Monday, June 1, 2015

निर्व्याज ऋण..

जे न देखे रवी ते ‘देखे कवी’ किंवा बादरायण संबंध काही म्हणा पण मनांत विचार सुरू झाले, भाषणांत शिरुकाकांनी इंग्रजी साहित्याची महती गातांना म्हटले होते ‘इंग्रजी साहित्यिक आपले बाप आहेत’. मराठी साहित्याच्या व्यासपीठावरून इंग्रजीचे गोडवे? ह्या अनुषंगाने आक्षेप, मत-मतांतरे झाली. त्या आक्षेपांना उत्तर देताना ते म्हणाले, ‘माझ्या वाक्यांवर मी अजूनही ठाम आहे..
SHRI NA PENDSE PHOTOनव्यानं अंगावर आलेली जबाबदारी, अर्थात कुठलीही बळजबरी नसतानाही, स्वीकारलेली. ‘जीवन वाहतं असावं’ वगैरे वगैरे प्रमाणे! ‘माणसानं नेहमी विद्यार्थीदशेत असावं’ असंही एक-दुस-याला शिकवण्यासाठी (च) वापरात येणारं वाक्य. दुस-याला शिकवताना शिक्षकही पुन्हा नव्यानं काही शिकतो, शिकत असतो असंही एक वाक्य. वर्तमानाबरोबर अपडेट असणं, अपग्रेड होणं नेहमीच चांगलं.
अपडेट, अपग्रेड हे शब्द सध्याच्या आयटी जमान्यात परवलीचे, सतत कानांवर पडणारे. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध पाहिला तर तसा फक्त आयटी, संगणकापर्यंतच मर्यादित होता, आहे. आणि अनपेक्षितपणे इंग्रजी विषयाच्या मार्गदर्शनाबद्दल विचारणा झाली. अभ्यासक्रमात फ्रेंच, अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, इटालियन, इ. लेखकांचे लेख समाविष्ट. तसं पाहता शैक्षणिक कालखंड (अ‍ॅकॅडॅमिक), पुण्यातील चाकरीसंबंधानं, संगणक प्रशिक्षण क्षेत्र यामुळे इंग्रजीशी थोडाफार संबंध होता, आहे. तरी पण नव्यानं काही शिकवणे म्हणजे प्रथम आपण स्वाध्याय करणं आवश्यक या हेतूने इंग्रजी शब्दकोश जवळ केला, जो गेली काही वर्षं कपाटाची शोभा वाढवत होता. मुक्त विद्यापीठातून बी.ए. करणा-या त्या विद्यार्थ्यांना ती जुनी डिक्शनरी ‘नव्यानं’ पाहावी या हेतूने दाखवली. पहिलं पान त्यांनी उलगडलं आणि पानावरचा मजकूर त्यांनी वाचला. ‘चि. शशीस, सप्रेम,श्री. ना. पेंडसे. १०/७/८१’ आणि आज तारीख होती २२/३/२००७ दुसरा दिवस, २३/३/२००७. सकाळीच टीव्ही वृत्तवाहिनीवर बातमी- गारंबी पोरकी झाली, ज्येष्ठ कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांचे निधन. मन सुन्न झालं, भूतकाळात सैरावैरा धावू लागलं. थक लं. थांबलं. निवांत बसलं.
एखाद्या कथा, कादंबरी, पटकथा लेखकाने प्लॉट आखावा त्याप्रमाणे घडलेल्या दोन्ही घटना. लेखासाठी तयार केलेल्या, हल्लीच्या न्यूज चॅनलप्रमाणे घडवलेल्या, क्रिएटिव्ह इन्सिडन्सही नाही. प्रसारमाध्यमात मिळणा-या फुटेजवर हल्ली घटनेच्या सत्यासत्यतेबद्दल खात्री केली जाते?.. असो. विषयांतर नको.. काय संबंध असावा ह्या दोन घटनांत ? आत्ताच तो शब्दकोश काढण्याची का इच्छा व्हावी? पुन्हा विचार सुरू झाले. दुसरा दिवस सर्व वर्तमानपत्रे, टेलिव्हिजन बातम्यांत गुंतून गेला  आणि सृजनशील,भावुक,तरल मनाच्या कलाकाराला त्या दोन घटनांतील तार्किक संबंध जाणवला.
