Monday, June 1, 2015

राईतले पानही कोणी उचलत नाही

किल्ले निवती म्हटल्यावर समुद्राच्या विशाल लाटा आणि डॉल्फिनचे नृत्य सर्व परिचित आहे. या निवतीच्या किल्ल्याशेजारीच असलेल्या काळेभेद, जुनागड परिसरातले सौंदर्य लक्ष वेधून घेत असते. या काळेभेदावरील निसर्गसृष्टी मनमोहून टाकते. या गर्द झाडीत पाऊल ठेवताना सावधानतेचा इशारा दिला जातो. हे स्थान डुंगेश्वराचे आहे. येथील कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही. झाडाची फांदीही तोडायची नाही. या नियमाविरोधात जो कोणी जाईल त्याला शिक्षा ही ठरलेलीच. याचा धाक अथवा श्रद्धा असल्यामुळे  निसर्गशक्तीच्या विरोधात कुणीही जाण्याच्या फंदात पडत नाही.
treeचारी बाजूंनी संकटे घोंगावत येतात. डोळय़ांसमोर मृत्यू दिसू लागतो. काय करावे समजत नाही. काळय़ाशार समुद्रात बोट बंद झालेली असते. तुफानामुळे दिशाही समजत नाही, अशा वेळी देवाचा धावा सुरू होतो. यावेळी डुंगेश्वर मदतीला धावतो. ‘‘बाऽऽ देवा वाचवं बोट किना-याला लाव.. सुखरूप पोहोचल्यानंतर माझी इच्छा तुझ्या चरणी पूर्ण करेन..’’
काही वेळातच तुफान शांत तरी होते अथवा मदतीसाठी अकल्पित असा हात पुढे येतो. किना-यापर्यंतची सफर मग सुखरूप होते. हे अनुभव आहेत, निवती परिसरातील दर्याच्या राजाचे. आम्हाला समुद्राची भीती वाटत नाही कारण आमच्या मागे खंबीरपणे डुंगेश्वर उभा आहे, असे जेव्हा येथील ग्रामस्थ सांगतात तेव्हा डुंगेश्वराच्या दर्शनाशिवाय स्वस्थ बसता येत नाही.
डुंगेश्वराच्या भेटीला जायचे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात निवती किल्ल्यानजीक  अरबी समुद्राचे दर्शन घेतानाच घनगर्द जंगलात शिरावे लागते आणि मग दर्शनाच्या स्थानापर्यंत वाकूनच चालावे लागते. जणू काही डुंगेश्वराच्या भेटीला जाताना आपण लीन होऊनच जावे. अहंकार बाजूला सारावा..
दर्शनाला येण्यापूर्वी सुर्चिभूत व्हावे म्हणून डुंगेश्वराच्या स्थानाशेजारी खळाळत्या निवती ओहोळात झोकून द्यावे आणि मग झाडे, वेलींच्या सान्निध्यात असलेल्या डुंगेश्वराच्या दरबारात हजर व्हावे. येथे अनेक भगवी पताके, निशाण आणि सर्पाच्या प्रतिकृती पाहायला मिळतात. हे शिवाचे स्थान असल्यामुळे पावित्र्यही तेवढेच पाळले जाते. या भागात पोहोचल्यावर येथे असणारे गूढ वातावरण, चारही बाजूला असणारी गर्द वनराई, वेलींचेच असणारे छप्पर,आणि वर्षानूवर्षे कुजलेल्या पालापाचोळय़ामुळे येथे येणारा मंद गंध..
शिवकिल्ले निवतीपासून अरबी समुद्रात घुसलेले काळेभेद स्थान म्हणजे डुंगेश्वराची राजधानीच. या काळेभेद शेजारीच डुंगेश्वराची राई पाहायला मिळते. राजधानीत येण्यास भक्तांना कोणताही अडसर नाही. परंतु, कुणी येथील झाडाचे पान जरी तोडले तरी त्याला  प्रायनिश्चित घ्यावे लागते. स्वत:हून चूक कबूल केली तर शिक्षा कमी पण कुणी काहीही माझे वाकडे करू शकत नाही, असा अहंकार धरला तर मात्र खर नाही. अनेकांनी याची प्रचिती अगदी काल-परवापर्यंत घेतली आहे. ग्रामस्थांची डुंगेश्वरावर एवढी श्रद्धा आहे की, या स्थानावर हजारो वर्षापासून हजारो प्रकारची झाडे असूनही त्याला कुणीही हात लावलेला नाही.
