसाराचा गाडा हाकताना थोडा मंदावला असला तरी त्यांनी यामध्ये खंड पडू दिला नाही. याबाबत त्यांनी पती उत्तम यांच्याशी चर्चा करून आपले स्वप्न बोलून दाखविले. आपण शिक्षक आणि आपली पत्नीही शिक्षक असावी, या चाकोरीबद्ध विचारसरणीच्या जमान्यात उत्तम चव्हाण यांनी पत्नीच्या स्वप्नाला साकारण्यासाठी केवळ होकारच नाही तर त्यासाठी संसारी जीवनातील अनेक तडजोडी स्वीकारून पाठबळही दिले. पतीकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे संगीता यांना आणखीन बळ मिळाले. त्यांनी याच बळावर 2010 मध्ये पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास केली. परंतु, त्यांना खुनावत होते ते स्वप्न अंबर दिव्याचे. त्यामुळे त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. 2011 मध्ये पुन्हा त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले. त्यांची नायब तहसीलदारपदासाठी निवड झाली. यामध्ये एका क्रमाने त्यांचे पोलिस उपाधीक्षक पदाची रँक हुकली. त्यानंतर नवीन पदाचे प्रशिक्षण सुरू ठेवत दुसरीकडे परीक्षेची तयारी कायम ठेवली. त्यानुसार 2012 मध्ये पुन्हा राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. सध्या देऊळगाव येथे प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असतानाच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि त्यांच्या जिद्द, चिकाटी व नियोजनबद्ध मेहनतीला फळ आले. त्यांची उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली. त्यांचा हा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
संगीता राठोड यांनी असे मिळविले यश
संगीता राठोड यांचे शिक्षण नवोदय विद्यालयात झाले आहे. या विद्यालयात प्रत्येक पंधरा दिवसाला होणार्‍या सामान्यज्ञान स्पध्रेमुळे त्यांच्यात स्पर्धा परीक्षेची बीजे रोवली गेली. लग्नानंतर मुलगी झाल्याने थोडे दुर्लक्ष झाले. मात्र, मनातली जिद्द स्वस्थ बसू देत नसल्याने आपल्या 15 महिन्यांच्या चिमुकलीला माहेरी आईकडे सोडून अभ्यास सुरू केला. पहाटेपासून अभ्यासास प्रारंभ होई. घरातील सर्वच खोल्यांच्या भिंती स्पर्धा परीक्षेतील अभ्यासक्रमाची विविध उत्तरे, गणिताची सूत्रे, व्याकरण, प्रश्नोत्तरे, मुद्दे अशा पत्रकांनी भरलेल्या. स्वयंपाक करतानादेखील समोरच्या भिंतीवर प्रश्नोत्तरे अथवा बाजूला पुस्तक असे. दुपारी शाळा करून आठ किलोमीटरचा टमटमने प्रवास करीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात क्लाससाठी हजेरी लावली. घरी जाण्यास रात्री 9 ते 9.30 वाजत. परंतु, मनातली जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. पती उत्तम यांची सुरुवातीच्या काळात निलेगाव (ता. तुळजापूर) येथे जवळपास 70 किलोमीटरवर नियुक्ती होती. त्यामुळे ते दोन ते तीन दिवसांतून एकवेळा गावी परतत. त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी उस्मानाबादेत घर केले आणि पुन्हा नव्या उमेदीने अभ्यास सुरू केला. या मेहनतीला फळ मिळून संगीता राठोड यांची उपजिल्हाधिकारी पदाकरिता निवड झाली.

Tuesday, June 16, 2015

किल्ले पट्टा ऊर्फ विश्रामगड

महाराष्ट्र व दक्षिण भारतातील मिळून एकूण ३६० गड-किल्ले व दुर्ग शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते. यातील किती गडांवर शिवाजी राजांचे पाय लागले असतील हे आपण नक्की सांगू शकत नाही. पण एक किल्ला मात्र असा आहे ज्याच्या बाबतीत आपण नक्की सांगू शकतो की छत्रपती शिवाजी राजांनी या गडावर एक-दोन दिवस नाही तर चांगलं महिनाभर वास्तव्य करून थकलेल्या शरीराला विश्राम दिला होता. आणि तो गड म्हणजे किल्ले पट्टा ऊर्फ ‘विश्रामगड ’.
fortउत्तर शिवशाहीच्या काळात शिवाजी राजांनी अखेरच्या क्षणी वास्तव्य केलेला गड म्हणून विश्रामगड ओळखला जातो. विश्रामगड ऊर्फ किल्ले पट्टाचा ट्रेक करण्यासाठी आम्ही रात्रीच मुंबईहून नाशिकला प्रयाण केले.
कसारा घाटाच्या खाली वाटेत एकदा चहापाण्यासाठी थांबून पहाटे साडेचारच्या सुमारास आम्ही गडाखालच्या पट्टा गावात येऊन पोहोचलो.
सकाळ झाल्यावर आम्ही गावातील दोन तरुणांना सोबत घेऊन सकाळी सात वाजता पेठ किल्ल्याकडे रवाना झालो. गाव पाठी पडताच गावापासून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत सर्वत्र तिळाची शेतीच शेती पाहण्यास मिळाली.
सगळीकडे तिळाची लागवड केलेली दिसत होती. जेथे पाहावे तेथे तिळाच्या पिवळया, पिवळया नाजूक फुलांचा बहर आला होता. गडाच्या पायथ्यापर्यंत पिवळा गालिचाच पसरलेला दिसत होता.
गडाकडे जाणारा रस्ता काही ठिकाणी मातीचा तर काही ठिकाणी पक्क्या दगडांचा आहे. किल्ल्याच्या जरा अलीकडे पाणवठयाची विहीर आहे. गावापासून पेठ गड हाकेच्या अंतरावर होता. वीस मिनिटातच आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचताच आम्ही चार-पाच जणांचा ग्रुप बनवून गड चढण्यास सुरुवात केली.
सुरुवातीलाच डाव्या हाताला काही गुहा व लेण्या पाहण्यास मिळाल्या. या गुहेत दुरुनच देवदेवतांच्या मूर्त्यां पाहण्यास मिळाल्या. कारण गुहेच्या तोंडाशी लाकडी दरवाजे बसवून ते कडीकुलूप घालून बंदिस्त केलेले होते. येथून जरा पुढे चढून येताच दगडातच खोदून काढलेल्या अस्सल शिवकालीन पाय-या लागतात. समोरच काताळात खोदून काढलेला प्रचंड बुरूज पाहण्यास मिळतो.
येथून पंधरा मिनिटांतच आम्ही गडावर प्रवेश केला. म्हणजे गड चढण्यास आपल्याला अर्धा तास भरपूर होतो. गडावर प्रवेश करताच समोरच पट्टाईदेवीचे मंदिर पाहण्यास मिळते. मंदिरात सिंहारूढ झालेली देवीची मूर्ती सुंदर व सुबक आहे. या मंदिराजवळच कातळात खोदून काढलेले पाण्याचे दोन टाक पाहण्यास मिळाले. या टाकाच्या उत्तरेला गडाचे महाद्वार दिसते.
महाद्वार अत्यंत शोभिवंत व कलाकुसरीने युक्त आहे. येथून वर चढून येताच उजव्या हाताला अजून एक महादरवाजा पाहण्यास मिळाला. हा दरवाजा खूपच सुरेख आहे. हा दरवाजा पाहून सारे आनंदित झाले. हा गडाचा दिल्ली दरवाजा आहे. आजही तो वैभवात असल्यासारखा वाटतो. येथून आम्ही जराशी चढण चढून गड माथ्यावर म्हणजे गडाच्या पठारावर येऊन पोहोचलो. हा गड प्रचंड मोठा होता. पट्टागड पाहून मला तोरण गडाची आठवण आली. कारण पट्टागडाच्या उजव्या हाताला चार ते पाच कि.मी. लांबीची माची दूरवर पसरलेली आहे.
या माचीला हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडयासारखी अभेद्य तटबंदी लाभलेली आहे. डाव्या हाताची माचीही चांगली ३ ते ४ कि.मी. लांबवर पसरलेली आहे. ही माची मात्र तट, बुरुजांनी बंदिस्त करून सुरक्षित केलेली आहे. या गडाच्या मधोमध राजगडाच्या बालेकिल्ल्यासारखी एक उंच टेकडी उंचावलेली पाहण्यास मिळते. गडावरील हे सर्वात उंच असलेले ठिकाण. या टेकडीच्या शिखरावर भगवा ध्वज डौलाने फडकत होता. ही टेकडी वगळता गडाला विस्तृत पठार लाभलेले आहे.
तसेच या गडाचे आजचे मुख्य आकर्षण म्हणजे गडाच्या मध्यभागी काळया दगडात बांधलेले तीन भव्य घुमट असणारे अद्भुत धान्य कोठार म्हणजेच अंबरखाना. तीनही घुमटांना मध्यभागी चौकोनी छिद्रे केलेली आहेत. तसेच या वास्तूला तीन दिशेला तीन प्रवेशद्वारे आहेत. पूर्वेकडील द्वार मात्र भव्य आहे. उत्तरेकडील प्रवेशद्वाराच्या आवारात पायाच्या वाघनखात हत्ती धरून ठेवल्याचे दगडी व्याघ्रशिल्प कोरलेले आहे. सध्या या सुंदर वास्तूचा उपयोग गडावर चरायला येणा-या गडाखालील गावातील लोकांच्या गाई, म्हशींच्या वसतीस्थानासाठी झालेला आहे. सगळीकडे या पशूच्या शेणांनी व मूत्रांनी चिखल झालेला दिसतो.
अंबरखाना ही वास्तू पाहून उजवीकडे पुढे आल्यावर पाण्याचे दोन टाक पाहण्यास मिळतात. या टाकाच्या बाजूलाच दगडात कोरलेले शिवलिंग आहे. येथून थोडे पुढे आल्यावर आपल्याला अर्धवक्र वाटीच्या आकाराचा भव्य, खोल व रौद्र कडा पाहण्यास मिळतो. येथे भन्नाट वारा बेफाम उधळत होता. हा हवाहवासा वाटणारा वारा अंगावर घेत आम्ही दक्षिण दिशेला टोकावर पोहोचलो आणि आश्चर्यचकित झालो. कडयाच्या खाली छोटया, छोटया टेकडय़ांवर अनेक अजस्त्र पवनचक्क्या पाहण्यास मिळाल्या.
आसमंत स्वच्छ असेल तर येथून दूरवरील आलंग, कुलंग, मदन, हे जोड किल्ले व कळसुबाई शिखर पाहण्यास मिळतात. तसेच कडवा नदी व त्यावरील धरण व सभोवतालचा परिसर पाहून थक्क व्हायला होते. तसेच गडावर अनेक ठिकाणी ढासळलेल्या स्वरूपात तटबंदी पाहण्यास मिळते. गडाच्या प्रत्येक माचीच्या टोकावर बुलंद बुरूज बांधून माची अजिंक्य केलेली आहे.
गडाच्या विविध भागात फिरताना ब-याच ठिकाणी वाडयाचे जोते व सांगाडे पाहण्यास मिळाले. या गडावर आजही पाण्याचे अनेक सुंदर टाक आहेत. येथे पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय आहे. पण गडावर वास्तव्याची सोय मात्र नाही. हा गड प्रचंड मोठा आहे. एका दिवसात सगळा गड पाहून होत नाही. या गडावर पाहण्याजोगे बरेच काही आहे. पण वेळेच्या अभावी आम्हाला सगळा गड पाहता आला नाही.
किल्ले पट्टा ऊर्फ विश्रामगड हा समुद्रसपाटीपासून ४५६० फूट व १३९० मीटर उंचावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान प्रमुख पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला सन १६७१ मध्ये मोगलांकडून जिंकून घेतला. शिवाजी महाराजांनी १६ नोव्हेंबर १६७९ रोजी जालन्याची लूट केल्यानंतर मोगल सरदार रणमस्त खान महाराजांवर चालून आला. पण महाराजांनी त्याचा पराभव करून त्याला पिटाळून लावले.
तरी लगेचच फिरून खान व केसर सिंग मोठी फौज घेऊन महाराजांवर चालून आले. त्यांनी संगमनेरजवळ महाराजांना सर्व बाजूंनी घेरले असता महाराजांचा इमानदार प्रमुख बहिर्जी नाईकने मोठया चलाखीने राजांना रणक्षेत्रातून बाहेर काढून छुप्या मार्गाने पट्टा गडावर सुखरूप आणले. वाढते वयोमान, सतत धावपळ, दगदगीने महाराज थकून गेले होते. त्यांना विश्रांतीची अत्यंत गरज होती. म्हणून महाराज अखेरच्या काळात प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे येथे महिनाभर राहिले. त्यामुळेच या गडाला विश्रामगड हे नाव पडले.
आम्हाला मुंबईला परतायचे असल्यामुळे दुपारी दोन वाजता गड उतरून परतीच्या प्रवासास लागलो. वाटेतच एका उपाहारगृहात दुपारची पोटपूजा आटपून जरा आडवाट करून टाकेद या तीर्थक्षेत्राचे दर्शन घेतले. येथली पायधूळ मस्तकी लावून मुंबईची वाट धरली.

