निसर्गाला जपणारे हात!
शास्त्रज्ञांनी केलेल्या
अंदाजानुसार हवामान बदलाचे परिणाम दिसायला सन २१०० उजाडेल अशा भ्रमात खरं
तर आपण राहू नये. आजच यावर काही ठोस उपाययोजना अमलात आणल्या तर भविष्यातील
परिस्थितीची तीव्रता आपल्याला कमी करता येईल. यासाठी संपूर्ण जगाने एकमताने
पृथ्वीवरील पर्यावरणाच्या रक्षणासाठी एकमेकांना साथ दिली पाहिजे.

प्रत्येक व्यक्तीने हवामान बदलास कारणीभूत
ठरणा-या सवयींचा त्याग केला पाहिजे. कार्बनचे उत्सर्जन आटोक्यात
आणण्यासाठी संपूर्ण जगभर अत्यंत प्रामाणिक प्रयत्न होताना दिसत आहेत. प्रगत
देशांपैकी युरोपमधील स्वीडनसारख्या देशांनी यामध्ये मोठी आघाडी घेतली आहे.
स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या शहरात
बहुसंख्य नागरिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. लहान-सहान प्रवासासाठी
नित्यनेमाने सायकलचा वापर करतात. त्यासाठी तेथील शासनाने सायकलवरून प्रवास
करणा-यांसाठी स्वतंत्र मार्ग राखून ठेवले आहेत.
या देशात, हवामान बदलाची तीव्रता कमी
करण्यासाठी सरकारपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्व जण आपली जबाबदारी
पार पाडण्यासाठी कायम प्रयत्नशील असलेले दिसतात.
आपणही आपल्या देशात स्थानिक पातळीवर काही
छोटया छोटया गोष्टी करून आपली जबाबदारी पार पाडू शकतो. आजवर आपल्या
कार्बनने माखलेल्या पावलांना आपल्या हिरव्या हातांनी पुसून टाकण्याचाच एक
प्रयत्न आपण केला पाहिजे.
हवामान बदलास कारणीभूत ठरणा-या
उष्माग्राही वायूंचे उत्सर्जन आटोक्यात आणूनच आपल्याला हवामान बदलाचा सामना
करता येईल. आपल्या दैनंदिन आयुष्यातील पुढील गोष्टींबाबत आवश्यक बदल आणून
उष्माग्राही वायूंचे उत्सर्जन आपल्याला रोखता येईल. इतकंच नाही तर पैशाचीही
बचत करता येईल.
जर मुले टीव्ही पाहण्याऐवजी किंवा
कॉम्प्युटरवर खेळण्याऐवजी मैदानी खेळ खेळतील तर प्रत्येक मुलामागे वर्षाला
६२ ते ९३ किलो कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन रोखता येईल. व टीव्ही-
कॉम्प्युटर वापरण्यामुळे येणा-या वीज बिलांत वर्षाला ३०१ ते ४५३ रुपयांची
बचत होईल.
हल्ली समाजात ‘नो टीव्ही डे’सारखे दिवस
साजरे होत आहेत, त्यामध्ये सहभागी होता येईल. संपूर्ण जगभर २९ मार्च हा
दिवस ‘अर्थ आवर‘ किंवा एक तास वीज बंद दिन म्हणून पाळला जातो. थायलंड,
फिलिफाइन्स, न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया, स्वीडन अशा अनेक देशांतील नागरिकांनी
या दिवशी रात्री साडेआठ ते साडेनऊ या वेळेत विजेचा वापर टाळल्यामुळे मोठया
प्रमाणात विजेची बचत झाल्याचे दिसले आहे.
कार्बनचे उत्सर्जन टाळू या – तापमानवाढ रोखू या!
आपल्या दैनंदिन आयुष्यात नवीन कागदाचा
वापरसुद्धा मोठया प्रमाणात होत असतो. एक टन कागद बनविण्यासाठी १७ झाडे
तोडावी लागतात. जर १०० मुलांनी अभ्यास करण्यासाठी नवीन वा वापरण्याऐवजी
पाठकोरे कागद गोळा करून बाइंडिंग केलेल्या वा वापरल्या तर अंदाजे ५०००
कागदांची बचत होईल आणि ८७० किलो कार्बन डायऑक्साईडचे वातावरणात उत्सर्जन
कमी होईल.
१०० मुलांनी त्यांची प्रत्येकी १०
विषयांची पुस्तके पुढील वर्षी पास होऊन येणा-या मुलांना दिली तर आणखी ७८०
किलो कार्बन डायऑक्साईडचे वातावरणात उत्सर्जन कमी होईल.
