Thursday, June 4, 2015

|

सह्याद्रीच्या हिरकण्या

गिरिभ्रमण, पवर्तारोहण, सुळकेगिरीचं प्रशिक्षण देण्यात पूर्वी पुरुषांची संख्या जास्त होती. आत्ता पल्लवी वर्तक-मोरे, वैशाली राणे, मेघना परब, नमिता देत या महिला प्रशिक्षिकांनी साहसी खेळातील पुरुष प्रशिक्षिकांची मक्तेदारी मोडीत काढली आहे. साहसी खेळातही या चौघींनी ‘रिस्क’ घेऊन स्वत:चं वेगळेपण सिद्ध केलं आहे. आपल्या अनुभवांतून त्यांनी अनेकींना तयार केलं आहे. नवरात्रींच्या निमित्ताने गिर्यारोहणाची वेगळी वाट चोखाळणा-या या ‘चारचौघीं’ची ओळख…
महाराष्ट्राच्या पूर्वेकडे उभ्या असलेल्या अभेद्य सह्याद्रीमुळे महाराष्ट्रात गिर्यारोहण, गिरिभ्रमण, ट्रेकिंग हे प्रकार चांगलेच रुजले आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात या साहसी खेळांच्या हौशी क्लब, संस्थांची संख्या मोठी आहे. त्यातून अनेक तरुणांना गिरिभ्रमण, पर्वतारोहण, सुळकेगिरीचं प्रशिक्षण मिळत आहे. हे साहसी प्रकार शिकवणा-याप्रशिक्षकांमध्ये आतापर्यंत पुरुषांची संख्या जास्त होती. आता मुलीही त्यात उतरू लागल्या आहेत. पल्लवी वर्तक-मोरे, वैशाली राणे, मेघना परब, नमिता दैत या चार जणी ‘साहसी खेळांच्या महिला प्रशिक्षक’ म्हणून आपली ओळख तयार करत आहेत.
खरं तर या चौघींनाही साहसी खेळांची आवड. त्यातून चौघींची साहसी खेळांच्या प्रशिक्षक बनण्यापर्यंत मजल गेली. पल्लवी आणि वैशाली शाळेत असताना शिकवणीसाठी अनंत बेदरकरांकडे जायच्या. बेदरकरसरांना गडकिल्ल्यांच्या भ्रमंतीची आवड होती. त्यांचा ‘शिवशक्ती हायकर्स’ नावाचा दुर्गभ्रमंतीचा क्लब होता. या क्लबअंतर्गत ते विविध दुर्गभ्रमंतीची शिबिरं भरवायचे. एका शिबिराला सर पल्लवी आणि वैशालीलाही घेऊन गेले. या कॅम्पमुळे दोघींना दुर्गभ्रमंतीची गोडी लागली. आज दोघीही चांगल्या पट्टीच्या रॉकक्लायम्बर आहेत. तर मेघना परब आणि नमिता दैत या कॉलेजमध्ये एनएसएस क्लबच्या सदस्या होत्या. या एनएसएस क्लबमुळे मेघना आणि नमितामध्ये दुर्गभ्रमंतीची आवड निर्माण झाली.
या चौघीही जेव्हा आपली आवड जपत होत्या, त्यांना सुरुवातीला घरच्यांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं. ‘डोंगर-दऱ्या चढून तुम्हाला काय मिळणार, कंटाळा नाही येत का, अशीही विचारणा त्यांना घरून व्हायची. मात्र या चौघी आपल्या आवडीपासून विचलित झाल्या नाहीत. शिक्षण पूर्ण करून या चौघींही गिर्यारोहणाच्या उपक्रमांत सहभागी व्हायच्या. चौघींनी गिर्यारोहणाचे बेसिक आणि अ‍ॅडव्हान्स कोर्स पूर्ण केले. आजही चौघी आपली नोकरी सांभाळून, घरचं करून विविध कॅम्पना जातात. त्यांच्यातून त्या आता प्रशिक्षक, लीड क्लायम्बर म्हणून काम करू लागल्या आहेत. मुख्य म्हणजे क्लायम्बिंगचं वाइंड-अपही करतात.
