Friday, April 17, 2015

चोहोबाजूंनी प्रतिकूल अवस्थेने घेरलेले असतानाही त्या परिस्थितीवर आकांताने मात करून जगण्याची, प्राण्याची जी दुर्दम्य इच्छा असते तिला ‘जीजिविषुवृत्ती’असे म्हणतात. अशाही अवस्थेत अशा मगरमिठीत, देहाचा चोळामोळा झालेल्या त्या झाडाला, साधा श्वास घेणेही अवघड होऊन जाते. तरीही ते झाड तो जीवघेणा अन्याय आणि आक्रमण मुकेपणाने सहन करीत राहते.
OLYMPUS DIGITAL CAMERAउन्हाच्या वणव्यात स्वत:चे अंग पोळत असतानाही, आश्रयाला आलेल्या पशु-पक्ष्यांना, गुरा-वासरांना आणि माणसांना सुखाची सावली देणा-या वृक्षांना आमच्या संस्कृत कवींनी सत्पुरुष म्हटले आहे.
वृक्षांचे हे जगणे केवळ परोपकारासाठीच असते. आमच्या कोकणी माणसाच्या वाटय़ाला हे वृक्षवैभव जेवढे आलेले आहे, तेवढे इतर भागातील माणसांच्या वाटय़ाला ते क्वचितच आले असेल. विविध जातींच्या आणि आकारांच्या वृक्षांचे कृपाछत्र आमच्या कोकणवर अनादिकाळापासून रंगवली धरून आहे.
कोकणातील अवघ्या वृक्षराजींत अग्रक्रमाने नाव घेतले जाते, ते आंब्या-फणसांचे. त्यातील आंब्याचे झाड आणि फळ सगळय़ा जगाच्या परिचयाचे. आंब्याच्या फळाला फळांचे राजेपण लाभलेले आहे. फणसाच्या वाटय़ाला एवढे मोठेपण मिळाले नसले तरी, त्यांच्यामधील ग-यांचा गोडवा मात्र सर्वाना हवाहवासा वाटतो.
झाडापेडांना भावभावना असतात; सुख-दु:खाच्या जाणिवा असतात, हे शास्त्रज्ञांनी यापूर्वीच सिद्ध केलेले आहे. आमचा साधासा कोकणी शेतकरी त्यांच्याही पुढे आहे. येथील वृक्षराजींपैकी बहुतेकांचे स्वभावही त्याला माहीत आहेत.
फणसाचे हळवेपण त्यानेच शोधून काढले आहे. त्याच्यामते फणसाचे झाड साध्या, सरळ आणि अत्यंत हळव्या स्वभावाचे आहे. त्याला भरल्या घरातील, एकमेकांवर प्रेम करणा-या मुलांमाणसांच्या कुटुंबाचा सहवास हवाहवासा वाटतो. अशा घराशेजारच्या परसातील फणस इतरांच्या मानाने लवकर फुला-फळांच्या बहराला येतो.
अंगणाशेजारच्या फणसाच्या झाडाच्या मुळाशी तयार केलेल्या शेणाने सारविलेल्या दगडमातीच्या गोलाकार ओटय़ावर बसून सायंकाळच्या वेळी आपल्या माणसांसोबत गप्पागोष्टी करणे किती सुखकारक असते, हे कोकणी माणसाला पुरेपूर ठाऊक असते. अशावेळी ते झाडही त्यांच्या गप्पागोष्टीत आणि सुख दु:खातही सामील झाल्यासारखे दिसते.
अशा वृक्षवल्लींचे सोईरेपण लाभलेला आमचा कोकणी माणूस, त्यामुळेच की काय, अन्नवस्त्रांची कमतरता असली तरीही आनंदी आणि सुखी दिसतो. तो माणूस हे सगळे तेथील निसर्गाकडून विशेषत: झाडांपेडांकडून आणि त्यातही विशेष अशा सरळ हळव्या स्वभावाच्या कुटुंबवत्सल अशा फणसाच्या झाडाकडून शिकला असावा. अशा या लोभस वृक्षाचे आणि त्याच्या गोड फळाचे वर्णन जुन्या मराठी पंडित कवींनी भरभरून केले आहे. ख्यातनाम कवयित्री इंदिरा संत यांनी फणसाच्या झाडाला, ‘कटिखांद्यावर लेवुनी बाळे’ असा उभारलेला कुटुंबवत्सल लेकुरवाळा म्हटले आहे!
अवघ्या कोकणाशी फणसाचे जन्मजन्मांतरीचे नाते आहे. तो येथील मुलांमाणसांशी, गुरांढोरांशी, पशु-पक्ष्यांशी कौटुंबिक नाते जोडून राहिला आहे. माणसांची ‘जाग’ असलेल्या घरांशेजारी, भरल्या ‘आवाठात’ तो अधिक सुखी आणि तृप्त दिसतो.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home