इंदोरेच्या वाटेने कळसूबाई

संदीप, तुषार आणि संकेतने तुफान वा-या-पावसात कळसूबाईच्या ५,४०० फूट उंचीच्या शिखरावर इंदोरेच्या अतिशय बिकट वाटेने चढण्याचं आव्हान लीलया पेललं. त्या थरारक अनुभवाचा वृत्तांत
 
ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वाहणा-या वा-याच्या झंझावातात उडून जाऊ की काय, अशी भीती वाटत होती. अंगावर पडणारे पावसाचे टपोरे थेंब बाभळीच्या काटयासारखे टोचत होते. यातच भर म्हणून की काय धुकं एवढं होतं की, समोरच्या दहा फूट अंतरावरसुद्धा दिसत नव्हतं. आम्ही एवढी वर्ष सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग करत आहोत, पण त्या दिवशी पहिल्यांदाच सह्याद्रीचं हे रौद्र रूप ‘याची देही याची डोळा’ पाहिलं. अशा या भयावह वातावरणात मी, संकेत आणि तुषार, इंदोरे रूटच्या अवघड वाटेवरून कळसूबाई शिखर चढत होतो.
अंदाजे ४ हजार फुटांवर आम्ही अतिशय तीव्र चढण चढताना कधी तुषार तर कधी संकेत रूट ओपन करत होते. प्रत्येक पाऊल अतिशय तोलून-मापून टाकत होतो. एक छोटीशी चूकसुद्धा इंदोरेच्या तीव्र खोल दरीत फेकले जाण्यामध्ये परिवर्तित झाली असती. आम्ही योग्य दिशेने जात आहोत की नाही, याचीसुद्धा कल्पना येत नव्हती. एव्हाना आम्हाला आपण कळसूबाईच्या धुक्यात हरवले असल्याची जाणीव झाली होती.
कळसूबाई हे ५,४०० फूट उंचीचं महाराष्ट्रातील सगळय़ात उंच शिखर. नगरमधील बारी गावातून कळसूबाईला जाण्यासाठी चांगली वाट आहे. या वाटेवर गावातील लोकांनी ठिकठिकाणी लोखंडी शिडया लावून चढणं थोडं सोपं केलं आहे, पण नेहमीच आडवाटा धुंडाळणं हा आमचा शिरस्ता असतो. त्यानुसार नाशिकमधील इंदोरे गावातील अवघड  वाटेवरून कळसूबाई चढण्याचं ठरवलं. सर्व तयारीनिशी आम्ही आदल्या दिवशी रात्री इगतपुरीला निघालो. मध्यरात्री तीन वाजता उतरलो. इंदोरे गावाला जाणारी बस पहाटे ६ वाजता असल्यामुळे इगतपुरी स्टेशनवरच दोन तास पहुडलो. पहाटे साडेपाचला तुषारने उठवलं. आम्ही डोळे चोळतच उठलो. गरमागरम चहाचा झुरका मारला. अहा..! तो एक स्वर्गीय आनंदच होता.
पहाटे सहाच्या सुमारास इंदोरेसाठी बस पकडली. रिमझिम रिमझिम पाऊस सुरूच होता. सकाळी सातच्या दरम्यान इंदोरे गावात उतरलो आणि आळस देत सभोवतालच्या निसर्गाकडे नजर टाकली. चहूबाजूला फक्त हिरवेगार डोंगर होते. ते पाहून आमचा आळस कुठे पळून गेला हे कळलंच नाही. असं वाटलं की, हा हिरवागार डोंगर म्हणजे एखादी नवी नवरी हिरवागार शालू लेवून बसली आहे.
संकेतच्या हाकेसरशी माझी तंद्री भंगली. मी त्यांच्याबरोबर गावाच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. तेवढयात तुषारने ‘कळसूबाई’ नावामागची आख्यायिका सांगितली. पूर्वी या शिखराच्या खालच्या गावात कळसूबाई नावाची एक अनाथ मुलगी राहत होती. बिचारी अनाथ असल्यामुळे सगळय़ांच्या घरची धुणी-भांडी करायची. कोणी देईल ते खायची. सगळे गावातले लोक तिला हिडीस-फिडीस करायचे. एके दिवशी ती सगळय़ांच्या त्रासाला कंटाळून या उंच शिखरावर आली आणि देवीची प्रार्थना करत बसली. तिला देवी प्रसन्न झाली. पुढे गावक-यांनी इथे देवीचं मंदिर बांधलं अणि तिच्या नावावरूनच मंदिराला ‘कळसूबाई’ असं नाव दिलं.
एव्हाना आम्ही बोलत-बोलत मुख्य रस्त्यावरून इंदोरे गावात पोहोचलो. गावक-यांशी बोलून आम्ही आमचा चढणीचा मार्ग आखला. सुरुवात केली. थोडासा पाऊस होता, पण मजा येत होती. या भागात आंबा, जांभूळ, कडुनिंब सर्व प्रकारची झाडं आढळली. सुरुवातीचा टप्पा ओलांडून वर गेलो तसं खालच्या भागातील गावाचं दृश्य विहंगम वाटत होतं. हळूहळू आकाशात ढगांची रेलचेल वाढली. खूप काळोख पडला. असं वाटलं की, आता भरपूर पाऊस पडणार आणि तेवढयात रिप-रिप रिप.. करत जोरात पासाला सुरुवात झाली वारासुद्धा जोराने वाहू लागला. धुक्यामुळे दिसायचंही थोडं कमी झालं. आधीच कळसूबाई शिखर धुक्यात हरवलं होतं आणि आता आम्हीही.
चिंब भिजलेल्या शरीरावरून पाणी निथळत होतं. हात थरथर कापत होते. निसर्गाने असं आक्राळ-विक्राळ रूप दाखवलं होतं. अशा परिस्थितीतही आम्ही खंबीरपणे ४ हजार फुटांवरील चढण पूर्ण केली. आणि वरच्या पठारावर पाऊल ठेवलं, तेव्हा मी जे पाहिलं त्यावर माझाच क्षणभर विश्वास बसला नाही. माझ्यासमोर निरनिराळया रंगांच्या फुलांचा जणू काही गालीचा होता. हिमालयातील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ची आठवण झाली. पावलापावलावर बदलणारा निसर्ग हीच कळसूबाईची खरी ओळख आहे. याची प्रचिती आम्हाला आली. परंतु ताशी ८०-९० किलोमीटर वेगाने वाहणारा वारा चालू देत नव्हता. बोचऱ्या पावसात डोळेसुद्धा उघडता येत नव्हते. आम्ही एक मोठा दगड बघितला आणि त्याच्या आडोशाला बसालो. वारा, पाऊस आणि धुकं अशा भयंकर परिस्थितीत आम्ही अडकलो. कळसूबाई कुठे आहे? कुठलीच वाट दिसत नव्हती. परत जायचं म्हटलं तर ती वाटसुद्धा धुक्यात गुडूप झाली होती.
आम्ही तिथेच दगडाच्या आडोशाला अर्धा तास बसून बिस्किटं खाल्ली. एकमेकांचं मनोधैर्य वाढवून पुन्हा उभे राहिलो आणि अंदाजे एक वाट पकडून वा-याशी झुंजत वर चढत राहिलो. बरीच चढाई केल्यानंतर हळूहळू लोकांचा आवाज येऊ लागला. मंदिराच्या जवळपास पोहोचल्याची जाणीव झाली. पूर्ण त्वेषाने चढाई केली. आता फक्त एक सरळसोट दगड होता. वर मंदिर दिसत होतं. आम्ही ते दगडातील चिमनी क्लायंबिंग करून वर चढलो. एकच जल्लोष झाला. तिघांच्याही चेह-य़ावरून आनंद ओसंडून वाहत होता. तो आनंद होता धेयपूर्तीचा आणि जीव वाचल्याचाही..
आम्ही तिघंही मंदिरात गेलो. देवीची पूजा केली आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाणी येऊन आमच्या ‘अबॅरंट वाँडरर्स’ (www.aberrantwanderers.com) या साहसी ग्रुपचा संकल्प केला. तिघंही खूप आनंदी होतो. मला शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतलेल्या प्रसंगाची आठवण झाली. अशा रीतीने आमच्या ‘अबॅरंट वाँडरर्स’ या साहसी ग्रुपची प्रतिकूल परिस्थिती ऐतिहासिकरीत्या कळसूबाई शिखरावर स्थापना झाली. बोच-या थंडीमुळे जास्त वेळ वर राहणं शक्य नव्हतं.
थोडा वेळ मंदिरात घालवल्यानंतर आम्ही बारीच्या वाटेने खाली उतरण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशीच्या सर्व घटनाक्रमांमुळे आम्ही तिघंही वेगळय़ाच विश्वात होतो. आम्ही वा-याच्या वेगाने खाली उतरत होतो, तेव्हा अनेक जण वर येत होते. आमचा उतरण्याचा वेग पाहून बरेच जण आश्चर्यचकित होत होते. अबॅरंट वाँडरर्स निमित्ताने आम्ही अ‍ॅडव्हेंचरच्या नव्या पर्वाला सुरुवात केली होती. दिवसभरातील घटनाक्रमाने मन भारावून गेलं होतं. खाली उतरल्यानंतर नम्रपणाने सह्याद्रीला नमन करून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला, पण मन अजूनही कुठेतरी धुक्यात हरवलं होतं.