२० मार्च २००७, तरुण भारत-‘मराठी साहित्याचा आधारवड’. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिकांचा लेख. त्यात उद्धृत केलेले अलिबाग येथील कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणांतील शिरूकाकांचे इंग्रजी भाषेसंबंधाचे मत वाचनात आले.
जे न देखे रवी ते ‘देखे कवी’ किंवा बादरायण संबंध काही म्हणा पण मनांत विचार सुरू झाले, भाषणांत शिरूकाकांनी (ते माझे चुलत आजोबा, तरीही घरांतील मोठय़ांनी केलेल्या नामोल्लेखाचे केलेले अनुकरण,अनुकरणप्रिय लहानपणात जडलेली सवय) इंग्रजी साहित्याची महती गातांना म्हटले होते ‘इंग्रजी साहित्यिक आपले बाप आहेत.’ मराठी साहित्याच्या व्यासपीठावरून इंग्रजीचे गोडवे? ह्या अनुषंगाने आक्षेप, मत-मतांतरे झाली. त्या आक्षेपांना उत्तर देताना ते म्हणाले ,‘माझ्या वाक्यांवर मी अजूनही ठाम आहे. इंग्रजी साहित्यात अनेक उत्तुंग साहित्यिक होऊन गेले. त्यांचा आदर्श समोर ठेवणे गरजेचे आहे. याचा अर्थ मराठी साहित्य थिटे आहे असा मात्र होत नाही.’ दुस-याचे गुण घेण्यासाठी,गाण्यासाठी मन मोठं लागतं. ते त्यांच्याकडे नक्कीच होतं. साहित्याचा विचार करता स्कॅ्रपबुकावर अक्षरी वळणांच्या रेघोटय़ा मारणारा मी, नवोदितांमधील नवोदित असा लेखक. ‘लेख, कथा लिहितो तो लेखक’ कदाचित ह्या व्याख्येपुरताच. साहित्याच्या ह्या अथांग सागरात हात मारायला (तरून जाण्यासाठी,व्यवहारिक हात मारणे नव्हे)सुरुवात केलेल्याला, माझ्यात आलेल्या कलागुणांच्या जनुकीय स्त्रोतातील एक आधारवड उन्मळून पडताना या दोन घटनांतून असं तर सांगत नसेल?
बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे दुस-याने काढलेली रेषा पुसण्यात जीव कष्टविण्यापेक्षा त्यातलं चांगले ते स्वीकारून त्याच्यापेक्षा मोठी रेषा काढण्याचे कष्ट घेणे हा आपण मोठं बनण्यासाठी अवश्य ध्यानात ठेवण्याचा मंत्र आहे. तुझा, दुस-या कलाकृतींकडे बघण्याचा दृष्टिकोन विस्तार. इतर भाषांतील साहित्य वाच. नवनवीन जे जे मिळेल (मग ते साहित्य, कलाकृती जुनी का असेना?) त्याचा नव्यानं संचय कर. संदर्भाचा खजिना विपुल कर. कलाकार आहेस, तसं म्हणवतोस मग कद्रुवृत्तीनं वागू नकोस. कोकणात राहिलास म्हणून काय झालं? साहित्य, कलाकृती, मग ती कोणत्याही शाखेची, भाषेची असो. त्याचं नि:पक्षवृत्तीने, निर्भीडपणे रसग्रहण कर. स्वत:ला प्रगल्भ, प्रबुद्ध बनव. त्या डिक्शनरी हातात येण्याचा आणि या विचारांचा असा संबंध जोडला गेला, कारण शिरूकाका तसेच होते. चांगलं काहीही, जे आपल्याकडे नसेल असं, ते स्वीकारण्यासाठी तत्पर. वाईटावर टीकाटिप्पणी करण्यास ही तितकेच तत्पर . त्यांचे हे निर्भीडपणा वगैरे सर्व गुणावगुण लेखनातही निर्भीडपणे वाचकाला भिडतातच.
