Thursday, June 4, 2015

माझी माऊली

आई म्हणजे प्रत्येक घरात वास करणारा, घरातील सर्वाची काळजी घेणारा ईश्वरच होय. आईची थोरवी अनंत काळापासून अनंत माणसांनी सांगितलेली आहे. मुलांसाठी कोणताही त्याग करणारी आईच असते. तिच्या वृद्धापकाळात मुलांनी अव्हेरलं तरी ती मुलांचं हितच चिंतीते. जगातील सगळ्या नात्यातील अतिशय शुद्ध, पवित्र, प्रेमळ आणि मंगल नातं म्हणजे आई आणि मूल.
aajiमाझ्या आईचा जन्म एका सुसंस्कृत आणि सुखी कुटुंबात झाला. माझे मोठे मामा घरचं काम सांभाळून ज्योतिष पाहत असत. दुसरे मामा (माझे सासरे) मंडळ अधिकारी होते तर लहान मामा मुंबईत नोकरीला होते. आईचं माहेर गावातच, माझ्या मावशीचं घरही आमच्या शेजारीच. माझ्या आत्याचंही घर जवळच! त्यामुळे माझ्या आईचं लांबच्या गावी विशेष जाणं-येणं नव्हतं.
आमचं गाव फार तर तालुक्याचं ठिकाण हेच तिचं जग. त्याबाहेर ती क्वचितच गेली असेल, पण तिला व्यवहारज्ञान आणि अनुभव ब-यापैकी होते, हे तेव्हाच्या घटनांवरून आज लक्षात येतं. गावी श्रावणात मंदिरांमध्ये पोथीवाचन व्हायचं. त्या पोथ्यांचा अर्थ श्रोत्यांना त्याकाळी माझे आजोबा (आईचे वडील) सांगत. त्यामुळे ‘पांडवप्रताप’, ‘हरिविजय’, ‘शिवलिलामृत’, ‘नवनाथ महात्म्य’ इत्यादी ग्रंथ वर्षानुवर्षे ऐकून त्यातील ब-याच गोष्टी तिला मुखोद्गत होत्या, तसंच वडिलांकडून लहानपणी ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘शिवाजीराजांच्या कथा तिने ऐकलेल्या होत्या त्या आम्ही लहान असताना ती आम्हाला सांगत असे. असं असलं तरी आमच्या मावशीला मात्र त्यातील एकही गोष्ट सांगता यायची नाही म्हणजे माझ्या आईची श्रवणशक्ती, स्मरणशक्ती आणि ते पुन्हा सांगायची कला तिला उपजत होती आणि तिने ती जपली होती.
भावंडांत मी धाकटा, दोन मोठे भाऊ, त्यापाठी दोन बहिणी. मी तीन वर्षाचा असताना थोडयाशा आजारपणाने माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे माझ्या आईवर पाच मुलांची जबाबदारी अकस्मात येऊन पडली. पण ती खचली नाही, दैवाला दोष देत बसली नाही. ना कुणाकडे मदतीसाठी याचना केली. तिचे तीन भाऊ आणि तीन दीर असतानाही तिने मोलमजुरी करून आमचं संगोपन केलं.
काही वर्षानी माझे दोन्ही भाऊ मुंबईला आले तरी शेवटपर्यंत आईचे कष्ट, दगदग काही संपली नाही. हळूहळू दोन्ही बहिणी आईच्या कामात मदत करू लागल्या. आईने आम्हाला कधी एक दिवस उपाशी ठेवलं नाही. मी लहान असल्यामुळे ती रोज दोन्ही वेळा जेवत होती की नाही ते मात्र मला समजलं नाही. आईला गावातील मोठी माणसं तिच्या माहेरच्या ‘चंद्रभागा’ या नावाने हाक देत, तर घरचे व शेजारचे सर्व ‘ताई’ म्हणत. ती नुसती नावाची ताई नव्हती तर आजारी माणसांची सेवा करण्यात, अडल्या-नडल्यांना मदत करण्यात ती नेहमी पुढे असे.
गावातील कित्येक स्त्रियांची बाळंतपणं तिने सुखरूप करवली व तीन-चार महिने प्रत्येक बाळ-बाळंतीणीला तेल मॉलिश व आंघोळ घातली, पण कुणाकडून साडी चोळी किंवा पाच रुपयेही मोबदला न घेता सेवा म्हणून आनंदानं केलं. आता हेच काम सेवा न राहता धंदा झालाय. माझ्या आईला कित्येक आजारांवरील औषधाची माहिती होती, त्यामुळे लोक तिच्याकडून झाडपाल्यांचं औषध विना मोबदला नेत.