निसर्गशिल्प.. सांधण व्हॅली

लाखो-हजारो वर्षे तो ऊन-वारा व पावसाचे तडाखे सह्याद्रीतल्या कातळावर, डोंगर-द-यांवर, पठारांवर बसतात. हे तडाखे वर्षानुवर्षे झेलल्यावर आकाराला येतात त्या नानाविध रचना. कधी कोकणकडयाचे रौद्र रूप, तर कधी साहसाला साद घालणारे सुळके, तर कधी रांजण खळगे. ही शिल्पकला घडतेच मुळी डोंगरकपा-यांत. निसर्गाची ही अशी अद्भुते पाहायची असतील, तर मात्र वाट थोडी वाकडी करण्यावाचून पर्याय नसतो.
sandhan5महाराष्ट्रातलं एक अनोखे निसर्गशिल्प आपल्या सह्याद्रीत दडलेले आहे. भंडारदराजवळील सांधण व्हॅली पाहल्यानंतर निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ शिल्पकार आहे याची प्रचिती येते. मातीचा जराही स्पर्श नाही की रस्त्याशी संबंध नाही. मोठमोठय़ा दगडांमधून वाट काढत आणि त्यावरून उडय़ा मारत पुढे जायचं. सोबतीला उंच, उभाच्या उभा काळकभिन्न कातळ..
या कातळिभतींची उंची इतकी आहे की सूर्यकिरण शेवटपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळेच तिथे सावल्यांच्या विविध छटा आणि प्रकाशाचे खेळ प्रत्येक वळणावर दिसतात. तसेच डोंगराच्या कुशीत उगम पावणा-या धबधब्याच्या मार्गाने चालायला सुरुवात करून थेट नदीपर्यंत जाण्याचा अनुभव हा शब्दांच्या पलीकडचा आहे! हे वर्णन आहे सांधण व्हॅलीचे. ही व्हॅली म्हणजे चकित करणा-या अनेक गोष्टी, सावल्यांचा खेळ आणि थरार यांचा खजिनाच आहे.
मुंबई-इगतपुरी-घोटी-शेंडी (भंडारदरा)- पांझरे-उडदवणे-साम्रद गाव या मार्गाने सांधण व्हॅलीजवळ पोहोचता येते. एकीकडे रतनगड, लांबवर सह्याद्रीतील अतिशय कठीण अशी कळसूबाईची डोंगररांग, त्यातून थेट लक्ष वेधून घेणारे अलंग, मदन, कुलंगसारखे अभेद्य किल्ले, चहूकडे जंगल असलेल्या मोठय़ा पठारावर वसलेले इनमीन शंभरेक घरांचे सांधण व्हॅलीजवळचे साम्रद हे गाव. सांधण व्हॅलीमुळे हे गाव जगाच्या नकाशावर आले आहे.
गावातून बाहेर पडल्यावर कातळाच्या सडय़ावरून पुढे जात वाट दाट झाडीत शिरते. थोडय़ाच वेळात आपण एका घळीच्या मुखाशी येतो. सांधण दरीचे वैशिष्टय़ म्हणजे ही जमिनीच्या पातळीखाली आहे. अतिशय अरुंद अशी ही लांबच लांब जमिनीला पडलेली भेग आहे. घळीच्या सुरुवातीलाचा एक जिवंत झरा आहे. जो कधीही आटत नाही. दगडांनी तो बंदिस्त केल्यामुळे अतिशय निर्मळ व थंडगार पाणी पिण्यास योग्य आहे. आपण घळ उतरायला लागतो. सुरुवातीचा सोपा कातळ टप्पा उतरून आपण आत दरीच्या नाळेत प्रवेश करतो.
आत दरी सापासारखी लांबच लांब वळण घेताना दिसते. दोन्ही बाजूला काळ्याकभिन्न कातळकडय़ांनी ती बंदिस्त केलेली आहे . या घळीच्या प्रथमदर्शनीच आपण प्रेमात पडतो. त्याचे राकट स्वरूपच भुरळ घालते. आपण आपसूकच पुढे जात राहतो. वाटेत मात्र जपून पावले टाकावी लागतात, कारण काही मोठमोठे दगडधोंडे व शिळा ओलांडाव्या लागतात. पहिला कातळटप्पा उतरताच एका पाणवठय़ाने आमचा मार्ग अडवला. त्या पाण्यातून, शेवाळलेल्या दगडांवरून आपणास कौशल्याने मार्ग काढत पलीकडे जावे लागते.
एव्हाना आपण ब-यापैकी आत गेलेले असतो. नजर उंचावून पाहिली की लक्षात येते, आपण थेट डोंगराच्या मधोमध खोदलेल्या भेगेत आहोत. ही भेग तरी केवढी ४५०-५०० फूट खोल, फार फार तर २५ फूट रुंद, कधी कधी १० फूटदेखील आणि एक किलोमीटर लांबीची आहे. परत आपला मार्ग दुस-या मोठय़ा पाणसाठय़ाने अडवला जातो.
सूर्याची किरणे येथे कधीही पोहोचू शकत नसल्याने येथील अतिशय थंडगार अशा त्या कंबरभर पाण्यातून लांब चालण्याचा थरार प्रत्यक्ष अनुभवातूनच येतो. काहीवेळा छातीपर्यंत पाणी असल्यामुळे बॅगा डोक्यावर घेण्यावाचून गत्यंतर नसते. डोंगराच्या पोटातील आपला प्रवास चालूच ठेवायचा. दोहो बाजूंचे उंच उंच कातळकडे व आकाशाच्या छोटय़ा तुकडय़ापलीकडे काहीही दिसत नाही.
आता हा व्हॅली रुंद होत जाते. तसा त्याचा उतारदेखील वाढत जातो. म्हणजे मग डोंगरकडय़ाजवळ आलो असे समजावे. तेव्हा समोर पुन्हा सह्याद्रीचे रौद्र स्वरूप आपल्या स्वागताला हजरच असते. भन्नाट वारा अंगावर झेलत मागे वळून पाहिले की, ती व्हॅली अंगावरच येते असते वाटते. या व्हॅलीतून पुढे काही अवघड कातळारोहण टप्प्यांवरून जात करोली घाटाला जाऊन मिळतो. व्हॅली उतरून साकुर्ली गावात यायचे.
त्या गावातून दहाएक मिनिटांवर डेहणे गाव आहे. या गावातून आसनगावला जाण्यासाठी बस किंवा खासगी वाहन मिळते. अप्रतिम अशा या निसर्गचमत्काराने आपण अवाक् होतो. ही अरुंद घळ पाणी व ज्वालामुखी यांच्या एकत्रित परिणामामुळे बनली असावी. पूर्ण सांधण दरीत कधीही ऊन पोहोचत नाही त्यामुळे तेथे कायमच सुखद गारवा असतो.
पावसाळ्यात सांधण व्हॅलीत शिरण्याचा मार्ग बंदच असतो. पाऊस सरला की नोव्हेंबरच्या दरम्यान हा मार्ग खुला होऊ लागतो. सांधण व्हॅलीचा ट्रेक करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी हमखास घ्यावी ती म्हणजे, अनुभवी ग्रुपसोबतच इथे जावे. गरज असल्यास एखाद्या गावक-याला सोबत घ्यावे. खडक, पाणी व जंगलातून वाट काढावी लागत असल्यामुळे, अनेकदा सरपटणा-या प्राण्यांशी गाठभेट होते, मग पायाच्या संरक्षणासाठी म्हणून चांगले बूट घालणे व कपडय़ाची एखादी जोडी सोबत असणे अत्यावश्यकच आहे. धाडस म्हणून चुकून देखील दरीत एकटय़ाने जाणे टाळावे.