SHRI NA PENDSE HOUSE PHOTO 02ते मुर्डीला वारंवार यायचे. भाद्रपद गणेशोत्सवात आग्रहाने. वारंवार हा तसा सापेक्ष शब्द, व्यग्रतेशी निगडित असलेला. पण त्या वास्तव्याच्या काळात माझ्या बालमनाला जसे दिसले तसे ते पक्के झाले. आपले आजोबा लेखक आहेत. त्यांच्याबरोबर येणारे,आलेले पु.लं, तर्कतीर्थ, विंदा, सुरेश पेंडसे (बहुधा माजी मुंबई पो.आयुक्त) शैला सुधीर दातार (भास्करबुवा बखलेंचा नातू-नातसून) वगैरे ही देखील तशीच कोणी मोठी व्यक्तिमत्त्वं आहेत एवढंच त्यावेळी समजलं होतं. लेखक, मोठी व्यक्तिमत्त्वं म्हणजे काय हे मात्र ख-या अर्थानं पुढे उमजलं.
इथल्या वास्तव्यांतही त्यांची चर्चासत्रं चालूच असायची. दादा (माझे सख्खे आजोबा), मोरूअण्णा, चिंतूभाऊ (क्रिस्पन फार्मास्युटिकल मशीन)आणि इतर कुटुंबीय ह्यांच्या चर्चा, खडाजंगी, त्या बैठकीत झोपाळय़ावर मांडीला मांडी लावून, नव्हे मांडीवर बसून अनुभवल्या. ते काही तरी छान होतं. वादविवाद होते; पण भांडणं नव्हती एवढं त्या वयातही नक्कीच कळलं होतं. आपल्या गुणदोषांसकट साधकबाधक खुली चर्चा करणं, पुन्हा जेवताना हसत-खेळत कौटुंबिक गप्पा, विडय़ाचे पान जमवताना पुन्हा नव्यानं चर्चा. चर्चाचा विषय एकच नाही. नव-नवीन. तुझं नवीन लेखन, तुझ्या लेखनात हे उगाचच आणलंस, गाव काय म्हणतंय?, अमुक तो कुठे? पाऊस पाणी काहीही. बैठकीतला बराचसा गोतावळा समकालीनच, ती वगळता. मुळात घराणं खोतीचं. त्यामुळे वादात खोती ही डोकावायचीच. शिरूकाकांच्या लिखाणात खोतीचे वाभाडे काढले जायचे. अर्थात कोही ठिकाणी गुणही आलेच. पण अधिकाराचा माज आला की तो वर्चस्व गाजवू लागतो. त्या माजामुळेच अन्यायी खोतांचं प्रमाण, शेकडा जास्त. त्या काळचे ते सरकारी यंत्रणेतला एक हुद्दा , पद-खोत. प्रत्येक हुद्याला, पदाला दोषाचे गालबोट आहेच. शेकडा प्रमाणात कमी अधिकता,तेव्हाही-आत्ताही? माझ्या माहितीप्रमाणे (खोती माझ्या जन्मापूर्वीच संपुष्टात आली होती. अर्थात फक्त हुद्दे बदलले. खोती खालसा झाली. नव्या शाहीत नवी पदे आली. पण वृत्ती? असो.)तर माझ्या माहितीप्रमाणे आमचे घराणे त्याला अपवाद होते, असावं. कारण दादांना, माझ्या आजोबांना कुळांच्या जमिनी स्वत:हून त्यांच्या ताब्यात देताना मी पाहिलं आहे. आधीच्या पिढीतही उत्तम जनसंपर्क आणि अशा नियमाला अपवादामुळेच शिरूकाकाविना झीगझीग, स्वत:चं मत, लेखन, विधान ठामपणे करू शकत होते. असावेत.
