Thursday, December 26, 2024

ऐसा नेता होणे नाही

मधुकरराव पिचड राजूरच्या एका शिक्षकाच्या घरात जन्मलेला एक मुलगा ज्याला स्वतःची जन्मतारीख सुद्धा माहीत नव्हती त्यामुळे ते 1 जून ही कॉमन जन्मतारीखच लावत असत त्या मधुकरराव पिचड यांचे आयुष्य हा एक खरेचच अचंबित करणारा प्रवास होता. एक साधारण आदिवासी मुलगा कुठल्याही पार्श्वभूमीविना केवळ स्वकर्तृत्वाने देशातील सर्वात महत्वाच्या आदिवासी नेत्यांपैकी एक बनतो, महाराष्ट्राच्या राजकारणातील मुख्य फळीतील नेता बनतो ही खरेच आश्चर्याची बाब आहे. पुण्याला फर्ग्युसन कॉलेजला शिक्षण घेत असलेल्या मधुकरराव पिचड यांना तिथेच विद्यार्थी नेत्याच्या रूपाने राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्यानंतर तालुक्यात आल्यावर त्यांनी समाजकार्यात स्वतःला झोकून घेतले. सत्तरच्या दशकात पंचायत समिती सदस्य व सभापती म्हणून सुरू झालेली त्यांची राजकिय कारकीर्द सलग सात वेळा म्हणजे जवळजवळ 35 वर्षे तालुक्याचा आमदार तसेच विविध महत्वाची कॅबिनेट मंत्रीपदे भूषविण्यात व्यतीत झाली. 1978 च्या पहील्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागून थेट चौथ्या स्थानी फेकले गेलेल्या मधुकरराव पिचड यांनी दोनच वर्षांनी 1980 मध्ये विधानसभा जिंकून त्यानंतर सलग 7 वेळा निवडून येत तब्बल 35 वर्षे एकहाती विधानसभेत अकोले तालुक्याचा व आदिवासी जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडला. राजूर येथे तालुक्यातील पहिले दूध संकलन केंद्र त्यांनीच सुरू केले. त्या केंद्रात पहील्या दिवशी केवळ 30 लिटर दुध जमा झाले होते. पण संथ सुरुवात असली तरी ही अकोले तालुक्याच्या जनतेसाठीची एका प्रमुख आर्थिक स्रोताची मजबूत पायाभरणी होती. तेव्हा 30 लिटरने सुरू झालेले दूध संकलन आज तालुक्यात रोजच्या एकूण 2 लाख लिटरपर्यंत येऊन पोचले आहे. पिचड साहेबांना महाराष्ट्राचे जलनायक म्हंटले जाते. अकोले तालुक्यात आज तब्बल 19 धरणे आहेत. केटी बंधाऱ्यांची तर गणतीच नाही. एक भंडारदरा सोडले तर बहुतेक ही सगळी धरणे पिचड साहेबांच्याच काळात बांधली गेली असावीत. निळवंडे धरण हा तर साहेबांच्या परफेक्ट धोरणांचा व दूरदृष्टीचा मानबिंदू आहे. निळवंडे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या बाबतीत पिचड साहेबांनी केलेले कार्य हे राज्यातच नाही तर देशात एक आदर्श कार्य म्हणून नावाजले जाते. कित्येक धरणे व वीजप्रकल्प बांधून पिचड साहेबांनी नुसता अकोले तालुकाच नाही तर सगळा नगर जिल्हा सुजलाम करण्यात प्रमुख वाटा उचलला आहे. धरणांच्या रूपाने पिचड साहेबांनी तालुक्याच्या व जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राला एक नवी संजीवनीच दिली आहे. सोबतीला रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्यांनी रोजगार निर्मिती बरोबरच आदिवासी भागातील कितीतरी पडीक जमीन ही पिकाखाली आणली व आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासास वेग मिळवून दिला. शेजारचा संगमनेर तालुका हा अकोले तालुक्यापेक्षा अतिशय समृद्ध आणि प्रगत व श्रीमंत तालुका समजला जातो. पण मी साधारण 1998 ते 2002 या