Wednesday, April 22, 2015

हिरवी शाल.. निळाई विशाल..

हेएक आडगाव जरी असलं तरी त्याला निसर्गाची अजोड साथ मिळालीय. विविधरंगी फुला-पानांनी नटलेल्या या गावानं निसर्गाची शाल पांघरली आहे, असंच पाहाताक्षणी वाटतं. वेत्ये गावाला अथांग असा सागरी किनारा लाभलेला आहे. इथल्या शांत, निसर्गरम्य वातावरण म्हणजे शहरी वातावरणाला, ताणतणावाला कंटाळलेल्यांसाठी तणावमुक्तीचं नैसर्गिक औषधच आहे.
kokan
कोकण म्हणजे निसर्गाचं दान.. कोकण म्हणजे हिरवाई.. परमेश्वरानं कोकणात ओंजळ भरभरून रिती केल्याचा प्रत्यय इथलं निसर्गसौंदर्य न्याहाळताना नक्कीच येतो. निसर्गाच्या या कृपादृष्टीनं कोकणचं सौंदर्य अधिकच खुललंय.. कोकणला लाभलेली ७२० किलोमीटरची किनारपट्टी हा त्यातलाच एक सौंदर्यदुवा!
स्वच्छ, मनमोहक आणि रमणीय समुद्रकिनारे ही कोकणची खासियतच! त्यातले काही जगजाहीर आहेत तर निसर्गाच्या कोंदणात लपलेले अस्पर्श.. वेत्येचा विशाल समुद्रकिनारा हा त्यापैकीच एक! पर्यटक आणि निसर्गप्रेमींच्या नजरेपासून दूर राहिलेला हा समुद्रकिनारा कुठल्याही प्रसिद्ध चौपाटीइतकाच, किंबहुना त्यापेक्षा अधिक रमणीय आहे.
कोकणातलं श्रीदेवी महाकालीच्या वास्तव्याने पुनित झालेलं गाव म्हणजे, आडिवरे! धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून हे गाव प्रकाशझोतात आलंय. आडिवरेला संपन्न अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. ब्रिटिश काळात या ठिकाणी मोठी बाजारपेठ होती. त्यामुळे या गावाचं नाव ‘अट्टेवरी’ असं ठेवण्यात आलं होतं.
कालांतराने या नावाचा अपभ्रंश होऊन गावाला ‘आडिवरे’ असं नाव पडलं. नंतर हेच नाव महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहोचलं, ते महाकाली देवीच्या महात्म्यामुळे. श्री देवी महाकाली ही अनेकांची कुलदेवता असून, नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे. त्यामुळे या ठिकाणी दूरदूरहून भक्त दर्शनाला येतात.
आडिवरे हे बारा वाडयांचं गाव आहे. खरं तर, या देवीचं वास्तव्य आडिवरे गावातील वाडापेठ या ठिकाणी आहे. मात्र, महाकालीसंदर्भाने वाडापेठऐवजी आडिवरे हेच नाव अधिक जोडलं गेलं आणि त्यामुळे प्रसिद्धीला आलं. या वाडापेठपासून सुमारे ५ कि.मी. अंतरावर वसलेलं आहे वेत्ये!
रत्नागिरीहून जाताना वाडापेठच्या मोठय़ा वळणाला लागूनच वेत्येला जाण्याचा मार्ग आहे. या मार्गावरून जाताना ‘कालिकावाडी’ म्हणून एक भाग आहे. इथे श्री देवी कालिकामातेचं  सुंदर मंदिर आहे. हे मंदिर फारसं प्रकाशझोतात आलेलं नसलं तरी ‘नवसाला पावणारी देवी’ अशीच या देवीची महती आहे.
वेत्ये गावात भंडारी समाजाची मोठी वस्ती आहे. या गावाला श्रीदेवी महाकालीचे माहेरघर म्हणून ओळखलं जातं. या गावातील जाधव यांचा पूर्वज मासेमारीसाठी समुद्रात गेला असता त्याने मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळय़ात देवीचे पाषाण अडकले. त्याने ते पाषाण गावात आणून गावक-यांना दाखविले.
हळूहळू ही माहिती सर्वत्र पसरताच पाषाण कोठे बसवायचे यावर विचारविनिमय करण्यात आला. चर्चेअंती वाडापेठला देवीची स्थापना करण्यात आली. ही देवी वेत्येमधून आली म्हणून या गावाला देवीचं माहेरघर म्हटलं जातं. आजही वेत्ये या गावाची ओळख अशीच आहे.
आजही देवीला कौल लावल्यानंतर तिने माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केल्यास वेत्ये गावात तिच्या आगमनाचा उत्साह संचारतो. तिच्या आगमनाची चाहुल लागली की, संपूर्ण गाव तिच्या स्वागताच्या तयारीला लागतं. गावचे चाकरमानीदेखील तितक्याच लगबगीने गावात दाखल होतात.
