पावणेरी
आमचीकडं पावना आला की त्याला
ताटात डाव्या-उजवे बाजूला घालायचं काय हा मोठा प्रश्न आसतो. माकडां काय
शिल्लक ठेवत नायत हो. म्हनू भाजीपाला करन्याचं सोडलीलं.

हल्ली मला एप्रिल मेमध्ये पावना आला तरी
घाबराय व्हत नाय. आटावडाभर ऱ्हायला तरी मी घाबरत नाय. कारन तुमी जानलव की
तुमी पन तंच करनार हाव. मला खात्री हायच.
थंडयेत पावना आला की हातरूना पांगरूनाचा
बाऊ वाट्टो. थंडी मरनाची असते. पावन्याला पांघरून देलव नाय आनी गारठून
त्यांचं धोंडकू झालं तर? लाजेखातर देवच लागतं. पन एप्रिल मेत आले पावने तर
एक सतरंजी तानलीव की काम उराकतं. पांगरून देवच लागत नाय. कालजी केवडी मिटली
सांगा? एका सतरंजीवर धा-बारा मानूस आरामशीर झोपतो.
भाज्येचा मोटा एटम. त्याचा प्रोब्लेमच
सुटतो. सगलीकडं नारलाला कल्पवृक्ष म्हनतात पन मी हल्ली हल्ली फनसालाच
म्हनाय लागलोय. फनसाचं काय फुकट जातय सांगा बगू?
पाना : भाजावलीसाठी, गांडूल खतासाटनं वापरतो.
काटक्या : जालाय, पानी तापवाय उपेगी पडतात.
कुय-या : म्हशीच्या आंबवनासाठी उपेगी.
मोटी झाडां : सगलं टिकाऊ फर्निचर, घर बांधनीपासनं उपेगी.
फळ : फळं म्हंजे फनस, गरे त्याचा उपेग लयच व्हतो.
मी या दिवसात ‘फनसवीक’ साजरा करतो.
घाबरलेव की काय? मंजे फनास इकतोच. नाय असं नाय पन आटवडाभर व्हयल काय करशीव
तं फनसाचंच असावं अशी माजी घरात सांगी असते. भाजी पाल्याचा नी घरचे
कारबारनीच्या करतीवाचा प्रश्न सुटतो.
आमचीकडं मार्च पासनं फनस तयार व्हया
सुरवाती व्हते. एप्रिल मे मंधी जोरात पिकतात. आमी फनसपोली करतावच. तललेले
गरे करताव. मजे फनसाचा राबता असतोच.
मग पावना आला की ‘फनस डे’ला सुरुवात
करायची. ‘वीक’भर म्हंजे आटवडाभर चालू ठेवायचा. पैल्या दिवसाला कोवला कोवला
पारा काडून आनायचा. चिरून आपल्याकडचा पावटां असेल तर वला नाय तं सुका भाजून
पा-याची भाजी खाया घालायची. पावन्याची कुडी बगून भातासारा भाजीचा ढीग
मारायचा. खाऊ दे पोटभर. पावना खासच असला तर पावटय़ा ऐवजी शेंगदाना मजे
गरीबांचा बदाम-काजू घालायचा. पावना खूस.
दुस-या दिवसाला दात इचकी करायची. ठावी
नाय? काय म्हनताव काय? आमचीकडं या. सोप्पी भाजी ती. अर्धवट तयार झालीला फनस
काडायचा. फोडून गरे काडायचे पर निवडत बसायचे नाय. गरा काडलाव रे काडलाव की
मध्ये साकटायचा. यकाचे दोन किंवा तीनच भाग करायचे. आटला सोलत बसायचं नाय.
तसाच उकडाय ठेवायचा.
उकाडताना मीठ, तिकाट घाला. नायतं
उकाडल्यावर गार झाल्यावर लावा चालंल. पावन्याला जेवताना भाज्येचा ढीग
उजव्या बाजूला ताटात मारायचा नि सुरुवाती करा म्हनायचं. खाताना मजा येते.