काळेभेदच्या स्थानावर गरुड वेलपासून ते सहय़ाद्रीत अतिदुर्गम असलेले अमृता, पारय, आंबा, उपरसाळ, कांगणी, करिवणा, सर्पगंधा याबरोबरच काज-याची आणि बिब्याचीही झाडे मोठय़ा प्रमाणावर आहेत. येथे वनसंपत्ती जशी तसा सरपटणा-या प्राण्यांचा अधिवासही मोठा. डुंगेश्वराच्या स्थानावर आपण काही चुकीचे करत असू तर सर्प अथवा सरपटणारा प्राणी समोर येऊन आपल्याला सूचना करतो अशी प्रचिती अनेकांनी घेतली आहे.
डिंगोबा, गांगोबा हे दोघे भाऊ आणि त्यांची बहीण भावई. समुद्रमार्गे एका देवतेला पोहोचविण्यासाठी डिंगोबा निवतीला आले. मात्र येथील स्थान पाहता त्यांनी मागे न जाण्याचाच निर्णय घेतला. ते याच किनारी स्थिरावले आणि डुंगेश्वर म्हणून परिचित झाले. गांगोबा या देवतेचे मंदिर कोचरा श्रीरामवाडी येथे आहे, तर भावई देवीचे मंदिर येथूनच दोन कि.मी. वर आहे.
डिंगोबाने मागे परतणार नसल्याचे सांगितल्याने झालेल्या वादामुळे आजही दोन भाऊ विशिष्ट दिवसाशिवाय एकत्र येत नाहीत, असे ग्रामस्थ सांगतात. गांगोबाची पालखी मिरवणूक निघाल्यानंतर कोचरा श्रीरामवाडी येथे ‘डिंगोबाचे खड्गं’ असे एक स्थान आहे. या स्थानाच्या पुढे पालखी जात नाही.
डुंगेश्वर स्थान आहे हे निसर्गाचा अप्रतिम ठेवा आहे. देवाचा आपल्यावर कोप होईल या भीतीपोटी येथील वनसंपत्तीला कोणीही हात लावत नाही. यामुळे हजारो वर्षापूर्वीपासूनची वनसंपत्ती येथे दाटीवाटीने उभी आहे. अनेक झाडे तुटतात, मोडतात पण कुणीही कोणत्याही पानाला हात लावलेला नाही.
याच स्थानाशेजारी निवतीचा ओहोळ येऊन समुद्राला मिळतो. यामुळे डुंगेश्वराच्या स्थानाकडे उजव्या बाजूला गोडेपाणी तर डाव्या बाजूला खारेपाणी पाहायला मिळते. एका विशिष्ट दगडावर उभे राहून एका हातात खारे पाणी आणि एका हातात गोडे पाणी घेत ओंजळीतून त्याला अर्धे द्यावे आणि आपली इच्छा सांगावी, अशी येथील परंपरा आहे. समुद्रात कितीही तुफान येवो अथवा पुरस्थिती डुंगेश्वराच्या स्थानापर्यंत पाणी कधीही पोहोचत नाही. समुद्र पातळीनजीक हे स्थान असूनही या विशिष्ट रचनेबाबत आश्चर्य मानायला हवे.
डुंगेश्वराच्या स्थानावर वाईट प्रवृत्तींना थारा नाही. येथे येऊन कुणाचे वाईट कर अशी कोणी इच्छा व्यक्त केली तर त्यालाच प्रायचित्त भोगावे लागते. यापूर्वी काही मंडळींना भोगाव्या लागलेल्या प्रायचित्तबाबत अनेक कथा ग्रामस्थ सांगतात. यामुळे देवासमोर जायचे तर पवित्र मनाने, पवित्र हेतूने.. डुंगेश्वराला बुधवार, शुक्रवार आणि रविवारी बळी देण्याचे विधी पूर्ण केले जातात.
