पर्यटकांना खुणावताहेत कांदळवने
विजयदुर्ग खारेपाटण खाडीमध्ये असलेल्या कांदळवणात वृक्षांच्या विविध जाती पाहायला मिळतात.

सहयाद्री पर्वतात विरळ होत चाललेल्या
वृक्षराजीचा परिणाम येथील मृदेची झीज होण्यात होत आहे. नदीनाल्यातून ही
माती वाहून जात सागराला मिळत आहे. मात्र ही माती पकडून मृदासंवर्धनाचे काम
आणि नव्याने जमिनीचे तुकडे तयार करण्याच काम करतेय ही खाडीमुखातील खारफुटी
वनस्पती सिंधुदुर्गाच्या किना-यावर सर्वच खाडय़ांमध्ये खारफुटीची भरगच्च वने
सापडतात. या वनांमध्ये खारफुटीच्या विविध जातीही आहेत. काही दुर्मीळ व
औषधी वनस्पतींचा यात समावेश आहे. ‘झायलो कार्पस’ अर्थात भेलांडा ही यापैकी
एक जात होय. आजीबाईच्या बटव्यातील हे औषधी झाड म्हणून उपयुक्त आहे. लहान
मुलांच्या पोटदुखीवर भेलांडा हे उपयुक्त औषध. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर
वापरले जाते.
अशा प्रकारे अनेक गुणधर्म यातील प्रत्येक
वनस्पतीत आहेत. विजयदुर्ग खाडीमध्ये शेकडो एकर क्षेत्रात खारफुटी वनस्पतीची
जंगले आहेत. सायंकाळच्या वेळी विविध पक्षी या जंगलात आश्रय घेतात.
पक्ष्यांचा हा सुरक्षित अधिवास आहे. अगदी खारेपाटणपर्यंत पसरलेली ही
खारफुटी पावसाळय़ातील वादळाच्या स्थितीत किनारी भागासाठी व मच्छीमार
बांधवांसाठी वरदानच ठरत आली आहे. काही हौशी लोक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी
अनेक वेळा या जंगलाची सफर करतात. काही लोकांच्या माडाच्या बागाही या
बेटावर आहेत. जिल्हा पर्यटनातून विकास साधत असतात या जंगलाचा नियोजनबद्ध
विकास करून पर्यटनातून रोजगाराच्या संधी या भागात निर्माण होऊ शकतात. मात्र
सकारात्मक मानसिकतेची गरज आहे.
सध्या बागायती आणि इतर विकासासाठी प्रचंड
जंगलतोड होत आहे. यामुळे जळणाच्या लाकडांचा प्रश्न निर्माण होत आहे. जंगलात
लाकडे मिळत नसल्यामुळे किनारी भागातील रहिवाशी आता खारफुटी वनस्पतींची तोड
करतात. जैवविविधतेत मृदा संधारणाची भूमिका बजावणा-या या वनस्पतीची तोड
आधीच होत राहिली तर भविष्यात खाडीतील वैशिष्टय़पूर्ण प्रणाली नष्ट होण्याची
भीती निर्माण झाली आहे. यामुळे वनविभागाने याची दखल घेऊन संरक्षणात्मक
उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच ही वने नष्ट झाली तर
किनारी भागात वादळापासूनचा धोका वाढणार आहे. याचबरोबर पक्ष्यांचा नैसर्गिक
अधिवासही संपुष्टात येईल ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. निसर्ग हा
नेहमीच एका बाजूला असमतोल झाला की तोच दुस-या बाजूला समतोल करण्याचा
प्रयत्न करत असतो खारफुटी प्रणाली त्यातूनच निर्माण झालेली आहे. यामुळे ती
वाचविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home