एक झाड प्रतिवर्ष जवळजवळ १० किलो कार्बन
डायऑक्साईड शोषून घेतो. १०० विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक झाड लावून
वाढविल्यास दरवर्षी १००० किलो कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जाईल.
वृक्षारोपण केलेल्या प्रत्येक रोपाच्या जन्माचा दाखला तयार करून घेणे तसेच
रोपाच्या वाढीचे प्रगतीपुस्तकही बनवून वृक्षारोपण करणा-यांच्या हाती
सुपूर्द करावे.
शक्यतो स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची
निवड केल्यामुळे त्यांच्या जगण्याची शाश्वती निर्माण होते. उदाहरणार्थ
कडुनिंब-
करंज-आंबा-जांभूळ-चिंच-सातवीण-सावर-पळस-पांगारा-बाभूळ-वड-पिंपळ-उंबर-भोकर-अर्जुन-
बकुळ-कदंब-आपटा-तामण-धामण-चाफा-बहावा-आवळा-हिरडा-बेहडा-बेल-फणस इ. कितीतरी
वृक्षांची लागवड करता येऊ शकेल.
अगदीच जागेची कमतरता असल्यास तुळस-अडुळसा-
कोरफड-शतावरी-निरगुडी-ब्राह्मी-कडीपत्ता-जास्वंद-मुरुडशेंग-नवरेल-पानफुटी
अशा औषधी वनस्पतींची जोपासना छोटयाशा जागेतही करता येते.
लक्ष लक्ष वृक्ष
असे म्हणतात की एक पिंपळ, एक वड, दोन
चिंच, तीन आंबे, चार जांभूळ आणि पाच कडुनिंबाची झाडे वाढविणारा कधीही नरकात
जात नाही. या वाक्यातील स्वर्ग-नरकाच्या कल्पना जरी बाजूला ठेवल्या तरी
एवढया झाडांच्या सहवासात राहणा-या व्यक्तीला मिळणारा आनंद आणि लाभणारे
आरोग्य स्वर्गीयच असते. अर्थात, या गोष्टी बोलायला सोप्या वाटतात, परंतु एक
झाड लावून त्याची जोपासना करणे ही एक जबाबदारी असते.
अनेकदा वृक्षांची लागवड सपशेल अपयशी
झालेली दिसते. कारण रोप स्थानिक प्रजातीचे नसते, वृक्ष लागवडीची जागा
चुकीची असते, खड्डयाचा आकार अपुरा असतो, रोप लावण्यापूर्वी खड्डा ओला करून
घेतला जात नाही.
रोपाला नियमितपणे खत-पाणी दिले जात नाही,
रोपाचे गुराढोरांपासून आणि उपद्रवी प्रवृत्तींपासून रक्षण केले जात नाही,
संरक्षक कुंपण लावले जात नाही, रोपाभोवतीच्या जागेची मशागत केली जात नाही.
जर आपल्याला लक्ष लक्ष वृक्षाचे लक्ष्य
गाठायचे असले तर पुढील पानावरील आकृतीत दर्शविल्याप्रमाणे रोपाची लागवड
केली तर यश हमखास मिळेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की गुलमोहर, सुबाभूळ,
निलगिरी, कॅशिया अशा वृक्षांना टाळावे आणि स्थानिक वृक्षांची लागवड करावी.
इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज
(आयपीसीसी)च्या अहवालानुसार कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन २० अब्ज
टनांपर्यंत जाऊन पोहोचेल. अशा वेळी कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी
प्रचंड प्रमाणात वृक्ष आच्छादनाची गरज आहे.
एक वृक्ष वर्षाला सरासरी २२.५ किलो कार्बन
डायऑक्साईड वायू शोषून घेतो. जर आपण एका वृक्षाचे सरासरी वय ५० वर्षे
गृहीत धरले तर तो वृक्ष आयुष्यभरात ११२५ किलो कार्बन डायऑक्साईड वायू शोषून
घेतो.
या हिशोबाने २० अब्ज टन कार्बन डायऑक्साईड
वायू शोषून घेण्यासाठी आपल्याला पृथ्वीतलावर १०६ अब्जांपेक्षाही जास्त
वृक्षांचे संवर्धन करण्याची गरज आहे. त्यासाठी जगाने काय करायचे ते जग
ठरवेल, पण आपण स्थानिक पातळीवर आपला वाटा उचलू शकतो.
येत्या पाच वर्षात आपण सर्वानी मिळून काही
शे-हजार किंवा लक्ष वृक्षसंवर्धनाचे लक्ष्य बाळगले पाहिजे. हे करताना
जाणीवपूर्वक आपल्या मातीत रुजणारे स्थानिक वृक्ष लावण्याची काळजी घ्यावी.
सौजन्य- वसुंधरा संवर्धन अभियान आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home