स्वत:ला पोटभर जेवण नसतानाही लोकांची सेवा म्हणून ती हे सर्व विनातक्रार आनंदाने करायची. शेजारी कुणी जास्त आजारी असेल तेव्हा तिचा जीव था-यावर नसायचा. आजारी माणसाच्या घरी ती रात्र रात्र जागत थांबायची. रुग्णाची सेवा, सुश्रूषा करायची, रुग्णाच्या घरच्यांना धीर द्यायची (तेव्हा रुग्ण रुग्णालयात ठेवायची सोय नव्हती.) कष्ट, सेवाभाव, स्पष्टोक्तपणा हा तिच्या आयुष्याचा स्थायीभाव झाला होता.
कुणाला बरं वाटावं म्हणून गोड गोड बोलणं आणि मागाहून कडवट बोलणं हे तिला मंजूर नव्हतं. जे काही बोलायची ते स्पष्ट व त्या माणसाच्या समोर. त्यामुळे काही माणसं दुखावली जायची पण त्याची ती पर्वा करत नसे. स्वत:च्या मुलावर सर्वच प्रेम करतात, पण माझ्या आईचे घरातील सर्वच मुलांवर प्रेम होते. माझा छोटा चुलत भाऊ राजेंद्र तर त्याच्या आईपेक्षा माझ्या आईकडेच जास्त रमायचा. तिला आई आणि स्वत:च्या आईला तो ‘माई’ म्हणायचा. तिच्या सेवाभावी आणि प्रसंगी धावून जाण्याच्या प्रेमळ स्वभावाने तिने सर्वाशी माणुसकीचं नातं जोडलेलं होतं.
कष्टाने मिळवलेल्या पै-पैशातून ती काटकसर करून थोडी बचत करण्याचा प्रयत्न करायची. प्रत्येक वस्तू काळजीपूर्वक वापरायची. खाऊच्या पुडयातील सर्व खाऊ एकाचवेळी वाटून न संपवता दुस-या दिवसासाठी राखून ठेवायची, कुणाला औषधोपचार करण्यासाठी लागणारी पानं, मुळ्यासुद्धा ती गरजेपुरतीच तोडायची.
फुकट मिळालं म्हणून ओरबडायची वृत्ती असता नये, असं ती नेहमी म्हणायची. तिच्या या नियोजनाच्या, काटकसरीच्या सवयीचे माझ्यावर संस्कार झाल्यानेच आज मी समाधानात, आनंदात, कोणत्याही कर्जाशिवाय, निव्र्यसनी जीवन जगतोय. या मायानगरीत अनेक वेळा मोहाचे क्षण येऊनही कधी तोल गेला नाही, पाय घसरला नाही हे तिच्या संस्कारामुळेच!
लहानपणी मला पैशाने विकत मिळणा-या वस्तू कमीच मिळाल्या. गरिबीमुळे कधी वह्या-पुस्तके नवीन घेता आली नाहीत, पण जीवन नीतीने, प्रामाणिकपणे, निष्ठेने जगण्यासाठी कराव्या लागलेल्या कष्टांची कधी लाज वाटली नाही. स्पष्ट बोलण्याचं धाडस, साधी वागणूक, योग्य-अयोग्याची जाण, काटकसर अशा कुठेही विकत न मिळणा-या, आयुष्यभर न संपणा-या आणि जीवन सुखी-आनंदी करणा-या अमूल्य गोष्टी मला आईकडूनच मिळाल्या.
माझ्या दुर्दैवाने तिचा सहवास मला फक्त १७ र्वषच लाभला. तरी तिने दिलेलं देणं जन्मभर पुरून पुढच्या पिढींचंही जीवन सुखी करेल इतकं आहे. तिच्या दुधाचे उपकार या जन्मात तर काय कित्येक जन्मातही फिटणार नाहीत. उपकारांची किंचितशीही फेड करण्याची, उतराई होण्याची संधी तिने आम्हाला दिली नाही. ती सेवा करण्यास जन्मली होती, सेवा करून घेण्यास नाही. मुंबई पाहाण्याची तिला खूप इच्छा होती, पण माझ्या दोन्ही भावांनी मुंबईत बिऱ्हाड करूनही तिला मुंबईत कधी आणलं नाही आणि मी मुंबईत येईपर्यंत ती आमच्यात राहिली नाही ही सल माझ्या मनात कायम राहिली आहे.