चढणीच्या माशांमध्ये चवीला सर्वात मस्त म्हणजे मळये, त्यानंतर शेंगटी, मग खवळा, डेकळा, दांडकी, खडस, वाळव, काडी, करजुवा, झिंगू, सुळे.. तशी प्रत्येक भागात माशांची नावे वेगळी आणि चवही वेगळी.. अशी मासेमारी करणा-या तरु णांची-ज्येष्ठांची टोळकी ग्रुप करून येतात, मासेमारी करतात. वाटे पाडतात. काही वाटे घरी पोहोचतात तर काही वाटे पार्टीला वापरले जातात. ब-याच वेळा नदीकिनारीच किंवा शेतातच या पाटर्य़ा रंगतात.रिमझिमत्या पावसात गरमागरम माशाचे तिखले अहाहा..ऽऽ
fishपावसाची रिपरिप वाढू लागताच शेतकऱ्यांच्या जशी दैनंदिनी बदलू लागते तसा त्यांचा आहारही बदलतो. सहयाद्रीतील धबधबे वाहू लागतात. सहयाद्री ते सागर अशी ओहोळांची साखळी एकदा का पूर्ण झाली की वसुंधरेचे रूपच बदलून जाते. ख-या अर्थाने पावसाळयाला गती येते. ओहोळ खळाळू लागले की, एरव्ही उन्हाळयात पाण्यासाठी तहानलेल्या नदीतील कोंडी भरून वाहू लागतात. याच कोंडींमध्ये असलेले मासे आता नव्या जगात जाण्यासाठी सैरभैर धावू लागतात. जणू काही आता येथे राहणेच नको. यापेक्षाही चांगले तळे पाहूया म्हणून त्यांची शर्यत सुरू होते. खळाळत्या धबधब्यांच्या विरुद्ध दिशेने ते प्रवास करू लागतात. ही माशांची चढाओढ पाहणे म्हणजेच एक दिव्य असते.
साखळी सुटली की पुढचे दहा ते पंधरा दिवस चढणीच्या माशांचा उडणारा फर्रा आणि झालेली धावपळ, अंगावर रिमझिमणारा पाऊस आणि हातात एखादा दांडा घेऊन माशाला पकडण्यासाठी कसरत करणारी टोळी..सध्या मुलखातल्या गावांमध्ये दिसणारे हे दृश्य.
पावसाला सुरु वात होताच सुकलेले ओहळ, आटलेल्या नद्यांच्या कोंडी भरभरून वाहू लागल्या की एवढयाशा डबक्यात राहिलेले मासे मुक्त होतात. पाऊस कोसळतच असतो. प्रवाह वाढत जातो आणि माशांची झुंबड धावू लागते, पाण्यावर उडू लागते आणि या उडणा-या माशांना, सैरावैरा धावणा-या माशांना पकडण्यासाठी सर्वांची एकच धावपळ. अंधार पडल्यानंतर तर माशांची लगबग अधिकच वाढते. मग बत्तीवरची मासेमारी सुरू होते. अचानक प्रकाश पाहून मासे थबकतात आणि खवय्यांची शिकार होतात.
पाऊस धुवाधार बरसू लागताच माशांची चढाओढ लागते. त्यांना नव्या जगात जायची घाई असते आणि सैरभैर झालेल्या माशांना कधी एकदा पकडतो असे शेतक-याला झालेले असते. माशांची आणि शेतकरी या दोघांच्या पळापळीत मोठी कसरत रंगते. एरव्ही उन्हाळयात कोंडीच्या तळाशी जाऊन बसलेले हे गोडया पाण्यातील मासे पावसाबरोबर थव्याने पुढे सरकू लागतात आणि या माशांना पकडण्यासाठी सारेच जण सरसावतात. हरतऱ्हेची शस्त्रे बाहेर पडतात. ही शस्त्र म्हणजे या भागाची एक वेगळी ओळख आहे. डोम, आके, पागरे, हूक, भरीव बांबूच्या काठय़ांनी तयार केलेली गरी. आके (गोल छोटेखानी जाळयाचा प्रकार) पागरे (छोटे जाळे, याला लोखंडी किंवा जस्ताचे तुकडे वजनासाठी जोडलेले असतात.) हे साहित्य बाहेर पडते. गढूळ पाण्यामध्ये माशांच्या हालचाली टिपत त्यांना पकडण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न होतात. काही मंडळी नदीच्या मुख्य मोक्याच्या जागी ‘किव’ही घालतात. मासे मारण्यासाठीचा लाकडी सापळा तयार करतात. या साखळी लागण्याच्या दिवसात चढणीचे मासे मारण्यासाठी हौसे, नवसे तयार असतात. चढणीच्या माशांची मज्जा जेवढी सांगावी तेवढी थोडीच. माशांच्या कसरतीप्रमाणे त्यांच्या कलेने घेत अलगद पिशवीत भरणारे अनेक महाभागांची कसरत पाहण्यासारखीच असते.
चढणीच्या माशांमध्ये चवीला सर्वात मस्त म्हणजे मळये, त्यानंतर शेंगटी, मग खवळा, डेकळा, दांडकी, खडस, वाळव, काडी, करजुवा, झिंगू, सुळे. तशी प्रत्येक भागात माशांची नावे वेगळी आणि चवही वेगळया.. अशी मासेमारी करणा-या तरु णांची-म्हाताऱ्यांची टोळकी ग्रुप करून येतात, मासेमारी करतात. वाटे पाडतात. काही वाटे घरी पोहोचतात तर काही वाटे पार्टीला वापरले जातात. ब-याच वेळा नदीकिनारीच किंवा शेतातच या पाटर्य़ा रंगतात. रिमझिमत्या पावसात गरमागरम नुसते मीठ-मसाल्यात परतलेले मासे खाणे म्हणजे अहाहा.ऽऽ झणझणीत याचा अर्थ येथेच समजतो..
रात्री रॉकेलचे दिवे पेटवून नदीच्या किना-याने फिरत असताना सैरावैरा धावणारे मासे, कुल्र्याना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. हा हंगाम या माशांचा विणीचा हंगाम. चढणीचे मासे प्रवाहाच्या विरोधात पोहून जातात आणि नेमक्या ठिकाणी अंडी घालतात. हा त्यांच्या प्रजोत्पादनाचा फंडा असतो. नद्यांच्या पाण्याला यावेळी वेग असतो, परंतु चढणीच्या या माशांचा पिले जन्माला घालण्याचा आवेग त्याहीपेक्षा अधिक असतो. त्यामुळे ते प्रवाहाविरु द्ध पोहतात, टिकतात आणि त्यांचा जन्म सफल करतात. प्रत्येक मासा आपली पिलावळ वाढविण्याच्या इच्छेखातर हजारो अंडी कुशीत घेऊन पुढचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करत असतात. एकदा का कोंड सोडली की आगीतून फुफाटयातच असा त्यांचा प्रवास सुरू होतो. नदीचे पाणी पुरामुळे आजूबाजूच्या शेतात घुसते, हे मासे मग त्या शेतात मिळणारे किडे, कीटक, मुंगी यावर ताव मारतात. ज्याप्रमाणे पावसाळयात
पाऊस-पार्टीचे वेध
तरुणाईला लागतात तशीच त्या माशांचीही ती एक प्रकारची पार्टी असते, पण एकदा शेतात किंवा पाण्याबाहेर पडल्यानंतर या माशांना प्रवाहात परतणे अवघड होते आणि मग त्यांची शिकार होते. चढणीचे मासे मारण्यासाठी सारेच जण टपलेले असतात. उन्हाळयात हे मासे एवढया संख्येने कुठे असतात? पावसाबरोबर ते बाहेर कुठून पडतात? हा सर्वसामान्यांना प्रतिवर्षी पडलेला प्रश्न. रात्र होताच आज कुठच्या डोहाकडे मासे मारण्यासाठी जायचे. हा बेत काही मंडळी ठरवत असतात. मग दिवे काढले जातात. पूर्वी पेट्रोमॅक्सवरून मासेमारी केली जायची. हे दिवे धरण्यासाठी एक विशेष माणूस असायचा. हे दिवे धरण्याची पद्धतही वेगळी होती. कारण दिव्यावर पाऊस किंवा पाणी उडू नये. याची दक्षता घेतानाच पेटत्या दिव्याची धगही थेट हाताला लागूनही ही दक्षता बाळगणे गरजेचे असायचे. शिलूक, काठया, लाठया, जाळे घेऊन मासेमारी केली जायची. तासा-दोन तासात किना-यावर लपत-छपत असलेले मासे अथवा डोहातून बाहेर पळणा-या माशांना पकडण्यासाठी धावपळ सुरू होते.
अलीकडे दिव्याची रचना बदलली. आता रॉकेलच्या दिव्यापेक्षा चायनीज दिवे वापरात येऊ लागले आहे. या दिव्यांवर पावसाचा तेवढासा फरक पडत नाही. अलीकडे काही मंडळींनी खास मासेमारीसाठी वॉटरप्रुफ दिवे विकत घेतले आहेत. पकडून आणलेल्या माशाचे तिकले खाण्याचा मोह कुणाला थोपविता येणार नाही. केवळ मीठ, मसाला आणि हळदीचे पान, त्रिफळ घालून माशांचे केलेले कालवण ही तर मालवणी मुलखातली चढणीच्या माशांची खास थाळी असते. या थाळीचा ज्यांनी आस्वाद घेतला त्यांना चढणीचे माशांची लज्जत समजेल ज्यांनी घेतला नाही त्यांनी सुसाट कोकण गाठावे..