डुंगेश्वर देवस्थानाच्या शेजारी असणा-या भागात कोंबडय़ा, बक-यांचा बळी दिला जातो. या गर्द झाडीत देवाला प्रसाद दाखविताना अन्नदान करण्याचीही परंपरा आहे. गोवा, कर्नाटकाबरोबरच अनेक भागातील भक्तगण या स्थानावर नतमस्तक होत भोजनावळीचा नवस भागवत असतात.
अरबी समुद्राच्या काठावर घनगर्द झाडीत भोजनाचा स्वाद घेताना मिळणारा आनंद हा अपूर्व असाच. विशेष म्हणजे डुंगेश्वराच्या स्थानावर एका बाजूला समुद्र तर दुस-या बाजूला गोडय़ा पाण्याची विहीरही पाहायला मिळते. मच्छीमार बांधव सागराला नारळ अर्पण केल्यानंतर मच्छीमारीला बाहेर पडतात. यानंतर जाळय़ातील पहिल्याच माशांचा नैवेद्य हा डुंगेश्वराला अर्पित केला जातो.
काही वर्षापूर्वी येथे काही मंडळींनी अनवधानाने काळेभेद भागातील झाडे तोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना अजस्र् सापाने दंश केला. तेथे अशी चोरी करण्यासाठी पोहोचलेल्या मंडळींपैकी कुणीही आता जिवंत नाही. कसल्या ना कसल्या कारणाने त्यांना मरण स्वीकारावे लागले. या प्रकारामुळे ग्रामस्थांची श्रद्धा आणखीनच दृढ झाली. डुंगेश्वराच्या स्थानावर कौल प्रसादही घेतले जातात. कुणालाही कोणत्याही प्रकारे अडचणी असल्यास प्रत्येक जण डुंगेश्वराला हाक मारतो. माहेरवाशीणींबाबत हा देव अधिकच संवेदनशील आहे, असे म्हटले जाते. कुणीही माता अथवा भगिनींनी देवाला साद घातली आणि त्यांची इच्छापूर्ती झाली नाही असे कधी घडलेले नाही.
या जागृत स्थानामुळे भक्तांनी येथे मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता. मात्र डुंगेश्वराने या स्थानावर कोणताही बदल करण्यास रोखले. यामुळे पारंपरिक स्थितीत समुद्राच्या काठावर हे स्थान सर्वाचेच लक्ष वेधून घेत आहे. सिंधुदुर्गातील अध्यात्म निसर्ग आणि कोकणच्या कोकणपणाचा अस्सल अनुभव घ्यायचा असेल तर डुंगेश्वराच्या स्थानावर पोहोचायला हवे.
एक मात्र तुम्हाला येथे कोणतेही विद्रुपीकरण करता येणार नाही आणि येथील कोणत्याही वस्तूला सोबत घेता येणार नाही. काय अनुभवायचे असेल ते याच भागात या स्थळावरच.. याच मातीतल्या गंधात, आणि येथेच!
देवराया आहेत पण..
देवराई ही संस्कृती आमच्या मुलखात नसानसांत भिनलेली आहे. काही श्रद्धेने.. तर काही परंपरेप्रमाणे. देवराई राखण्याची गरज पूर्वजांनी ओळखली होती. आता वाढलेल्या प्रत्येक झाडाकडे घनफूट आणि पैशाच्या नजरेने बघणा-यांसाठी परंपरेने मिळालेला हा धडाच म्हणता येईल.अलीकडे विज्ञानाच्या तंत्रज्ञानात आम्हाला पूर्वजांची दुरदृष्टी अंधश्रद्धा वाटू लागली आहे. त्यामुळे देवाचा धाक बाजूला सारून, जमलेच तर त्याच देवासमोर लोटांगण घालत राखलेल्या वृक्ष संपदेवर कटर चालविले जात आहे. (आता कुऱ्हाडीचा जमाना कमी झाला त्याऐवजी झाडे कापता येणा-या मशीनचा वापर वाढला आहे) मात्र  अशाही स्थितीत सारे काही संपले आहे असेही नाही..
