Monday, June 1, 2015

आंबेमोहराचे दिवस.!

‘‘करि रंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयांचे’’ पूज्य साने गुरुजींच्या या सुवचनाशी नाते सांगणारा एकमेव ‘वृक्ष’ म्हणजे आमचा कोकणचा झाडी आंबा, रायवळ आंबा!
mango tree
‘‘करि रंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयांचे’’ पूज्य साने गुरुजींच्या या सुवचनाशी नाते सांगणारा एकमेव ‘वृक्ष’ म्हणजे आमचा कोकणचा झाडी आंबा, रायवळ आंबा! हापूस आंबा हा फळांचा ‘राजा’ असला तरी झाडाचा ‘आजा’ (आजोबा) रायवळ आंबाच! मानवजातीला जन्मापासून मृत्यूपर्यंत साथ देणारा एकमेव वृक्ष! ते भाग्य कलमी आंब्याच्या नशिबी नाही.
माणूस जन्माला आल्यावर बारशाच्या वेळी पाळण्याच्या वर ‘‘टाळाच्या रूपाने’’ डोकावणारा! लग्न मंडपात ‘तोरण’ म्हणून मिरवणारा! आणि मृत्यूच्या वेळी ‘सरण’ बनून स्वत: धन्यासोबत जाळून घेणारा ‘आम्रवृक्षा’सारखा दुसरा ‘इमानदार’ वृक्ष नाही! लहान मुलांचे बालपण खरं सजवलं असेल तर या झाडी आंब्यानीच! कोकणातील आमच्या आतापर्यंतची पिढी या रायवळ आंब्याच्या सान्निध्यात वाढली, खेळली, कुदली, भांडली, रडली, हसली आणि लहानाची मोठी झाली! केवढे आमचे सद्भाग्य!!
आमच्या लहानपणी झाडी आंबे पिकू लागले की आमचे खेळणे त्या झाडी आंब्याच्या सावलीत! जी ‘बिटकी’ जास्त ‘साखरी’ त्या बिटकीखाली पोराटोरांची फौज जास्त. आंबे पिकून टच्च झालेले असायचे. ‘घड’ उंचावर वा-याने लोंबकळत असायचे! दूरवर पिकलेल्या आंब्याचा वास नाकात शिरत असायचा आणि त्या वासानेच पोरं बेभान व्हायची. डोलणा-या घडाकडे बघून पोरांना ‘प्रतिभेचे’ स्फुरणच चढायचे! त्यांचे वा-याला सांगणे असायचे. एक साथ एक कतार मालवणी ढंगात.
‘‘वा-या वा-या लवकर ये।
आंब्याच्या झाडाक भेट दे।
आंबो एक एक खाली पाड।
पयलो पडात तो देवाचो।
दुसरो पडात तो माझो।’’
अशी ‘स्वरचित कवने’’ करून पिकून तयार झालेले ते झाडी आंबे आपल्या ओच्यात कधी येतात याची आम्ही वाट पाहत असू. शनिवार, रविवार सुट्टीचे दिवस आणि पूर्ण ‘मे’ महिना बच्चेकंपनी आंब्याच्याच खाली असायची. तिथे हरत-हेचे खेळ ऐन दुपारीच सुरू व्हायचे. कारण भर दुपारच्या वेळी पिकून तयार झालेले आंबे (त्याला ‘कांडी’ हा स्पेशल शब्द) पडतात असा मुलांचा संकेत!
लगोरी, आबाधुभी, आटयापाटया, मुलींची अचीपची तर जरा थोराड मुलांचे ‘काजी’चे खेळ त्या आम्रवृक्षाखाली रंगत. ‘काजीचे खेळ’ हा एक वेगळा प्रकार! त्याच आंब्याच्या पाळाजवळ सहा इंचांचा ‘खड्डा’ खणून ‘गल’ तयार केली जायची. मोठया आकाराच्या काजूच्या आत शिसे भरून ‘डफ’ तयार करायचा आणि तो काजूचा खेळ सुरू व्हायचा. अलीकडे मुलांच्या हातात बॅट, स्टम्प आणि टेनिस किंवा रबरी बॉल. चोविस तास क्रिकेट!
खेडयातून हे सर्व आंब्याखालील खेळ आता इतिहासजमा झाले. त्यावेळी मुलांचे अर्धे लक्ष खेळात तर अध्रे लक्ष वा-याने डोलणा-या आंब्याच्या घडावर! ‘उदरभरण आणि मनोरंजन’ त्या तिथे तरूतळी चालत असे आणि पिकून पिवळाज झालेला तो आम्रवृक्ष मुलांचे खेळ डौलाने बघत खुलूनच जात असे.
