‘म्हाता-या’ उडू लागल्यात !
म्हातारी फिरू लागली आहे..ती
उडू लागली आहे..तिचे शुभ्र केस हातात धरून..येथेच्छ फेरफटका मारताना ‘ए हवा
का झोका ऽऽ ’ चा अनुभव मोरपिसापेक्षा काहीही उणा नाही! पांढराशुभ्र तलम
पिसारा.

खाली काळी चकती आणि त्यामागे धावणारी
मुलं. त्या दिवशी मी पाहिली आणि मी ही त्यांच्याबरोबर पळू लागलो. थेट
बालपणात जाऊन पोहोचलो. वा-याच्या झुल्यात ‘म्हातारी’ आकाशात उडत होती.
परिसरात वा-याबरोबर उडणारे पांढरे पुंजके
सर्वाचेच लक्ष वेधून घेत होते. लहानपणीच्या दिवसात म्हातारीच्या मागे न
धावणारी व्यक्ती कोकणात मिळणे म्हणजे दुर्मीळच बाब.
दुपारी उन्हं तापू लागली की या म्हाता-या
आपल्या प्रवासाला बाहेर पडतात. वा-याच्या दिशेने होणारा हा प्रवास कधी
आकाशात उंचच उंच तर कधी समांतर होत असतो.
कुठे तरी आडोशाला किंवा झाडी-झुडपात
‘म्हातारी’ अडकली की वा-याबरोबरचा तिचा प्रवास संपतो. पण हा प्रवास थांबला
तरी निसर्गचक्रातील एक महत्त्वाचा अध्याय इथूनच सुरू होतो. म्हाता-या
माणसाच्या पांढ-या केसांवरूनच या पुंजक्याला म्हातारी हे नाव पडले आहे.
सावर, रूई, कावळीची वेल अशा वनस्पती
म्हातारीच्या माध्यमातून आपली वंशवेल वाढविण्याचा प्रयत्न करतात. सावरीच्या
काळया शेंगामधून पडणारा कापूस बी धारण करतो. तर रूई आणि कावळीच्या वेलीची
फळं साधारण सारखीच असतात.
म्हातारीमागे मोठे निसर्गचक्र फिरत असते.
बीजं उडतात. कुठेतरी रुजतात. त्यातून झाड तयार होते. पुन्हा फळं, पुन्हा
म्हातारी असे चक्र चालतच असते.
काही झाडांना प्रजननासाठी निसर्गाने
अद्भुत शक्ती दिली आहे. बहुतांशी झाडं आपल्या फळांमधून किंवा
फुलं-शेंडामधून बीज उत्पादित करतात. साधारण वसंतात या वर्गातील वृक्षांना
शेंगा किंवा विशिष्ट आकाराची फुले यायला सुरुवात होते. प्रत्येकाला
नवनिर्मितीची आस असतेच..या निसर्गनियमातून लता-वेली तरी मागे कशा राहतील?
फुलाची बिजं तयार होतात. यानंतर ‘बीज
प्रसार’ यासाठी निसर्ग किमया मदतीला येते. निसर्ग या बियांभोवती सुंदर
मऊसूत धाग्यांचा पुंजका तयार करतो.
फळात हे पुंजके एका खालोखाल चिकटून
राहतात. मग एक दिवशी फुलांचे आवरण पूर्णत: सुकतं आणि फुटतं आणि त्यातून
रेशमी पुंजके बाहेर पडतात. हे पुंजके म्हणजे ‘म्हातारी’!
रुईची बोंडे परिपक्व झाली की, म्हाता-या
मुक्त होतात. जणू त्या पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होतात. हे निसर्गचक्र
सह्याद्रीत अनेकवेळा अनेक दिशांनी अनुभवता येतं.
आपण केवळ या निसर्गाकडे सजगपणे पाहायला
हवे. मग समजते हे निसर्गचक्र आणि हजारो केसांची वा-याप्रमाणे हेलकावे
घेणारी म्हातारी, तिच्या साथीला नव्या प्रवासात तिला लगडलेल बीज .
उन्हाच्या वाढलेल्या झळांबरोबर हा
निसर्गातला चमत्कार नव्या बिजाच्या नव्या जागेसाठी प्रस्थान करतो. हे
प्रस्थान पाहणे म्हणजेच निसर्ग समजणे.?या पुंजक्याला म्हातारी हे आमच्या
मुलखातलं ग्रामीण नाव.. कसं सार्थ वाटतं हे निसर्गाशी संवाद साधताना लक्षात
येते.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home