Monday, June 1, 2015

झग्यावरचं नमन

कोकणातल्या शिमगोत्सवाची वैशिष्टय सांगावी तेवढी थोडीच! त्यापैकी ‘नमन’ हा कलाप्रकार विशेष लोकप्रिय आहे. गुहागर तालुक्यात तर नमन पाहण्यासाठी लांबवरून भाविक येतात.
kokan mevaकोकणातल्या शिमगोत्सवाची वैशिष्टय सांगावी तेवढी थोडीच! त्यापैकी ‘नमन’ हा कलाप्रकार विशेष लोकप्रिय आहे. गुहागर तालुक्यात तर नमन पाहण्यासाठी लांबवरून भाविक येतात.
त्यातसुद्धा गुहागरमधल्या मोभार गावचं ‘नमन’ खास असतं. या नमनाची लोकप्रियता मुंबईपर्यंत पोहोचलीय. मुंबईतील साहित्य संघ मंदिरमध्येसुद्धा ते सादर झालंय.
मोभार हे गुहागर तालुक्याच्या टोकाशी जयगड खाडीवर वसलेलं  दुर्गम गाव. या गावाच्या खाडीपलीकडे सुरू होतो रत्नागिरी तालुका! तालुक्यात खाडीपलीकडे असलेल्या नरळेत लागलेला लाऊडस्पीकर मोभारात स्पष्ट ऐकू येतो इतकं हे अंतर जवळ आहे.
जयगड खाडीवर वसलेल्या या गावाचं रूपही देखणं आहे. गावाच्या सडयावरून दिसणारं खाडीचं नयनरम्य दृश्य डोळ्याचं पारणं फेडणारं असतं. सध्या रत्नागिरी व गुहागर तालुक्याला जोडणारा ‘राई-भातगाव’ पूल झालाय, तो याच गावाच्या सडयावर.
गावाचं पूर्वीचं नाव ‘पाचेरी सडा’! मात्र गावाला ‘मोभार’ नावाची पदवी मिळाल्याने त्याचा उल्लेख ‘मोभार’ असा केला जातो. मोभारचा शिमगा हा इतर गावांप्रमाणेच होळीपोर्णिमेपासून सुरू होतो. माडहोळीच्या आदल्या दिवशी ग्रामदेवतेला रूप लावतात आणि शिमगोत्सवाला ख-या अर्थाने सुरुवात होते.
गेल्या काही वर्षात मोभार बदललं असलं तरी पूर्वापार चालत आलेली नमन परंपरा इथे जपली आहे. मुंबई, पुण्यात असणारे चाकरमानी शिमग्यात मात्र अगदी न चुकता हजेरी लावून नमनातला आपला मान बजावतात. या नमनात दाखवण्यात येणारी सोंगं तर बघण्यासारखी असतात.
यातलं दशमुखी रावणाचं सोंग हे सर्वाच्याच आकर्षणाचा विषय असतं. इतकं की, गावात ज्या मानक-याकडे नमन असतं त्या ठिकाणी लहान पोराटोरांसह सगळे अगदी संध्याकाळपासून हजर असतात.
आज एकीकडे जग विस्तारत चाललं असताना आणि भौतिकतेकडे वळत असताना एखाद्या कलाप्रकाराबद्दलची ओढ आणि हौस इतक्या मोठया प्रमाणावर फक्त कोकणातच जोपासली जाऊ शकते.
kokan meva1पाणबुडी व काळकीदेवी ही गावची ग्रामदैवतं.  ग्रामदेवतेच्या नमनाचा शिक्का इथल्या काही ग्रामस्थांकडे पूर्वापार आहे. हा शिक्का म्हणजेच नमनाच्या वेळी घालायचा पोषाख! यात चांदी व सोन्याच्या दागिन्यांचा समावेश असतो. या पोषाखाला ‘झगे’ म्हणण्याची पद्धत आहे.
हे शिक्के ज्या मानक-याकडे असतात तो नमनाच्या वेळी न चुकता उपस्थित असतो. शिमगोत्सवात गावकर व मानकरी असलेले खोत यांच्याकडे नमन असतं. मोभारच्या खोतीचा मान रानडे घराण्याकडे आहे. तर गावकराचा मान पंडये आणि डिंगणकर यांच्याकडे आहे.