शिरूकाका नास्तिक. स्वत:च्या मरणोत्तर कर्मानाही त्यांचा विरोध. असं असूनसुद्धा मुर्डीला आले की हातपाय धुतल्यावर, ते शुचिर्भूत होऊन त्यांचे पाय देवघराकडे वळत आणि साहित्यात उंची गाठलेले त्यांचे मस्तक तेथील सिद्धिविनायकापुढे नत होत असे. का? कसं? हे अनाकलनीय आहे असं ते स्वत:ही म्हणत. स्वत:ला नास्तिक म्हणवणा-या शिरूकाकांनी नास्तिकतेचा टेंभा मिरवण्यासाठी, ते कधीही लपवलं नाही. आपल्या साहित्यिक मित्रांनी या अशा नास्तिकपणाची उडवलेली खिल्लीही ते तितक्याच खिलाडूवृत्तीने स्वीकारत. मुर्डीच्या गणेशोत्सवाच्या पंच्याहत्तरी समारंभात त्यांनी ती कबुली व चेष्टेचा किस्सा स्वत:हून सांगितलेला मला स्मरतो आहे. ते म्हणाले हे एकच ठिकाण जिथे मला नत व्हावे असे वाटते.. स्वत:शी प्रामाणिक, म्हणूनच कदाचित निर्भीड-स्पष्टवक्ता. त्यांच्या कोकणात, बालपणाच्या कोकणात ते रमून जात. मग त्या गप्पांचा ओघवतेपणा त्यांच्या गप्पा ऐकणारेच, ऐकलेलेच जाणू शकतात. माझा लेखनाशी संबंध कथा, एकांकिका, कविता, चुकार एखादा लेख लिहिण्यापुरताच मर्यादित. खरी आवड रंगांची, नाटकाची. ओघानं गारंबीचा बापू आलंच. गावातील महाशिवरात्री उत्सवात ते करण्याचं ठरलं. परवानगी मागितली. पत्र आलं. नेहमीप्रमाणे पोस्टकार्ड. बोलताना सतत स्त्रवणारे शब्द, पत्रात मात्र, परवानगी आहे. एवढेच त्रोटक. औपचारिकपणा रुचला नव्हता. फोन केला. गावात नाटक सादर करतोयस, परवानगी कसली मागतोयस? प्रश्नानंच संभाषणाला सुरुवात झाली. मी फक्त श्रवणभक्तीच केली. भरभरून बोलत राहिले. नाटकाबद्दल सूचना झाल्या, बोलायला लागल्यावर गप्पांचा ओघ वाहता असायचाच, आता त्यांच्या कानांनी सहकार पुकारल्यावर त्यात कुणी व्यत्यय आणणंही शक्य नव्हतं. त्यामुळे फोनवरून आमची फक्त श्रवणभक्तीच. नाटक म्हटल्यावर हुरूप असतोच, असायचाच. तो आणखी वाढला. त्याच गोष्टीचा पुन:प्रत्यय तुंबाडचे खोत मालिकेच्या वेळी आला. अजून निर्माता-दिग्दर्शक कुणाची ओळख नाही, बोलणं नाही. लोकेशन म्हणून मुर्डी-आंजर्ला परिसर फायनल झालेला. तशी प्रेमाची ऑर्डर निघालेली. यांच्या अंगात नवचैतन्य सळसळत होतं. आधीपासून शिरूकाकांचे फोन खणखणू लागलेले. ती मंडळी येतील. त्यांच्याशी व्यवहार बोलून घे त्यांना सर्व ठिकाणे दाखव. घराडीच्या पाखाडीसाठी, कडय़ावरची नारायण घाटी.
