किल्ले पट्टा ऊर्फ विश्रामगड
महाराष्ट्र व दक्षिण भारतातील
मिळून एकूण ३६० गड-किल्ले व दुर्ग शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते. यातील
किती गडांवर शिवाजी राजांचे पाय लागले असतील हे आपण नक्की सांगू शकत नाही.
पण एक किल्ला मात्र असा आहे ज्याच्या बाबतीत आपण नक्की सांगू शकतो की
छत्रपती शिवाजी राजांनी या गडावर एक-दोन दिवस नाही तर चांगलं महिनाभर
वास्तव्य करून थकलेल्या शरीराला विश्राम दिला होता. आणि तो गड म्हणजे
किल्ले पट्टा ऊर्फ ‘विश्रामगड ’.

कसारा घाटाच्या खाली वाटेत एकदा चहापाण्यासाठी थांबून पहाटे साडेचारच्या सुमारास आम्ही गडाखालच्या पट्टा गावात येऊन पोहोचलो.
सकाळ झाल्यावर आम्ही गावातील दोन तरुणांना
सोबत घेऊन सकाळी सात वाजता पेठ किल्ल्याकडे रवाना झालो. गाव पाठी पडताच
गावापासून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत सर्वत्र तिळाची शेतीच शेती पाहण्यास
मिळाली.
सगळीकडे तिळाची लागवड केलेली दिसत होती.
जेथे पाहावे तेथे तिळाच्या पिवळया, पिवळया नाजूक फुलांचा बहर आला होता.
गडाच्या पायथ्यापर्यंत पिवळा गालिचाच पसरलेला दिसत होता.
गडाकडे जाणारा रस्ता काही ठिकाणी मातीचा
तर काही ठिकाणी पक्क्या दगडांचा आहे. किल्ल्याच्या जरा अलीकडे पाणवठयाची
विहीर आहे. गावापासून पेठ गड हाकेच्या अंतरावर होता. वीस मिनिटातच आम्ही
किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचताच
आम्ही चार-पाच जणांचा ग्रुप बनवून गड चढण्यास सुरुवात केली.
सुरुवातीलाच डाव्या हाताला काही गुहा व
लेण्या पाहण्यास मिळाल्या. या गुहेत दुरुनच देवदेवतांच्या मूर्त्यां
पाहण्यास मिळाल्या. कारण गुहेच्या तोंडाशी लाकडी दरवाजे बसवून ते कडीकुलूप
घालून बंदिस्त केलेले होते. येथून जरा पुढे चढून येताच दगडातच खोदून
काढलेल्या अस्सल शिवकालीन पाय-या लागतात. समोरच काताळात खोदून काढलेला
प्रचंड बुरूज पाहण्यास मिळतो.
येथून पंधरा मिनिटांतच आम्ही गडावर प्रवेश
केला. म्हणजे गड चढण्यास आपल्याला अर्धा तास भरपूर होतो. गडावर प्रवेश
करताच समोरच पट्टाईदेवीचे मंदिर पाहण्यास मिळते. मंदिरात सिंहारूढ झालेली
देवीची मूर्ती सुंदर व सुबक आहे. या मंदिराजवळच कातळात खोदून काढलेले
पाण्याचे दोन टाक पाहण्यास मिळाले. या टाकाच्या उत्तरेला गडाचे महाद्वार
दिसते.
महाद्वार अत्यंत शोभिवंत व कलाकुसरीने
युक्त आहे. येथून वर चढून येताच उजव्या हाताला अजून एक महादरवाजा पाहण्यास
मिळाला. हा दरवाजा खूपच सुरेख आहे. हा दरवाजा पाहून सारे आनंदित झाले. हा
गडाचा दिल्ली दरवाजा आहे. आजही तो वैभवात असल्यासारखा वाटतो. येथून आम्ही
जराशी चढण चढून गड माथ्यावर म्हणजे गडाच्या पठारावर येऊन पोहोचलो. हा गड
प्रचंड मोठा होता. पट्टागड पाहून मला तोरण गडाची आठवण आली. कारण
पट्टागडाच्या उजव्या हाताला चार ते पाच कि.मी. लांबीची माची दूरवर पसरलेली
आहे.
या माचीला हरिश्चंद्रगडाच्या
कोकणकडयासारखी अभेद्य तटबंदी लाभलेली आहे. डाव्या हाताची माचीही चांगली ३
ते ४ कि.मी. लांबवर पसरलेली आहे. ही माची मात्र तट, बुरुजांनी बंदिस्त करून
सुरक्षित केलेली आहे. या गडाच्या मधोमध राजगडाच्या बालेकिल्ल्यासारखी एक
उंच टेकडी उंचावलेली पाहण्यास मिळते. गडावरील हे सर्वात उंच असलेले ठिकाण.
या टेकडीच्या शिखरावर भगवा ध्वज डौलाने फडकत होता. ही टेकडी वगळता गडाला
विस्तृत पठार लाभलेले आहे.
