Wednesday, April 22, 2015

शालेय जीवनातली संस्कार शिदोरी!

आज कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही, पण ५०-५५ वर्षापूर्वी आमचे गाव तारकर्ली म्हणजे एखाद्या खेडय़ाप्रमाणे खूपच अविकसित होते. 
aathvan copyआज कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही, पण ५०-५५ वर्षापूर्वी आमचे गाव तारकर्ली म्हणजे एखाद्या खेडय़ाप्रमाणे खूपच अविकसित होते. मालवणला जाण्या-येण्यास एस.टी. बस सुरू व्हायची होती. गावात रस्ते, वीज यांसारख्या आवश्यक गोष्टीही नव्हत्या. वृत्तपत्रे मिळत नव्हती. अख्ख्या गावात एक-दोन जणांच्या घरी रेडिओ होते, पण तेही खूपदा बंदच असतं, कारण एकदा रेडिओ बिघडला की तो दुरुस्त करणारा जवळपास कुणी नव्हता.
मूल आजारी असेल तर गावात डॉक्टर नसल्याने मुलाला उचलून सहा कि.मी. दूर मालवणला घेऊन जाण्याची धमक तेव्हा आमच्या आयांमध्ये होती. दुसरा इलाजच नव्हता. मुंबईला असलेल्या मुलाचे पत्र येई तेव्हा त्यांची खुशाली कळत होती, त्यामुळे त्या काळी अशी माणसे पोस्टमनची वाट देवासारखी पाहत असत. कुणी चाकरमानी गावी येई तेव्हा मुंबईच्या गमतीजमती ऐकायला त्याच्याकडे गर्दी जमायची.
कमी अधिक प्रमाणात त्या काळी सर्व गावांची स्थिती अशीच होती. इतर कोणत्याही सोयी-सुविधा नसल्या तरी सरकारी मत्स्योद्योग विद्या मंदिर-तारकर्ली ही पहिली ते सातवीपर्यंतची सरकारी शाळा मात्र आमच्या गावी होती. प्रत्येक वर्गाला वेगळा शिक्षक होता. या आमच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग काथ्याच्या चटईवर तर पाचवी ते सातवीचे बेंच वर बसत.
आम्ही चौथीत असताना म्हणजे १९६९-७० साली एके दिवशी आमच्या वर्गातील सारी मुले दप्तर घेऊन वर्गाबाहेर बसली. आमच्या वर्गात जे दोन-चार जाणते म्हणजे प्रत्येक वर्गात दोन-दोन वेळा बसून चौथीपर्यंत आले होते, त्यांनी आम्हा सर्वाना वर्गाबाहेर बसवले होते. त्यांना वर्गाबाहेर बसण्याचे कारण विचारलं तेव्हा समजले, आपल्याला वर्गात बसण्यासाठी बेंच हवेत.
साडेदहा वाजता आमचे वर्गशिक्षक कोळंबकर मास्तर हे वर्गात आले तर वर्ग रिकामा आणि मुले वर्गाबाहेर बसलेली असे अपूर्व दृश्य पाहिले. मास्तरांनी आमच्याजवळ येऊन आम्ही बाहेर बसण्याचे कारण विचारले. आम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण मुले ऐकेनात. मग त्यांनी ही बातमी मुख्याध्यापकांना सांगितली. मुख्याध्यापक होते साधले मास्तर; प्रेमळ पण कडक शिस्तीचे. दांडगाई करणारी मुलेही ते येताच शांत होत असत.
साधले मास्तरांनी वर्गाबाहेर बसण्याचे कारण विचारले. एक-दोन मोठय़ा मुलांनी खाली नजर ठेवूनच कारण सांगितले. मुख्याध्यापक समजावत म्हणाले, ‘अरे शाळेचे काही नियम असतात, तुम्हाला पुढच्या वर्षी बेंच मिळणार बसायला. माझे ऐका वर्गात बसा.’ तरीही कुणी उठेना. उलट एक जण म्हणाला, ‘बेंच दिल्याशिवाय आम्ही वर्गात बसणार नाही. परांजपे मास्तरांच्या सुतारकामाच्या वर्गात इतके बेंच धुळ खात पडलेत, ते द्या आम्हाला बसायला.’ मग मास्तरांचा नाईलाज झाला. त्यांनी आम्हाला सांगितले, ‘मुले आणि बेंच किती आहेत ते पाहतो व पुरण्यासारखे असतील तर शनिवारी वर्गात लावतो.
