Monday, June 1, 2015

गाव झाले म्हातारे..

गाव बदलले हे फार नंतर. पहिल्यांदा शेती बदलली, नंतर चावडी बदलली. हळूहळू गावातील माणसे बदलली. या सर्व कालचक्रात गावाचे गावपण केव्हा संपले हे समजलेच नाही. गावाच्या एकूणच रचनेमध्ये भौगोलिकदृष्टय़ा आता अनेक बदल झाले आहेत. नवे प्रयोग गावात होत आहेत. पण हा काही अपवाद सोडला तर एकूणच गाव म्हातारे झाले आहे.
KOKAN5कालचक्र सातत्याने फिरतच राहणार आहे. कुणी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तर तो फेकला जाईल. चक्र फिरतच राहील. कालची गावातील लगबग आज दिसत नाही. सकाळच्या ओव्या आज कानावर येत नाहीत. भूपाळीही जवळपास बंद झालीय. सडा समार्जनात आता शेणाचे शिंपण अस्तंगत झाले. घरांनी आपली रूपे बदलली. काही घरे मुकी झाली तर काही घरांची अवस्था बिकट झालीय. शेताचेही रूप बदलले. पूर्वी डोंगराच्या कापांवर रमणारी नाचण्याची शेती आज गावातून हद्दपार झाली. बरीच शेती ‘पड’ पडली आहे. शेताच्या परिसरात मनसोक्त चरणारी गाई-गुरे गावातून कमी होऊ लागली. त्यांची जागा यंत्रांनी घेतलीय.
आता शेण सारवण्याची गरजच उरलेली नाही. त्याची जागा सदाबहार टाईल्सने घेतली आहे. चकचकीत, गुळगुळीत जमिनीवर पाऊल ठेवावे कसे? असा अनेकांसमोर प्रश्न. चालतानाही पडण्याची भीती. आज खेड्यातल्या घरांचे हे दृश्य! आमचं गाव बदललंय. गावाचं गावपण बदललंय, माणसे बदलली आणि माणसांची वृत्तीही बदलली. आताच्या घरांना ‘सदर’च नाही. कारण सदरेवर यायला कुणाला सवड नाही. बाल्कनी असते नावापुरती. अंगण असतं बापुडवाणे, गजबजलेले गाव आता दिसत नाही. गावाकडची घरे कशी सुनसान झाली आहेत. जगण्याच्या लढाईत आणि नवतेच्या शोधात गावं गावपण विसरू लागली आहेत. आता कोकणची छबी पूर्णत: बदलली आहे. कालची घरे आज नाहीत. चौसोपी वाड्यांची जागा आता स्लॅबच्या बंगल्याने घेतली आहे. नळय़ांची घरे गायब झाले. कौलारू घरे थोडीफार आहेत. उर्वरित छोट्या-छोट्या घरांच्या छप्परावर पत्र्यांची सावली पसरली आहे. काही गावं अशी आहेत तर काही गावांनी आपले रूप बदलले आहे. चित्रपटात कोकणातील कौलारू घरांची एक वस्ती आमच्या मित्राला शूट करायची होती. त्यासाठी त्याला चौसोपी घर हवे होते. त्यांनी अनेक गावे पालथी घातली. पण त्याला मनासारखे घर सापडेना. झाले असे होते की कोकण बदलले आहे, याची प्रकर्षाने यावेळी जाणीव झाली. कारण असा एकही गाव नाही ज्या गावातील घरांची रचना बदललेली नाही. नळय़ांचे वाडे आता इतिहासजमा झाले आहेत. कौलारू घरे झपाट्याने कमी होत आहेत. गावचे गावपण बदलत असल्याचे हे चित्र आहे.  