आता फक्त गरवणेच
मच्छीमार नौका बंद झाल्याने आता गरीने अथवा पागून मासे मिळविण्यास सुरुवात झाली असून युवक व मुले मासळी पकडण्याचा गर घेऊन खाडीत मासळी पकडताना दिसत आहेत, तर पहिला पाऊस पडल्यावर बाहेर येणा-या कुल्र्या पकडण्यासाठीही रात्री बत्ती घेऊन फिरताना दिसत आहेत. नदीतून अथवा वहाळातून चढणीचे मासे मारण्यासाठी छोटी जाळी लावली जातात. तर किनारपट्टीला मासळी पकडण्यासाठी गर टाकून तासन् तास बसावे लागते.
देवगड बंदरानजीकच ब-याचशा नौकांना किना-यावर येण्यासाठी जागा नसल्याने खाडीतच प्लास्टिकचा कागद घालून नौका उभ्या करून ठेवण्याशिवाय पर्याय दिसत नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतरही काही मच्छीमार बांधव आपल्या नौका किना-यावर आणण्यात मग्न आहेत.तर काहींच्या नौकांवर पावसाळयातील संरक्षण म्हणूनच झापांचे आच्छादन तसेच प्लास्टिक कागद बांधण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. मासेमारीसाठी वापरण्यात येणारी जाळी तसेच अन्य सर्व सामान नीटनेटके ठेवण्याची लगबग दिसत आहे. दरवर्षी मे महिन्यातच हजेरी लावणारा पाऊस यावर्षी उशिरा दाखल झाला असून पावसाची वाट पाहणारा शेतकरी तसेच स्थानिक मच्छीमार मात्र पावसाची सुरुवात होताच आपल्या कामाला लागला आहे. परंतु खाडीला अद्याप पूर न आल्याने खाडीमध्ये माशांचा शिरकाव झाला नसल्याने मासे मिळण्याचे प्रमाण कमी असल्याचे मत येथील स्थानिक मच्छीमार बांधव व्यक्त करत आहेत.
अधिक प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यास खाडीला पूर येतो व त्या पुराबरोबरच मासे खाडीपात्रात शिरकाव करतात. या माशांमध्ये सुळे, तांबवसे, गुंजली आदी माशांचा समावेश असतो.पावसाळयातील खोल समुद्रातील मच्छीमार बंद असल्याने या माशांना चांगला भाव मिळतो.मात्र सध्या पावसाचा जोर कमी असून अद्यापही खाडीला पूर न आल्याने मासे मिळण्याचे प्रमाण कमी आहे.देवगड तालुक्यात वाडातर, टेंबवली-वानिवडे तर,मोंडतर, कट्टा, तारामुंबरी, मळई या खाडींमध्ये हे मासे मिळत असल्याने पारंपरिक पद्धतीने येथील स्थानिक मच्छीमार मासे पकडतात. याउलट परिस्थिती तांबळडेग, मोर्वे, मिठबांव या भागातील मच्छीमारांची असून पावसाळयात येथील मच्छीमारांना मात्र खाडीत मासे मिळत नसल्याने तीन महिने घरी जाळी विणणे यासारखी कामे करावी लागतात. देवगडमध्ये यावर्षीचा मासळी हंगाम हा मच्छीमारांच्या दृष्टीने तोटयातच गेला. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांची भिस्त आता पावसाळयातील पारंपरिक मच्छीमारीवर असून मुळातच पाऊस उशिरा दाखल झाल्याने मच्छीमारांच्या आशेवर पाणी पडले हे निश्चित. सध्या मच्छी मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने मच्छीचा भावही वधारला आहे. त्यामुळे अंडी व मटण व्यावसायिक मात्र तेजीत आहेत. देवगडमध्ये मच्छीच्या किमती या भरमसाट वाढल्या असून पापलेटच्या एका नगाची किंमत १५० ते २०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या वधारलेल्या किमती सर्वसामान्यांना परवडत नाहीत. लोकांनी आता सुके मासे, कालवे, तिसरे, मुळे व खेकडे घेण्यावरच भर दिला आहे.
या दिवसात सारेच काही झटपट उरकायचे असते.?पावसाला थांबण्याची हौस नसते. पदार्थ तयार करण्याच्या पद्धती तेवढयाच झटपट. खमंग हळदीच्या पानात मिरपूड, त्रिफळ, हळद, मीठ, मसाला घालून सोरकुलात किंवा चुलीवर केलेला माशांचा तिखला लय भारी. सध्या समुद्राची मासेमारी थांबली आहे.?अशा कालावधीत चढणीच्या माशांच्या तिखला खायचा बेत या मुलखात झक्कास जमतो.?गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत झणझणीत तिखले जिभेवर पोहोचण्यापूर्वी?लाळ गळत असते आणि खमंग वासाने एक घास अधिकच जातो. खरपूस वासामुळे चटणीही  खरवडून खावीसी वाटते.
जसे तिखले तसाच मोटलासुद्धा.. पकडलेल्या इवल्याशा माशांना हळद, मीठ, मसाला आणि कोकमची दोन सोलं टाकून हळदीच्या पानात पुरचुंडीप्रमाणे  गुंडाळले जाते. त्याला पुन्हा कुंबियाच्या पानाने बांधून ती रसरशीत आगीत भाजली जाते. पाऊस सुरू होताच घरातील पडवीमध्ये कांबळे सुकविण्यासाठी न्हाणी घरात अथवा चुलीवर उतव (ओले कपडे सुकविण्यासाठी बांधण्यात आलेली बांबूची चौकड) बांधले जातात. याच चुलीत हा मोटला टाकला जातो. काही मिनिटातच पानांचा रंग बदलतो आणि खमंग वास सुटतो. अहाहाऽऽऽ हाच तर स्वाद हळुवार पोहोचणा-या सर्देलेल्या थंडीतही हा मोटला स्वर्गीय थाळीचा आनंद देतो.
अलीकडे चढणीच्या माशांचा मोटला खाण्याचे भाग्य आजच्या पिढीला मिळत नाही. कारण पाऊस जसा बदलला आहे तसेच नदींचे प्रवाहही बदलले आहेत. अनेक कोंडी संपल्या आहेत. उन्हाळी होणा-या मासेमारीमुळे गोडया पाण्यातील या नदीतल्या माशांची पैदासही थांबली आहे. मळवे, डेकळय़ांचे कालवण आता दुर्मीळ होण्याची चिंता आहे. पुढचे पुढे, आज मात्र चढणीच्या माशांचा बेत सहयाद्रीतल्या अनेक गावांमध्ये रंगला आहे हे मात्र खरेच!.
साखळी लागण्याची आजही प्रतीक्षाच आहे. सध्या नद्यांमध्ये प्रवाहही कमी असून या प्रवाहावरून जाणारे मासे मारण्यासाठीची लगबग सुरू आहे. मासे मारण्यासाठी येंड, शेंडी, कांडाळी, आक्या, जावला, कोयता, शिलूक आदी साधने घेऊन हे हौशी लोक नद्या-नाल्यात फिरताना दिसतात. तर रात्रीच्या वेळी बत्तीच्या उजेडात हे लोक मासे पकडताना पाहायला मिळतात.
पाण्याच्या डोहातील मासे पकडण्याची एक पद्धती म्हणजे मासे पागवणे. एक मोठे जाळे घेऊन लोक ते या डोहात टाकतात व सर्व बाजूंनी पाण्याच्या तळाशी दाबून धरतात. यावेळी मध्ये फसलेले मासे या जाळयात अडकतात. कांडाळी म्हणजे एक लांब जाळे असते. हे जाळे पाण्याच्या प्रवाहात पाणी शांत असलेल्या ठिकाणी आडवे टाकले जाते. यामुळे वर जाणारे मासे या जाळयात अडकतात. पाण्याच्या खाली कोसळणा-या प्रवाहातून वर उडया मारून जाणारे मासे अलगदपणे शेंडीत झेलले जातात.
या शिवाय शिलूक आणि शिगेच्या सहाय्यानेही मासे मारले जातात. खवळे, मळवे, टोळ, शेंगटी, ठिगूर, वाळय, काडी आदी मासे सध्या जोरदार मिळत आहेत. कणकवलीच्या गडनदीपात्रात सध्या हे चढणीचे मासे मारण्यासाठी लोकांची मोठी वर्दळ आहे. मासेमारीची अनेक साधने घेऊन लोक दिवसरात्र या पात्रात फिरताना दिसतात.