काळात संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात फिरलो असता लक्षात आले की संगमनेर या तालुक्याच्या ठिकाणापासून अगदी 10-15 किमी इतकेच अंतर असलेल्या काही गावांत देखील बरे रस्ते नव्हते की एसटी सुद्धा जात नव्हती. त्याउलट त्याचवेळी अकोले तालुक्यातील पेठेची वाडी या अतिदुर्गम गावात सुद्धा कच्चा का होईना पण मोटारेबल रस्ता होता. पाचनई या दुर्गम गावात पिचड साहेबांच्या काळातच पक्का डांबरी रस्ता बनला होता व एसटी सुद्धा जात होती. अगदी प्रत्येक वाडीवस्तीवर जात नसली तरी अपवाद वगळता तालुक्यातील जवळजवळ प्रत्येक गावात एसटी जात होती. म्हणजे दूध संकलनातून आर्थिक मिळकत देऊन, शेतजमीनीला पाणी उपलब्ध करून देऊन ते थांबले नाहीत तर विकासासाठी आवश्यक असलेले दळणवळणासाठीचे रस्तेही त्यांनी अगदी अतिदुर्गम भागापर्यंत निर्माण करून घेतले. अकोले तालुक्याची कनेक्टिव्हिटी इतर अनेक तालुक्यांपेक्षा त्यांनी नक्कीच खूप उत्तम केली. अकोले तालुका हा मुखत्वे आदिवासी तालुका असल्याने व अतिपर्जन्यवृष्टीचा तालुका असल्याने इथे साखर कारखाना चालू शकणार नाही या मतप्रवाहाला छेद देत पिचड साहेबांनी जिद्दीने अगस्ती सहकारी कारखाना स्थापन केला व अगदी यशस्वीपणे तो आजतागायत चालवूनही दाखवला. आज तालुक्याच्या आर्थिक समृद्धीत अगस्ती कारखान्याचाच सर्वात मोठा वाटा आहे असे निर्विवादपणे म्हणता येईल. शिक्षण हाच समाजाच्या विकासाचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे हे ओळखून पिचड साहेबांनी शिक्षणाची गंगा खेडोपाड्यातील गरीब आदिवासी व दुर्बल घटकापर्यंत नेण्यासाठी आदिवासी उन्नती संस्थेची स्थापना करून तालुक्यात अनेक ठिकाणी शाळा व आश्रम शाळांचे जाळे उभे केले. आज अनेक शिक्षणसम्राटांनी शिक्षण क्षेत्रात भरमसाठ फी आकारून त्याला आर्थिक मिळकतीचे एक बाजारी साधन बनवून ठेवले आहे. पण उन्नतीच्या शाळांच्या माध्यमातून पिचड साहेबांनी विनामूल्य वा अगदी नाममात्र फी घेऊन आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गोरगरीब आदिवासी बांधवांच्या लेकरांना शिक्षणाची संधी मिळवून दिली आहे. महाराष्ट्रातील आदिवासी जनतेसाठी पिचड साहेबांचे योगदान अगदी अतुलनीय असेच आहे. आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट बनवण्याचे व मांडण्याचे काम संपूर्ण देशात सगळ्यात आधी पिचड साहेबांनीच केले. मुख्यमंत्री श्री शरद पवार यांच्या सोबतीने त्यांनी स्वतंत्र आदिवासी मंत्रालय व आदिवासी बजेटची निर्मिती केली तसेच समाजकल्याण मंत्रालयातून वेगळा व स्वतंत्र असा आदिवासी विकास विभाग सुद्धा स्थापन केला. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून अनेक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प उभारले जाऊन तसेच विविध कल्याणकारी योजना राबवून महाराष्ट्राच्या आदिवासींचे जीवनमान उंचावण्यात मोलाची भूमिका बजावली जात आहे. स्वतंत्र आदिवासी बजेट मांडण्याचे जे महत्वाचे काम देशात सर्वप्रथम पिचड साहेबांनी केले त्यांच्यानंतर देशातील इतरही अनेक राज्यांनी पिचड साहेबांचा कित्ता गिरवत स्वतंत्र आदिवासी बजेटचा स्वीकार केला. आदिवासी