‘साहसी खेळात छंद आणि आवडीला अधिक महत्त्व असतं. त्यामुळे मुलगा-मुलगी असा भेदभाव त्यात नसतो. ज्याला आवड आहे त्याने यात उतरायला हवं’, असं मत पल्लवीचं आहे. ‘करिअर, लग्न, संसार-मुलं या त्रांगड्यात एकदा स्त्री अडकली की, तिला स्वत:च्या छंदांकडे लक्ष देता येत नाही. फारच थोडय़ा जणी आपल्या छदांकडे लक्ष देतात. आवड असूनही लग्नानंतर त्यांनी ट्रेकिंग, क्लायम्बिंग सोडणा-या अनेक जणी माझ्या बघण्यात आहेत. अशा सर्व जणींना एकत्र करून आम्ही ‘ऑल वुमन रॉकक्लायम्बिंग क्लब’ हा ग्रूप निर्माण केला. सुरुवातीला या ग्रूपमध्ये २५ जणी होत्या. आता त्यांच्या संख्येत वाढ होऊन ती ८० वर गेलीय. आम्ही सगळय़ा जणींसाठी क्लायम्बिंगच्या मोहिमा आखतो. त्यांना वेळात वेळ काढून सर्व जणी आवर्जून येतात,’ असं पल्लवी सांगते.
पल्लवी स्वत: ‘ऑल वुमन रॉकक्लायम्बिंग क्लब’ या ग्रूपची लीड क्लायम्बर आहे. या ग्रूपने तैलबैलाच्या क्लायम्बिंगवर माहितीपटही तयार केला होता. त्याचं प्रसारण ‘गिरिमित्र संमेलन’ या गिर्यारोहकांच्या राष्ट्रीय पातळीवरच्या संमेलनात करण्यात आलं. हा माहितीपट संमेलनात बक्षीसप्राप्तही ठरला.
पल्लवीसारखंच महिलांना गिरिभ्रमणाचं प्रशिक्षण देणा-या मेघना आणि नमिता सांगतात, ‘कोणत्याही आउटडोअर कॅम्पसाठी प्रशिक्षक म्हणून काम करताना ब-याच गोष्टी नव्याने शिकता येतात, असे अनुभव प्रगल्भ करणारे असतात. या कॅम्पमध्ये शिकवताना आम्ही शिकलेल्या गोष्टींची नव्याने उजळणी होते. या कॅम्पमुळे माणसांचे स्वभाव कळतात. लोकांशी वागावं कसं याचा अंदाज येतो. क्लायम्बिंग करताना अनेकदा आव्हानात्मक प्रसंग अनेक येतात. या प्रसंगांना धर्याने आणि जिद्दीने सामोरं जाण्याचं कसब अवगत करता आलं की, अर्धी मोहीम फत्ते होते.’
साहसी खेळांत तंदुरुस्ती महत्त्वाची असते. त्यामुळे मुलींनी स्वत:ची तंदुरुस्ती वाढवण्याकडे विशेष प्रयत्न केले पाहिजेत. एकदा का, एखादीला आपल्या क्षमतेचा अंदाज आला की, ती साहसी खेळांत मागे राहत नाही. त्यासाठी फक्त गरज असते ती योग्य चॅनेलची. मुलींमध्ये इच्छाशक्ती असते, मात्र प्रोत्साहन मिळालं तर काम सोपं होतं, असं पल्लवी, मेघना, वैशाली आणि नमिता चौघींचं एकमत आहे.
ऊन-वारा-पावसाची पर्वा न करता शरीराला भरपूर कष्ट देणा-या या साहसी खेळांत स्त्रिया मागे नाहीत, याचं चालतं-बोलतं उदाहरण म्हणजे या चौघी. हे साहसी खेळ त्या स्वत: शिकल्या, त्यांनी त्याचा आनंद आणि थरार अनुभवलाच, पण आपल्या इतर मैत्रिणींनाही तो मिळावा, यासाठी त्या पुढे सरसावल्या. जास्तीत जास्त मुलींनी या साहसी खेळांत यावं, यासाठी त्यांची चालू असलेली धडपड खरंच कौतुकास्पद आहे.
आगामी मोहिमा
अलंग-मलंग-कुलंग ट्रेक : २६ ते २८ ऑक्टोबर २०१२
संपर्क : एक्स्प्लोर्स- आनंद केंजाळे :- ९८५०५०२७२३, ९८५०५०४४३३
कॅनयॉन व्हॅली ट्रेक (खंडाळा) : ४ नोव्हेंबर २०१२
कलावंतीण दुर्ग ट्रेक (खोपोली ): ४ नोव्हेंबर २०१२
आदिवासी पाड्यावर दिवाळी फराळ वाटप : १० आणि ११ नोव्हेंबर २०१२
ढाक ट्रेक (लोणावळा ) : १७ आणि १८ नोव्हेंबर २०१२
वासोटा ट्रेक (सातारा) : २४ आणि २५ नोव्हेंबर २०१२
प्रीती पटेल : ९८५०१९३०३९
Print Friendly

Share It

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home