Wednesday, June 10, 2015

गंध हरवला मातीचा..
मातीत जिवंतपणा अलीकडे नाहीसा झाला आहे. तो संपत चालला आहे.?पावसाचे नियमित अवेळी येणे हे जसे वाढले आहे.?तसेच मातीलाही खतांचा डोस दिला जाऊ?लागल्याने तिचे मूळचे सौंदर्य?नाहीसे होऊ लागले आहे. लाल मातीतला पहिल्या पावसाबरोबर हवा-हवासा वाटणारा गंध आता नाकापर्यंत पोहोचत नाही.?शेतक-यांची हजारो वर्षे सेवा करणारे अ‍ॅक्टिनोमायसिटीस जमिनीत त्यांना हवे ते अन्न न मिळाल्यामुळे मृत्यूच्या वाटेवर प्रवास करू लागले. त्यामुळे पहिल्या पावसाचा गंध हरवला आहे.
पूर्वी मृगाच्या पहिल्या सरी पडल्या की भिजलेल्या मातीचा सुगंध सर्व आसमंतात पसरत असे. गेली दोन दशके पहिल्या पावसात मातीस येणारा गंध कुणी अनुभवला आहे का? उत्तर अर्थात नाहीच असणार.
ज्या मातीत पहिल्या पावसात जास्त गंध सुटतो, ती माती अधिक सुपीक असते. अशा जमिनीतून भरपूर उत्पादन मिळते. पोटात ओलावा साठवून ठेवणारी आणि कणांना घट्ट धरून ठेवणारी ही माती ह्युमसने समृद्ध असते. नत्र आणि कर्बाचे प्रमाणही या मातीत अधिक असते. आपण म्हणाल, की मातीच्या गंधाचा आणि उत्पादनाचा काय संबंध? हेच तर विज्ञान आहे,जे आपल्या सर्वानाच समजून घेणे आवश्यक आहे. पहिल्या पावसानंतर मातीस येणारा सुगंध ,शिवारात पसरलेला सुवास हा अ‍ॅक्टिनोमायसिटीस या जमिनीमध्ये असणा-या तंतुमय जीवाणूपासून उत्पन्न झालेला असतो. निसर्गाने शेतक-यांना सेंद्रिय शेतीसाठी भेट दिलेला हा परोपकारी जीवाणू खेळती हवा असणा-या जमिनीच्या वरच्या थरामध्ये मोठय़ा प्रमाणात आढळतो.
जमिनीचा घट्ट काळा रंग ह्युमसमुळे असतो आणि अ‍ॅक्टिनोमायसिटीसमुळेच ह्युमसची निर्मिती होते. जमिनीचे काळी आई हे नावसुद्धा याचमुळे. वनस्पतीजन्य सेल्युलोज, लिग्निन आणि मृत कीटकांच्या टणक आवरणामधील ‘कायचीन’ हे या जीवाणूंचे मुख्य खाद्य. जमिनीमध्ये या सर्व घटकांचे ते पूर्ण विघटन करून त्यातील मूलद्रव्ये पिकांच्या मुळांना सहज उपलब्ध करून देण्याचे त्यांचे कार्य अव्याहत चालू असते.
अ‍ॅक्टिनोमायसिटीसमुळेच पिकांची वाढ जोमाने व निरोगी होते आणि ती सुद्धा कमी पाण्यात, फक्त ओलाव्याच्या साहाय्यानेच. खरीपानंतर रब्बीचे पीक आणि त्यानंतर काढणी झाली की उन्हाळा सुरू होतो. जमिनीमधील ओलावा कमी होतो आणि अ‍ॅक्टिनोमायसिटीसचे रूपांतर सूक्ष्म गोल कणांमध्ये होते. कोरडय़ा चिमूटभर मातीत असे लाखो जिवंत गोल कण असतात.
पहिला पाऊस पडला की हे कण जमिनीमध्ये लगेच रूजतात, व त्यांच्या नवीन जीवन प्रवासाची सुरुवात होते. पहिल्या वळणाच्या अथवा मृगाच्या पावसाच्या टपो-या थेंबांनी मातीचे कण उडतात, त्याचबरोबर अ‍ॅक्टिनोमायसिटीसचे सूक्ष्म कणही हवेत दूरवर पसरतात. आणि त्यांचा सुवास सर्वत्र दरवळत राहतो. व्हॅनिला अथवा अत्तरासारखा हा सौम्य गंध मातीतून निर्माण झालेला असतो. म्हणून तो मृदगंध. या गंधावरून हे सिद्ध होते की, जमिनीमध्ये अ‍ॅक्टिनोमायसिटीस भरपूर आहेत म्हणजेच मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यामुळे खरीप व रब्बीचे पीक अमाप येणारच. अ‍ॅक्टिनोमायसिटीसचा गंध फक्त एकदाच आणि तोही पहिल्या पावसातच येतो. बाकी वर्षभर हा जीवाणू शेतक-यांच्या सेवेत स्वत:स जमिनीखाली गाडून सतत कार्यरत असतो. उन्हाळा सुरू झाला, उष्णता वाढली की, तो सूक्ष्म कणांमध्ये रूपांतरित होतो. जगण्यासाठी या जीवाची ही एक धडपडच असते. आता रासायनिक खतांचे डोस सुरू झाले. बरोबर कीटकनाशकेही आली आणि शेतक-यांची हजारो वर्षे सेवा करणारे अ‍ॅक्टिनोमायसिटीस जमिनीत त्यांना हवे ते अन्न न मिळाल्यामुळे मृत्यूच्या वाटेवर प्रवास करू लागले. पहिल्या पावसाचा गंध हरवू लागला. जमिनीमध्ये वनस्पती आणि कीटकांचे अवशेष सडू लागले. ते खाण्यासाठी वेगळीच कीड तयार होऊ लागली. पहिल्या पावसात वावरणारे अनेक छोटे-छोटे जीव नष्ट झाले.?यातच मृग किडेही दुर्मीळ झाले. तिला नष्ट करण्यासाठी नवनवीन कीटकनाशके  बाजारात आली आणि जमिनीच्या नैसर्गिक पोताचा सर्वनाश झाला. काळय़ा आईची रयाच बदलली.?जसा शेतातला मृद्गंध नाहीसा झाला.?तसाच जंगलावरही निसर्गबदलाचा परिणाम झाला.?एकूणच सृष्टीचक्र बदलले मग माती तरी तशीच कशी राहील?

Monday, June 8, 2015

निसर्गनिर्मित अद्भुत‘रांजण-खळगे’

निसर्गाची अदाकारीच न्यारी असते. डोळे उघडे ठेवून जर आपण निसर्ग पाहिला तर तो नवलाईनेच भरलेला दिसून येईल. आपण आधुनिकतेच्या कितीही गप्पा मारल्या तरीही माणूस हा निसर्गापुढे नेहमीच दुबळा वाटत आला आहे. निसर्ग त्याचे अस्तित्व हे नेहमीच दाखवून देत असतो. कधी तो रौद्र रूप दाखवून माणसाला त्याची जागा दाखवून देतो तर स्वत:च्या सुंदर रूपाने माणसाला मोहीत करीत असतो. म्हणूनच जेव्हा भवतालच्या श्रेष्ठ कलाकुसरींबाबत जेव्हा चर्चा होत असते, तेव्हा आपसुकच त्यात नैसर्गिक कलाकृती ओघाने पहिल्याच येतात.
ranjan khalageया पृथ्वीतलावर सर्वात श्रेष्ठ शिल्पकार कोण असेल, तर तो आहे निसर्ग! कारण या निसर्गाने आपल्या भोवताली इतक्या सुंदर कलाकृती निर्माण केल्या आहेत की, पाहणा-याचे डोळेच दिपून जावेत.
निसर्गाकडून तयार झालेल्या सा-याच कलाकृती या अवाढव्य आणि डोळे विस्फारणा-या आहेत. आपण सहयाद्रीच्या डोंगररांगांकडे गेलो की, या जास्त ठळकपणे समोर येतात. मग आपलीही बोटे आश्चर्याने तोंडात जातात.
मानवाच्या शक्यतेपलीकडच्या या कलाकृती निसर्गाने तयार केल्या आहेत त्या विशेष आयुधांनी! एखाद्या मानवी शिल्पकाराकडे ज्याप्रमाणे छन्नी, हातोडा वगैरे साधनसामग्री असते, तसेच निसर्गाकडे पाणी, हवा, अग्नी अशी पंचमहाभुतांनी भरलेली वेगळी पण वैशिष्टय़पूर्ण आयुधे आहेत. या आगळ्यावेगळ्या शस्त्रास्त्रांनी निसर्गाने सा-या जगाला हेवा वाटावा, अशा कलाकृती निर्माण केल्या आहेत.
उदाहरणच द्यायचे झाले तर अहमदनगरमधील धडकी भरवणारी सुप्रसिद्ध सांधण व्हॅली आहे, पुणे जिल्हयातील मुळशी तालुक्यात असणारी ‘तैल-बैल’ या जोड डोंगराच्या भिंती आहेत, याशिवाय डोंगर-पर्वतांमध्ये तयार झालेल्या सुंदर घळी, कपारी तर आहेतच, बुलडाण्यातील लोणार सरोवरदेखील आहे. या अन् कैक कलाकृती निसर्गाच्या पोटातूनच बाहेर पडल्या आहेत.
विशेष म्हणजे या सा-या कलाकृतींना पर्यटनाबरोबरच विज्ञानाचीही झालर चिकटलेली दिसून येते. म्हणजेच ही ठिकाणं पाहणं म्हणजे ज्ञानार्जनाचाही ‘बोनस’ ठरतो. हे सारे काही हवेहवेसे अन् अनुभवावे असेच आहे. अशाच पंक्तीतले एक सुंदर ठिकाण म्हणजे पुणे आणि नगर जिल्हयाच्या सीमेवरून वाहणा-या कुकडी नदीतील निसर्गनिर्मित आश्चर्य असलेले रांजणखळगे! हे रांजणखळगे म्हणजेच ‘पॉट होल्स’ इतक्या संख्येने जगात आपल्याला इतर कुठेही पाहायला मिळणार नाही.
पुणे जिल्हयातील शिरूर तालुक्याच्या शेवटी टाकळीहाजी नावाचे गाव आणि नगर जिल्हयातील पारनेर तालुक्याचे निघोज गाव, या दोघांच्या सीमेवरून कुकडी नावाची नदी वाहत गेलेली आहे. या कुकडी नदीच्या दोनही काठावर बसॉल्ट खडक आहे. या खडकातच निसर्गाचा अद्भुत आविष्कार आपली वाट पाहत उभा आहे.
कुकडी नदीच्या काठावर उभे राहिले की मग हे रांजणखळगे आपल्याला खुणवायला लागतात. डोळे थकून जातील पण मन भरणार नाही, इतके रांजणखळगे येथे निर्माण झाले आहेत. वेगवेगळ्या आकारांचे, उंचीचे, खोलीचे, कमी-जास्त जाडीचे, एकमेकांत मिसळलेले हे रांजणखळगे जणू काही भूतलावरचे अनोखे शिल्पसमूहच वाटतात.
तसे पाहिले तर या निर्मितीमागेही एक विज्ञान दडलेले आहे. नदीने वाहून आणलेले दगड-गोटे हे या बसॉल्ट खडकावरील छोटया भेगांत अडकले जातात. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगड गोटे याच भेगांत जोराने फिरल्यामुळे तिथे गोलाकार खड्डे तयार होतात.
या प्रक्रियेला काही थोडकी वर्षे नव्हे तर हजारो वर्षे जावी लागतात. हजार वर्षानंतर या छोटया भेगा रांजणासारख्या खड्डयांचे रूप घेऊन दिसतात आणि हे विज्ञान समजले की मग हे ठिकाण आणखीनच प्रेक्षणीय वाटायला लागते.
कुकडी नदीच्या दोन्ही तीरांना जोडणारा झुलता पूलदेखील बांधण्यात आला आहे. त्यामुळे हा पूलदेखील पर्यटकांसाठी विशेष आकर्षण बनला आहे. या पुलावरून रांजणखळगे पाहणे म्हणजे भटकंतीचा उत्कर्ष बिंदूच ठरायला हरकत नाही.
कुकडी नदीतील या रांजणखळग्यांचे महत्त्व ओळखून अनेक पर्यावरणप्रेमींची, संशोधकांची, विज्ञान अभ्यासकांची पावले इकडे वळत असतात. आपणही भटकंतीला विज्ञानाच्या किमयेची जोड देऊन येथे वाट वाकडी करायला हरकत नाही. कारण नेहमीचीच, सरावाची, भटकंतीची ठिकाणे पाहण्यापेक्षा अशी निसर्गाने तयार केलेली व उच्च निर्मितीमूल्ये असलेली ठिकाणे पाहणे हे केव्हाही ज्ञानात भर घालणारं असतं.