मंत्रालयाची स्थापना आणि पहिले मंत्रिपद हे पिचड साहेबांनीच भूषविले. आदिवासींमधील बोगस आदिवासींची घुसखोरी थांबवण्यासाठी पिचड साहेबांनी खूप महत्वाचे प्रयत्न केले. गोविंदजी गारे आणि मधुकरराव पिचड यांनी या बाबतीत फार मोठे योगदान दिलेले आहे. आजही महाराष्ट्रातील बोगस आदिवासींचे सर्वात मोठे शत्रू हे मधुकरराव पिचड आणि गोविंदजी गारे हेच आहेत. महाराष्ट्रात आदिवासी जमीन कायदा व वनहक्क कायदा यांच्या सुदृढीकरणात व अंमलबजावणीत त्यांनी अतिशय महत्वाचे योगदान दिले. ते सक्रिय असतानाच्या काळात आदिवासींच्या विविध महत्वाच्या प्रश्नांवर चोख आणि नेमक्या मार्गाने प्रशासकीय व राजकीय पातळीवर नेटाने झुंज देणारे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही त्यांच्याइतके सामर्थ्यवान व प्रभावी नेतृत्व अन्य कोणतेही नव्हते असे म्हणता येईल. वैयक्तिकरित्या तर त्यांनी किती जणांची मदत केली व किती आयुष्ये घडवली याला गणती नाही. कित्येक जणांनी माझे आयुष्य हे केवळ त्यांच्यामुळेच घडले असे सांगितलेले व लिहिलेले मी ऐकले व वाचले आहे. पिचड साहेब हे बहुआयामी असे नेते होते. महाराष्ट्र राज्याची आदिवासी विकास, कृषी, रोहयो, पशुसंवर्धनवन व पर्यावरण मंत्री, दुग्ध विकास, मत्स्य विकास मंत्री, परिवहन व पूनर्वसन विकास मंत्री अशी विविध क्षेत्रातील मंत्रीपदे त्यांनी सक्षमपणे व कार्यक्षमरीत्या भूषविली आहेत. काही जिल्ह्यांचे पालकमंत्रीही ते राहीले आहेत. असे किती नेते आहेत या देशात ज्यांनी इतक्या विविध क्षेत्रांत यशस्वीपणे मंत्रीपदे भूषवली आहेत? फार पूर्वी एक प्रशासकीय अधिकारी मला म्हणाले होते की महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ सलगपणे लाल दिव्याची गाडी वापरणारा माणूस कोण असेल? मी म्हणालो शरद पवार, कारण तेच तेव्हा सर्वात मोठे नेते होते. पण ते अधिकारी म्हणाले शरद पवार नाहीत तर ते आहेत तुझ्याच तालुक्याचे आमदार म्हणजे मधुकरराव पिचड. तर असे होते की जेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदा काँग्रेस जाऊन युतीचे सरकार आले होते तेव्हाही पिचड साहेब हे विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेत्याला सुद्धा कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा असतो आणि त्यामुळे लाल दिव्याची गाडी त्यांना त्या पाच वर्षांत सत्ता नसतानाही मिळाली होती. विरोधी बाकांवर बसल्यामुळे इतर कोणत्याही नेत्याला ही सुविधा व बहुमान मिळाला नाही. सलग ३० वर्षे त्यांना हा बहुमान मिळाला. अकोल्यात ऐंशीच्या दशकात पाण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे पिचड यांच्यावर खटले दाखल झाले होते. त्यामुळे १९८४ मध्ये नव्याने सरकार स्थापन करणाऱ्या वसंतदादा पाटील यांनी त्यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतल्यावर अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. हे कळल्यावर केवळ मधुकरराव पिचड यांच्यावरील हे खटले रद्द करून त्यांना मंत्रिपदाची शपथ घेता यावी म्हणून वसंतदादा पाटलांनी चक्क आपला शपथविधी चार तास थांबवून ठेवला होता. आजकालच्या शपथविधीचें ग्रँड सोहळे