गाव घेतो साप्ताहिक सुट्टी
शेतक-याची दिवस-रात्र
निसर्गावरच अवलंबून असते. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत त्याला घडय़ाळी
तासावरच अवलंबून राहता येत नाही. त्याचे काम कधी संपतच नाही. हंगाम संपला
की काम बदलते एवढेच. शेतक-याची जशी अवस्था तशी त्याच्या कुटुंबाचीही. यात
मुके प्राणीही शेतक-याबरोबर फिरत असतात. आज यांत्रिकी शेतीच्या पद्धतीत
बैलांचे महत्त्व कमी होऊ लागले आहे. पण एकेकाळी शेतक-याचा उजवा हात म्हणून
बैल जोडीच शेतीचा भार सांभाळायची. या जीवांना एक दिवस विश्रांती मिळावी
म्हणून ग्रामदेवतेच्या धाकाने गाव साप्ताहिक सुट्टी घेऊ लागला आणि
प्रत्येकाला आपल्या नियमित कामापासून थोडीशी उसंत मिळू लागली.
बारा
बलुतेदार आणि ग्रामदैवत या संकल्पनेवर गावाची घडी बसलेली.. तर अलीकडे
गावाचा चेहरा आधुनिक होऊ लागला आहे. कुंभाराने पिढय़ान् पिढय़ाचा धंदा बाजूला
केला आहे. परिटानेही व्यवसाय थांबविला आहे. तेलीवाडीत हमखास तेलाचा घाणा
असायचा, कालौघात तोही बंद झाला.

व्यवसायावरून जाती पाहण्याचे दिवस संपले.
शेतीचे अर्थकारण बदलले आणि गावाची घडी विस्कटून गेली. गावाची घडी पुन्हा
बसविण्याचे विविध माध्यमातून हरतऱ्हेने प्रयत्न चालू आहेत. बलुतेदारीची
परंपरा बदलली. गावात जास्त ती नोकरशाही आली. नोकरशाही मंडळींचे गणित
घडय़ाळावरच चाललेले.. यामुळे शहरीकरणाचे वारे गावातही घुसले. ब-याच गावातील
एक पिढीच शहरात स्थिरावली. त्याची पुढची पिढी शहरातच मोठी झाली, गावाला
रामराम केला. असो..
नोकरशाही मंडळींना सुट्टीचे मोठे अप्रुप.
सणवारात सुट्टी असली की मग गावाकडची आठवण येतेच. आठवडय़ाला सुट्टी त्यांना
हवीच असते. ब्रिटिश आमदनीपासून सुट्टीची ही परंपरा पुढे हक्क बनली. कंपनी
कायद्याप्रमाणे शासकीय कामकाज प्रक्रियेत सुट्टीलाही महत्त्व आले.
सुट्टय़ांची संख्याही वाढली. हे सुट्टी पुराण फार मोठे आहे. सुट्टी ही
माणसाला हवीच. त्याच्या दैनंदिनीत थोडा तरी बदल व्हायला हवा म्हणजे
व्यक्तिमत्त्व विकासाला हातभार लागतो आणि तो मोठय़ा क्षमतेने नियोजित काम
पूर्ण करू शकतो. हा निसर्ग नियम आहे. ही ऊर्जा मिळण्यासाठी आवश्यक असणारा
कामातला बदल त्याला आपलासा वाटतो. सुट्टी असली तरी मानव प्राणी स्वस्त बसत
नाही. त्याचे काही ना काही काम सुरू असते.
नोकरशाहीची दैनंदिनी सर्वसाधारण अशी असली
तरी शेतक-याची दिवस-रात्र ही निसर्गावरच अवलंबून असते. सूर्योदयापासून
सूर्यास्तापर्यंत त्याला घडय़ाळी तासावरच अवलंबून राहता येत नाही. त्याचे
काम कधी संपतच नाही. हंगाम संपला की काम बदलते एवढेच. शेतक-याची जशी अवस्था
तशी त्याच्या कुटुंबाचीही. त्याला हौसमजा काय ती शेतातच करावी लागते.
रहाटगाडय़ातून सवड मिळतेच असे नाही. अनेक गावांमध्ये शेतक-यांची हिच अवस्था.
या रहाटगाडय़ापासून अनेक पिढय़ा दूर होत आहेत. शेती ओस पडत आहे.
एकीकडे असे चित्र असताना, साप्ताहिक
सुट्टी शेतक-यानेही घ्यावी, सण-उत्सवाला तो जसे कामकाज थांबवितो तसे त्याने
आठवडय़ाचा एक दिवस शेतीची कामे थांबवावी असा दंडकच काही गावांनी घालून
घेतला आहे. कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द हे गावही असेच. नोकरशाहीप्रमाणे
हरकुळ खुर्द गावच रविवारची साप्ताहिक सुट्टी घेते. या दिवशी शेतीची कामे
बंद असतात. शेतकरी अन्य कामाला मोकळा होतो. ही परंपरा ग्रामदेवतेच्या
धोरणाप्रमाणे सुरू आहे. गाववासीयांनी प्रत्येक आठवडय़ाला ग्रामदेवतेच्या
मंदिरात पोहोचावे, एकमेकांची सुख-दु:खे समजावून घ्यावीत म्हणून
ग्रामदेवतेने हे आदेश दिल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावची ग्रामदेवता,
पावणादेवीच्या मंदिरात दर रविवारची दुपार हा जनता दरबाराचा असतो. देवीच्या
साक्षीने अनेक कुटुंबातील समस्या या दरबारात उपस्थित केल्या जातात.
देवीच्या तरंगस्वारीला प्रश्नोत्तरे केली जातात. कधीकधी अज्ञात शक्तीचाही
बिमोड करण्याचा प्रयत्न होतो. गाव आपले धोरणात्मक निर्णयही याच दिवशी घेतो.
