Monday, June 1, 2015

शाळेला जायला सज्ज

बच्चेकंपनी तुमची उन्हाळ्याची सुट्टी संपली. दोन आठवडय़ात तुमची शाळा देखील सुरू होईल. पण तुम्ही उदास अजिबात होऊ नका. शाळा सुरू होत असली तरी नवा वर्ग, नव्या टिचर, नवं दप्तर, नवे शूज, नवा गणवेश, नवा रेनकोट, छत्री सारं काही नवीनच मिळणार आहे. या नव्या वस्तूंच्या खरेदीला जाण्यासाठी तुम्ही आई-बाबांच्या मागे लागला असाल पण बाजारात काय नवीन आलंय याची आधीच माहिती तुम्ही मुलांनी काढून ठेवली तर आई-बाबांचं काम तितकंच हलंक होईल नाही का..
school bagsशाळा सुरू व्हायला फक्त दोन-एक आठवडे उरले आहेत. शाळा सुरू होणार म्हणजे पुन्हा तो अभ्यास, टय़ुशन, परीक्षा असं सगळं सुरू होणार मग हवं तसं खेळायलाही मिळणार नाही याचं टेन्शन तुम्हा मुलांना आलं असेल. पण छोटय़ा मुलांनो तुम्हाला आम्ही घाबरवण्यासाठी शाळेची आठवण करून दिली नाहीय. आठवण करून दिलीय ती वेगळ्याच कारणासाठी. शाळा सुरू होणार म्हटल्यावर किती तयारी करायची आहे.
नवं दप्तर, नव्या पेन्सिली, रेनकोट, शूज, कंपासबॉक्स, पुस्तकं, वह्या खूप काही घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला नक्की काय घ्यायचं आहे याचा विचार आधीपासून करायला नको का..? शाळेच्या पहिल्याच दिवशी आपल्या प्रत्येक वस्तू इतक्या मस्त असल्या पहिजेत की सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं पाहिजे.
पण काय घ्यायचं, काय नाही याचा आधीच विचार करून ठेवलेला बरा. हो ना! पुस्तक, वह्या, शाळेचा गणवेश आणि शूज यामध्ये आपण काहीच निवडू शकत नाही. कारण शाळेचा जो गणवेश, जी पुस्तकं, जे शूज सांगितले ते तसेच घ्यावे लागणार.
पण दप्तर, रेनकोट, छत्री यासारख्या गोष्टी मात्र आपण आपल्या मर्जीप्रमाणे निवडू शकतो. काय नवीन आलंय किंवा तुम्ही कशा प्रकारे आपली स्कूल बॅग, छत्री निवडायची यासाठी थोडीशी मदत आम्ही तुम्हाला करणार आहोत.
स्कूल बॅग कशी घ्यायची?
‘माझी स्कूल बॅग जुनी झाली, मला नवीनच हवीय’ असा तुमच्यापैकी अनेक मुलं हट्ट करतात. जुनी स्कूल बॅग चांगली असेल तर नवीन स्कूल बॅगचा हट्ट करू नका पण त्यातूनही तुम्हाला नवीन स्कूल बॅग हवी असेल तर घेताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
तुम्हाला कार्टुन खूप आवडत असतील ना. कोणाला छोटा भिम, कोणाला बालगणेश, कोणाला हनुमान, मुलींना चुटकी किंवा बार्बी. त्यामुळे स्कूल बॅग घेताना तुम्ही आवडतं कार्टुन असलेल्याच स्कूल बॅग निवडणार हे पक्क. पण छोटय़ा दोस्तांनो आवडीच्या कार्टुन प्रिंट घेण्याबरोबरच काही गोष्टी तुम्ही पण लक्षात ठेवा.
» बॅगवरच्या आकर्षक डिझाईन, प्रिन्ट बघताना या बॅग्सची मजबुती बघणं देखील तितकंच गरजेच आहे. त्यामुळे मजबूत अशा बॅग निवडा.
» आपल्या स्कूल बॅग या वजनानं अत्यंत हलक्या फुलक्या असाव्यात याची काळजी घ्या.