पाहता एका नव्याने व पहील्यांदाच आमदार झालेल्या व्यक्तीसाठी चक्क मुख्यमंत्र्यांनीच सगळा शपथविधी पुढे ढकलणे ही बाब ती व्यक्ती किती महत्वाचे नेतृत्व होते हेच अधोरेखित करते. व्यक्तिगतरित्या बोलायचे झाल्यास पिचड साहेब हे एक अगदी राजबिंडे आणि रुबाबदार असे व्यक्तिमत्व होते. मला तर त्यांच्या चेहऱ्यात राज कपूर यांचीच छटा दिसत असे, तसाच अतिशय गोरा वर्ण आणि तसेच नाक व चेहरा.! पिचड साहेब हे अतिशय बुद्धिमान व्यक्ती तर होतेच पण त्यांची स्मरणशक्ती सुद्धा अत्यंत दांडगी होती. तालुक्यातील प्रत्येक गावातील अनेक लोकांना ते नुसते नावानेच नाही तर त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे या तपशिलांनिशी ओळखत असत. कुठे काय काम चालू आहे वा कोणते काम रखडले आहे याची त्यांना पूर्ण आणि अपडेटेड माहिती असे. कधी काय झाले होते व तेव्हा कोणता माणूस कसा वागला होता हे त्यांच्या कायमचे आठवणीत राहत असे. एवढेच नाही तर मूळचे हाडाचे काँग्रेसी असल्याने (शेवटी मुलाच्या आग्रहामुळे बीजेपीत गेले असले तरी) त्यांनी नेहमी अहिंसा आणि सहिष्णूतेचाच पुरस्कार केला. त्यांनी कधी कुणावर हिंसक डूख धरला नाही की कुणाचे बदल्याच्या भावनेतून नुकसान केले नाही. स्वतः आदिवासी समाजाचे असूनही त्यांनी कधीही बिगर आदिवासींसोबत भेदभावाची वा अलिप्ततेची भूमिका घेतली नाही. आणि उलटपक्षी अंदर की बात सांगायचीच झाली तर आजही त्यांच्या अगदी जवळच्या बहुतांश कार्यकर्त्यांना देखील वाटते की उलट त्यांनी बिगर आदिवासींनाच अंमळ जास्त फेवर दिला. आजच्या फक्त माझी जात आणि फक्त माझा धर्म हेच श्रेष्ठ या वैचारिक घाणीत लोळण्याच्या वातावरणात सगळ्यांना असे समानपणे सोबत घेऊन चालण्याची पिचड साहेबांची ही जीवन कारकीर्द म्हणजे खरेच एक सन्माननीय अपवादच म्हणावी लागेल. त्यांना राजकीय विरोधक व शत्रू खूप असतीलही पण ते सगळे त्यांच्या राजकीय भूमिकेचे विरोधक आहेत. एक व्यक्ती म्हणून पिचड साहेब हे नक्कीच अजातशत्रू होते. जे लोक त्यांना सोडून विरोधात गेले ते सुद्धा हे मान्य करतील की पिचड साहेबांनी कधीही कुणावर पातळी सोडून टीका केली नाही वा कुणाचे आयुष्य ते विरोधात गेले म्हणून सूडाने उध्वस्त केले नाही (हेही खूपच दुर्मिळ आहे). या माणसात सूड व हिंसक भावनाच नव्हती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही अशीच त्यांची वर्तणूक होती. उलट जे त्यांना सोडून गेले ते बहुतांश लोक हे स्वतःची वैयक्तिक राजकीय महत्वाकांक्षा जोपासण्यासाठी किंवा पिचड साहेबांपासून मिळणारा आर्थिक लाभ थांबल्यानेच गेले असे लक्षात येते. अर्थात पिचड साहेबांचेही काही राजकीय निर्णय चुकले असतील, काही चुका त्यांच्याकडून घडल्याही असतील, कारण शेवटी ते मनुष्यच होते. पण माझी जाण त्यांच्या चुका शोधण्याइतकी वा त्यांना दोष देण्याइतकी सक्षम नाही हे मी नम्रपणे नमूद करतो. मात्र त्याचवेळी पिचड साहेबांची एक मला वाटणारी सर्वात मोठी कमतरता अशी की त्यांनी तालुक्यात वा एकंदरच आदिवासी समाजात नेतृत्वाची पुढची खंबीर व त्यांच्यासारखीच अभ्यासू, कार्यशील, झुंजार व वैचारिक नवी पिढी निर्माण केली नाही. यशवंतराव