‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ या
उक्तीप्रमाणेच परमेश्वर अठ्ठावीस युगे विठ्ठलाच्या रूपाने ज्या विटेवर उभा
आहे ती वीट नक्की कशी व कुठे बनते याबाबत सर्वामध्ये कुतूहल असते. कुंभार
कलेशी निगडित असलेला हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने उभारी घेऊ शकतो.
मात्र, या व्यवसायाला गरज आहे ती
सहकाराची. सुरुवातीला खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने कर्जरूपाने ५०
टक्के अनुदान स्वरूपात या व्यवसायासाठी वित्तपुरवठा केला जायचा. पण
सद्यस्थितीत तो होत नसल्याने शासनाकडून अनुदानप्राप्त वित्तीय मदत मिळाली
तरच नुकसानीत असलेला हा व्यवसाय भविष्यात तग धरू शकेल आणि त्यानंतरच ख-या
अर्थाने ‘विठ्ठलाचे पायी वीट झाली भाग्यवंत’ असे म्हणताना वीट व्यावसायिक
निश्चितच सुखावतील.
सावंतवाडीतील मळगाव परिसरात वीट व्यवसायास
आवश्यक असणारी कुंभारी माती मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे पावसाळा
हंगामाची शेती उरकल्यावर वीट व्यवसायासाठी सुरुवातीला योग्य जागेची निवड
करून या जमिनीची साफसफाई केली जाते. यानंतर जमिनीचा वरचा थर काढून बाजूला
केला जातो. याला ‘बेन’ काढणे म्हणतात. यानंतर योग्य माती प्राप्त झाल्यावर
कामगारांकरवी ती एकत्रित केली जाते. त्यानंतर मातीत पाणी मिसळून मातीचा
गारा केला जातो.
माती योग्य प्रमाणात कुजल्यावर कुंभार वीट
मारण्याचे म्हणजे साच्यातून वीट काढण्याचे काम करतात. यासाठी लाकडी साचा
वापरला जातो. एकावेळी एकच वीट याद्वारे निघते. यासाठी वाळूचाही वापर केला
जातो. आठ ते दहा दिवस वाळल्यावर वीटा भट्टीसाठी तयार होतात.
वीटभट्टी रचणे हे देखील एक कसब आहे.
प्रत्येक थरात व थरातील प्रत्येक ओळीत हवेसाठी पोकळी ठेवावी लागते. भट्टी
रचताना त्यात लाकडाचा भुसा, लाकडी पट्टय़ा व तुकडे वापरले जातात. काही भागात
यासाठी या हंगामात उपलब्ध होणारे काजूचे बोंड वाळवून भट्टीसाठी वापरले
जातात. याला जळाव म्हणतात. त्याची योग्य रचना झाल्यावर भट्टी जाळली जाते.
त्यातून आतल्या बाजूलाच ज्वाळा उडतात.
भट्टी पूर्ण थंड झाल्यावर या तयार
झालेल्या पक्क्या विटा बाजूला केल्या जातात. यावेळी भट्टीतील आतल्या
भागातील विटाच पक्क्या होतात. तर बाहेरील विटा दुस-या भट्टीच्या वेळी
पुन्हा रचल्या जातात. या भट्टीसाठी लाकडाचे तुकडे तसेच काजू बोंड वापरतात.
सावंतवाडी तालुक्यात हा व्यवसाय सध्या
मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. याच हंगामात घरे, इमारती बांधण्याचे काम चालत
असल्याने याकामी विटांचाच वापर जास्त प्रमाणात होत असल्याने विटांना चांगली
मागणी आहे. गोव्यातूनही या विटांना चांगली मागणी आहे. तेथे दरही चांगला
मिळत असल्याने या भागातील विटा गोवा, कर्नाटक या भागात निर्यात केल्या
जातात.
अवेळी होणा-या पावसामुळे वीट व्यावसायिक
चिंतातूर बनले आहेत. हा व्यवसाय अवेळी पावसामुळे धोक्यात आला असून,
वनविभाग, महसूल विभाग, गौण खनिज बंदी अशा बाबींना वेळोवेळी तोंड द्यावे
लागते.
सांस्कृतिक ठेवा असलेला हा वीट व्यवसाय
वृद्धिंगत होण्यासाठी वित्तीय संस्थांबरोबरच सहकाराचीही आवश्यकता आहे. आज
मोठय़ा प्रमाणात स्त्रियांचे बचतगट कार्यरत आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘पुरुष
बचतगट’ स्थापन होऊन त्या माध्यमातून कमी व्याजदराने मिळणारे सरकारी कर्ज
उपलब्ध होऊ शकते.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home