सह्याद्रीचा पालवीत्सव
निसर्गाची भूल काय असते. हे
समजून घेण्यासाठी थेट सह्याद्रीतच फिरायला हवे असे काही नाही. कारण त्याचा
सांगावा अगदी घराच्या अंगणातल्या अथवा परसदारातल्या राईपर्यंत पोहोचलेला
असतो. तुम्हाला गंमत वाटेल, पण तो कुणाला विसरत नाही. अगदी
बोन्सायलासुद्धा! कुंडलीतले इवलेसे झाडसुद्धा त्याच्या सांगाव्यानिशी
मोहरून जाते. त्याच्या या पर्वापुढे सह्याद्रीची काय गाथा सांगावी.?येथे तर
पालवीत्सव बहरतो. रानवाटा भारून जातात. शिशिरात निष्पर्ण होऊन योगी
असल्याप्रमाणे विरक्ती घेतलेली ही निसर्गसंपदा आपल्या लाल, चुटूकदार,
पोपटी, पिवळ्या पानांनी साद घालू लागते. हा पालवीत्सव पुढचे पंधरा दिवसच
टिकेल आणि नंतर मग फुलांचा बहर वाढेल.
प्रत्येक
नवा सूर्य आपल्याला नवं काहीतरी देत असतो.?निसर्ग तर सारखा बोलत असतो, रंग
बदलत असतो. परवापर्यंत निष्पर्ण झालेली झाडे आता पालवींने बहरली आहेत.
फाल्गुन सुरू झाला आणि हे रूप अधिकच लोभसवाणे झाले. फाल्गुनने वसंतागमनाची
द्वाही दिली आणि कोकिळेलाही कंठ फुटला.?उषेची लाली येतानाच तिची भूपाळी
सुरू झाली. थंडीने आपले धुक्यांचे पदर दूर केले आणि कळ्यांनी फुलं होण्याची
धडपड सुरू केली. नवा गंध नाकापर्यंत पोहोचला. सहज म्हणून शेतातून भ्रमंती
केली आणि लक्षात आले. सह्याद्री नखशिखांत फुलांनी बहरला आहे. त्याला
सौंदर्याचे वेध लागले आहेत. आंबा, काजूचा मोहर आपली मेजवानी तयार होते आहे,
असे सांगू लागला असे वाटत होते.

निसर्गाने प्रत्येक सजीवाला भाषा दिलेली
आहे. जशी हाकेच्या अंतरावर भाषेचे थोडेफार का होईना हेल बदलतात अगदी तस्सेच
प्रत्येक ऋतूत निसर्गाचीही भाषा बदलते. त्याच्या अवतीभोवती वावरणा-या
जीवांची भाषा बदलते. आसमंत हिरव्या पालवीने, फुलांनी बहरलेला असतो. हवेत एक
अनामिक सुगंध असतो. याच वेळी कुहूऽऽ कुहू असा मंजुळ स्वर कोकीळ गाऊ
लागतो. ही नादाची, स्वरांची भाषा.. पक्षी जगाची!
कडकडीत उन्हातही निष्पर्ण झुडूप पिवळ्या
पानांच्या घोसांनी बहरते. ही रंगाची भाषा बहाव्याची! फुलांची, पालवीची भाषा
कशी तरल व प्रसन्न असते. संवेदनशील मनाला थेट भिडणारी.. फुलांच्या भाषेचा
मासला विचारात घेताना या बहुपेडी जगात आपण मंत्रमुग्ध होतो.
पळस, काटेसावर, साग, निलगिरी अर्जुन,
सारडा, किंजळ, अंजन, कदंब, चांदवड अशी किती नावे सांगावीत.. हे अनेक वृक्ष
शिशिराची साद ऐकतात, त्याच्या भयाने ध्यानस्थ होतात. पण आंबा, काजू, बकुळी,
गुलमोहर.. यांसारखे अनेक त्याचे ऐकत नाहीत. पानगळ करणे त्यांना मानवणारे
नसते. पण एकदा का वसतांची चाहुल लागली की, त्यांचा रंग बदलून जातो. हिरवाईत
अनेक रंगांचे मिश्रण दिसू लागते. तांबूस लालसर छटा चैत्राचा सांगावा सांगू
लागते. वसंत ऋतू म्हटल्यावर त्याची सांगड बहरलेले आम्रतरू, फुललेले
पलाशवृक्ष, शीतल वारे, कोकीळगान, रंगोत्सव व गंधोत्सवाशी घातली जाते.
शिवारीचा शृंगार जवळपास पूर्ण होतो.
गुलमोहर पिवळ्या सडय़ांनी बहरतो. ताम्हणाची गुलाबी फुले अधिकच रंगतदार
वाटतात. कोराटीन पांढ-या, पिवळ्या, गुलाबी फुलांनी सुकुमार होते.
करंवदांच्या डहाळीवर मोगरा फुलतो.? बाभळीही नववधूसारखी सजून जाते. एरव्ही
काटय़ातच धन्यता मानणारा निवडुंगही आपल्या चुटूक फुलांनी चैत्राचे स्वागत
करतो. कलासक्तासाठी वसंतोत्सव म्हणजे साक्षात पर्वणीच!
एखाद्याच्या वेशभूषेवरून आपण त्याचे
व्यक्तिमत्त्व समजून घेत असतो. कधी कधी आवडनिवड कशी आहे यावर स्वभाव गुण
लक्षात घेतले जातात. सह्याद्रीत वावरणारी अनेक मंडळी या फुला-पानांच्या
सौंदर्यावरून भविष्यकाळाचा वेध घेतात. बहावाचा सुवर्ण झुंबर किती लांब आहे.
त्याचा रंग किती बदलणार आहे, यावरून पावसाचा ठोकताळा मांडला जातो.
पुराणातली वांगी पुराणात असे आपण कितीही म्हटले तरी निसर्ग आणि काही
ठोकताळे हे लक्षात घेता आपले पूर्वज खरोखरच हुशार होते. हे मनाला बजावावे
लागते.
वसंत हा कामदेवाचा पुत्र! रूप व
सौंदर्याचा साक्षात आविष्कार असलेल्या कामदेवाच्या घरी पुत्रजन्म झाल्यावर
सारा निसर्ग बहरून येतो. वृक्ष त्याच्यासाठी नव्या पालवीचा पाळणा बांधतात.
पुष्प-कुसुमे त्याच्यासाठी नव्या वस्त्रांची भेट घेऊन येतात. शीतल-सुगंधित
वारा त्याला झोका देतो आणि कोकीळ पक्षी आपल्या सुमधुर स्वरांनी त्याचे
मनोरंजन करतो. असा हा सृजनोत्सव! म्हणूनच बहुधा वसंताला ऋतुराज म्हणत
असावेत! त्याच्यावर आधारित संगीत राग ‘बसंत बहार’ या नवचैतन्याचीच प्रचिती
देतो.
सदान्कदा चिवचिवाटात समाधान मानणा-या
चिमण्यांना याच दिवसांत कंठ फुटतो. चिकाटय़ांचा कहर सुरू होतो. पक्षी
सावरीच्याही प्रेमात याच दिवसांत असतात. पळसाची अशीच कथा.. गर्द लाल आणि
बाहेरून गुलाबीसर असलेल्या पांगा-याच्या फुलात मध असतो. तो प्राशन
करण्यासाठी मधमाश्या, भुंगे आणि तत्सम जीव आकर्षित होतात. दयाळ, भारद्वाज,
सातभाई, मैना, चिकाटी, राघू, कावळे, हरियाळ असे अनेक पक्षी या झाडांवर
उतरतात. २४ तास तिच्या भोवतीच ते रुंजी घालत असतात.?या दिवसात पळसवनात गेले
की, वाटते लाल रंगाचा सरोवर आपण पाहतो आहोत. त्याची फुले दिसायला आकर्षित
असली तरी आपल्या शिवारात फुलू नये असे अनेक शेतक-यांना वाटते, कारण जमिनीचा
कस कमी झाला की पळसाचे प्रमाण वाढते. निकृष्ट जमिनीचे ते प्रतीक समजण्याचा
प्रघात आहे.
प्रत्येक दिवस जसा नवा वाटतो. तशी
आपल्यातला अनुभवही नवा असतो. नवे काहीतरी समजलेले असते.?बघण्याची दृष्टी
बदललेली असते. काहीतरी साक्षात्कार झाल्याप्रमाणे शुश्क पडलेल्या
फांद्यांवरचे इवलेसे फूल आपल्याला सौंदर्याची दृष्टी देते. मनातली सौंदर्य
कलासक्ती जागृत करते आणि मग मिळणारा आनंद नवी ऊर्जा बहाल करतो. आमराईच्या
हिरवाईतून हिरवे केशरी आंबे डोकावू लागतात. कै-यांचे आगमन झालेले असते.
काजूचे गर तयार झाले आहेत. इवलीशी गांधारी शेकडो फुलांचा गुच्छ दाखल होते
ती याच दिवसात.
पुढचे पाच महिने तिचे सौंदर्य उजळतच
जाते. प्रितीच्या खुणांचा गुलमोहर अधिकच आनंदित होतो. रुईही फुलून जाते.
ही ऊर्मी निसर्गाकडे येते कुठून? तळपत्या उन्हातही ही त्याची शक्ती कशी
दशहत्तींचे बळ असल्याप्रमाणे पुढे येते. याची उत्तरे निसर्गाकडून जेव्हा
मिळवू लागतो तेव्हा समजते आपण मानव किती शुद्र आहोत. निसर्ग अवलीया जादूगार
आहे.
आणि मग सुरेश भटांच्या ओळी ओठांवर येतात..
‘नको, चर्चा नको येथे उन्हाची,
फुलांची वेळ ही संभाषणाची!’
चैत्रगंध!फुलांची वेळ ही संभाषणाची!’
पाखरे माणसांसारखी भडाभडा..
कधीही कुठेही आणि कशीही बोलत नाहीत.
पण मुकीही नसतात. त्यांचा चिवचिवाट अनेक अर्थ सांगत असतो..
गंध फुलवणारी कळी अणि आसमंत न्याहाळणारे पक्षी यांचे नाते याच हंगामात अधिक घट्ट होते.
कोवळय़ा पानांना कटीखांद्यावर सारेच पुलकीत होतात.
डेरेदार आम्रवृक्षच नाहीतर अख्खी राईच सुगंधाचे वेगळे विश्व उभे करते.
पिसाटवाराही येथे थबकतो. रानवाटा गंधभारीत होतात. निसर्गाचा चमत्कार दिसू लागतो.
एकेका झाडावर विविधरंगी छटा हिरव्या पानांमध्ये लपलेली गुलाबी पालवी..
रक्ताळलेल्या फांद्या आणि पिवळ्या रंगाची फुले! हे रंग कोणी उधळले असतील.?
वर्षानुवर्षे या रंगांच्या छटा बदलत कशा नाहीत, असे बालप्रश्न मनात रुंजी घालतात.
मनातल्या जाणिवांना रसरसणारे चैतन्य किती घेऊ असे होते.
मग समजते हाच तो चैत्रगंध!
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home