Friday, April 17, 2015

पर्यटन विकासाचा नवा पॅटर्न तयार करणार

राज्य सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी विशेष पर्यटन पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमुळे सिंधुदुर्गचा विकास गतिमान होणार आहे. या अनुषंगाने वरिष्ठ अधिका-यांसमवेत आपण पर्यटनस्थळांची पाहणी केली. 
मालवण - राज्य सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी विशेष पर्यटन पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमुळे सिंधुदुर्गचा विकास गतिमान होणार आहे. या अनुषंगाने वरिष्ठ अधिका-यांसमवेत आपण पर्यटनस्थळांची पाहणी केली. पाहणीदरम्यान काही ठिकाणी आढळून आलेल्या त्रुटी दूर करण्यात येतील. सिंधुदुर्ग हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा असल्याने येथील पर्यटन विकासाचा नवा पॅटर्न तयार करून सरकारला सादर करण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री नारायण राणे यांनी देवबाग येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
येथील पर्यटन विकासाचे मॉडेल बनवण्यासाठी कोकण आयुक्त, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नारायण राणे यांनी शुक्रवारी तोंडवळी येथील प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्पाच्या जागेबरोबरच मालवण बंदर जेटी, तारकर्ली पर्यटन केंद्र व देवबाग मोबारवाडीला भेट देऊन पाहणी केली.  जिल्ह्यात पर्यटन विकासाचे जे प्रकल्प सुरू आहेत, त्यांची पाहणी करून नियोजन आराखडा तयार करण्यासाठी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने तोंडवळी येथील सी-वर्ल्ड प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न आहे. येथे स्थानिकांना विश्वासात घेऊन चांगल्या पद्धतीने प्रकल्प तयार करण्याबाबत प्रयत्न केले जातील.
सी-वर्ल्ड प्रकल्पाचा परिपूर्ण आराखडा तयार झाल्यानंतर आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन तोंडवळीत ग्रामस्थांसमोर सी-वर्ल्ड प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहोत. एक ते दीड महिन्यांत हा आराखडा तयार होईल, असे राणे म्हणाले. मालवण शहरातील बंदर जेटी सुशोभीकरणाचे काम लवकरच पूर्ण होईल. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील प्रवासी जेटीसाठीही केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे परवानगी मागण्यात आली आहे. याबाबत खा. डॉ. निलेश राणे व वरिष्ठ अधिकारी दिल्लीत जाऊन पाठपुरावा करणार असल्याची माहिती राणे यांनी दिली. या दौ-यातत आपण तारकर्ली येथील पर्यटन केंद्राची पाहणी केली.
पाहणीमध्ये पर्यटन केंद्रात अनेक सुधारणा आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. या सुधारणा घडवून आणण्याबरोबरच पर्यटन केंद्राचा दर्जा वाढवणे, पर्यटन केंद्र परिसर सुशोभीकरण याबाबत व्यवस्थापकीय संचालकांशी आपण चर्चा केली आहे. तालुक्यातील देवबाग गावात अत्याधुनिक जेटी उभारण्याचा आपला संकल्प आहे. या जेटीचा उपयोग प्रवासी वाहतुकीसाठी करण्यात येणार आहे. देवबागमधून ही बोट मालवणला जाईल व येथून तोंडवळी येथील सी-वर्ल्ड प्रकल्पाच्या स्थळापर्यंत प्रवासी बोट नेण्याचा आपला संकल्प असल्याचे राणे यांनी सांगितले.
मालवणच्या भुयारी गटार योजनेच्या कामास तांत्रिक कारणाने उशीर झाला आहे. शहरवासीयांसाठी आपण ही योजना आणली असून नागरिकांनीही त्याला सहकार्य करावे. रेंगाळलेल्या कामांबाबत आपण कंत्राटदारांशी चर्चा करून लवकरात लवकर प्रलंबित कामे पूर्ण करण्याची सूचना करणार असल्याचे राणे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे काम उत्कृष्ट
विलासराव देशमुखांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहत असून मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत विचारले असता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे काम उत्कृष्ट आहे. त्यामुळे त्यांना बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे राणे यांनी सांगितले.
स्थानिकांना तातडीने परवाने द्या
देवबाग येथील प्रवासी नौकाधारकांनी बंदर विभागाकडून व्यवसायासाठी परवाने देण्यात येत नसल्याची कैफियत मांडताच राणे संतप्त झाले आणि त्यांनी येथील स्थानिक नौकाधारकांना तातडीने परवाने द्या. येत्या पंधरा दिवसात ही कार्यवाही झाली पाहिजे. अन्यथा संबंधित अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा दिला.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home