Thursday, June 4, 2015

वसंता, सर्वानाच सुखी ठेव रे!

‘ऋतू’ या आडनावाची सहा भावंडे, आपापले वेगळेपण टिकवून असणारी आणि वर्षानुवर्षे वर्षाला दोन महिने हजेरी लावून जाणारी. ‘यावच्चंद्रदिवाकरौ’ अर्थात चंद्र व सूर्य जोपर्यंत फिकत राहतील, तोपर्यंत ही भावंडे आपला पाहुणचार तुम्हा-आम्हाला देतच राहणार.
नटभैरव रागातील चिजेचे बोल ‘सूरज चंदा जब तक फिरे..’ हे शास्त्रीय संगीत आणि ऋतू यांचं अतूट नातं स्पष्ट करतात. कुमार गंधर्वाची ‘धानी’ रागातील चीज आठवा. ‘आयी ऋत आयी, बोलन लगी कोयलिया..’ आणि आशाताई वर्षाऋतूच्या सान्निध्यात प्रचंड हिरवाईत म्हणतात, ‘ऋतू हिरवा.., ऋतू बरवा..!’ प्रत्येक ऋतूची मजा वेगळी. सगळे ऋतू बिचारे प्रामाणिक, सध्या आपले अतिथी आहेत, ‘वसंत ऋतू’.
treeसध्या ‘वसंत’राव आलेले आहेत. या ऋतूच्या गुणांची केवढी तारीफ करावी! जीव हैराण करून टाकणारा उष्मा बाहेर जाणवतोय. घरातही पंख्यापासून लांब जाववत नाही. पण तरीही या ऋतुराजाचे खास वैशिष्टय़ आहे.
चैत्र-वैशाख वसंत ऋतू. सध्या चैत्रमास सुरू आहे. भारतीय सौराचा पहिला महिना, चैत्रपरंपरेला गुढीचा मान हा पहिल्या दिवशी. म्हणजे प्रतिपदेला.
नवीन वर्षाची सुरुवात सूर्योदयापूर्वीच घरासमोर गुढी उभारायची, त्यामुळे सकाळी लवकर उठून लगबगीने सर्व कामे आटोपायची, पाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात. गोडधोड करायचे.
होळीला जशी पुरणाची पोळी तशी पाडव्याला श्रीखंडपुरी ताजा बांबू तोडून आणून त्याचीच गुढी उभारणे आता दुरापास्त. दिवस बदलताहेत, परिस्थितीनुसार बदलणे आवश्यक असते. गुढीपाडव्यापासून सुरू होणारी सणांची परंपरा अगदी होळी पौर्णिमेपर्यंत सतत सुरू असते. पाडवा झाला, मग रामनवमी उत्सव झाला. नुकताच हनुमान जयंती सोहळा पार पडला.
ग. दि. माडगुळकर रचित सुधीर फडके यांनी चाली लावलेले व गायलेले ‘गीत रामायण’ ऐकण्याचे हे दिवस. सारा आनंदाचा माहोल, वसंत ऋतूची ही सुरुवात. आपण हे सारे अनुभवतो हे खरे आहे, पण त्यामागे ‘वसंत’ ऋतूचा विचार असतो का? बिलकूल नाही. जो तो परंपरेप्रमाणे सर्व काही करत असतो. ऋतूंना दाद देणारे थोडेच असतात.
काव्य-साहित्य इत्यादी ऋतूंशी निगडित असणा-या गोष्टी मर्यादितपणेच सांभाळल्या जातात. मुंबईत असताना ‘वसंत व्याख्यानमाला’मधील काही व्याख्याने ऐकण्याचा योग आला. साहित्यिक विचार कानावर पडणे आवश्यक असतेच. वर्षात एकदाच येणारा हा वसंत आम्हाला प्रफुल्लित करतो. ऋतू हे मनावर लहानपणापासूनच रुजवले गेले पाहिजेत.
