Friday, April 17, 2015

कुपोषणाच्या विळख्यात डहाणू

कुपोषणाचे दोन प्रकार केले जातात. त्यापैकी पहिला ‘पीईएम’ म्हणजे प्रोटिन एनर्जी मालन्युट्रिशन आणि दुसरा म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशिएन्सी. भारतामध्ये यापैकी पहिल्या म्हणजे पीईएम प्रकारचे कुपोषण आढळते. बालकाचे वय आणि वजन यांच्या तुलनेद्वारे कुपोषणाच्या श्रेणी निश्चित केल्या जातात.
डहाणू तालुक्यात कुपोषित बालकांसाठी दिला जाणारा पोषण आहार म्हशीच्या तबेल्यात सापडल्याची घटना ताजी असतानाच तालुक्यातील कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने ही समस्या गंभीर होऊ लागली आहे.
कुपोषणाची समस्या कमी करण्यासाठी व कुपोषित बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी सरकार कोट्यवधींचा निधी खर्च करीत आहे. परंतु कुपोषणाचे प्रमाण काही प्रमाणातच कमी होत असल्याचे दिसते. याबाबतची आकडेवारीच या समस्येची तीव्रता दाखवून देत आहे. यावर्षी मे महिन्यात केलेल्या पाहणीत 43333 मध्यम तीव्र कुपोषित बालके तर  511 तीव्र कुपोषित बालके आढळली आहेत. त्यापूर्वी एप्रिल 2012 मध्ये 3970 मध्यम तीव्र कुपोषित तर 427 तीव्र कुपोषित बालके होती. मार्च 2012 मध्ये 4091 मध्यम तीव्र कुपोषित तर 399 तीव्र कुपोषित बालके असल्याचे आकडेवारी दर्शवते. मात्र, मे महिन्याच्या आकडेवारीवरून तीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण वाढल्याचे दिसत असल्याने, आदिवासी भागातील कुपोषित बालकांचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे मत स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले आहे.
ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील डहाणू तालुका कुपोषणाच्या विळख्यात सापडला आहे. आशागड येथील एकाच आदिवासी कुटुंबातील राकेश लहू गिंभल हा चार वर्षाचा तर उमेश लहू गिंभल हा सहा वर्षाचा मुलगा कुपोषित असल्याचे आढळले. या दोन्ही बालकांची स्थिती गंभीर असल्यामुळे त्यांना उपचारासाठी डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर हा प्रकार उघडकीला आला. त्याआधीही कुपोषणाची समस्या आढळली होती. दोन महिन्यांपूर्वी जामशेत येथील विकास गिंभल या एक वर्षाच्या कुपोषित आदिवासी बालकाच्या प्रश्नावरून ही समस्या दिसून आली होती. आशागड येथील या गरीब गिंभल कुटुंबाकडे उपचारासाठी पैसे नसल्याने ते त्यांच्या मुलावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात जाण्याचे टाळत होते. मात्र,हा गंभीर प्रकार लक्षात येताच स्थानिक पत्रकारांनी या बालकांना कॉटेज रुग्णालयात तत्काळ दाखल करून घेऊन पुढील उपचार देण्याचा आग्रह धरला. मात्र, हा गंभीर प्रकार घडला असतानाही एकही शासकीय अधिकारी आणि बालविकास प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी तिथे फिरकले नसल्याने, आदिवासींच्या या गंभीर प्रश्नाकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
गर्भवती माता व कुपोषित बालके यांना सकस आहार देण्यासाठी सरकार कोटय़वधींचा खर्च करते. पण याचा उपयोग प्रत्यक्ष गरजवंतांना होत नसल्याने कुपोषणाची समस्या अधिकाधिक गंभीर होऊ लागली आहे. डहाणू कॉटेज रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ नसल्याने राकेश आणि उमेशच्या कुटुंबीयांना या दोन्ही बालकांना पुढील उपचारांसाठी मुंबईला हलवण्याचा सल्ला वैद्यकीय अधिका-यांनी दिला आहे. मात्र, उपचारांसाठी पैशाची चणचण असलेल्या या गरीब आदिवासी कुटुंबाला पुढील उपचारासाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे त्यांनी डहाणू उपजिल्हा रुग्णालयातच किरकोळ उपचार सुरू ठेवले आहेत. ठाणे जिल्हयाला पडलेला कुपोषणाचा हा विळखा सैल व्हायला तयार नसून अद्यापही अनेक बालके या समस्येने ग्रस्त आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय कधी होतील का, याची प्रतीक्षा ठाणे ग्रामीण जिल्ह्याला आहे.
कुपोषणाचे प्रकार  
९० ते ११० % सामान्य पोषण
 ७५ ते ८९  % प्रथम श्रेणी सौम्य कुपोषण
 ६० ते ७४  % द्वितीय श्रेणी मध्यम कुपोषण
 ६०% पेक्षा कमी तृतीय श्रेणी तीव्र कुपोषण

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home