साप्ताहिक सुट्टी घेण्याच्या प्रथेमुळे शेताच्या कामकाजाव्यतिरिक्त काही
करायचे असल्यास शेतकरी हाच दिवस निश्चित करतो. एरव्ही शेतकरी आपण राबत
असताना बैलांनाही फिरवत असतो. एक दिवस तरी त्यांना विश्रांती मिळावी, अशी
या मागची भूमिका आहे, असे काही जण सांगतात.
हरकुळ खुर्द गावाप्रमाणेच सिंधुदुर्ग
जिल्हय़ाच्या सीमेवर असणा-या मोसम गावातही रविवारी कामकाजाला सुट्टी दिली
जाते. या दिवशी सारे गाव कसे शांत, निपचित असते. हंगाम कोणताही असो,
शेतीची कामे बंद ठेवली जातात. विशेष म्हणजे मोसम गावात हिंदू, मुस्लीम
दोन्ही धर्मीय लोक मोठय़ा संख्येने आहेत. या गावचे ग्रामदैवत रवळनाथासमोर
सारे जण नतमस्तक होतात. ही परंपरा कधीपासून सुरू झाली, याबाबत मोसम गावची
मंडळी निश्चित माहिती देऊ शकत नाहीत. परंतु, पिढय़ान् पिढय़ा गाव रविवारची
सुट्टी घेतो असे ज्येष्ठ मंडळी सांगतात. एक दिवस सुट्टी मिळाल्याने शेती
व्यतिरिक्त अन्य कामे करता येतात, घराबाहेर जाता येते, असे ग्रामस्थ
सांगतात. मोसम गावात रविवारचाच धार्मिक कार्यक्रम पार पडतो.
साप्ताहिक सुट्टीसाठी या गावांनी रविवारच
का निवडला. या मागची कथाही रंजक आहे. ग्रामदेवतेच्या पाषाणाला
कौलप्रसादाच्या माध्यमातून दर आठवडय़ाला कोणत्या दिवशी आपल्या दरबारात हजर
व्हावे? असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारला. यावेळी कोणत्याही वाराबाबत कौल
देण्यास देवतेने नकार दिला. हरप्रकारे विनंती करण्यात आली. पण कौल होईनाच.
यावेळी गावानेच आपल्या मर्जीने दिवस ठरवावा का? असा विचारताच देवाने उजवा
कौल दिला. मग गाववासीय एकत्र जमले. कुठल्या दिवशी सर्वानी मंदिरात एकत्र
जमावे याविषयी मतैक्य होईना. शेवटी एक आठवडय़ाची मुदत गाववासीयांनी ठरवली.
मंदिरात कोणत्या दिवशी अधिकाधिक मंडळी येतात तो दिवस एकत्र येण्याचा असेल
असे देवाच्या साक्षीने निश्चित करण्यात आले आणि रविवार हा दिवस एकत्र
येण्याचा ठरला. या दिवशी कुणीही शेतीविषयक कामे करत नाही. गावात पूर्वी
अनावधानाने रविवारची कामे शेतकरी करायचा तर योगायोग म्हणावा किंवा
दुर्दैवाने त्याला कोणत्या ना कोणत्या अतक्र्य गोष्टींची जाणीव व्हायला
लागली. गावाने सुट्टी घेतली असतानाही कुणी शेतक-याने आपल्या शेतात रविवारचे
काम केलेच तर त्याला पुढे पुन्हा डबल काम करावे लागते. कसली ना कसली
आपत्ती येऊन त्याच्या शेतीचे नुकसान होते, असा अनेकांनी अनुभव घेतला. काही
शेतक-यांनी पावसाळी हंगामात लावणीची कामे रविवारीही सुरूच ठेवली.
परभागातून कामगार आणले असल्यामुळे लवकर
काम आटोपते घ्यावे, असा त्यांचा प्रयत्न होता. परंतु त्याच दिवशी सायंकाळी
मोठा पाऊस पडून लावलेली शेतीच वाहून गेली. पुढच्या काही दिवसांत त्यांना
पुन्हा शेती उभी करावी लागली. काही ठिकाणी रविवारी लावलेली शेती करपून
गेली. काही शेती रोगाच्या भक्ष्यस्थानी पडली. यामुळे कोणताही शेतकरी
रविवारी काम करणे नको रे बाबा असे या गावात म्हणतो. हरकुळ खुर्द आणि मोसम
गावात ज्याप्रमाणे रविवारची साप्ताहिक सुट्टी घेतली जाते त्याप्रमाणे
कणकवली तालुक्यातीलच कोंडये आणि घोणसरी गावात सोमवारची सुट्टी घेतली जाते.
याप्रमाणे अन्य गावातही असे वार निश्चित करण्यात आले आहेत. ग्रामदेवतेचे
आदेश हा गावात अंतिम मानला जातो. या ग्रामदेवतेच्या धाकाला कुणी अंधश्रद्धा
म्हणो नाही तर आणखी काही. एक मात्र खरे की सामाजिक स्वास्थ्यासाठी गावची
घडी बसविणा-या पूर्वजांनी केलेला प्रयत्न हा दूरदृष्टीचा आणि समतोल
साधण्यासाठीच आहे. जसा आठवडी बाजार अनेक गावांचा निश्चित आहे तसाच गाव कधी
बंद ठेवायचा? हेही गाववासीयांच्या मतानुसार निश्चित केले जाते. तळ
कोकणातल्या सुट्टी घेणारी गावे म्हणजे एक स्वतंत्र व्यवस्था असते, असे
म्हणायला
हरकत नाही.
हरकत नाही.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home