आता वर्गात बसा.’ मुख्याध्यापकांकडून असे आश्वासन मिळाल्यावर आम्ही एक एक करत वर्गात जाऊन बसलो. वास्तविक मुख्याध्यापकांनी आम्हाला इतके समजावून न सांगता वर्गाबाहेर उठा-बशा काढण्याची, ओणवे राहण्याची किंवा पालकांना बोलावून शिक्षा दिली असती तरीही ते योग्य ठरले असते. इतकेच नव्हे तर त्या काळी विद्यार्थ्यांना मार दिला तरी पालक विचारत नसत, पण आमच्या शिक्षकांनी आम्हाला शिक्षा दिली नाही, तर सोमवारपासून आम्ही चौथीतच बेंचवर बसू लागलो. माझ्याप्रमाणे दोन-तीन विद्यार्थी बेंचवरून हात पुरत नाही म्हणून उभे राहून लिहीत असू.
१९७३ साली सातवीत असताना वार्षिक स्नेहसंमेलनात आम्ही मुलांनी ‘जिंकू किंवा मरू.. माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरू’ हे स्फूर्तिगीत सादर करायचे ठरवले होते. सरावही झाला होता. स्नेहसंमेलनाच्या दिवशी म्हणजे रात्री आमचे गीत सादर होण्यापूर्वी कुणीतरी सांगितले, सगळे मास्तर, बाई आणि शिपाई नानकटाई खाताहेत कॉफीबरोबर. झाले, हे समजल्यावर आमचा ‘इगो’ दुखावला. आम्ही सातवीत म्हणजे शाळेतील ज्येष्ठ विद्यार्थी. शिवाय आमचे शेवटचे वर्ष तरी आम्हाला न देता हे कसे खातात? कुणाच्या तरी डोक्यात आलं, चला कार्यक्रमावर बहिष्कार आणि तसा निरोप शिपायांना दिल्यावर शिक्षकांची धावपळ झाली.
त्यांनी आम्हाला समजावलं, पण कुणी तयार होईना. शेवटी शिक्षक म्हणाले, ‘आता सर्वाना पुरतील इतक्या नानकटाई नाहीत, शिवाय गावात मिळणारही नाहीत. तुम्ही कार्यक्रम करा, उद्या रजा आहे, परवा पूर्ण वर्गाला नानकटाई आणि कॉफी देऊ.’ शिक्षकांकडून अशी कबुली मिळाल्यावर मग आमचे गाणे झाले आणि तिसऱ्या दिवशी पूर्ण वर्गाला कॉफीसोबत नानकटाईही मिळाली. आज त्या नानकटाईची चव ना कुकीजमध्ये ना कशातच.
आमच्या गावात सातवीच्या पुढे शाळा नसल्याने आम्ही आठवीपासून मालवणला जात असू. कॉलेजला बंक सगळेच मारतात. शाळेला दांडय़ाही खूप जणांनी खूप वेळा मारल्या असतील; पण आम्ही हायस्कूलमध्ये असताना फक्त एकदाच मारलेल्या दांडीने आम्हा सर्वाना (मास बंक होता) रडू आणले व अद्दल घडवली. गावी दिवसभराची (पूर्णवेळ) शाळा असल्याने आम्ही जेवण करून सकाळी साडेआठ वाजता घर सोडायचो. तारकर्ली ते मालवण सहा कि.मी. अंतर मस्त समुद्रकिनाऱ्यावरून चालत जावे लागे. आता एसटी सुरू झाली होती, पण पासाला पैसे नव्हते. आमच्या गावाच्या सीमेवरील ‘रांज’ पार करूनच आम्हाला पुढे जावे लागे.