याला हे-त्याला ते, त्याचाही अभ्यास पूर्ण. मुंबईत असून एक ना अनेक सूचना. फोनवर फोन.  या तुंबडाच्या लेखनावेळची एक आठवण. लेखन विषय मांडताना त्याचा पूर्ण अभ्यास करून मगच तो लोकांसमोर ठेवायचा हा त्यांचा नियम, खाक्याच असावा. झालं मुर्डीला तीन फाशांचा पट लावायचं ठरलं. मुंबईहून शिरूकाका मुर्डीला. ओटीवर दोन रात्री पट रंगला. पोबारा, कच्चेबारा, वाकडे, दसप्या, शेगडी, दत्तूकाका (छ-दो-आठ हे दान त्यांना हुकमी पडे. त्यामुळे त्यांच्या नावाने ते दान झाले, अर्थात मुर्डीसाठी मर्यादित), बंद. दानांच्या मागणीनं घर-आसमंत दणाणून गेला.
दुरंग्या, चौसष्ठय़ा, सयी, कुसष्टय़ा झाल्या. हल्लीच्या भाषेत डाव हरणे, डावानं मार खाणे, ड्रॉ, फॉलोऑन, वगैरेच. पूर्वी आंजर्ले-आडे केळशी परिसरात हा खेळ चुरशीने खेळला जायचा. आता फक्त आम्ही मुर्डीकरच तो खेळतो. सोंगटय़ा किंवा द्यूत (दोन नव्हे तीन फासे, महत्त्वाचं) शिरूकाकांचे असंख्य प्रश्न. मग त्याला दादा, भास्करभाऊ, केशवबाबा परांजपे, परसूभाऊ, बंडूभाऊं ची उत्तरे. कोणी अधिकही असतील. कारण एकंदर भिडू आठ. हा सर्व खटाटोप १४०० पानी कादंबरीतील ५-६ पानांसाठी. पण रसिकांसाठी कलाकृती सादर करताना पूर्ण अभ्यास करण्याचा माझ्यासारख्या नवोदितांना तो एक संस्कार, वस्तुपाठच होता. पण.. एवढे सगळे कष्ट घेऊन लिहिलेली, तितक्याच कष्टाने, आत्मियतेने सादर केलेले कलियुगातील महाभारत, तशीच व्यक्तिमत्त्वं, तशाच स्वभाव छटांचे असंख्य कंगोरे, भव्यता, सर्व-सर्व गोष्टींनी युक्त ‘तुंबाडची खोती’ टीव्हीवर मात्र लवकर का खालसा व्हावी, प्रश्नच आहे. लेखकाची, शिरूकाकांची नापसंती, आक्षेप कधी कानावर आले नाही. मग माशी कुठे शिंकली? का वाहिन्यांचं किंवा तिथे प्रस्थापितांचं राजकारण आड आलं? का कुणाची अस्मिता दुखावली? कुणास कळे? सत्य काय ते रसिकांसमोर येणं खरं म्हणजे गरजेचं होतं. आहे. कारण एक उत्तम परिपूर्ण कथानक त्या सगळय़ा दुष्टचक्रात अडकून पडलं, वाया गेलं. चित्रफितीच्या भाषेत डब्यात गेलं, अशी खंत वाटत होती; पण श्री ना. पेंडसे जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून सहय़ाद्रीवर ती सहय़ाद्रीच्या कुशीत वाढलेली, घडलेली कादंबरी, पुन्हा एकदा नव्यानं सुरू झालीय. तेच ते हे कालचक्र.