तिच्या बालपणी आमच्या गावात नुकतीच शाळा सुरू झाली होती, पण तेव्हाच्या रूढीप्रमाणे मुली शाळेत जात नव्हत्या. त्यामुळे ती जाऊ शकली नाही. पण शाळा शिकायला हवी होती असं तिला नक्कीच वाटत होतं. मी साडेपाच वर्षाचा असतानाच तिने माझं नाव शाळेत दाखल केलं. माझी आई अशिक्षित असली तरी अज्ञानी नव्हती. देवावर तिची श्रद्धा होती म्हणूनच दर सोमवारी ‘शिवलिलामृता’तील अकरावा अध्याय आणि दर शनिवारी ‘शनिमहात्म्य’ ती आमच्याकडून वाचून घेई आणि आम्ही वाचत असताना ती तिथेच बसून ते श्रवण करी. त्यामुळे अकरावा अध्याय आणि शनिमहात्म्याचे तिचं पाठांतरच झालं होतं.
माझ्या पत्नीला ‘सोनोग्राफी’नंतर जुळी मुलं असल्याचं समजताच तिला स्वत:चीच काळजी वाटू लागली. त्यावेळी पत्नीला मी विश्वासाने म्हणा किंवा श्रद्धेने पण ठामपणे सांगतिले, ‘माझ्या आईने कित्येक स्त्रियांची प्रसूती व नंतरची सेवा विनामोबदला केलीय, दुर्दैवाने आज ती नसती तरी तिचे पुण्य माझ्या कामाला येईल. तुझी प्रसूती विनाशस्त्रक्रिया होईल. यावर विश्वास ठेव, काळजी करू नकोस.’ आणि शेवटी तसंच घडलं.
आई-वडिलांचं पुण्य, पाप मुलांच्या कामी आड येतं, असं म्हणतात, त्याचा मला अनुभव आला. माझ्या पत्नीची प्रसूतीच्या वेळी परिस्थिती नाजूक बनलेली असताना माझा विश्वास, श्रद्धा खरी ठरली. ‘आई’ ही दोन अक्षरे, त्यातील ‘आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर.
आई म्हणजे प्रत्येक घरात वास करणारा, घरातील सर्वाची काळजी घेणारा ईश्वरच होय. आईची थोरवी अनंत काळापासून अनंत माणसांनी सांगितलेली आहे. मुलांसाठी कोणताही त्याग करणारी आईच असते. तिच्या वृद्धापकाळात मुलांनी अव्हेरल तरी ती मुलांचं हितच पाहते. जगातील सगळ्या नात्यातील अतिशय शुद्ध, पवित्र, प्रेमळ आणि मंगल नाते म्हणजे आई आणि मूल.
१७ नोव्हेंबर १९७७ रोजी रात्री घराजवळच तिला सर्पदंश झाला. योग्य उपचार न मिळाल्याने १८ नोव्हेंबर १९७७ रोजी सकाळी ७.३० वा. वयाच्या ५०/५२ व्या वर्षी ती आम्हा सर्वाना सोडून परमात्म्याची सेवा करण्यास परत गेली. पुनर्जन्मावर माझा ठाम विश्वास असल्याने परमेश्वराने मला पुनर्जन्म दिला तर जन्मोजन्मी मला तिच ‘माऊली’ आई म्हणून लाभावी अशी प्रार्थना करतो.
आई गेल्यावर पोरसवदा वयात मी व्यवहारी मुंबईत आल्यावर आप्तांकडून मला जहरी भाषेचे चटके मिळू लागल्यावर, कधी तिरस्काराची वागणूक मिळू लागल्यावर पदोपदी आईची आठवण येत असे. त्यावेळी कितीतरी रात्री व्याकुळ होऊन असहाय्यपणे रडण्यात गेल्या. लग्नानंतरही त्या आठवणींनी व आईच्या आठवणीने कितीतरी वेळा रडू यायचं. अशा वेळी पत्नीने मला समजून घेतलं.
सुखात दु:खाची आठवण येतेच. पुढे पत्नीची साथ आणि नंतर मुलांच्या प्रेमाने हळूहळू आठवणींची धग कमी झाली. अश्रूही आटले, मात्र आजही कुठे चिमणी पिल्लांना दाणे भरवताना, गाय वासराला वात्सल्याने भरवताना, आई आपल्या मुलांचं कौतुक करताना, ‘सह्याद्री’वर ‘माझी माय’ हा कार्यक्रम पाहताना पाहिलं की मला इतक्या वर्षानंतरही आईची आठवण तीव्रतेने येते. तेव्ह डोळ्यांतून अश्रू ओघळत नाहीत, पण डोळ्यांच्या कडा पाणीदार होतात आणि ओठातून हलकेच शब्द निघतो.. ‘आई!’

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home