भांगरे यांनी मधुकर पिचड यांच्यातील नेतृत्व घडवले पण मधुकरराव पिचड हे स्वतः मात्र दुसरे मधुकर पिचड घडवू शकले नाहीत. अर्थात हे देशात प्रत्येक नेतृत्वाच्या बाबतीत म्हणता येईल. लोक आपले स्थान अबाधित रहावे म्हणून नवे प्रतिभाशाली नेतृत्व घडवत नाहीत. पण या भूमिकेमुळे समाजाचे व देशाचेच नुकसान होते. इथे हेही विशेषत्वाने नमूद करावे लागेल की विधानसभेत ते विरोधी पक्षनेते असताना सोबतच्या आरआर पाटलांसारख्या अनेक नव्या नेत्यांना बोलण्याची व भूमिका मांडण्याची भरपूर संधी देऊन त्यांच्यातील नेतृत्व घडवण्यास मदत करत होते, आणि म्हणून ते महाराष्ट्राला लाभलेले सर्वात चांगले विरोधी पक्षनेते होते हे तर विधानसभेतच बोलले गेले आहे. पण हीच नवे नेतृत्व घडविण्याची भूमिका त्यांनी तालुक्यात किंबहुना आदिवासी समाजात सुद्धा घ्यायला हवी होती असे मला वाटते. आपण जसे खंबीरपणे लढलो तसेच किंवा त्याहून अधिक खंबीरपणे लढणारी नवी फळी तयार झाली पाहीजे ही भूमिका फक्त राजकीयच नाही तर प्रत्येक क्षेत्रातील व संस्थेतील नेतृत्वाची असली पाहिजे. पण असे एकही उदाहरण आज संपूर्ण देशात आढळत नाही आणि दुर्दैवाने पिचड साहेबही त्याला अपवाद नव्हते असेच म्हणावे लागेल. खरेतर सक्रिय राजकारणातून बाजूला होऊन त्यांनी दहा वर्षांपूर्वीच जी एकप्रकारची निवृत्ती घेतली होती तेव्हाच महाराष्ट्राच्या व आदिवासी समाजाच्या विकासात एक पोकळी निर्माण झाली होती. नेत्याच्या भूमिकेतून ते केव्हाच रिटायर झाले होते आता फक्त ते शरीराने जगातून निघून गेले आहेत. पण जरी राजकीय दृष्ट्या सक्रिय नसले तरी महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांचा ते एक मोठा आधारस्तंभ होते हे नक्की. सक्रिय व सत्तेत नसले तरी त्यांचे नुसते असणे हा सुद्धा आदिवासी समाजाला एक मोठा आधार होता. त्यांचे कार्य म्हणजे समाजासाठी एक दिशा देणारा एक मार्गदर्शकच आहे. मात्र त्यांचे कार्य जरी अमर राहणार असले तरी व्यक्तिरूपातली त्यांची प्रेरणा व त्यांचा समाजाला वाटणारा दृढ आधार हे मात्र आता कायमस्वरूपी हरवून गेले आहेत. समाजाच्या कित्येक जबाबदाऱ्या एकनिष्ठपणे व एकट्याने आपल्या खंबीर खांद्यावर पेलून धरणारे पिचड साहेब हे जाताना आदिवासी समाजासाठी, अकोले तालुक्यासाठी व महाराष्ट्रासाठी सुद्धा एक अत्यंत मोठी व कदाचित कधीही भरू शकणार नाही अशी पोकळी निर्माण करून गेले आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा एक अत्यंत प्रभावी व प्रतिभाशाली नेता आपण गमावला आहे. राजूर गावाने, अकोले तालुक्याने, आदिवासी समाजाने व महाराष्ट्राने एक अत्यंत मौल्यवान असे व्यक्तिरत्न गमावले आहे. पण जोपर्यंत या जगात पीडितांना, वंचितांना, दुर्बलांना, गोरगरीब आदिवासींना संघर्ष आणि झुंज देत राहावी लागेल तोपर्यंत पिचड साहेबांचे आयुष्य व त्यांचे कार्य हे एखाद्या अजरामर दीपस्तंभासारखे समाजाला दिशा व ऊर्जा देण्याचे काम करत राहील हे मात्र नक्की. पिचड साहेबांना विनम्र व भावपूर्ण श्रद्धांजली मृत्यू दि. 6 डिसेंबर 2024. शब्दांकन - श्री. राहुल भांगरे

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home