कलाकृतीचं सादरीकरण झाल्यावर, त्यावर चर्चा-प्रश्न हे अपेक्षितच. त्यांना आत्मविश्वासानं सामोरं जायचं झालं तर पूर्वतयारीने कलाकृतीचे सादरीकरण हवेच. हे मात्र मी शिकलो. सोंगटय़ांचा डाव या प्रकरणातून. यंदा नाटय़मंडळाच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्तानं संत एकनाथांवर नाटक लिहिण्याची जबाबदारी मंडळाने टाकली. ती जबाबदारी पूर्ण विश्वासानं पेलू शकलो आणि ‘तोची एक नाथ’ हे नाटक २००७ च्या शिवरात्री उत्सवात लिहून सादर केलं. अर्थात मंडळाच्या सहाय्यानं, विश्वासानं. त्या साध्यतेच्या मागेही हेच संस्कार उपयोगी पडले असावेत. याची जाणीव आज, आता प्रकर्षाने झाली. जे संस्कार, अशा यशस्वी व्यक्तिमत्त्वांच्या वर्तणुकीतून आपोआप, आपल्या नकळत होत असतात. असावेत. कलाक्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर लेखन, साहित्य प्रांतात शिरूकाकांचं माझ्यावर हे ऋणच. त्याचं व्याजही द्यायचं नाही की मुद्दलही द्यायचं नाहीये. त्यांचा ऋणकरी म्हणवून घेणंच बहुमानाचं.
ज्या ऋणांत घराणं पद्धतीनं जनुकीय वारसा, वारंवार अप्रत्यक्ष होणारे संस्कार, सूचना, शाबासक्या, त्यांचा वास्तवाला सामोरं जाण्याचा, सत्याच्या जवळ जाण्याचा अट्टहास, त्यासाठी आवश्यक असलेली अलिप्त, तटस्थ वृत्ती, आणि बरंच काहींचा सामावेश. त्यांचा तो वारसा वडिलोपार्जित जमीनजुमला सांभाळतात. त्याप्रमाणे सांभाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग त्यात अफाट वृद्धी नाही करता आली तर हरकत नाही. ती जमीन पुढल्यांकडे सोपवण्याइतपावेतो तिची मशागत माझ्या लेखणीच्या माध्यमातून करता आली तरी मी खरंच भाग्यवान. साहित्य लेखन क्षेत्रात माझी काही तरी किरकोळ लुडबूड बघून, ‘‘अरे श्रीनांचा नातू ना तू? मग काय हे असलं?’’ या उपहासगर्भ प्रश्नाला उत्तर देण्याची नामुष्की माझ्यावर येऊ नये, याचसाठी हातात धरलेली लेखणी तितक्याच आत्मविश्वासाने धरून ती त्यांच्याच प्ररेणने त्यांच्यासारखी दमदारपणे सातत्यानं झरती राहावी, अशी इच्छा. अशी झरणी मला मिळावी हीच त्यांच्या चरणी विनंती, आशीर्वादाची अपेक्षा. कलाकार हा त्याच्या निर्मितीबाबतच फक्त अ-समाधानी असतो, नेहमी अन्यथा भौतिकदृष्टय़ा विचार करता त्याच्याकडे आध्यात्मिक स्वरूपाचं समाधान भरभरून असतं. तात्पर्य, समाधानी असतो. त्यामुळेच शिरूकाकांना ‘हाक आभाळाची’ झाल्यावर मन:शांती मिळाली. योजलेली कलाकृती पूर्ण होईपर्यंत अथवा नवी काही सुरुवात होईपावेतो तो अस्वस्थ भौतिकतेत अस्वस्थ होत असला तरी त्याचे तादात्म्य अवस्थेतील सातत्य कायम असते, म्हणूनच तर भौतिकदृष्टय़ा ते गजबजलेल्या-बजबजलेल्या मुंबईत असूनही, मनाने कोकणातच वास्तव्य करून राहिले, वावरत राहिले. कायम. तेव्हाही आणि आत्ताही. फरक इतकाच. तेव्हा त्यांच्या मनात कोकण असायचे आता कोकणच्या, प्रत्येकाच्या मनात ते आहेत.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home