प्रेरणा’दायी गुरु प्रा.एस.झेड.देशमुख – सर - मुरारी देशपांडे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन (२२.१२.२०२४
‘प्रेरणा’दायी गुरु प्रा.एस.झेड.देशमुख – सर - मुरारी देशपांडे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन (२२.१२.२०२४) ^^^^^^^^^^^^^^^^^ …........’लाथ मारीन तिथे पाणी काढीन’हा वाक्प्रचार उच्चारणे फार सोपे आहे.तसे करून दाखवणे भलते कठीण.आयुष्यभर हा वाक्प्रचार आपल्या कणखर वागण्याने खरा करून दाखविला तो आमचे गुरु आदरणीय एस.झेड.देशमुख सरांनी.असंख्य तरुणांच्या आयुष्याला आकार देणारा हा शिल्पकार आज ऐशीच्या उंबरठ्यावर सुद्धा अथकपणे युवाशक्तीची शिल्पे साकारण्यात मग्न आहे.’एस झेड’या आद्याक्षरांना हजारो युवकांच्या जीवनात ‘प्रेरणा’मंत्राचे स्थान आहे.या नावात इतकं पावित्र्य आणि इतकं सामर्थ्य सामावलं ते सरांच्या निरपेक्ष पण तितक्याच बाणेदार स्वभावामुळे. त्या उंचखडकच्या मातीतच काहीतरी रसायन असलं पाहिजे. 75 वर्षांपूर्वीचा अकोले तालुका.प्रगतीचा प्रकाश कसा असतो ते तोपर्यंत तालुक्याने पाहिलंही नव्हतं.आणि अशा तालुक्यातील एक लहानसं खेडं उंचखडक! अंगातील धमक आणि बुद्धिमत्तेची चमक कधीच लपत नाही म्हणतात.त्या लहानशा गावांत जन्मलेल्या देशमुख सरांनी आपल्या कर्तृत्वाने प्रचंड उंची गाठली.अडचणींचे अभेद्य खडक निश्चयाने फोडून काढले.परिस्थिती अनुकूल नसेल तर जगण्यात काही अर्थ नाही असं म्हणत हताश न होता सर अर्थशास्त्रात निष्णात झाले.उच्च शिक्षणाचे वारे नसलेल्या भागातून अकोले तालुक्यातील पहिले सी ए होण्याचा बहुमान त्यांनी मिळविला.अर्थशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला अर्थ देण्यासाठी केला.संस्कार,शिक्षण,राजकारण,समाजकारण,प्रबोधन अशी पंचारती सरांनी समाजाला आजवर समर्पित केली.ठामपणे यशाची एकेक पायरी चढत कीर्तीचा’सोपान’ त्यांनी सहज गाठला. अकोल्याच्या मॉडर्न हायस्कूल मध्ये शिकत असताना किशोरावस्थेतील सरांचे गुण स्वर्गीय फडके सर आणि प्राचार्य अनंतराव देशपांडे यांनी हेरले.त्यांनी या विद्यार्थ्याकडे खास लक्ष पुरविले.त्यातून महाराष्ट्राला मिळाला एक अभ्यासू,ओजस्वी वक्ता.ज्या वक्त्याने गेली चाळीस वर्षे महाराष्ट्र पिंजून काढला.युवकांच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लींग चेतविले.अन्यायावर कठोर प्रहार करायला प्रवृत्त केले.शिवचरित्रावरील त्यांची व्याख्याने युवकांना झपाटून टाकणारी ठरली.स्वतः ची पदरमोड करून राज्याचा कानाकोपरा त्यांनी शिवमय करून टाकला.स्वातंत्र्यवीर सावरकर,स्वामी विवेकानंद,चन्द्रशेखर आझाद,हुतात्मा वीर चाफेकर बंधू,समर्थ रामदास स्वामी,भगवद्गीता,रामायण,महाभारत,अटलबिहारी वाजपेयी,शामाप्रसाद मुखर्जी,पंडित दीनदयाल उपाध्याय,या विषयांवर बोलताना श्रोत्यांना त्या त्या काळात घेऊन जाण्याचं सामर्थ्य त्यांच्या शब्दात आहे.जे जे उन्नत उदात्त सुंदर महन्मधुर ते ते त्यांच्या व्याख्यानात असते.व्याख्यानानंतर एखाद्या युवकाच्या झोपडीत जाऊन हक्काने भाकरी अन ठेचा आनंदाने खाणारे सर अनेकांनी पहिले आहेत. आपल्या श्रद्धास्थानांसाठी जगणारा हा माणूस प्रचंड लोकसंग्रह करणारा एक स्वयंभू प्रवाह बनला.स्फटिका सारखा साफ नितळ निर्मळ प्रवाह.या प्रवाहात स्नानाचे सौभाग्य ज्यांना लाभलं ते अंतर्बाह्य उजळले. ज्या काळात ‘जय भवानी’जय शिवाजी’अशी घोषणा दिली तरी पोलीस गुन्हे दाखल करीत त्या काळात त्यांनी पतित पावन संघटनेच्या माध्यमातून हिंदुत्ववादी युवकांना संघटीत केले.सरकारी अन्यायाच्या विरोधात पुण्यात शनिवारवाड्यासमोर घेतलेल्या हजारोंच्या सभांनी महाराष्ट्र ढवळून निघाला. किती खटल्यांना ते धीरोदात्तपणे सामोरे गेले हा तर स्वतंत्र ग्रंथाचा विषय ठरेल. सरांचा आजवरचा जीवन प्रवास पाहून या ओळी आज प्रकर्षाने आठवल्या. मिळविण्यास न्याय हा लढेन मी लढेन मी छातीवर जुलुमाच्या पुन्हा पुन्हा चढेन मी शिवबाचा होय भक्त धमन्यातुनी तेच रक्त वर्तनातुन दृढनिश्चयी सावरकर होय व्यक्त मी शाहीर क्रांतीचा कडकडतो माझा डफ जोवरी कुडीत प्राण तोवरी हे माझे तप स्वतः साठी कधीच काही न मागणारे सर समाजासाठी लढताना मात्र आजही थकत नाहीत.तरुणाच्या उत्साहाने चौफेर वावरणारे सर सतत माणसांच्या गराड्यात असतात.मोठा नावलौकिक मिळवूनही या माणूसवेड्या माणसाने आपले साधे माणूसपण टिकवून ठेवले आहे.औपचारिकतेच्या चौकटीत बंदिस्त न झालेला हा चैतन्याचा झरा असाच खळाळत निरंतर वाहात राहो हीच परमेश्वराकडे प्रार्थना ....🌹🕉️🙏🚩
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home