विस्मृतीत गेलेली भातुकली..
पूर्वी घरोघरी खेळला जाणारा
भातुकलीचा खेळ हा शोकेसमधे किंवा बासनात गुंडाळलेला दिसतो. हा खेळ खेळताना
कोणीही दिसत नाही. अशा या विस्मृतीत गेलेल्या भातुकलीच्या गमती जमती.

भातुकली म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर हेच
चित्रं उभं राहतं. पूर्वी पाच-सात मैत्रिणी जमल्या की भातुकलीचा असा खेळ
मांडला जायचा. शाळेतून घरी येतानाच आज आपण ‘घर घर’ खेळूया, असं फर्मान
एखादी मैत्रीण काढायची आणि मग कधी एकदा घरी जातोय आणि भातुकली खेळतोय असं
सगळ्यांना होऊन जायचं.
सुट्टीच्या दिवशी तर हा दिवसभराचा
कार्यक्रम असायचा. अगदी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी बारा आणि पुन्हा
दुपारी तीन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ही भातुकली रंगायची. सुट्टीत तर
हा खेळ दररोजचा असायचा.
आदल्या दिवशीची गोष्ट पुन्हा दुस-या दिवशी
पूर्ण केली जायची. वेळेचंही भान नसायचं. कोणी भातुकलीची खेळणी आणायचे तर
कोणी बाहुल्या.. आणि एक जण खोटया खोटया स्वयंपाकासाठी घरात आईला किंवा
आजीला लाडीगोडी लावून कधी कुरमुरे तर कधी दाणे, कधी चिवडा तर कधी बिस्किटं
असा काही ना काही खाऊ जमा केला जायचा.
इतकंच नाही तर झाडाची पानं आणून त्याची
भाजी किंवा पु-यादेखील केल्या जायच्या. भातुकलीसाठी खाऊ आणायचादेखील
प्रत्येकाचा नंबर ठरलेला असायचा. कधी कधी तर एका चौकात दोन ते तीन भातुकली
मांडल्या जायच्या. त्यात पण कोणी आई व्हायचं तर कोणी बाबा तर कोणी लहान
मुलं तर कोणी शाळेतली शिक्षिका.. आणि त्यांचा तो लुटुपुटुचा संसार खेळायला
सुरुवात व्हायची.
कधी कधी तर कोणी आईची किंवा ताईची ओढणी
घेऊन आईप्रमाणे साडी नेसायच्या. आणि मग आज जेवायला काय करायचं असा घरातल्या
गृहिणीला पडलेला प्रश्न त्या छोटया घरातल्या गृहिणीलादेखील पडलेला असायचा.
मुलांचे अभ्यास घेतले जायचे, त्यांना पेपर
काढून देऊन ते त्यांच्याकडून सोडवून घेतले जायचे. थोडक्यात काय ख-याखु-या
आयुष्यात पडणारे मुलांचे अभ्यास, त्यांच्या शाळा, असे सगळे काही विषय या
लुटुपुटुच्या संसारात हाताळले जायचे.
इतकंच काय पण अगदी बाहुला बाहुलीच्या
लग्नापर्यंत सगळे सोपस्कार कसे साग्रसंगीत पार पडले जायचे. बाहुला
बाहुलीच्या लग्नासाठी तर कधी कधी मुलांनाही त्यात सहभागी केलं जायचं. आणि
मग हा बाहुला बाहुलीच्या लग्नाचा सोहळा अगदी ख-याखु-या लग्नाप्रमाणे आठ-आठ
दिवस रंगायचा. आणि या मुलींच्या घरातलेही त्यांना कौतुकाने मदत करायचे.
कदाचित भावी आयुष्यात केल्या जाणा-या
संसाराची ही नांदी असल्याने कित्येकदा भातुकली खेळणा-या मुलींकडे कौतुकाने
बघितलं जायचं. त्यामुळे त्यांच्या त्या खोटया खोटया स्वयंपाकाचं तेव्हाही
कौतुकच व्हायचं. तिथल्या नात्यांचं तिथल्या बाहुला बाहुलीच्या
लग्नसोहळ्याचं असं सगळ्याचं कौतुकच व्हायचं.
कुठेतरी भावी आयुष्यात केल्या जाणा-या
संसाराचं बीज त्या मुलींच्या मनात रुजवलं जात असावं. असा हा भातुकलीचा खेळ
रंगला की रंगायचा आणि मोडला की आठ-पंधरा दिवसही मोडायचा. तसंच कंटाळा आला
किंवा भांडणं झाली की पुन्हा गोळा करून ठेवला जायचा. कारण काहीही असो
भातुकली खेळायची मजाच काही वेगळी असायची.