कोकणात शेकडो वनराई आजही डौलाने उभ्या आहेत. सिंधुदुर्गात तर प्रत्येक गावात किमान एक तरी देवराई आहे. यात शंभर-सव्वाशे एकर क्षेत्रापासून ते डुंगोबासारख्या (आरवली) फक्त एकाच वृक्षाच्या वनराईचाही समावेश आहे. देवराई राखण्याची प्रथा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे.
पूर्वी कोकणात प्रचंड प्रमाणात वृक्षराई होती. आपली गावे-वस्ती सह्याद्रीच्या डोंगरात, जंगलात वसलेली होती. समृद्धीच्या काळातही देवराई जपण्याची गरज पूर्वजांना वाटली, हा जुन्या समृद्ध; पण तितक्याच प्रगत संस्कृतीचा पुरावा म्हणता येईल. समृद्ध, जैवविविधतेने नटलेले जंगल तयार करणे ही शेकडो वर्ष चालणारी प्रक्रिया आहे. गावा-गावांत उंचच उंच, दाट सावली देणा-या शेकडो वर्षापासून आपले अस्तित्व जपणा-या देवराईत गेल्यावरच याची कल्पना येते.
 ब-याचदा गावातील वैदूंसाठी देवराई म्हणजे औषधांचे दुकानच असायचे. आजही या देवराया आपल्या पोटात अनेक दुर्मीळ वनौषधी लपवून आहेत; पण त्यांना ओळखणारी पिढी अभावानेच उरली आहे. देवाच्या नावाखाली या देवराया जपल्या गेल्या. आजही श्रद्धेने या देवस्थानचे अस्तित्व मानून कोणी या देवरायांना तोडायच्या फंदात पडत नाही.
भारतात लहान-मोठय़ा आकाराच्या जवळजवळ १३ हजार देवराया आहेत. त्यापैकी १,६०० देवराया पुणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत आहेत, त्यांच्यातही काही वैशिष्टय़े आहेत. काही सुगंधाने भारलेली.. तर काही वनसंपदेने गच्च असलेली.. काही रेडीअमप्रमाणे चमकणारी. त्यापैकीच एक म्हणजे डुंगेश्वर!‘देवराई’तून मिळणा-या वस्तूंच्या उपयोगितेतही फरक आहेत. काही देवरायांमध्ये खाली पडलेली फुलं, फळं, वाळक्या फांद्या उचलण्याची परवानगी असते, तर काही देवरायांमधून तेही बाहेर काढण्याची अनुमती नाही. एवढंच काय, तर काही  देवराईतून बाहेर पडताना लोक अंगावरचे कपडेही झटकतात. त्या पवित्र स्थानातले पानही बाहेर येऊ नये, यासाठी ही खबरदारी!
इतके कडक नियम असणारी ‘देवराई’ असते तरी कशी? मनुष्याचा हस्तक्षेप न झालेली ‘देवराई’ म्हणजे आश्चर्यच वाटतं. घनदाट, गर्द अरण्यात उंच वृक्षांची दाटी, विशाल बुंधे, बुंध्यांवर-फांद्यांवर वेटोळे घातलेल्या वेली व विविध प्रकारचे दुर्मीळ ऑड. जंगलाच्या छतातून सूर्यप्रकाश आत शिरणं जरा कठीणंच.. कुठंतरी खाली आलेल्या तिरिपीमुळे दिसणारे, खालच्या पातळीवर वाढणारे नाजूक नेचे, बुरशी आणि अळंबीचे प्रकार.
वर्षानुवर्ष जमिनीवर पडणा-या पाल्यापाचोळय़ांचा एक मऊ गालिचा अंथरलेला असतो, या कुंद वातावरणात कुजणा-या पाल्यापाचोळय़ाचा एक विशिष्ट मंद वास दरवळत असतो. हे स्थान अनेक प्रकारच्या कीटकांना, पक्ष्यांना, प्राण्यांना. इतरत्र त्यांच्या आश्रयस्थानाला धोका निर्माण झाला असला, तरी इथं ते सुरक्षित आहेत! आज अभयारण्यांचे संरक्षण सरकारने केलेल्या नियमांमुळे किंवा बंदुकांमुळे होत असते आणि देवरायांचे रूढी-परंपरांमुळे.
