Monday, June 1, 2015

रसभरीत दिवस

मे महिना म्हटलं की आठवतात जांभवडयातले रसभरीत दिवस. आमचं लहानपण आता सारखं टी.व्ही., कार्टून, आइस्क्रीम, कोल्ड्रिंक, समर कॅम्प यांनी लडबडलेलं नव्हतं, तर वेगवेगळे खेळ, विविध प्रकारची अस्सल फळं, फुलं, सुगंधी वाळवणांनी समृद्ध झालेलं होतं.
mango treeमे महिना म्हटलं की आठवतात जांभवडयातले रसभरीत दिवस. आमचं लहानपण आता सारखं टी.व्ही., कार्टून, आइस्क्रीम, कोल्ड्रिंक, समर कॅम्प यांनी लडबडलेलं नव्हतं, तर वेगवेगळे खेळ, विविध प्रकारची अस्सल फळं, फुलं, सुगंधी वाळवणांनी समृद्ध झालेलं होतं.
आमच्या घराच्या जरा पुढे एक आंब्याचं झाड होतं. मोठं डेरेदार, भरपूर सावलीचं, आंब्यांनी लगडलेलं झाड. आंबा डार्क रंगाचा पण वरची साल उघडली की भरजरी केशरी रंगाच्या रसाने थबथबलेला.
आम्ही दहा-बारा पोरं, सकाळी उठल्यापासून झाडाखाली तळ ठोकून असायचो. जरा वारा आला की दोन तीन आंबे तरी पडायचेच. सगळी जण जिवाच्या आकांताने धावायची.
कोण झाडावरून आंबा पडतानाच जिवंत कॅच पकडायचे. कोण पिकलेल्या आंब्याभोवती फिल्डिंग लावून ठेवायचे. मधल्या काळात पडलेल्या आंब्याचा चट्टामट्टा करण्याचा सोहळा व्हायचा. दिवसभर तहानभूक हरवलेली असायची.
कोकणात त्या काळात सगळीकडे हे चित्र कमी-अधिक फरकाने दिसायचेच. प्रत्येक आंब्याच्या झाडाखाली जणू समर कॅम्प लागलेला असायचा. एक बिटकी आंबा होता. छोटया-छोटया बिटक्यांचे घोस लटकलेले असायचे.
ससा जसा दुस-यांचं भक्ष्य होण्यासाठीच जन्माला आला आहे. तसं बिटकी जरा जोरात वारा आला की त्याचा जणू मान राखण्यासाठी जमिनीवर पडायची. देठ काढून जरासा डिंक पिळला की आत मधुर रसाने भरलेली सुगंधी कुपीच! कितीही बिटक्या खाल्या तरी पोट भरायचं नाही. पण मन मात्र समाधानाने तृप्त व्हायचं.
एक मिरमि-या आंबा होता. तो खाल्ल्यावर ओठ, जीभ, हिरडया, बधीरच होणार! हा आंबा खात खुशाल कुणीही जाऊन दाढ काढून घ्यावी. कधी काढली कळणार पण नाही. वासच त्याचा एवढा तीव्र असायचा, पण तरीही आम्ही तो खायचो. आम्ही लहान मुलं सगळया आंब्यांना समान न्याय द्यायचो. भेदभाव नाही.
आमच्याच परडयात एक छोटासा फणस होता. रसाळ आणि तिखट चवीचा. पिवळाधमक छोटा गरा. त्यामुळे नीट खाता यायचा ! साधारण नारळाएवढा फणस. खुशाल एकटयाने एक संपवावा आणि स्वत:ला गर्वाने भीम समजावे.
आंबे, फणसं खाल्ल्यावर पोटातल्या रिकाम्या जागा फटी, करवंदे, जांभळं आणि पिठुळ गोड मोत्यासारख्या तोरणांनी भरायचो. आज ती गोड तोरणं ‘सच्चा कार्यकर्त्यांसारखी’ दुर्मीळ झालेली आहेत. मे महिन्यात आम्हा लेकरांचे पालन-पोषण ही झाडंच करायची.
मे महिना कधी संपला हे आम्हालाही कळायचं नाही आणि आमच्या बालकांनाही! आजकाल पालकांना शाळेचं नाही; पण सुट्टीचं टेन्शन असतं. हे आधुनिकतेचे दुष्परिणाम असावेत! आज आमची मुलं जेव्हा पेटीतल्या कलमी आंब्यांच्या फोडींवर ताव मारतात. तेव्हा आमचा सुवर्णकाळ आठवून मला गलबलून येतं. पोरं उगीचच केवीलवाणी वाटतात आणि पावलं झाडी आंबे शोधण्यासाठी पुन्हा पुन्हा बाजाराकडे वळतात.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home