‘‘छे! या उन्हाळ्याने अगदी हैराण करून टाकलेय. नकोसे करून टाकलेय.’’ असा आपण त्रागा करतो. त्यात चूक काहीच नाही. परिस्थितीच तशी असते, पण हस-या वसंताचा तो एक भाग आहे. असेच शहाणपण अंगी बाळगले तरच तो उन्हाळा सहन करण्याचे बळ आपल्याला मिळेल. कारण काय की, आपण कितीही नियोजन केले तरी दुपारी बारा एक वाजताच्या उन्हाचे चटके आपल्याला सहन करावे लागणे अपरिहार्य असते.
मग पाणी फ्रीजचे प्यायचे की, माठातले, शीतपेयाच्या तयार बाटल्या ढोसायच्या की लिंबू, आवळा ही आयुर्वेदिक मूल्ये असलेली सरबते घरी ठेवायची हा विचार ज्याने त्याने ककरायचा. ऋतूला नाही दोष द्यायचा. हसरा वसंत सर्वाचाच आहे. तो जसा आहे तसाच्या तसाच त्याचा स्वीकार करायला शिकायचे.
लेक माहेरी आलेली आहे. बरोबर दोन अडीच वर्षाचा युवराज आहे. सायंकाळी घरासमोरील मोकळ्या जागेत आजूबाजूची एक-दोन मुले जमलेली आहेत. आई बाळाला छानपैकी कपडे घालून काहीतरी खिलवत उभी आहे. इतक्या आनंदाने खाऊ खाणारे बाळ जोरजोराने रडू लागते. आई पाहते तर खालील मातीतील लाल मुंग्या बाळाच्या अंगावर चढून त्याला हैराण करून टाकताहेत. झालं..
बाळाच्या आईचा तोंडाचा पट्टा सुरू झाला, ‘‘जळल्या त्या मुंग्या, इथे कुठे कडमडायला आल्या, काय मेल्यांनी अवस्था करून टाकली माझ्या सोन्याची!’’ आई शहाणी, अनुभवी, वैचारिक पातळी उच्च असलेली. ती लेकीला म्हणतेय, ‘‘अगं आधी बाबाचे सर्व कपडे काढ, त्याच्या अंगाला क्रीम वगैरे काहीतरी लाव. त्या मुंग्यांना शिव्या देऊन काय होणाराय?’’ आईचा ऋतूंचा अभ्यास आहे.
वसंत व्याख्यानमालेत खूप काही तिने ऐकलेय. खूप वाचलंय. सर्व काही आलबेल झाल्यावर आईने लेकीला थोडे बौद्धिक दिले. मुलीला ते किती पचनी पडले तो भाग वेगळा.
ऋतू सर्वाचा आहे. मुंग्या, डोंगळे यांच्या फौजा घराबाहेरील जमिनीतून तुफान वेगाने व करोडोंच्या संख्येने बाहेर पडताना दिसत आहेत. वसंत सर्वाचाच आहे, तो माणूस आणि प्राणी असा फरक करत नाही. या मुंग्या घरा भिंतीवर वावरताहेत. त्यांना गट्ट करायला पालीसुद्धा मोठया संख्येने हजेरी लावताना दिसताहेत. हे असे असायचेच असे गृहीत धरायला हवे. या कीटकांचा बंदोबस्त करणे आपल्या हातात असते. जमल्यास पेस्ट कंट्रोल करावे. पण करून काय उपयोग?
हा ऋतू जसा किडयामुंग्यांचा तसा तो पक्षांचाही आहे. कोकीळ गान ही तर वसंताची खासियत, पण इतर पक्षीही दिवसभर तापून सायंकाळी पाण्याच्या शोधार्थ तुमच्या-आमच्या घराजवळ हजेरी लावणार पाहा. सायंकाळी गावच्या आलेल्या पाण्याच्या धारेजवळ पन्नास एक कावळे घिरटया घालताना पाहून काही वेगळेच जाणवले.
