Thursday, June 4, 2015

नुसतंच ‘व्रत’

स्त्रियांच्या सक्षमीकरणाचं व्रत ही येत्या मंगळवारी येणा-या ‘वटसावित्री’ या सणाची खरी ओळख आहे. हे व्रत केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठीच न करता, सावित्रीसारखी आपल्याही बुद्धीची चुणूक, ध्येयनिष्ठता, तिची तळमळ, पतीच्या निधनानंतरही धीर धरून योग्य कृती करण्याचं दुर्दम्य साहस अशी जीवनमूल्यं पतीपेक्षाही एका पत्नीत प्रभावीपणे असू शकतात.. ही जाणीव निर्माण करण्यासाठी करावं.
vatsavitri उचित नवरा मिळावा, साजेसा.. शोभेल असा नवरा मिळावा यासाठी गणपती उत्सवाच्या एक दिवस आधी येणारं ‘हरतालिका तृतीया’ हे व्रत कुमारिका करतात. तर आपलं सौभाग्य अबाधित राहावं म्हणून विवाहित स्त्रिया ‘वटसावित्री’चं व्रत करतात.
वटसावित्री हे व्रत करताना प्रत्येक विवाहित स्त्रीची मनोकामना असते की, आपल्या नव-याची भरभराट व्हावी, त्याचं निरोगी आरोग्य अबाधित राहावं तसंच कुठल्याही वाईट, अनिष्ट गोष्टींना तो बळी पडू नये. या इच्छा पूर्ण होण्यासाठी या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याची चाल पडली आहे.
शहरांमध्ये हल्ली वडाच्या झाडाची एक छोटी डहाळी आणून तिची पूजा करतात. वडाच्या झाडाभोवती दोरा बांधतात. वटसावित्रीचं व्रत हे ‘त्रिरात्र व्रत’ आहे. म्हणजेच एकंदर तीन रात्री हे व्रत पाळलं जातं. पौर्णिमेच्या आधीचे दोन दिवस उपवास करून रोज सावित्रीचं गाणं म्हटलं जातं, अशी माहिती आपल्याला ‘संपूर्ण चार्तुमास’ या धार्मिक ग्रंथामध्ये आढळते. हे व्रत आणि हा सण भारतभर पाळला जातो. बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, ओदिशा आणि महाराष्ट्र इथं हे व्रत विवाहित स्त्रिया पाळतात. तामिळनाडू आणि कर्नाटकामध्ये या उपवासाला ‘करदय्यन नोम्बू’ असं नाव आहे.
जिच्या नावावरून या व्रताला ‘जन्म-सावित्री’ किंवा ‘वटसावित्री’ हे नाव पडलं ती सावित्री ‘मद्र’ देशाची राजकन्या होती. मद्र देशाचा राजा अश्वपती याची कन्या सावित्री ही अत्यंत देखणी, रूपवान होती. द्युमत्सेन या आपल्या अंध वडिलांसोबत निर्वासित झालेला राजपुत्र सत्यवान याला सावित्रीनं आपला पती म्हणून निवडलं. त्याच्यासोबतच जीवन कंठण्याचा निर्णय तिनं घेतला.
आपल्या आंधळ्या वडिलांसोबत सत्यवान हा जंगलात राहत होता. राजवैभवाचं सारं सुख सोडून, सासरच्या लोकांची सेवा करत आणि पतीसेवेमध्ये संपूर्ण मनानं मग्न होऊन सावित्री जंगलामध्ये राहिली. एक दिवस जंगलामध्ये लाकडं तोडत असताना सत्यवान एकाएकी चक्कर येऊन झाडाच्या उंचावरील फांदीवरून खाली कोसळतो.
कोसळतो तो अत्यंत लाडक्या, प्रेमळ पत्नी सावित्रीच्याच पुढयात. तिथंच त्याला मरण येतं. त्याचे प्राण नेण्यासाठी यमराज येतात. अत्यंत व्यथित, व्याकूळ आणि दु:खी सावित्री आपल्या नव-याचे प्राण न नेण्याविषयी यमराजांची कळकळीनं विनवणी करते. ती यमाला म्हणते की, ‘जर तुम्ही यांचे प्राण घेऊन जाणारच असाल तर मीसुद्धा मागे मागे येईन..’
अखेरीस यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन निघतात. सावित्रीदेखील त्याच्या मागे मागे निघाली. कित्येक वेळा मागे येऊ नकोस, अशी सूचना दिली तरीदेखील सावित्री यमराजाच्या मागे मागे जातच होती.