एरवी कुणाच्या खिजगणतीत नसणारी, संथ वाहणारी रांज पावसाळ्यात भीषण रौद्र होत असे. डोंगर दऱ्यातून वाहत येऊन जे पाणी समुद्राला मिळते त्या पाण्याच्या प्रवाहाला आमच्याकडे ‘रांज’ असे म्हणतात. पावसाळ्यात नवीन माणूस रांज पार करायला जाईल तर तो गटांगळ्या खात समुद्रात गेलाच म्हणून समजा. पायाखालील वाळू झपाटय़ाने खचते, सरकते. वरून पाण्याचा लोंढा त्यात नवख्या किंवा कमी ताकदीच्या माणसाचा टिकावच लागून देत नाही. अशावेळी आम्हा शाळकरी मुलांना गावातील तरुण, तगडी, अनुभवी माणसे दप्तरासह उचलून घेऊन रांज पार करून देत. पुढच्या बाजूस रांजीवर त्यावेळी लाकडी साकव बांधलेला असे पण आम्ही जात नसू. तो लांबचा मार्ग होता. पाचेक कि.मी. चालल्यावर सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर दांडी गावी श्रीदांडेश्वराच्या मंदिरात आम्ही सर्व एकत्र जमून मग पुढे हायस्कूलला जात असू.
याच दांडेश्वर मंदिरात एकेदिवशी दहावी-अकरावीच्या विद्यार्थ्यांनी सर्वाना सांगितले, ‘उद्या रोजच्याप्रमाणे सर्वानी येथेच जमायचे. मालवण शहरात जायचे पण हायस्कूलमध्ये न जाता दुपापर्यंत मालवण फिरून घरी जायचे.
घरी सांगू अर्ध्या दिवसाने शाळा सोडली म्हणून.’ या गोष्टीला आम्ही आठवीवाल्यांनी थोडा विरोध केला; पण आमचं काही चाललं नाही, पण आमच्यापैकी एक विद्यार्थी दुस-या शाळेत शिकत होता. तो तयार झाला नाही, तेव्हा त्याची शाळा वेगळी आहे म्हणून त्याला या योजनेतून मोकळं केलं.
दुस-या दिवशी मालवणला जाऊनही कुणीही शाळेत न जाता उगीचच मालवण फिरत राहिलो. दुपापर्यंत फिरून कंटाळा आला मग दुपारी घरी गेलो. तिकडे आमच्या हायस्कूलमध्ये प्रत्येक वर्गातील कोणत्याच तुकडीत आठवी ते अकरावीचा एकही विद्यार्थी उपस्थित नाही, हे पाहून तारकर्लीला काहीतरी गंभीर घटना घडली असावी, हे शिक्षकाच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित मुख्याध्यापकांना खबर दिली व मुख्याध्यापकांनी शिपायाला मालवणातील दुस-या हायस्कूलमध्ये कुणी तारकर्लीचा विद्यार्थी आला आहे का, हे पाहण्यास पाठवले. आमच्या दुर्दैवाने तिथे आठवीच्या वर्गात आमच्या योजनेतून बाद झालेला विद्यार्थी हजर होता. त्याने सांगितले की, सर्व जण माझ्याचबरोबर मालवणला आलेत. खोतसरांना हे समजल्यावर त्यांच्या सर्व प्रकार लक्षात आला. त्यांनी शिक्षकांना काही सूचना दिल्या.
दुस-या दिवशी आम्ही साळसूदपणे काही घडलेच नाही अशा आविर्भावात आपापल्या वर्गात बसलो. हजेरी झाल्यानंतर प्रत्येक वर्गशिक्षकाने आम्हा तारकर्लीच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक खोतसरांना भेटण्यास सांगितले. त्या दिवशी खोतसरांच्या केबिनबाहेर आठवी ते अकरावीत असणाऱ्या फक्त तारकर्लीच्या विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. केबिनमध्ये जाण्यास कुणीच तयार नव्हते. शेवटी मोठय़ा मुलांनी आम्हाला केबिनमध्ये ढकलून ते आमच्या मागून आले. नेहमी गंभीर दिसणारे खोतसर आज खूप कठोर वाटत होते. न विचारता त्यांच्या कार्यालयात पन्नास-साठ मुले पाहून ते ओरडले ‘काय आहे?’ सरांनी आपणास भेटण्यास सांगितल्याचे सांगताच, काल कुणीच कसं शाळेत आले नाही म्हणून विचारले. आम्ही ठरल्याप्रमाणे ‘रांजीला पूर होता म्हणून येता आले नाही’ असे उत्तर दिले. त्यावर सरांनी दुस-या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दाखला देऊन बरेच सुनावले. सर्वाची चांगलीच हजेरी घेतली आणि प्रत्येकाने आपल्या पालकांना घेऊन यानंतरच वर्गात बसण्यास फर्मावले.