दुर्दैवाने अलीकडे ही दृश्ये पडद्याआड गेली.
गेली पन्नास वर्षे कोकणात झालेली बेसुमार जंगलतोड त्यात असंख्य झाडी अांब्यांचे बळी गेलेत. त्यात पुन्हा शंभर टक्के अनुदानातून कोकणच्या कातळावरच कलमबागा साकारल्या, त्यात अनेक झाडी आंबे नष्ट झाले. मधुर रायवळ आंब्याची तोड होऊन त्यावर हमखास पैसे देणारी हापूस आंब्याची खुंटी कलमे उभी राहिली. मुलांची तर आता पंचाईत झाली आहे.
सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. हापूस आंब्याच्या कलमावर स्वैरपणे दगड मारता येत नाही. हक्काने आंबा खाता येत नाहीत कारण सर्व कलम बागा दहा-दहा वर्षाच्या कराराने व्यापा-याकडे गेलेल्या आहेत. कोकणातील मुलांच्या तोंडात हक्काने आंबा पडत नाही. ज्या आंब्यावर बच्चेकंपनीचा अधिकार होता ते रायवळ आंबे बहुतांशी मोक्याच्या ठिकाणावरून अस्तंगत झाले.
‘‘कोकणात कलमाची बाग लावता गावचो ‘परब’ आणि हापूस आंबो खाता कुवेतचो ‘अरब’!’’ अशी परिस्थिती निर्माण झाली. मुलांच्या स्वत:च्या हक्काच्या ‘‘आमरायांचं’’ नष्ट झाल्या. आपल्याच कलमावर दगड मारणे म्हणजे ‘‘असुनी खास मालक घराचा म्हणती चोर’’ त्याला अशी परिस्थिती जिथे निर्माण होते, तेथे आंब्या खालील खेळांचे काय होणार?
सुदैवाने रायवळ आंब्याचा रसास्वाद आणि त्या आम्रवृक्षाखालील खेळांचा मनमुराद आनंद आमच्यापर्यंतच्या पिढीने ओतप्रोत घेतला. आमच्या घरी आणि आजोळीदेखील खेळण्यासाठी मोठी ‘आमराई’ होती. आमचा घराच्या आमराईत त-हेत-हेचे आंबे आणि रंगतदार बिटक्या होत्या.
नारळाएवढया आकाराचा ‘पिवळा धमक’ नारळा आंबा, रुबाबदार गुजराथी व्यापा-यासारखा दिसणारा ‘‘कावजी पटेल’’ आंबा, गोय आंबा, ‘साखरी, बिटकी, शेंदरी रंगाचा ‘शेंदरी आंबा, देवपूजेचे पाणी ज्या आंब्याच्या मुळात ओतले जाई तो गोड देवांबा, कापा आंबा, डिखळा आंबा!
नाना आकार, नाना चवी! प्रत्येकाचा रंग वेगळा, ढंग वेगळा, रुची वेगळी खरंच तो निसर्गाचा चमत्कारच मानावा लागेल. ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरींनी ‘देव अजब गारूडी’ का म्हटले असेल ते त्या आंब्याच्या चवी पाहूनच समजत असे. आमच्या आमराईला गडगा नव्हता आणि काटेरी वयचे कुंपणही नव्हते.
‘‘मळयास माझ्या कुंपण पडणे अगदी मला नसाहे’’ हे केशवसुतांचे वचन आमच्या पणजोबांनी शब्दश: अमलात आणले होते आणि पुढील तीन पिढय़ांनी त्यांचा तो वारसा पुढे चालवला होता आणि म्हणूनच ‘बामणांच्या आमराईत’ सगळया वाडीच्या पोरांची जत्रा असायची. अगदी दोन महिने हाऊसफुल्ल!
सांगायची आणखी एक गंमत म्हणजे आमच्या आमराईत ‘बाजीराव-मस्तानी’ नावाचे दोन आम्रवृक्ष होते. आमच्या पणजोबांनी ती नावे त्यांना ठेवल्याचे आमच्या घरची वडीलमाणसे आम्हाला सांगत. ‘बाजीराव’ आंबा अगदी उंच पुरा हिरवागार, पेशवाईतील शूर पराक्रमी योद्धा वाटावा असाच, तर त्याच्यासमोर ‘सुबक खाशी’ जवळ-जवळ तेवढयाच उंचीची पण अणकुचीदार पानांची ‘‘मस्तानी’’ बिटकी. या बाजीराव मस्तानीच्या सावलीत आमचे खेळ जास्तच रंग भरायचे!