कोकणचे जसे चित्र पूर्वी रंगवले जायचे तशी घरे आता राहिलेली नाहीत. प्रत्येक पिढीला बदल हवा असतो. आपल्या निवासस्थानात आणि कामातही. याचेच प्रत्यंतर कोकणातही येत आहे. शहरी संस्कृती आता गावात बाळसे धरू लागली आहे. काही वर्षापूर्वीची सडासंमार्जनात व्यस्त असणारी घरे आता कुलूपबंद झाली आहेत. घरातील तरुण माणसे कामाच्या व्यापात अन्यत्र रवाना झाली. परिणामी घरात असणा-या ज्येष्ठ मंडळींना एकूणच घराचे व्यवस्थापन राखणे शक्य नसल्याने घरांची रचना सोयीनुसार बदलण्यात आली. आता घरादारात सारवण करणे शक्य होत नाही. गाई-वासरे गोठय़ात उरलेली नाहीत. आणि महत्त्वाचे म्हणजे सारवण करण्यासाठी राबते हातही नाहीत. आजच्या पिढीला शेणात हात घालणे शक्यही नाही. त्यांच्यासमोर अनेक व्याप असतात. एक मात्र खरे की, आधीच सहकाराच्या नावाने बोंबाबोंब असणा-या कोकणात माणसे कमी झाली. कामाच्या दिशा बदलल्या. तशी गावातील वर्तुळे बदलली, रहाटी बदलली, परंपरांची तीव्रताही कमी झाली. पूर्वीसारखा आता गावच्या उत्सवात जोश राहिलेला नाही.
सर्वाच्या सहकार्याने राबविल्या जाणा-या परंपरा एक प्रथा म्हणून जपल्या जातात. परंतु, त्यातील आनंद आता कमी होऊ लागला आहे. तरुण मुले गावाला नवी ‘जान’ आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्वी उन्हाळी-पावसाळी बहरणारी शेती आता ब-याच अंशी कमी झाली आहे. शेतातली हिरवळ रोडावली आहे. त्या दिवशी पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकारी सांगत होते, कोकणाला सिंचनाचा बॅकलॉग आहे, हे मान्य. परंतु, आहे त्या पाटबंधा-यांवरचे सिंचन क्षेत्र झपाट्याने कमी होताना दिसते आहे.
लोकांना शेतीमध्ये उत्सुकता राहिलेली नाही. हे सर्व ऐकताना डोळय़ासमोर आपला गाव येतो. घरट्यातून पिल्ले उडाल्यानंतर पुन्हा कधीतरी पिल्ले घराकडे परततीलच या विश्वासाने मायभूमीत राहणारी ज्येष्ठ मंडळी दिसतात. तरुणांचा शोध गावात घेता येत नाही. कालचे कोकण आठवायचे तर नव्या पिढीला असं काही गावात होते हेच माहीत नाही, कारण मधल्या काही वर्षात झपाट्याने कोकणने कात टाकली. मधल्या काळात डिजिटल युगात जमिनीचे भाव बदलले, कोकणातील व्यवसाय बदलले. पर्यटनाची पंढरी गजबजून गेली. आणि कोकणातील ग्रामसंस्कृतीच्या ग्रामीण ढंगाला पुन्हा नवे दिवस यायला लागले. परंतु मधल्या काही उदासीन चक्रात गावांची रयाच बदलून गेली आहे.
घनगर्द देवरायांमध्ये असणा-या ग्रामदेवतांच्या मंदिरांचा आता लखलखीत अशा शहाबादित फर्शीत जिर्णोद्धार होऊ लागला आहे. काळाबरोबर मंदिरातील शांतीने प्रस्थान हलविले. सताड उघडी असणारी मंदिरे आता कडीकुलपात बंद होऊ लागली. देवालाही चोरांची भीती वाटते आहे. मती बदलली आणि मातीही बदलली. कोकणातले अनेक गावं सध्या म्हातारी झाली आहेत. गावातील तरुण मंडळी कामाच्या शोधार्थ गावापासून दूर झाली. काहींनी गावाला रामराम ठोकला. शहरी संस्कृतीत तन-मन गुंतविले. या स्थित्यंतरात गावापर्यंत शहरे घुसली अन् गावचे गावपण संपले. आता आमच्या गावात भिंतीला पापुद्रे आलेली घरे दिसतात, अबोल झालेली आणि त्याच्या परिसरात असतात गाईगुरे म्हातारपणीचा रवंथ करत..अगदी निवांतपणे..!

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home