रस्त्यामध्ये सुरुवातीला ती धर्माच्या उचित आचरणाबद्दल बोलली. नंतर यमराजांशी गप्पा सुरू झाल्या. मग तिने तत्त्वांचं कठोर पालन करणा-या निष्ठावान लोकांशी मैत्री करण्याचं महत्त्व सांगितलं. तिचा प्रत्येक विचार आंतरिक प्रकाशानं चमकत होता. तिची प्रत्येक भावना ही ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती वाटावी, इतकी प्रामाणिक होती. प्रत्येक बोलण्या-चालण्याच्या या देवघेवीने यमराज अगदी हरखून जात होते.
यमराजाला ‘धर्मराज’ असं संबोधून तिनं यमाच्या न्याय-प्रियतेचीदेखील प्रशंसा केली. प्रसन्न झालेल्या यमराजांनी ‘सत्यवानाचं जीवन सोडून कुठलेही वर माग’, असं तिला सांगितलं. त्यावेळी सावित्रीनं आपल्या सास-याची दृष्टी आणि गेलेलं राज्य परत मिळावं, असं मागितलं. पुढं तिनं आपल्या वडिलांना शंभर पुत्र मिळावेत, असा वर मागितला. शेवटी सावित्रीनं मला आणि सत्यवान यांना शंभर पुत्र मिळावेत, असं मागितलं.
शंभर पुत्रांसाठी सत्यवान आणि सावित्रीचं सहजीवन आवश्यक होतं. म्हणजे पुन्हा एकवार सावित्रीच्या कुशाग्र बुद्धीची चुणुक यमराजाला मिळाली. शेवटी यमराजांनी तिला सांगितलं की, ‘हे पाहा कुठलीही एकच गोष्ट मी तुला देऊ शकतो.’ तसंच यावेळी सत्यवानावरून कुठलीही अट यमराजांनी ठेवली नाही. त्यावर तात्काळ सावित्रीने आपल्या नव-याचे प्राण परत मागितले.. आणि यमराजांनी ते सहर्ष देऊ केले..
सावित्रीनं दिलेली सत्त्वपरीक्षा पाहून यमराजाचं मन द्रवलं. तिचं पावित्र्य, तिची धारणा, तिची अढळ श्रद्धा आणि दुर्दम्य आत्मविश्वास यामुळे यमराजांना तिचं म्हणणं मान्य करावंच लागलं. त्यांनी सत्यवानाला नवसंजीवन दिलं. त्यानंतर अत्यंत आनंदानं, सुखानं सत्यवान आणि सावित्री यांना सहजीवन मिळालं.. धार्मिक महत्त्वासोबतच हे व्रत म्हणजे, स्त्रियांच्या सक्षमीकरणाचं व्रत आहे.
दृढ आणि अढळ निश्चयाच्या आधारावर एखादी स्त्री जेव्हा आपल्या कृती करते, तेव्हा ती यमराजाकडून प्राणदेखील परत मागू शकते. वटसावित्री व्रताबद्दल रेल्वेगाडीच्या प्रवासात किंवा ऑफिसामध्ये अनेक वेळा कानांवर येणारी प्रतिकिया अशी की, ‘हे नवरे कुठे आपल्यासाठी व्रत करतात की, जन्मोजन्मी हीच बायको मिळावी, मग आपणच का करायचं असलं व्रत?’.. हे तर्कशास्त्र योग्य असेल तरीदेखील सावित्रीच्या कथेमागील संदेश पुरता ग्रहण न केल्यामुळे अशा प्रतिक्रिया महिला देतात.
सावित्रीसारख्या बुद्धीची चुणुक, सावित्रीसारखी ध्येयनिष्ठा, तिची तळमळ, पतीच्या निधनानंतरही धीर धरून योग्य कृती करण्याचं दुर्दम्य साहस, पतीसोबतच्या सहजीवनावर दुर्दम्य श्रद्धा ठेवण्याचा चिवटपणा हे गुण एका पतीपेक्षा एका पत्नीजवळच जास्त असू शकतात.. म्हणूनच ही कथा सत्यवानाच्या प्राणांशी निगडित असली तरीदेखील ही सावित्रीची कथा आहे. ही सावित्रीच्या चातुर्याची, तिच्या निरलस कार्याची कथा आहे..
या समाजामध्ये अनेक प्रकल्प, अनेक जीव, अनेक चांगल्या गोष्टी, अनेक कल्याणकारक उपक्रम वाचवण्याची, ते जगवण्याची नितांत आवश्यकता आहे. आपल्या समाजाला एकच नाही अनेकानेक ‘सावित्रीं’ची गरज आहे. सावित्रीबाई फुले यांचं नाव सावित्री होतं, हा आज मला योगायोग वाटत नाही.. जीवन समृद्धी, जीवन विवेक आणि जीवन विवेकावरील प्रगाढ श्रद्धा ही त्रिसूत्री आहे. वडाभावेती सूत्र गुंडाळलं किंवा नाही तरी आपल्या महिलांनी या त्रिसूत्रीचं प्राणपणानं पालन केलं तर खरोखरच आपल्या समजाला एक नवसंजीवन मिळेल.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home