भातुकली म्हटली की तुमच्यापैकी कित्येक
जणींच्या आठवणी ताज्या झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण तुमच्यापैकी कित्येक
जणींनी हा लुटुपुटुचा संसार त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी खेळला असेल.
फक्त प्रत्येकाची तो खेळ खेळण्याची पद्धत वेगळी असेल.
आजही आपल्या मुलींना त्या खेळाची मजा
रंगवून सांगितली जात असेल. पण आता मात्र असं चित्रं फारच क्वचित ठिकाणी
दिसतं. त्यातली भातुकलीची मजा आताच्या मुलींना काही कळायचीच नाही. त्या
इवल्याशा जेवणाची मजा त्यांना कळायची नाही. कारण त्या मुली हा खेळ खेळतानाच
दिसत नाही.
खरं म्हणजे आताच्या मुलींना हा खेळ
खेळायला मिळत नाही असं नाही. उलट पूर्वीपेक्षा या भातुकलीच्या खेळात भरपूर
काही नावीन्य आलं आहे. त्यांचा हा खेळ आपल्या भातुकलीपेक्षाही खूप मोठा
आहे. त्यांच्या या भातुकलीत सगळ्या आधुनिक सोयी आहेत.
अगदी फ्रीज आणि वॉशिंग मशीनपासून ते
ओव्हनपर्यंत सगळं काही दिसेल. इतकंच नाही तर त्यांचा खेळ म्हणजे मॉडय़ुलर
किचनचं छोटंसं स्वरूपच आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण त्यात एखाद्या
स्वयंपाकघरात ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी तिथे असतात.
तुम्हाला काहीच करावं लागत नाही. जेव्हा
खेळायचं असेल तेव्हा तो सेट काढून समोर ठेवायचा आणि आपला खेळ खेळत राहायचा.
मात्र असं असलं तरी जो खेळ थोडयाशा खेळण्यातही मजा असायची तो हा
अत्याधुनिक किचन सेट खेळण्यात नाही एवढं मात्रं खरं. कारण हा खेळ एकटी
मुलगीही खेळू शकते.
तो मांडावा लागत नाही. त्यामुळे तो नीट
मांडून खेळण्यात जी मजा यायची तीच मुळी या ठिकाणी नाही. त्यामुळे मग तो
एकटीनेच खेळला तरी पसारा होत नाही. त्यामुळे मैत्रिणीही नाहीत. ज्या खेळात
मैत्रिणी नसतील तो भातुकलीचा खेळच कसा म्हणता येईल तीच तर खरी मजा होती
त्या खेळाची. त्यामुळे कित्येकदा या भातुकलीच्या आधुनिक सेट्सना
शोकेसमध्येच स्थान दिलं जातं.
अगदी वेगवेगळ्या भांडय़ांचं कलेक्शन असलं
तरी ते शोकेसमध्येच मांडून ठेवलं जातं. कारणं काहीही असली तरी हल्लीच्या
मुलींना ती भातुकलीची ओढ नाही हेच खरं. कारण आता घर-संसार याकडे बघण्याचा
दृष्टिकोन कमालीचा बदलला आहे.
लग्नानंतर या सगळ्या गोष्टी कराव्याच
लागतात, मग त्या आतापासूनच कशाला करायच्या असा काहीसा समज मुलींच्या आईचा
आणि पर्यायाने मुलींचा झाला आहे. त्यामुळे ही भातुकली काहीशी विस्मृतीत
गेली आहे असंच वाटतं. तसंच मुलगा आणि मुलगी असा भेद करायचा नाही म्हणून
त्या ब-याचदा मुलांप्रमाणे मैदानी खेळ खेळताना दिसतात. त्यात आता मोबाईल्स
गेमचीही भर पडली आहे. आणि त्यात दिवसेंदिवस वाढत जाणारा अभ्यास या सगळ्यात
त्यांच्या वाटेला पुरेसा वेळच मिळत नाही.
पण याचा अर्थ त्यांनी भातुकली हा खेळ
मुलींचा आहे तो त्यांनी खेळलाच पाहिजे, असं नाही. मात्र त्यातही एकत्र येऊन
मिळून मिसळून, एकमेकांना समजून घेण्याचं बीज होतं. मात्र तो खेळच खेळला
जात नसल्याने ते बीजदेखील आता कुठेतरी हद्दपार होताना दिसतंय. थोडक्यात काय
तर हल्लीच्या मुलींना त्या खेळाची गोडी समजणार नाही. आणि तो खेळ पर्यायाने
विस्मृतीत जमा होईल.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home