सटीसामाशी येणा-या माहेरवाशिणीची जशी डोळय़ात तेल घालून वाट पाहिली जाते तशीच वाट येथील ग्रामस्थ या दिवसाची वाट पाहताना दिसतात.
मच्छीमारी आणि शेती हाच वेत्ये ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय आहे. हे एक आडगाव जरी असलं तरी त्याला निसर्गाची अजोड साथ मिळालीय. विविधरंगी फुला-पानांनी नटलेल्या या गावानं निसर्गाची शाल पांघरली आहे, असंच पाहाताक्षणी वाटतं. वेत्ये गावाला अथांग असा सागरी किनारा लाभलेला आहे.
इथल्या शांत, निसर्गरम्य वातावरणामुळे किना-यावर आलेल्या माणसाचं मन प्रसन्न होतं. तसं पाहिलं तर वेत्ये गाव रुढार्थाने पर्यटनस्थळ म्हणून विकसित झालेलं नाही. किंबहुना पर्यटनस्थळी असणारी कुठलीही आकर्षणं इथे नाहीत. परंतु, निसर्गाने आपल्या विविध रंगांची मात्र इथे मुक्त हस्ते उधळण केली आहे. वेत्ये गाव पाहिलं की गारव्याचा भास होतो. हिरवाईनं मन अक्षरश: चिंबून जातं.
शहरी वातावरणाला, ताणतणावाला कंटाळलेल्यांसाठी तर हे तणावमुक्तीचं नैसर्गिक औषधच आहे. इथला शांत, मनाला भुरळ पाडणारा समुद्र पाहिल्यानंतर मनाचा थकवा केव्हाच निघून जातो. नजरेसमोर पसरलेला अथांग समुद्र..  एका बाजूला असणारी उंचच उंच टेकडी..
समुद्र आणि गाव यांमध्ये हिरवी रेषा ओढणारं सुरूबन.. हे सगळं पाहिल्यानंतर निसर्गाच्या कुंचल्याचा हा छोटासा, पण अप्रतिम देखावा चित्रबद्ध करण्याची इच्छा झाल्यावाचून राहत नाही. विशेष म्हणजे एकदा इथे आलं की पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं.
याच ठिकाणी थंब देव म्हणून महापुरुषाचं ठिकाण आहे. वर्षातून एकदा इथे सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम साजरे होतात. गावात एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं तळंदेखील आहे.
अनेक बाबतीत सरस असूनही वेत्ये गाव इतर पर्यटनक्षेत्रांप्रमाणे पाहिजे तसं नावारूपाला आलं नाही. या गावाकडे सातत्याने झालेलं लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणांना लाभलेला समुद्रकिनारा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित झाला. पण वेत्ये मात्र त्याला आजही अपवाद ठरलंय. एवढंच कशाला, या गावाचा विकास पाहिजे तसा आजही झालेला नाही. गावात पुरेशी बाजारपेठ देखील नाही.
गावात ये-जा करणा-या दोन बसेसवर वाहतुकीची सगळी मदार आहे. गावची रस्त्याची गरजही पुरेशी भागलेली नाही. या गावच्या सुविधा झाल्या. पण ज्यामुळे गावाला रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असं गावाच्या सौंदर्यात भर घालणारं सुरूबन आता हळूहळू नष्ट होऊ लागलंय. तिकडे कुणाचंही लक्ष नाहीय. पर्यटन यादीत समावेश होऊनही हे गाव मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहे. विकासासाठी मिळालेला निधी इथे खर्चच पडलेला नाही.
असं असलं तरी, आता या गावाची वेगळी ओळख पुढे येऊ लागलीय. गावात असलेल्या समुद्रकिना-याचा फायदा घेऊन राजापूर शिपयार्ड प्रकल्प इथे उभारला जातोय. या प्रकल्पामुळे इथलं राहणीमान थोडंफार सुधारताना दिसतंय. पूर्वीच्या कौलारू घरांवर आता सिमेंटचा थर पडू लागला.
अनेकांच्या दारात वाहनंसुद्धा आहेत. ही जादू आहे इथे येऊ घातलेल्या प्रकल्पांची. या प्रकल्पामुळे बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल आणि त्यांची परिस्थिती निश्चित सुधारेल. नुसता इतक्यानेच गावचा विकास होणार नाही. प्रकल्पाबरोबरच या गावाला पर्यटनाची जोड मिळाल्यास वेत्ये हा समृद्ध गाव होण्यास वेळ

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home