देवरायांची स्थापना, संकल्पना केव्हा आणि कशी झाली असावी, याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. एक प्रवाह सांगतो की, पूर्वीच्या काळी जंगलतोड करून जाळून आणि माती सुपीक असेपर्यंत शेती केली जायची. मातीचा कस कमी झाला की, जंगलाचा पुढचा पट्टा कापला जाई, अशा परिस्थितीत मूळच्या जंगलाचा काही भाग राखीव ठेवायलाच हवा याची काळजी घेतली जायची. यासाठी ग्रामदेवतांचा धाक दाखवला  जायचा.. काही जाणीवपूर्वक तर काही गरज म्हणून. त्या जंगलाचं संरक्षण करण्यासाठी झाडाखालीच वनदेवता स्थापित केली असावी.
ब-याच देवरायांमध्ये पाण्याचे स्रोत आहेत. वनदेवतेच्या कृपेने शेताला पाणी मिळते, अशी भावना असल्यामुळे त्या देवतेचं स्थान पवित्र ठेवण्याची काळजी घेतली जाते. देवराईच्या संरक्षणाचे नियम न पाळल्यास वनदेवता रागावते, देवीचा कोप होऊ शकतो, त्यामुळे देवराई, नैसर्गिक संकट, पिकांचं नुकसान होऊ शकतं, या श्रद्धेमुळे लोकांकडून पिढय़ान् पिढय़ा या देवरायांचे संरक्षण केले गेले, त्यांचे पावित्र्य राखले गेले.
या देवराया असंख्य प्रकारच्या वृक्षांचे, वनस्पतींचे भांडार आहेत. आयुर्वेदात लागणा-या निरनिराळय़ा प्रकारच्या औषधी वनस्पती तिथे उगवत. मृदा आणि जलसंवर्धनाचं ते भक्कम क्षेत्र आहे. तिथून उगम पावणारे झरे-ओढे पाण्याचे बारमाही स्त्रोत होते. काही स्त्रोत आता बदललेत.आता अशा देवरायांचं महत्त्व कमी झाले आहे. आपल्या दृष्टीने त्या केवळ जुन्या परंपरेचे प्रतीकच नाहीत, तर जैविक विविधतेचे ‘हॉट स्पॉट’ आहेत. इतर कुठेही न दिसणारे वनस्पती, कीटक येथे सापडतात. त्यामुळे जगभरातल्या जैव वैज्ञानिकांच्या दृष्टीनेही देवराया महत्त्वाच्या आहेत.
देवरायांना जपणा-या भावना आता नाहीशा होत आहेत. प्रगती आणि आधुनिकीकरणाच्या ओघात तरु णाई खेचली जात असून, आतापर्यंत देवरायांचे रक्षण करणा-या श्रद्धा या अंधश्रद्धा वाटत आहेत. शेतीसाठी, गुरे चारण्यासाठी, तसेच मोकळय़ा जमिनीवर वाढणारा ताण, देवरायांच्या जमिनीचे मालकीहक्क, असे प्रश्न संकट म्हणून कोसळत आहेत. अनेक ठिकाणी देवतांचे स्वरूपही बदलले आहे. पूर्वी झाडाखाली मांडलेल्या देवांना आता झाडे कापून सिमेंट काँक्रीटच्या बांधलेल्या भव्य मंदिरांत बसवले आहे. ऱ्हास झाला आहे, होत आहे, तरीही आशेचे किरण आहेत.. तुम्ही विश्वास ठेवा अगर नको ठेऊ पण हे सत्य आहे.. कारण डुंगेश्वर समर्थ आहे.. तशा त्या त्या भागातील वनदेवता.. तशी समज असलेली रुपकेसुद्धा!!

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home