Saturday, May 16, 2015

उन्हाची वाढलेली तीव्रता, अंगाची होणारी लाहीलाही यावर उपाय म्हणून नदीच्या पाण्यात तासन् तास पडून राहणे काही जण पसंत करतात.
tilari
दोडामार्ग- उन्हाची वाढलेली तीव्रता, अंगाची होणारी लाहीलाही यावर उपाय म्हणून नदीच्या पाण्यात तासन् तास पडून राहणे काही जण पसंत करतात. सध्या तिलारी नदीच्या पाण्यात तिलारी, घोटगेवाडी, घोटगे, कुडासे या ठिकाणी शेकडो नागरिक आंघोळ करताना हे चित्र पाहावयास मिळते. पण तिलारी प्रकल्पाने यापूर्वी अचानक पाण्याचा प्रवाह सोडल्याने बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यासाठी तिलारी प्रकल्पाने सावधानगिरी बाळगून पाणी सोडणे गरजेचे आहे.
धरणाचे पाणी नदीत सोडणार अशा नुसत्या ग्रामपंचायतींना नोटीस पाठविली म्हणजे आपली जबाबदारी संपली किंवा नदीच्या तिरावर बोर्ड चिकटविले असे जर तिलारीच्या अधिकाऱ्यांना वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. कारण धरणातील कालव्याने सोडण्यात येणारे पाणी किती सोडायचे? त्याची वेळ कोणती याबाबत अद्यापही प्रकल्पाचे धोरण निश्चित नाही.
तिलारी नदी ही पूर्वापार बारमाही असली तरी उन्हाळयात ही नदी कोरडी पडायची. त्यामुळे वर्षानुवर्षे तिलारीने विभागल्या गेलेल्या गावांतील नागरिकांची शेती-भाती, बागायती आणि बाजारासाठी नदीपात्रातून रहदारीची वाट असायची त्यामुळे तिलारी प्रकल्प अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
तिलारी धरणाच्या पाण्यावर खानयाळे-कोनाळकट्टा येथे कार्यान्वित झालेला जलविद्युत प्रकल्प ११ मेगावॅटच्या या प्रकल्पाकरिता २ युनिट बसविण्यात आले आहेत. आणि हे दोन्ही युनिट एकाच वेळी चालवायचे असतील तर तब्बल २३ क्युसेक्स पाणी कालव्यातून सोडावे लागते.
सध्या नियमित एकच युनिट सुरू आहे. तर दुसरे मागणीप्रमाणे कार्यान्वित केले जाते. परिणामी पाण्याची पातळीही दुप्पट वाढते. त्यामुळेच तिलारी नदीपात्रात धरणापूर्वी पावसाळयात घडणा-या दुर्घटना आता उन्हाळयात घडत आहेत. पूर्वी होडी दुर्घटना तिलारीतील नागरिकांचे जीव घेत होती. मात्र, आता तिलारी प्रकल्पामुळे उन्हाळयातही नागरिकांचा नदीत बुडून अंत होतो आहे.
बाजाराला जाण्यासाठी तिलारी नदीपात्र ओलांडत असताना २८ नोव्हेंबर २००९ मध्ये घोटगे येथे पहिली दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कालव्यातीलच नदीपात्रात सोडलेल्या पाण्यात घोटगेच्या अर्चना दळवी व अमिता दळवी या मायलेकींचा वाहून जाऊन बुडून बळी गेला. तर त्याचीच पुनरावृत्ती कुडासे येथे १२ मे २०११ला झाली.
तशाच प्रकारे बागायतीत जाण्यासाठी नदीपात्र ओलांडताना महानंदा राणे व दीप्ती सतीश देसाई या दोघींना आपला जीव गमवावा लागला. आणि या चौघांच्याही मृत्यूला जबाबदार ‘तिलारी’ प्रकल्पाचे पाणी. शिवाय दोन वर्षापूर्वी तीन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रकल्पाने धरणातील कालव्यातून नदीपात्रात किती पाणी सोडले पाहिजे. याचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home