खाया लय टाईम लागतो. बरं एकुद्याच्या दातात खाताना आटलेचं साल अडाकलंच तर
सरल हात धुवाय जातो. नि देवाजवल बसतो. साल अडाकलंय ते सुटू दे म्हनू न्हवं
हो, उदबत्तीची कांडी सोदाय. पुडची धा पंदरा मिनटा साल काडन्यात जातात. वेल
कसा दवडायचा? हय़ावर हा उपाय.
तिस-या दिवशी रितसर गरे सोलून आटलां ठेचून सोलून गरे चिरून म्हाता-यानपन डोले मिटून खाली अशी बेष्ट भाजी करायची सगले खुस.
चौथ्या दिवसाला पिक्या फनसाची सांजना करायची. पिक्या ग-याचा रस काडायचा. तेच्यात भिजतील येवडय़ा आपल्याच घरातल्या धुतलेल्या तांदलाच्या कन्या घालायच्या. गुल-साकार काय असलं त्या परमान घालायची नि सगलं सामान वाटयेत घालायचं पली पली नि सगल्या वाटय़ा मोदकपात्रात ठेवायच्या नि वाफेवर शिजवून काडायच्या. सांजना तयार. गोडाची पावनेरी पन झाली.
चौथ्या दिवसाला पिक्या फनसाची सांजना करायची. पिक्या ग-याचा रस काडायचा. तेच्यात भिजतील येवडय़ा आपल्याच घरातल्या धुतलेल्या तांदलाच्या कन्या घालायच्या. गुल-साकार काय असलं त्या परमान घालायची नि सगलं सामान वाटयेत घालायचं पली पली नि सगल्या वाटय़ा मोदकपात्रात ठेवायच्या नि वाफेवर शिजवून काडायच्या. सांजना तयार. गोडाची पावनेरी पन झाली.
पाचव्या दिवशी व्हयाच पिक्या फनसाच्या
काडलील्या आटला सोलायच्या. तिकट-मीट-मसाला घालून आटलांची उसल देयाची. काय
इचारू नुका. मानसाना लय आवायते. ‘राजमा’च काय पन पिस्त्या-बदामाला पन मांग
टाकील. करना-या बाईच्या वाटय़ाला खाली टोपच ऱ्हायाचा. बगून घ्या.
साव्या दिवसाला फनसाची तिकट इडली करायची.
वर सांगतल्या परमानच-पिक्या फनसाच्या ग-याचा रस काडायचा. तेच्यात भिजतील
तेवडय़ा पेशक्या थोडय़ा जेस्तीच कन्या-घरच्या तांदलाच्या घालायच्या. पन
साकरेऐवजी मीठ, लसून, मिरच्यांचा ठेचा, वायच जिरं घालायचं नि वाटयेत थोडं
थोडं घालून मोदकपात्रात शिजवायचं. वाफेवर हये इसरू नये.
फनसाची इडली तयार. द्या खायाला. दिवस गेला. सा दिवस कसे गेले कल्लं काय? कलतच नाय.
सातव्या दिवसाला दोन फनस काडावेत. एक
पिकायसाठी नि एक भाज्येसाठी. दोरीन बांधून शिंकालं करावं. चार आंबं, थोडे
कुलीथ, पावटे, चार आमसुला वायल्या वायल्या पिशव्येत भरून पावन्यांच्या
हातात द्यावेत नी ‘पुनरागमनायच’ असं म्हनून पाटवनी करावी. पावना पन खुस.
तुमी पन खुस, ब्याद गेली म्हनायची. आनी हवी असलीच तर फनसाची साटां, मजे
फनसपोली भेट म्हनू देलीव तर ‘तुमची सारा मानूस नाय’ असं म्हनेल पावना.
तुमानला कशी वाटली माजी पावनेरी?
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home