सर्व जण शाळेबाहेर पडलो. काय करावे तेच कळत नव्हते. मी आणि माझा मित्र सुनील कुबल दोघे एस.टी.साठी बस स्टँडकडे निघालो. माझ्या छातीची धडधड पुढील चित्र डोळ्यांसमोर दिसत असल्याने वाढत होती, पण सुनील शांत होता, कारण त्याची आई कधी त्याला मारत नसे, पण माझी पाठ लाल होणार हे मला माहीत होते. आमच्या समोरून सुनीलचे दोन शेजारी मनू आणि शंभू धुरत येत होते. त्यांनी आमचा अवतार व उलटमार्गी येत असलेले पाहून प्रश्न केला, ‘काय रे, फिरताय खयं, शाळा नाय?’ आम्ही त्यांना सर्व प्रकार सांगितला व सुनीलने त्यांना आमचे भाऊ म्हणून खोतसरांना भेटण्याची विनंती केली. त्यांनी ते मानलं नाहीच, उलट म्हणाले, ‘शाळा चुकवन बाजार फिरतास, जावा आता आपापल्या औशींका घेवत शाळेत.’ सुनीलचे बाबा मुंबईत तर माझे वडील हयात नसल्याने आमच्या दोघांच्याही आईलाच शाळेत यावे लागणार होते, म्हणून आम्ही धुरत बंधूंच्या पाया पडलो, विनवण्या केल्या तेव्हा ते खोतसरांना भेटण्यास तयार झाले. सर्वप्रथम आमचे दोघांचे भाऊ (गावभाऊ) शाळेत आले आणि कसे तरी त्या प्रसंगातून सुटलो.
सायंकाळी घरी आल्यावर मी भीत-भीतच सर्व घटना आईला सांगितली व मार खाण्याची मनाची तयारी केली. आईने मोठ्ठे डोळे करून माझ्याकडे रागाने पाहताच मी रडू लागलो. तिने मला जवळ घेतले आणि म्हणाली, ‘असे कुणी सांगितले म्हणून चुकीची, मनाला न पटणारी गोष्ट आपण कुणाला घाबरून करता कामा नये, हे यापुढे लक्षात ठेव. तू मला ही गोष्ट परवाच सांगायला हवी होतीस, आईशी खोटं बोलण्याची चूक केलीस, जा आता देवाला नमस्कार कर आणि त्यांची माफी माग, पुन्हा असं कधी वागणार नाही सांग.’
आज इतक्या वर्षानंतरही हे सगळे प्रसंग मला काल-परवा घडल्यासारखे लख्ख आठवतात. मन बालपणीच्या अतिरम्य काळात हरवून जाते. तेव्हाचे शिक्षक प्रेमळ, मुलांच्या मनाचा विचार करणारे होते, म्हणूनच प्रसंगी चोप देत, पण पालक कधी त्यांना विचारत नसत. शिक्षकांवर त्यांचा विश्वास होता. मुलांना शिक्षकांबद्दल आदर होता, शिक्षणाचा बाजार झाला नव्हता. विद्यार्थीदशेत केलेल्या चुका वेळीच लक्षात आणून दिल्याने तशा चुका पुढील आयुष्यात झाल्या नाहीत. जीवनात शिस्त आली. आमच्या मतांना तेव्हा शिक्षकांनी न टाळल्याने, आम्हीही आमच्या मुलांची मते विचारात घेतो. ती दुर्लक्षित करीत नाही, त्यामुळे मुलांशी सुसंवाद राहतो. शालेय जीवनात मिळालेली ही संस्कार शिदोरी आयुष्यभर पुरणारी ठरली आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home