आपण म्हणतो, हसरा वसंत, स्फूर्तिदायक वसंत वगैरे, कारण आधीचा शिशिर ऋतू संपला की, निष्पर्ण झालेल्या तरुंवर मस्तपैकी पालवी येऊन ती पाने पुढे हिरवी कंच होतात आणि ऑफिसात सुटबूट घालून जाणा-या एखाद्या अधिका-यासारखी दिसतात. हीच वसंताची ताकद आहे, पण पक्षी जेव्हा तुमच्या-आमच्या घराजवळ पाण्यासाठी रेंगाळतात, तेव्हा त्याचा अर्थ असतो की, बाहेर उपलब्ध असलेले पाण्याचे स्रेत आटलेले असतात, नष्ट झालेले असतात.
सांडपाण्यावर ‘वसंत’ फुलवता आला पाहिजे. थोडयाशा निरीक्षणानंतर, अभ्यासानंतर हे सहज शक्य आहे. काही वनस्पती अशा असतात की, त्यांना थोडेसे जरी पाणी मिळाले तरी त्या पाणीदात्याला खूश ठेवतात. लांबट हिरवी पाने व छोटीछोटी पिवळी तिळाच्या फुलांसारखी दिसणारी फुले यांची झुडपे या सांडपाण्यावर मस्त माजतात.
बागेत घराच्या परिसरात एक रोप झाले, पुरे, पुढे ते हिरवे पिवळे ताटवे कसे वाढवायचे व घराच्या भोवतालच्या परिसर कसा रंगीत करायचा याचा छंद हवा. याच फुलांबरोबर विनामेहनत वाढणारी सदाफुलीही जपावी, वाढवावी, सफेद फुलं, जांभळी फुलं, पसंती तुमची. मग त्यांच्या जोडीला तीन-चार छटांची मखमल ऊर्फ कॉसमॉस. आणि थोडी अधिक मेहनत घेतलीत तर झेंडू. सांडपाण्याच्या थेंबाथेंबाला ही वसंतपिल्ले तुम्हाला दाद देतील व रणरणत्या उन्हाची सुरुवात होण्यापूर्वी तुम्हाला अलोट नेत्रसुख देत राहतील.
भगवे गणेशफूल वसंतातच उगवणार. एका नळीतून सहजच सातआठ फुले बाहेर पडणार, उंची फक्त दीडदोन फूट. या सर्वच भावंडांची उंची दीड, दोन, अडीच, ती फूट. त्यांची कमान उभी राहिली की समजायचं, वसंत फुलला. फुललेला खुरचाफा, गुलमोहर, सोनचाफा पाहण्यासाठी मान उंचवावी लागेल.
पण या आमच्या सांडपाणीसंख्यावर जाता-येता सहज नजर पडली तरी नेत्रसुख अपरंपार, मग पेपर टाकणारा पो-या आला तरी खूश अथवा दुधवाले कलवारी आले तरी ते खूश. या सर्व हिरव्या पिवळ्या गर्दीत तुळशीचे ताटवे खुलवणेही अगदी सोपे. त्याची योग्य वाटणी करत बसलात तर छान गोलाकार तुळशीचे ताटवे निर्माण होतात. देवाला तर आपण तुळशी वाहतोच, पण चार तुळशीची पाने रोज खावीत, असा आपला आयुर्वेदही सांगतो.
आमच्याकडे पाणी आहे म्हणून आम्ही या वसंत ऋतूच्या गोष्टी करतो, त्याचे गोडवे गातो. तुफान उष्मा झाला तरी देह थंड करायला आम्हाला पाण्याची कमी नाही, पण? महाराष्ट्रात ज्या-ज्या भागात दुष्काळ पडलाय, जिथे पाण्याचा थेंबही दृष्टीस पडत नाहीये तेथे कसला आलाय वसंत? आपण डोळे मिटायचे आणि नुसतेच म्हणायचे,
‘‘सर्वे सुखिन: संतु, सर्वे संतु निरामय:’’

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home