निसर्गाला जपणारे हात!

शास्त्रज्ञांनी केलेल्या अंदाजानुसार हवामान बदलाचे परिणाम दिसायला सन २१०० उजाडेल अशा भ्रमात खरं तर आपण राहू नये. आजच यावर काही ठोस उपाययोजना अमलात आणल्या तर भविष्यातील परिस्थितीची तीव्रता आपल्याला कमी करता येईल. यासाठी संपूर्ण जगाने एकमताने पृथ्वीवरील पर्यावरणाच्या रक्षणासाठी एकमेकांना साथ दिली पाहिजे.
treeप्रत्येक देशाने हवामान बदलास कारणीभूत ठरणारी ध्येयधोरणे व अर्थव्यवस्था बदलून अल्प कार्बन उत्सर्जन करणारी अर्थव्यवस्था अमलात आणली पाहिजे. त्यासाठी एका व्यक्तीपासून ते संपूर्ण समाज-शासन-देश आणि जगाने आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीने हवामान बदलास कारणीभूत ठरणा-या सवयींचा त्याग केला पाहिजे. कार्बनचे उत्सर्जन आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण जगभर अत्यंत प्रामाणिक प्रयत्न होताना दिसत आहेत. प्रगत देशांपैकी युरोपमधील स्वीडनसारख्या देशांनी यामध्ये मोठी आघाडी घेतली आहे.
स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या शहरात बहुसंख्य नागरिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. लहान-सहान प्रवासासाठी नित्यनेमाने सायकलचा वापर करतात. त्यासाठी तेथील शासनाने सायकलवरून प्रवास करणा-यांसाठी स्वतंत्र मार्ग राखून ठेवले आहेत.
या देशात, हवामान बदलाची तीव्रता कमी करण्यासाठी सरकारपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्व जण आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी कायम प्रयत्नशील असलेले दिसतात.
आपणही आपल्या देशात स्थानिक पातळीवर काही छोटया छोटया गोष्टी करून आपली जबाबदारी पार पाडू शकतो. आजवर आपल्या कार्बनने माखलेल्या पावलांना आपल्या हिरव्या हातांनी पुसून टाकण्याचाच एक प्रयत्न आपण केला पाहिजे.
हवामान बदलास कारणीभूत ठरणा-या उष्माग्राही वायूंचे उत्सर्जन आटोक्यात आणूनच आपल्याला हवामान बदलाचा सामना करता येईल. आपल्या दैनंदिन आयुष्यातील पुढील गोष्टींबाबत आवश्यक बदल आणून उष्माग्राही वायूंचे उत्सर्जन आपल्याला रोखता येईल. इतकंच नाही तर पैशाचीही बचत करता येईल.
जर मुले टीव्ही पाहण्याऐवजी किंवा कॉम्प्युटरवर खेळण्याऐवजी मैदानी खेळ खेळतील तर प्रत्येक मुलामागे वर्षाला ६२ ते ९३ किलो कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन रोखता येईल. व टीव्ही- कॉम्प्युटर वापरण्यामुळे येणा-या वीज बिलांत वर्षाला ३०१ ते ४५३ रुपयांची बचत होईल.
हल्ली समाजात ‘नो टीव्ही डे’सारखे दिवस साजरे होत आहेत, त्यामध्ये सहभागी होता येईल. संपूर्ण जगभर २९ मार्च हा दिवस ‘अर्थ आवर‘ किंवा एक तास वीज बंद दिन म्हणून पाळला जातो. थायलंड, फिलिफाइन्स, न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया, स्वीडन अशा अनेक देशांतील नागरिकांनी या दिवशी रात्री साडेआठ ते साडेनऊ या वेळेत विजेचा वापर टाळल्यामुळे मोठया प्रमाणात विजेची बचत झाल्याचे दिसले आहे.
कार्बनचे उत्सर्जन टाळू या – तापमानवाढ रोखू या!
आपल्या दैनंदिन आयुष्यात नवीन कागदाचा वापरसुद्धा मोठया प्रमाणात होत असतो. एक टन कागद बनविण्यासाठी १७ झाडे तोडावी लागतात. जर १०० मुलांनी अभ्यास करण्यासाठी नवीन वा वापरण्याऐवजी पाठकोरे कागद गोळा करून बाइंडिंग केलेल्या वा वापरल्या तर अंदाजे ५००० कागदांची बचत होईल आणि ८७० किलो कार्बन डायऑक्साईडचे वातावरणात उत्सर्जन कमी होईल.
१०० मुलांनी त्यांची प्रत्येकी १० विषयांची पुस्तके पुढील वर्षी पास होऊन येणा-या मुलांना दिली तर आणखी ७८० किलो कार्बन डायऑक्साईडचे वातावरणात उत्सर्जन कमी होईल.
एक झाड प्रतिवर्ष जवळजवळ १० किलो कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो. १०० विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक झाड लावून वाढविल्यास दरवर्षी १००० किलो कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जाईल. वृक्षारोपण केलेल्या प्रत्येक रोपाच्या जन्माचा दाखला तयार करून घेणे तसेच रोपाच्या वाढीचे प्रगतीपुस्तकही बनवून वृक्षारोपण करणा-यांच्या हाती सुपूर्द करावे.
शक्यतो स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची निवड केल्यामुळे त्यांच्या जगण्याची शाश्वती निर्माण होते. उदाहरणार्थ कडुनिंब- करंज-आंबा-जांभूळ-चिंच-सातवीण-सावर-पळस-पांगारा-बाभूळ-वड-पिंपळ-उंबर-भोकर-अर्जुन- बकुळ-कदंब-आपटा-तामण-धामण-चाफा-बहावा-आवळा-हिरडा-बेहडा-बेल-फणस इ. कितीतरी वृक्षांची लागवड करता येऊ शकेल.
अगदीच जागेची कमतरता असल्यास तुळस-अडुळसा- कोरफड-शतावरी-निरगुडी-ब्राह्मी-कडीपत्ता-जास्वंद-मुरुडशेंग-नवरेल-पानफुटी अशा औषधी वनस्पतींची जोपासना छोटयाशा जागेतही करता येते.
लक्ष लक्ष वृक्ष
असे म्हणतात की एक पिंपळ, एक वड, दोन चिंच, तीन आंबे, चार जांभूळ आणि पाच कडुनिंबाची झाडे वाढविणारा कधीही नरकात जात नाही. या वाक्यातील स्वर्ग-नरकाच्या कल्पना जरी बाजूला ठेवल्या तरी एवढया झाडांच्या सहवासात राहणा-या व्यक्तीला मिळणारा आनंद आणि लाभणारे आरोग्य स्वर्गीयच असते. अर्थात, या गोष्टी बोलायला सोप्या वाटतात, परंतु एक झाड लावून त्याची जोपासना करणे ही एक जबाबदारी असते.
अनेकदा वृक्षांची लागवड सपशेल अपयशी झालेली दिसते. कारण रोप स्थानिक प्रजातीचे नसते, वृक्ष लागवडीची जागा चुकीची असते, खड्डयाचा आकार अपुरा असतो, रोप लावण्यापूर्वी खड्डा ओला करून घेतला जात नाही.
रोपाला नियमितपणे खत-पाणी दिले जात नाही, रोपाचे गुराढोरांपासून आणि उपद्रवी प्रवृत्तींपासून रक्षण केले जात नाही, संरक्षक कुंपण लावले जात नाही, रोपाभोवतीच्या जागेची मशागत केली जात नाही.
जर आपल्याला लक्ष लक्ष वृक्षाचे लक्ष्य गाठायचे असले तर पुढील पानावरील आकृतीत दर्शविल्याप्रमाणे रोपाची लागवड केली तर यश हमखास मिळेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की गुलमोहर, सुबाभूळ, निलगिरी, कॅशिया अशा वृक्षांना टाळावे आणि स्थानिक वृक्षांची लागवड करावी.
इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी)च्या अहवालानुसार कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन २० अब्ज टनांपर्यंत जाऊन पोहोचेल. अशा वेळी कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी प्रचंड प्रमाणात वृक्ष आच्छादनाची गरज आहे.
एक वृक्ष वर्षाला सरासरी २२.५ किलो कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतो. जर आपण एका वृक्षाचे सरासरी वय ५० वर्षे गृहीत धरले तर तो वृक्ष आयुष्यभरात ११२५ किलो कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतो.
या हिशोबाने २० अब्ज टन कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेण्यासाठी आपल्याला पृथ्वीतलावर १०६ अब्जांपेक्षाही जास्त वृक्षांचे संवर्धन करण्याची गरज आहे. त्यासाठी जगाने काय करायचे ते जग ठरवेल, पण आपण स्थानिक पातळीवर आपला वाटा उचलू शकतो.
येत्या पाच वर्षात आपण सर्वानी मिळून काही शे-हजार किंवा लक्ष वृक्षसंवर्धनाचे लक्ष्य बाळगले पाहिजे. हे करताना जाणीवपूर्वक आपल्या मातीत रुजणारे स्थानिक वृक्ष लावण्याची काळजी घ्यावी.
सौजन्य- वसुंधरा संवर्धन अभियान आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

कचरा नकोच!