तसेच या गडाचे आजचे मुख्य आकर्षण म्हणजे
गडाच्या मध्यभागी काळया दगडात बांधलेले तीन भव्य घुमट असणारे अद्भुत धान्य
कोठार म्हणजेच अंबरखाना. तीनही घुमटांना मध्यभागी चौकोनी छिद्रे केलेली
आहेत. तसेच या वास्तूला तीन दिशेला तीन प्रवेशद्वारे आहेत. पूर्वेकडील
द्वार मात्र भव्य आहे. उत्तरेकडील प्रवेशद्वाराच्या आवारात पायाच्या
वाघनखात हत्ती धरून ठेवल्याचे दगडी व्याघ्रशिल्प कोरलेले आहे. सध्या या
सुंदर वास्तूचा उपयोग गडावर चरायला येणा-या गडाखालील गावातील लोकांच्या
गाई, म्हशींच्या वसतीस्थानासाठी झालेला आहे. सगळीकडे या पशूच्या शेणांनी व
मूत्रांनी चिखल झालेला दिसतो.
अंबरखाना ही वास्तू पाहून उजवीकडे पुढे
आल्यावर पाण्याचे दोन टाक पाहण्यास मिळतात. या टाकाच्या बाजूलाच दगडात
कोरलेले शिवलिंग आहे. येथून थोडे पुढे आल्यावर आपल्याला अर्धवक्र वाटीच्या
आकाराचा भव्य, खोल व रौद्र कडा पाहण्यास मिळतो. येथे भन्नाट वारा बेफाम
उधळत होता. हा हवाहवासा वाटणारा वारा अंगावर घेत आम्ही दक्षिण दिशेला
टोकावर पोहोचलो आणि आश्चर्यचकित झालो. कडयाच्या खाली छोटया, छोटया
टेकडय़ांवर अनेक अजस्त्र पवनचक्क्या पाहण्यास मिळाल्या.
आसमंत स्वच्छ असेल तर येथून दूरवरील आलंग,
कुलंग, मदन, हे जोड किल्ले व कळसुबाई शिखर पाहण्यास मिळतात. तसेच कडवा नदी
व त्यावरील धरण व सभोवतालचा परिसर पाहून थक्क व्हायला होते. तसेच गडावर
अनेक ठिकाणी ढासळलेल्या स्वरूपात तटबंदी पाहण्यास मिळते. गडाच्या प्रत्येक
माचीच्या टोकावर बुलंद बुरूज बांधून माची अजिंक्य केलेली आहे.
गडाच्या विविध भागात फिरताना ब-याच ठिकाणी
वाडयाचे जोते व सांगाडे पाहण्यास मिळाले. या गडावर आजही पाण्याचे अनेक
सुंदर टाक आहेत. येथे पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय आहे. पण गडावर
वास्तव्याची सोय मात्र नाही. हा गड प्रचंड मोठा आहे. एका दिवसात सगळा गड
पाहून होत नाही. या गडावर पाहण्याजोगे बरेच काही आहे. पण वेळेच्या अभावी
आम्हाला सगळा गड पाहता आला नाही.
किल्ले पट्टा ऊर्फ विश्रामगड हा
समुद्रसपाटीपासून ४५६० फूट व १३९० मीटर उंचावर आहे. छत्रपती शिवाजी
महाराजांचे अष्टप्रधान प्रमुख पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला सन
१६७१ मध्ये मोगलांकडून जिंकून घेतला. शिवाजी महाराजांनी १६ नोव्हेंबर १६७९
रोजी जालन्याची लूट केल्यानंतर मोगल सरदार रणमस्त खान महाराजांवर चालून
आला. पण महाराजांनी त्याचा पराभव करून त्याला पिटाळून लावले.
तरी लगेचच फिरून खान व केसर सिंग मोठी फौज
घेऊन महाराजांवर चालून आले. त्यांनी संगमनेरजवळ महाराजांना सर्व बाजूंनी
घेरले असता महाराजांचा इमानदार प्रमुख बहिर्जी नाईकने मोठया चलाखीने
राजांना रणक्षेत्रातून बाहेर काढून छुप्या मार्गाने पट्टा गडावर सुखरूप
आणले. वाढते वयोमान, सतत धावपळ, दगदगीने महाराज थकून गेले होते. त्यांना
विश्रांतीची अत्यंत गरज होती. म्हणून महाराज अखेरच्या काळात प्रकृती
अस्वस्थ झाल्यामुळे येथे महिनाभर राहिले. त्यामुळेच या गडाला विश्रामगड हे
नाव पडले.
आम्हाला मुंबईला परतायचे असल्यामुळे
दुपारी दोन वाजता गड उतरून परतीच्या प्रवासास लागलो. वाटेतच एका
उपाहारगृहात दुपारची पोटपूजा आटपून जरा आडवाट करून टाकेद या
तीर्थक्षेत्राचे दर्शन घेतले. येथली पायधूळ मस्तकी लावून मुंबईची वाट धरली.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home