गावात शिमगोत्सवाव्यतिरिक्त लग्न, मुंज अशा समारंभप्रसंगीसुद्धा नमनाचा कार्यक्रम होतो. ज्या दिवशी नमन मानक-यांकडे असतं त्या दिवशी पालखी त्याच्याकडे वस्तीला असते.
संकासुराच्या खेळाने नमनाला सुरुवात होते. यानंतर गणपतीचं रूप आणून, त्याची आराधना करून मगच कार्यक्रम सुरू होतो. नमनात दोन मृदंग असतात. यात वग दाखवला जातो. तो दरवेळी प्रासंगिक प्रबोधनात्मक विषयावर आधारलेला असतो. मागे उभे असणारे पुढे दाखवण्यात येणा-या सोंगाची बतावणी करत असतात.
या कार्यक्रमात गण, गवळण, बुचडा, कोळीण, पारधी, सांबर, देवीच्या मानाचा घोडा, परधी, वाघ, रावणाची बहीण शुर्पणखा, राम, लक्ष्मण, रणवीर अशी अनेक प्रकारची सोंगं दाखवतात. ही सोंगं पूर्णपणे लाकडापासून तयार केलेली आहेत. विशेष म्हणजे गावातलेच एक कलाकार दिवंगत भागा सोमा गावडे यांनी ही सोंगं तयार केली आहेत.
पन्नास वर्षापूर्वी कोणतंही यंत्र उपलब्ध नसताना या कलाकाराने ही सोंगं तयार केली. दहातोंडी रावणाचं सोंगसुद्धा याच कलाकाराच्या हातचं. सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण असलेलं रूप म्हणजे दहातोंडी रावण.. या रावणाचं सोंग दाखवण्याची कला सगळ्यांनाच जमत नाही. मोजकेच कलाकार हे सोंग दाखवतात. या वगात रावणाचं राम-लक्ष्मणाबरोबर होणारं युद्धही दाखवलं जातं.
‘‘मोंभार गावीचे, देव सोमया सयांबा,
देव रोळोबा सयांबा,
मोंभार गावीचे देव पाणबुडी,
माय आसनी
देव काळकाई, माय आसनी’’
अशा ओव्या म्हटल्या जातात.
kokan meva2नमना वेळी केली जाणारी बतावणी, फाकी, ओव्या कुठेही लिखित स्वरूपात नाहीत. नमानात म्हटलं जाणारं काव्य अशुद्ध स्वरूपात असलं तरी त्याला एक प्रकारचा ठेका व गोडवा असल्याचं पाहायला मिळतं. नमनाची एक आठवण जुन्याजाणत्यांकडून सांगितली जाते.
मोभारचं नमन रत्नागिरीच्या जयगड किल्ल्यात गेलं होतं. किल्ल्याचा दरवाजा बाहेरून बंद झाला आणि नमनाचे  खेळे आत अडकले. मात्र, देवीची प्रार्थना करून मृदंगावर थाप मारताच दरवाजा उघडला. त्या वेळी इथल्या किल्लेदाराने गावाला तलवार बक्षीस दिली. बक्षिसाचा ऐतिहासिक ठेवा आजही गावाने जतन केला आहे.
नमन रात्री दहाच्या सुमारास उभं राहतं. कार्यक्रम संपायला पहाटेचे किमान पाच वाजतात. गावच्या जोगव्याने व आरतीने कार्यक्रमाची सांगता होते. या वेळी नवस केले जातात. याला ‘झग्यावर नवस लावणं’ असं म्हणतात. झग्यावर देवीला केलेल्या नवसाला देवी पावते, अशी श्रद्धा आहे.
गावाच्या श्रीपाणबुडीदेवीची मोठी आख्यायिका आहे. ती एका खारव्याला मासे पागताना जाळ्यात मिळाली. त्यामुळे तिची स्थापना केली गेली ती पाणबुडीदेवी या नावाने! पूर्वी  मोभार, पाचेरी, आंबेर व कोळवली यांचं एकच ग्रामदैवत होतं.
कालानुरूप त्याची विभागणी झाली आणि गाव वेगळं झालं. गावची पाणबुडी व काळकीवर नितांत श्रद्धा आहे. म्हणून अवघ्या महाराष्ट्रात श्री ‘पाणबुडी देवी’ गुहागर तालुक्यातील मोभार व कोळवली या दोन गावांमध्येच असल्याचं जाणकार सांगतात.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home