लहानपणी आपल्याला ‘कचरा करू नको!’ असा सतत उपदेश ऐकायला मिळायचा. थोरामोठय़ांकडून मिळणा-या या उपदेशाचे एक प्रकारचे संस्कारच आपल्यावर व्हायचे. आज असे संस्कार होण्याचे प्रमाण अंमळ कमीच झाले आहे. मात्र, दुस-या बाजूला, कच-याचे प्रचंड वाढत चाललेले प्रमाण पाहता कचरा करू नको असे कोणी कोणाला सांगायचे? इतकी परिस्थिती कचरामय झाली आहे.
Kacharaहवामान बदलाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आजूबाजूला वाढणा-या कच-याची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. डंपिंग ग्राऊंडच्या आसपास राहणा-या लोकांनी तर कच-याच्या गाडय़ा परिसरात येऊ देण्याविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
केवळ मुंबईचे उदाहरण घेतले तर या शहरात दररोज ७००० मेट्रिक टन इतका घनकचरा निर्माण होतो. यापैकी, ५००० मेट्रिक टन हा घरगुती कचरा असतो. या घरगुती कच-यापैकी १८५० मेट्रिक टन म्हणजे ३७ टक्के हा ओला कचरा असतो ज्याचे कंपोस्ट खतात रूपांतर होऊ शकते. एका कुटुंबाकडून दररोज १.०२ किलो ओला कचरा निर्माण होतो. त्यामधून ०.१८२ किलो कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो. याचा अर्थ मुंबईत दररोज निर्माण होणा-या १८५० मेट्रिक टन ओल्या कच-यातून ३,३५६,७०० किलो कार्बन डायऑक्साईड रोज उत्सर्जित होतो आणि याव्यतिरिक्त, हा कचरा वाहून नेणे, साठवणे यासाठी लागणारी वाहतूक आणि डंपिंग ग्राऊंडवर साठविलेल्या कच-यातून उत्सर्जित होणा-या मिथेन वायूचे प्रमाणही प्रचंड असते.
दररोज हजारो टन कचरा साठवून त्याची विल्हेवाट लावण्याच्या जागेच्या आणि प्रक्रियेच्या मर्यादा आहेत. उपयोगी व चंगळवादी प्रवृत्तीमुळे कच-याचे प्रमाण अधिकाधिक वाढून विघटनाचा प्रश्न गंभीर रूप धारण करीत आहे. म्हणून आज आपल्याला ‘कचरा नको’ हेच उद्दिष्ट ठेवावे लागेल तरच परिस्थिती आटोक्यात येऊ शकेल. प्रत्येक व्यक्ती-समाज-शासन अशा सर्वानी याबाबत जबाबदारी घेतली पाहिजे. प्रत्येक कुटुंबात रोज निर्माण होणा-या कच-याचे पद्धतशीर विघटन आणि विल्हेवाट लावणे सुरू झाले तर कच-याची व्याप्ती आपोआप कमी होईल. खरं म्हणजे आपल्या परिसरातील पालापाचोळा, भाजीपाल्यातील न वापरलेल्या साली व देठ यांचा उपयोग जिथल्या तिथे खत बनविण्यासाठी होऊ शकतो आणि अगदी महिन्याभरात या ओल्या कच-याचे विघटन होऊन खतात रूपांतर झालेले दिसू शकते. आपल्या गावांमध्ये एके काळी सर्रास असलेले उकिरडे म्हणजे सेंद्रीय खतनिर्मितीचे कारखानेच होते. आमच्या माहितीतील अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी या पद्धतीचा वापर करून शाळेत गोळा होणा-या ओल्या कच-याचे विघटन करून खत बनविण्यास सुरुवात केली आहे.
जी गोष्ट ओल्या कच-याची तीच गोष्ट सुक्या कच-याची आहे. सुका कचरा हा काच, पत्रा, कागद, प्लास्टिक, लाकूड अशा वर्गवारीनुसार वेगळा केला तर त्यावर पुन्हा प्रक्रिया करून त्यापासून हलक्या दर्जाची उत्पादने तयार करता येतात. आजही आपल्याकडे येणारे भंगारवाले हे याच प्रक्रिया उद्योगातील भागीदार आहेत. घराघरातून फक्त रद्दी कागद गोळा करून त्याच्या विक्रीतून आलेली रक्कम त्याच परिसरातील मुलांसाठी वाचनालय सुरू करण्यासाठी वापरण्यात आल्याचेही उदाहरण आहे. दुस-या भाषेत सांगायचे झाले तर कचरा म्हणजे एक प्रकारची दुर्लक्षित संपत्तीच जणू!
उत्खननात सापडलेल्या प्राचीन सिंधू संस्कृतीचे अवशेष आपल्याला एका पर्यावरणपूरक नगररचनेच्या वारशाची ओळख करून देतात. अशी कल्पना केली की, मुंबई शहर काही कारणाने जमिनीत गाडले गेले आणि हजारो वर्षानंतर त्याचे उत्खनन झाले तर डंपिंग ग्राऊंडवरील अविघटनशील कच-याचे ढीग व तुंबलेली गटारेच सापडतील ना? आपण कोणता वारसा येणा-या पिढीकडे सोपवू इच्छितो?
ओल्या कच-यातून खतनिर्मिती
ओला कचरा म्हणजे आहारातील फळे व भाजीपाल्याच्या साली, देठ, पानं, खरकटे अन्न, इ. टाकून दिलेला भाग! या कच-यावर सूर्यप्रकाश, हवा, पाणी आणि सूक्ष्मजीवाच्या संयोजनातून घडणा-या प्रक्रियेतून सेंद्रीय खत (कंपोस्ट खत) तयार करता येते. मुंबईतील गोरेगाव येथील प्रज्ञाबोधिनी हायस्कूलने शाळेच्या गच्चीवर ‘मंथन’ या नावाने खतनिर्मिती प्रक्रिया चालवली आहे. नाशिकमधील अभिव्यक्ती संस्थेच्या अर्थकेअर डिझाइन्सने तयार केलेल्या खतनिर्मिती यंत्राचा (छिद्र असलेले व एकमेकांना जोडलेले दोन ड्रम) वापर करून या शाळेने ओल्या कच-यापासून खत तयार केले. यासाठी पुढीलप्रमाणे पद्धत वापरण्यात आली :-
प्रथम वरचा ड्रम पूर्णपणे भरेपर्यंत त्यामध्ये नियमितपणे ओला कचरा टाकत राहणे. कचरा जास्त ओला असल्यास थोडा लाकडाचा भुसा पसरणे किंवा खूप सुका असल्यास थोडे पाणी शिंपडणे आणि दर आठवडय़ाने ड्रम खाली-वर फिरवून (हवा खेळती राहण्यासाठी) पुन्हा जागच्या जागी आणणे. वरचा ड्रम ओल्या कच-याने भरल्यावर त्याला खालच्च्या बाजूला फिरवून त्यामधील कचरा विघटनासाठी महिनाभर बंद करून ठेवणे आणि खालचा ड्रम वर घेऊन त्यामध्ये कचरा टाकण्यास सुरुवात करणे. या प्रकारे दुसरा ड्रम कच-याने पूर्ण भरेपर्यंत पहिल्या ड्रममधील कच-याचे विघटन होऊन त्याचे खतामध्ये रूपांतर झालेले दिसते.
गच्चीवरील शेती
कालपरवापर्यंत जिथे गाव होते तिथे आज शहरे वाढत आहेत. सिमेंट- काँक्रीटच्या इमारती, विषारी धूर ओकणारे कारखाने, झोपडपट्टय़ा, डांबरी रस्ते, तुंबलेली गटारे, कच-याचे ढीग यामध्ये झाडे लावण्याच्या जागाच आक्रसून गेल्या आहेत. मात्र अशा ठिकाणी काही वेगळ्या जागा उदा. घरातील गॅलरी आणि इमारतीची गच्ची वृक्षारोपणासाठी वापरता येऊ शकते ही कल्पना हळूहळू समाजात रुजत आहे. जशी गावातील घरांमागे परसबाग असायची तशीच ही आधुनिक परसबागच जणू! आता तर गच्चीवरील शेती ही लागवडीची एक शास्त्रशुद्ध पद्धत विकसित होत आहे. प्रत्यक्ष करायला लागल्यावर खूपच सोपी वाटावी अशीच ही गोष्ट आहे.
आपल्या दैनंदिन जीवनातील भाजीपाल्याचा ओला कचरा सुरुवातीलाच वेगळा साठवायचा. घरगुती कच-यातील ४० टक्के हिस्सा या ओल्या कच-याचा असतो जो जैविकदृष्टय़ा विघटनशील असतो. या कच-याचे खत बनवून, त्याचा उपयोग करून वनस्पतींची लागवड करता येते. बाल्कनी, गच्ची, अंगण, इ. जागी आपल्याला फळे किंवा भाज्या लावता येतात. ओल्या कच-याचा स्थानिकरीत्या विनियोग केल्याने कचरा उचलण्यासाठी लागणारी मनुष्यशक्ती आणि वाहतूक खर्च यांमध्ये बचत होऊन पर्यावरणाची हानी कमी होते. प्लास्टिकच्या पिशव्या, फुटके डबे, बादल्या, खोके, ड्रम, कोल्ड ड्रिंक्सच्या मोठय़ा बाटल्या, मोठे टाकाऊ पाईप, इ. वस्तूंचा वापर होतो, त्यामुळे कचरा व्यवस्थापनावर पडणारा ताण कमी होतो. या वस्तूंमध्ये पालापाचोळा, लहानसहान फांद्या, विटांचे लहान तुकडे, नारळाचा काथ्या या सेंद्रीय गोष्टींचा तळाला वापर करून त्यावर मातीचा ४ सें.मी. थर पसरून वांगी, मिरची, पालक, मेथी, टॉमेटॉ, इ. भाज्यांच्या बिया पेरून शेती करायला सुरुवात करता येईल. इतकंच नव्हे तर फुलपाखरांना आकर्षित करणा-या वनस्पती, फळ झाडं, औषधी वनस्पती यांचीही लागवड करता येऊ शकते.
(सौजन्य- वसुंधरा संवर्धन अभियान आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई)