सहय़ाद्रीच्या घरी शिवरात्र
सहय़ाद्रीच्या पर्वतरांगामध्ये
श्री जोम मल्लिकार्जुन, चौकेश्वर, मोळेश्वर, गाळेश्वर, घृणेश्वर, धारेश्वर
आणि तळेश्वर ही प्रसिद्ध सप्त शिवालयं वसली आहेत.

महाशिवरात्रीचे वारे आता सहय़ाद्रीच्या
कुशीतही घुमू लागले आहेत. या वा-यांनी आमंत्रण आणलंय सहय़ाद्रीत वसलेल्या
सप्त शिवालयांपैकी श्रीजोम मल्लिकार्जुन मंदिराच्या यात्रेचं..
महाशिवरात्रीच्या मध्यरात्री सहय़ाद्रीच्या पर्वतशिखरावर ही यात्रा साकारणार
आहे..
सहय़ाद्रीच्या माथ्यावरची श्रीजोम
मल्लिकार्जुन, चौकेश्वर, मोळेश्वर, गाळेश्वर, घृणेश्वर, धारेश्वर आणि
तळेश्वर ही सप्त शिवालयं प्रसिद्ध आहेत. ही शिवालयं सहय़ाद्रीच्या
पर्वतरांगामध्ये वसली आहेत. त्यातलं श्रीजोम मल्लिकार्जुन मंदिर हे शिवालय
सहय़ाद्रीच्या पर्वत क्षेत्रात विराजमान आहे. या शिवालयांचं वैशिष्टय़ं
म्हणजे याचं बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचे असल्याचं आढळून येतं. दरवर्षी
महाशिवरात्रीला श्रीजोम मल्लिकार्जुन येथे भव्यदिव्य यात्रा भरते. या वेळी
सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, ठाणे, मुंबई, रत्नागिरी व
सिंधुदुर्ग इथून शिवभक्त मोठय़ा प्रमाणावर हजेरी लावतात. तसेच यात्रेसाठी
ब-याच गावांतून दिंडय़ाही येतात. या वेळी रात्रभर भजन-कीर्तन उत्साहात
होतात. अनेक देवतांच्या पालख्यासुद्धा या वेळी मल्लिकार्जुनाच्या भेटीला
येतात.
शिवरात्रीच्या या कार्यक्रमात इथे येणा-या
पाहुण्यांचे मानाचे विडे काढण्याची प्रथा आहे. शिवरात्रीच्या रात्री इथं
येणा-या भाविकांसाठी विनामूल्य अन्नदानाचा कार्यक्रम सलग दोन दिवस चालू
असतो. खरं तर हा अत्यंत दुर्गम भाग असल्यामुळे इथे भाविकांची व्यवस्था
करण्यात देवस्थान मंडळांची कसोटी लागते. असं असलं तरीही या क्षेत्री
येणा-या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला कारणीभूत आहे इथला
निसर्ग..
इथे सहय़ाद्रीच्या उंचच उंच पर्वतरांगा साद
घालतात. त्यातलं सगळ्यात उंच शिखर हे ४२०० फूट उंचीचं असल्यामुळे या
शिखराला पर्वत म्हटलं जातं. आणि याच पर्वतावर श्रीजोम मल्लिकार्जुनाचं
मंदिर आहे. हिंदू धर्मीयांची भावनोत्कट श्रद्धा आणि त्याच्या जोडीला
शिवरायांच्या हिंदवी पराक्रमाच्या अनेक घटनांचे साक्षीदार असलेलं हे
निसर्गरम्य स्थळ धार्मिक स्थळाबरोबरच एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणूनसुध्दा
आता विकसित होतंय..
काशी, बद्रीनाथ, द्वारका, रामेश्वर ही
सर्वच तीर्थक्षेत्रे आहेत. पण निवृत्तीनाथांना बोध झाला तो मात्र,
त्रिंबकेश्वरच्या एका गुहेत! त्या बोधामुळे आज सगळ्या विश्वाचं कल्याण
झालंय.. त्याचप्रमाणे सहय़ाद्रीच्या पर्वतरांगांमधील एका शिखरावरील श्रीजोम
मल्लिकार्जुनाचं स्थान एकांतात आहे. आत्मचिंतन करण्यासाठी ही एक रम्य जागा
आहे. हे देवस्थान सातारा जिल्हय़ातील जावळी तालुक्यात मोडत असलं तरी तिथे
जाण्यासाठी रत्नागिरी जिल्हय़ातल्या खेडहून रस्ता आणि सुविधा आहेत. या
ठिकाणी जाताना निसर्गरम्य रघुवीर घाट पाहताना डोळे तृप्त होतात. या
मल्लिकार्जुन शिवालय स्थळी अगस्ती मुनी आणि लोपामुद्रा यांनी तपश्र्चर्या
केली आणि याच ठिकाणी समाधी घेतली, असे सांगितले जाते.
श्रीजोम मल्लिकार्जुन शिवालय मंदिरात
जाण्यासाठी खेडहून खोपीला जावे लागते. तिथे गेल्यानंतर रघुवीर घाटातून या
घाटमाथ्यावर गेल्यानंतर शिंदी हे गाव लागते. शिंदी इथे आपले वाहन सोडून
तिथून पर्वत मंदिराकडे जाण्यासाठी डोंगराळ भागातून पाऊलवाट करण्यात आली
आहे. त्या दिशेने जात असता मार्ग फलकही लावण्यात आले आहेत. इथून जाताना
घनदाट अरण्य परिसरातून जावे लागते. वाटेत खळाळणारे झरे दृष्टीस पडतात.
या क्षेत्राचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे
मंदिराच्या जवळपास डोंगरमाथ्यावर पाच ते सहा ठिकाणी बारमाही वाहणारे
पाण्याचे झरे आहेत. इथे प्राचीन काळी खोदलेली सहा-सात फूट पाण्याने भरलेली
खोल दोन कुंडे आहेत. त्या ठिकाणी स्नानाची सोय केलेली आहे. या ठिकाणाहून
सूर्यास्तची मजा औरच आहे. जय शंभोऽऽच्या झंकारात हे सारे अनुभवण्यासाठी या
भागात पोहोचायलाच हवे.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home