» वही, पुस्तकं, डब्बा, पाण्याची बाटली, आणि इतर छोटय़ा-मोठय़ा वस्तू मावतील इतके कप्पे आहेत ना हे बॅगमध्ये पाहून घ्या.
» बॅग्सना शो यावा यासासाठी त्यावर रंबीबेरंगी बक्कल लावली असतात.
तुम्ही अशा बॅग्स विकतही घेतात, पण या शक्यतो घेणं टाळावं कारण एकदा का याचं बक्कल टुटलं की या स्कूल बॅग्स दिसायला खराब दिसतात.
मार्केटमध्ये चायनाच्या वस्तू खूप येतात. त्यात तुम्हाला हव्या असणा-या अनेक कार्टुन प्रिन्टच्या बॅगा येतील पण चायनाच्या वस्तू घेताना निट बघून घ्या कारण या टिकाऊ नसतात. तुमच्या बॅग्सच्या आतमध्ये ‘मेड इन चायना’ असं लेबल लावलं असेल त्यावरून तुम्हाला पटकन कळेल.
सध्या छोटय़ा भिमच्या कार्टुन बॅग्सना खूप मागणी आहे त्यामुळे तुम्ही अशा देशी कार्टुनच्या बॅगा नक्की विकत घ्या.
ट्रॉली बॅग्स
शाळेतल्या पुस्तकांचं खूप ओझं असेल. या ओझ्यानं खांदे नुसते वाकतात. तुमचीही बॅग्स जड असेल, खूप पुस्तकांचं ओझं तुमच्या जवळ असेल तर आई बाबांना तुम्ही ट्रॉली बॅग्स घ्यायला सांगू शकता. जेव्हा बॅग्स जड असेल तेव्हा तुम्ही या बॅग्सचा ट्रॉलीसारखा वापर करू शकता. पण हो पावसात मात्र या बॅग्सचा तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. तुमच्या आवडत्या कार्टुन प्रिंन्टमध्ये या बॅग्स उपलब्ध आहेत. पण या बॅग्स थोडय़ा महाग असू शकतील.
छत्री, रेनकोट
पावसाळा सुरू होणार म्हटल्यावर तुम्ही मुलं नव्या रेटकोट आणि छत्रीच्याही शोधात असाल. रेनकोट घेतला की आपण भिजत नाही पण रेनकोटमध्ये बॅग मावत नाही मग ती भिजतेच म्हणून आईबाबा रेनकोटबरोबर दुसरी छत्री पण विकत घेतात.
तुमच्यापैकी काही जणांचे पालक आकारानं मोठा रेनकोट विकत घेतात, जेणकरून त्यात तुमची बॅग मावेल. पण आता आई-बाबांना सांगा तसं करण्याची अजिबात गरज नाही. कारण बाजारात काही बॅग्सच्या आकारातले रेनकोट आले आहेत. म्हणजे त्याच्या पाठीमागे तुमची बॅग मावेल असा वेगळा भाग जोडण्यात आला आहे. त्यामुळे यात तुमची बॅग न भिजता राहू शकते आणि आकारानं मोठे रेनकोट घेण्याचीही गरज लागणार नाही.
या रेनकोटमध्ये आणखी एक प्रकार आलाय तो कार्टुन रेनकोटचा. हे रेनकोट मिकिमाऊस, बनी, बर्ड्स, फ्रॉग अशा वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये येतात. याच्या कॅप्सवर त्या कार्टुनचा चेहरा असतो. त्यामुळे असे रेनकोट घालून तुम्ही त्या कार्टुन कॅरेक्टरसारखे दिसाल.
तुम्हाला छत्री, रेनकोट दोन्ही हवं असेल तर कॉम्बो पॅक घेऊ शकता. यात तुम्हाला तुमच्या रेनकोटवर मॅचिंग अशी छत्री आणि गमबूट देखील मिळतील. वेगळं काही घेण्याची गरज पडणार नाही. हे कॉम्बो पॅक तुम्हाला स्वस्तही मिळतील.
तुम्ही छत्री बघत असाल तर कार्टुन फेस आकारातल्या छत्र्या आल्या आहेत याही तुम्ही घेऊ शकता. तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील या छत्र्या नक्कीच आवडतील.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home