अस्तित्व शोधतेय गाडी घुंगराची बाबा गाडी घुंगराची!
जमाना ‘वाय फाय’चा आहे.
‘व्हॉट्सअॅपच्या’ जमान्यात सगळंच कसं जलद झालं आहे. संपर्कासाठी विविध
माध्यमे वाढण्याबरोबरच वाहतुकीची माध्यमेसुद्धा वाढली आहेत.

मालवाहक गाडयानी ‘घुंगराची गाडी’ म्हणजेच कोकणची एक ओळख सांगणा-या ‘बैलगाडीला’ कधीच मागे टाकले आहे.
पण म्हणून काय तिचे महत्त्व कमी झालेले
नाही. कणकवली व मालवणच्या आठवडा बाजारादिवशी परतीच्या मार्गावर हे खटारे
(बैलगाडी) आजही आपल्या दृष्टीस पडतात.
साधारणपणे तीस वर्षे मागे जर आपण वळून
पाहिले तर दळणवळणाच्या सोयी असणे तर दूरची गोष्ट; परंतु पक्का डांबरी रस्ता
सुद्धा कोकणातील ग्रामीण भागात नव्हता. दूरवर असलेल्या पाहुण्यांची खुशाली
घेण्यासाठी पोष्ट कार्यालयात जावे लागायचे. किंवा ट्रंक कॉल बुक करावा
लागायचा.
आता हातात मोबाईल आल्याने सारं कसं एकदम
सोप्प झालं आहे. वाहतुकीच्या बाबतीत विचार केल्यास ‘बैलगाडीच’ वाहतुकीचे
प्रभावी माध्यम होते. वाचकहो काळ बदलला, तांबडया रस्त्यांचे डांबरी रस्ते
झाले, यांत्रिक वाहने आली, सारं काही बदललं पण या बदलत्या काळात बैलगाडी
मात्र आपलं अस्तित्व टिकवून आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी शहराच्या आठवडा
बाजारात लाकडे वगैरे माल आजही बैलगाडीने घेऊन जात असल्याचे दिसून येते.
मालवण तालुक्यातील आचरा येथून चिंदर, त्रिंबक या गावात तर रेशनिंगचे धान्य
आजही गोडाऊनमधून बैलगाडीने नेलं जातं.
खरं कोकण अनुभवायचं असेल तर कोकणातील
एखाद्या शहराऐवजी गावातच फेरफटका मारणे उत्तम. माड पोफळीच्या बागा, नदी
किनारे, डोंगरक डे हे सारे काही तुम्ही अनुभवू शकता. बैलगाडी सुद्धा याच
कोकणची खासियत सांगणारे वाहन. पण जसा काळ बदलत गेला तशी बैलगाडी सुद्धा या
काळात मागे पडली.
साधारण ७०च्या आसपास याच बैलगाडीशिवाय
ग्रामीण भागात वाहतुकीचा अन्य पर्याय नव्हता. मालवण व कणकवलीचा विचार करता
मसुरे, वेरली, विरण, राठीवडे, हिवाळे येथील अनेक शेतकरी मालवणचा सोमवारचा
बाजार, कणकवलीच्या मंगळवारच्या आठवडा बाजारासाठी बाजाराच्या एक एक दिवस
अगोदर त्या त्या भागातून मिळणारे नारळ, केरसुण्या, भात, तांदूळ, ऊस,
कडधान्ये, लाकडे वगैरे घेऊन या शहरातल्या आठवडा बाजारामध्ये विक्री करीत
असत व पुन्हा मागे येताना गावातील व्यापा-यांचा किराणा माल घेऊन यायचे.
मालवण मार्गावरील प्रवास आडारीपर्यंत
रस्त्यावरून व नंतर होडीतून बैलगाडी मालवण किना-याला लावली जायची. तेव्हा
आताचा आडारी पूल नव्हता. कणकवली मार्गावर तर बेळणे नदीवर पूल नसल्याने
मालाने भरलेल्या बैलगाडया नदीच्या पात्रातूनच पलीकडे नेल्या जात असत. एकाच
वेळी २०-२० बैलगाडया एकापाठोपाठ जात असत. जणू काही कोकण रेल्वेचाच नजारा
भासावा.
सर्व बैलगाडीचालक एकत्र जात असल्याने
वन्यप्राणी तसेच लुटमारीपासून संरक्षण मिळायचे. कणकवलीकडे जाणा-या
बैलगाडीवाल्यांची विश्रांतीची ठिकाणेसुद्धा ठरलेली असायची. प्रथम बेळणे
येथे जेवण व नंतर फणसवाडीत रात्रीचा मुक्काम.
अगदी सकाळी बाजार भरण्यापूर्वी ही
बैलगाडयांची रांग बाजारात प्रवेशकर्ती व्हायची. वाटेतल्या प्रवासात
एकमेकांना बाजू मारणे (ओव्हरटेक करणे) यासाठी या बैलगाडीवाल्यांमध्ये
अहमिका चालायची.
पण काळ सरकत गेला तशी वाहतुकीची माध्यमे
वाढली. प्रत्येक गावात मालवाहक टेम्पो आले व बैलगाडी मागे पडली.
शेतक-यांच्या घरी पॉवर टिलर आल्याने बैलजोडी बाळगणे अव्यवहार्य वाटू
लागल्याने याचा परिणाम बैलगाडी वाहतूक बंद पडण्यावर झाला. पण म्हणून काय
तिचे महत्त्व कमी झालेले नाही.
कणकवली व मालवणच्या आठवडा बाजारादिवशी
परतीच्या मार्गावर हे खटारे दृष्टीस पडतात. जलद वाहतुकीच्या कितीही सुविधा
निर्माण झाल्या तरी ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली बैलगाडी, गाडीच्या
बैलांच्या घुंगरांचा आवाज आजही टिकवून आहे. हेही नसे थोडके..
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home