‘‘बाजीराव’’ आंबा अतिशय ‘मधुर’! पिकून तयार झाला की त्याचा ‘शीर्ष’ भाग लालबुंद व त्याखालील भाग पिवळा जर्द दिसायचा! अतिशय देखणं रूप! तो आंबा जणू डोक्यावर लाल पुणेरी पगडी व खांद्यावर पिवळे उपरणे ल्यालेला ‘बाजीरावच’ दिसायचा. ‘मस्तानी’ बिटकीचे सौंदर्य काय वर्णू? अगदी आंतरबाहय़ पिवळसर आणि लालबुंद दिसायची. असं म्हणताना ऐकलं होतं.
मस्तानींना ज्यावेळी ‘थोरले बाजीराव’ विडा देत. तो विडा ती चघळायची तेव्हा तिच्या गालाच्या कांतीतून तोंडातील विडयाचा लाल रंग दिसायचा. इतकी नाजूक कांती! आमच्या मस्तानी बिटकीची साल तशीच नाजूक पण चविष्ट! आमच्या पणजोबांनी त्या झाडी आंब्याच्या जोडगोळीला दिलेली ती नावे ऐकून आमच्या पणजोबांच्या रसिकतेचा आम्हाला सार्थ अभिमानच वाटायचा!
या दोन झाडी आंब्याची वैशिष्टय़ असे की, ‘बाजीराव’ आंब्याला ज्या वर्षी मोहर यायचा त्याच वर्षी मस्तानी बिटकी मोहरायची! साधारणत: एक वर्ष आड दोघीही मोहरायची. बाजीराव मस्तानीच्या खाली दुपारी आवाठातील पोरांचा गलका असायचा. परकर घातलेल्या पोरी जोरात म्हणायच्या.. अगदी बोंबाबोंब.
‘‘बाजीरावाची मस्तानी, खाली पडगे गोड राणी’’ मग पोरे जोरात ओरडत – अगदी बेंबीच्या देठापासून ‘‘मस्तीनीचो बाजीराव पगडीचो आंबो खाली पाड’’ दुपारी झोपलेला प्रत्येक घरातील वडिलधा-या माणसांना पोरांचा तो उत्स्फूर्त गलका ‘किलेश’ वाटायचा. त्यांच्यापैकी कोणी तरी काठी घेऊन आमच्या मागे येत असे.
‘‘पोरांनी दुपारच्या येळी बोंब सुरू केल्यानी, झोप नाय काय नाय, तेंका चांगले ‘दांडे आमवाण’ देवक व्हया’’ अशी गर्जना करीत! पण आमची ‘अख्खी आमराई’ आमच्या कुशीत आम्हा पोराना लपवी. सगळीकडे शांत! शांत! ते गेल्यावर पुन्हा आंब्याच्या झाडामागे लपलेली पोरे हळूहळू सावधपणे बाहेर यायची आणि जोरात घोषणा युद्ध सुरू व्हायचे. अगदी निवडणुकीतील ‘अरे आवाज कुणाचा’ स्टाईल!
‘‘अरे मस्तानीचो बाजीराव, पगडीचो आंबो खाली पाड’! अरे बाजीरावाची मस्तानी, खाली पड गोड गोड राणी!’’ मस्तानी बिटकी आणि बाजीराव आंबा दोन्ही एकदम मिळणे आम्हाला ‘जॅक पॉट’ लागल्यासारखेच वाटायचे. आम्ही ते दोन्ही आंबे एकदम चोखत असू. त्या कॉकटेलची चव काय न्यारीच होती. आज इतक्या वर्षानी लिहायला बसल्यावर नुसत्या आठवणीने जीभ ओली होते.
दुर्दैवाने कोकणातील १९६१ सालच्या चक्रीवादळात आमचा बाजीराव मुळासकट उन्मळून पडला! एखादा ‘पुराण पुरुष’ धारातीर्थी पडावा अगदी तसाच! त्यानंतर बिचारी मस्तानी बिटकी कधी मोहारलीच नाही. पुढे तीन-चार वर्षे पाने गळून पडून ती सुकून सुकून गेली! आपली नावे त्या आम्रवृक्षानीही चिरंजीव केली. आज तिच्या खालचे खेळ हे आमचे नित्यस्मरण झाले आहे.
असो! कोकणात प्रत्येकाने त्या काळी कमी अधिक प्रमाणात हे ‘आमराईचे दिवस’ अनुभवले आहेत. खरेच ते दिवस ‘आंबे मोहराचे’ होते, किती सुखकर! किती सुगंधी! आपल्यासोबत मुलांचे बालपण मोहरून टाकणारे दिवस! आंबे मोहराचेच दिवस..!

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home