Friday, April 17, 2015

महिलांनी फुलवला ‘सूर्यफुलां’चा मळा

पूर्वीच्या ‘चूल आणि मूल’ या परंपरेला बगल देत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करणा-या लांजा तालुक्यातील कोचरी येथील होलदेव महिला बचत गटाने दीड एकर माळरानावर सूर्यफुलाचा मळा फुलवला आहे.
Sunflowerलांजा – पूर्वीच्या ‘चूल आणि मूल’ या परंपरेला बगल देत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करणा-या लांजा तालुक्यातील कोचरी येथील होलदेव महिला बचत गटाने दीड एकर माळरानावर सूर्यफुलाचा मळा फुलवला आहे. जिद्द, परिश्रम आणि काहीतरी वेगळे करून दाखवण्याची ईर्षा या त्रिसुत्रीच्या जोरावर या बचत गटाने फुलवलेला सूर्यफुलाचा मळा जणू त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतो.
सद्य:स्थितीत बेरोजगारीची समस्या असताना तरुणवर्ग मात्र शेतीपासून दूर जात आहे. शेतीतूनच विविध प्रकारची उत्पादने घेऊन त्याद्वारे अर्थार्जन उपलब्ध करण्याची मानसिकता त्यांची नाही. असे असताना आपण महिला आहोत, आपण काय करणार, अशी निराशा न दाखवता शेती हाच
अर्थव्यवस्थेचा कणा असून, या शेतीतूनच आपण आपला आर्थिक विकासाचा मार्ग साध्य करू शकतो, अशी खूणगाठ मनाशी बांधून लांजा तालुक्यातील कोचरी येथील होलदेव महिला बचत गटाने शेतीतूनच आपल्या आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला आहे.
होलदेव महिला बचत गटाने यापूर्वी हंगामी पिके यामध्ये भाजीपाला लागवडीसारखा प्रयोग करताना त्याद्वारे स्वत:ला आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. मात्र, त्यातून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने काहीतरी वेगळे उत्पादन घेण्याचा निर्णय या बचत गटाच्या अध्यक्षा सुनीता पांचाळ व सर्व पदाधिकारी,सदस्यांनी घेतला होता. यातून ब-यापैकी आर्थिक उत्पन्न मिळवून देणा-या सूर्यफुलाची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्याचे उत्पन्न कसे घ्यावे, बियाणे कोठून आणावे असे प्रश्न होतेच. यावेळी त्यांना कोचरीचे सरपंच चंद्रकांत पांचाळ यांनी मदत केली. कृषी विभागानेही यासाठी सूर्यफुलाची २ किलोची बियाणी पांचाळ यांना उपलब्ध करून दिली.
बियाणी उपलब्ध झाल्यानंतर बचत गटाच्या सर्व महिलांनी येथील दीड एकराच्या माळरानावर कष्टाने सूर्यफुलाचा मळा फुलवला आहे. यासाठी नजीकच्या शेततळय़ातून पाणीपंपाद्वारे या पिकाला पाणीपुरवठा केला जातो. तर येणा-या समस्यांबाबत त्यांना कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. या मळ्यात सध्या अडीच महिन्यांची सूर्यफुले डोलू लागली आहेत. जणू या महिलांनी घेतलेल्या परिश्रमाची ही फुले साक्ष देत आहेत.ं

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home