निसर्गशिल्प.. सांधण व्हॅली
लाखो-हजारो वर्षे तो ऊन-वारा व
पावसाचे तडाखे सह्याद्रीतल्या कातळावर, डोंगर-द-यांवर, पठारांवर बसतात. हे
तडाखे वर्षानुवर्षे झेलल्यावर आकाराला येतात त्या नानाविध रचना. कधी
कोकणकडयाचे रौद्र रूप, तर कधी साहसाला साद घालणारे सुळके, तर कधी रांजण
खळगे. ही शिल्पकला घडतेच मुळी डोंगरकपा-यांत. निसर्गाची ही अशी अद्भुते
पाहायची असतील, तर मात्र वाट थोडी वाकडी करण्यावाचून पर्याय नसतो.

या कातळिभतींची उंची इतकी आहे की
सूर्यकिरण शेवटपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळेच तिथे सावल्यांच्या विविध
छटा आणि प्रकाशाचे खेळ प्रत्येक वळणावर दिसतात. तसेच डोंगराच्या कुशीत उगम
पावणा-या धबधब्याच्या मार्गाने चालायला सुरुवात करून थेट नदीपर्यंत
जाण्याचा अनुभव हा शब्दांच्या पलीकडचा आहे! हे वर्णन आहे सांधण व्हॅलीचे.
ही व्हॅली म्हणजे चकित करणा-या अनेक गोष्टी, सावल्यांचा खेळ आणि थरार यांचा
खजिनाच आहे.
मुंबई-इगतपुरी-घोटी-शेंडी (भंडारदरा)-
पांझरे-उडदवणे-साम्रद गाव या मार्गाने सांधण व्हॅलीजवळ पोहोचता येते.
एकीकडे रतनगड, लांबवर सह्याद्रीतील अतिशय कठीण अशी कळसूबाईची डोंगररांग,
त्यातून थेट लक्ष वेधून घेणारे अलंग, मदन, कुलंगसारखे अभेद्य किल्ले,
चहूकडे जंगल असलेल्या मोठय़ा पठारावर वसलेले इनमीन शंभरेक घरांचे सांधण
व्हॅलीजवळचे साम्रद हे गाव. सांधण व्हॅलीमुळे हे गाव जगाच्या नकाशावर आले
आहे.
गावातून बाहेर पडल्यावर कातळाच्या
सडय़ावरून पुढे जात वाट दाट झाडीत शिरते. थोडय़ाच वेळात आपण एका घळीच्या
मुखाशी येतो. सांधण दरीचे वैशिष्टय़ म्हणजे ही जमिनीच्या पातळीखाली आहे.
अतिशय अरुंद अशी ही लांबच लांब जमिनीला पडलेली भेग आहे. घळीच्या
सुरुवातीलाचा एक जिवंत झरा आहे. जो कधीही आटत नाही. दगडांनी तो बंदिस्त
केल्यामुळे अतिशय निर्मळ व थंडगार पाणी पिण्यास योग्य आहे. आपण घळ उतरायला
लागतो. सुरुवातीचा सोपा कातळ टप्पा उतरून आपण आत दरीच्या नाळेत प्रवेश
करतो.
आत दरी सापासारखी लांबच लांब वळण घेताना
दिसते. दोन्ही बाजूला काळ्याकभिन्न कातळकडय़ांनी ती बंदिस्त केलेली आहे . या
घळीच्या प्रथमदर्शनीच आपण प्रेमात पडतो. त्याचे राकट स्वरूपच भुरळ घालते.
आपण आपसूकच पुढे जात राहतो. वाटेत मात्र जपून पावले टाकावी लागतात, कारण
काही मोठमोठे दगडधोंडे व शिळा ओलांडाव्या लागतात. पहिला कातळटप्पा उतरताच
एका पाणवठय़ाने आमचा मार्ग अडवला. त्या पाण्यातून, शेवाळलेल्या दगडांवरून
आपणास कौशल्याने मार्ग काढत पलीकडे जावे लागते.
एव्हाना आपण ब-यापैकी आत गेलेले असतो. नजर
उंचावून पाहिली की लक्षात येते, आपण थेट डोंगराच्या मधोमध खोदलेल्या भेगेत
आहोत. ही भेग तरी केवढी ४५०-५०० फूट खोल, फार फार तर २५ फूट रुंद, कधी कधी
१० फूटदेखील आणि एक किलोमीटर लांबीची आहे. परत आपला मार्ग दुस-या मोठय़ा
पाणसाठय़ाने अडवला जातो.
सूर्याची किरणे येथे कधीही पोहोचू शकत
नसल्याने येथील अतिशय थंडगार अशा त्या कंबरभर पाण्यातून लांब चालण्याचा
थरार प्रत्यक्ष अनुभवातूनच येतो. काहीवेळा छातीपर्यंत पाणी असल्यामुळे बॅगा
डोक्यावर घेण्यावाचून गत्यंतर नसते. डोंगराच्या पोटातील आपला प्रवास चालूच
ठेवायचा. दोहो बाजूंचे उंच उंच कातळकडे व आकाशाच्या छोटय़ा तुकडय़ापलीकडे
काहीही दिसत नाही.
आता हा व्हॅली रुंद होत जाते. तसा त्याचा
उतारदेखील वाढत जातो. म्हणजे मग डोंगरकडय़ाजवळ आलो असे समजावे. तेव्हा समोर
पुन्हा सह्याद्रीचे रौद्र स्वरूप आपल्या स्वागताला हजरच असते. भन्नाट वारा
अंगावर झेलत मागे वळून पाहिले की, ती व्हॅली अंगावरच येते असते वाटते. या
व्हॅलीतून पुढे काही अवघड कातळारोहण टप्प्यांवरून जात करोली घाटाला जाऊन
मिळतो. व्हॅली उतरून साकुर्ली गावात यायचे.
त्या गावातून दहाएक मिनिटांवर डेहणे गाव
आहे. या गावातून आसनगावला जाण्यासाठी बस किंवा खासगी वाहन मिळते. अप्रतिम
अशा या निसर्गचमत्काराने आपण अवाक् होतो. ही अरुंद घळ पाणी व ज्वालामुखी
यांच्या एकत्रित परिणामामुळे बनली असावी. पूर्ण सांधण दरीत कधीही ऊन पोहोचत
नाही त्यामुळे तेथे कायमच सुखद गारवा असतो.
पावसाळ्यात सांधण व्हॅलीत शिरण्याचा मार्ग
बंदच असतो. पाऊस सरला की नोव्हेंबरच्या दरम्यान हा मार्ग खुला होऊ लागतो.
सांधण व्हॅलीचा ट्रेक करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी हमखास घ्यावी ती
म्हणजे, अनुभवी ग्रुपसोबतच इथे जावे. गरज असल्यास एखाद्या गावक-याला सोबत
घ्यावे. खडक, पाणी व जंगलातून वाट काढावी लागत असल्यामुळे, अनेकदा
सरपटणा-या प्राण्यांशी गाठभेट होते, मग पायाच्या संरक्षणासाठी म्हणून
चांगले बूट घालणे व कपडय़ाची एखादी जोडी सोबत असणे अत्यावश्यकच आहे. धाडस
म्हणून चुकून देखील दरीत एकटय़ाने जाणे टाळावे.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home