Thursday, June 4, 2015

टीव्हीवरच्या भक्तिवाहिन्या

धर्म या जीवनातल्या अविभाज्य घटकाचं प्रतिबिंब जसं सगळीकडे दिसतं तसंच ते आजच्या आधुनिक काळातल्या माध्यमांमध्येही दिसतं. भारतात चित्रपट, नाटक, दूरदर्शन या सर्वच माध्यमांमधून हे धार्मिक संस्कार देण्याचा प्रयत्न आतापर्यंत करण्यात आला आहे. खाजगी वाहिन्यांच्या आगमनापासून तर या धार्मिक कार्यक्रमांसाठी वेगळी वाहिनी असण्याची सोय उपलब्ध झाली आहे. कम्युनिटी चॅनेल ही कल्पना आता भारतातही चांगलीच रुजली असून सध्या आपल्या देशात आध्यात्मिक प्रेक्षक आणि व्यवसाय या दोन्ही दृष्टीने यशस्वी होताना दिसत आहेत.
खाजगी धार्मिक वाहिन्यांच्या या प्रवासाची सुरुवात केली ती ‘जैन’ या वाहिनीने. आध्यात्मिक कार्यक्रमांची सुरुवात या वाहिनीने केली. वास्तविक पाहता दूरदर्शनच्या काळातही अशा प्रकारे काही विशेष कार्यक्रमांचं प्रसारण झालं होतं. स्वामी धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्याकडून दूरदर्शनच्या काळात योगाभ्यासाचं शिक्षणही दिलं जात असे. अनेक करमणूक वाहिन्यांनीही आपल्या प्रेक्षकांच्या या खास गरजेसाठी आपल्या कार्यक्रमांमध्ये प्रात:समयी राखीव वेळ ठेवलेला असतो. एक-दोन तास प्रसारित होणा-या या कार्यक्रमांना मिळणा-या प्रतिसादामुळेच अशा प्रकारच्या संपूर्ण वाहिनीची गरज निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. केवळ आपल्या भक्तांपुरतेच परिचित असलेले अनेक प्रवचनकार अणि गुरूंची ओळख या वाहिन्यांमुळेच सर्वसामान्य प्रेक्षकांना झाली.
सध्या भारतात ‘आस्था’, ‘संस्कार’, ‘साधना’ आणि ‘झी जागरण’ या प्रमुख धार्मिक वाहिन्यांवर आपले कार्यक्रम प्रसारित करण्यात येतात. केवळ हिंदू धर्माविषयीच नव्हे तर ख्रिश्न तसंच मुस्लीम समाजाच्याही वाहिन्या आपले कार्यक्रम प्रसारित करत आहेत. ‘पॉवर व्हिजन’ ही वाहिनी ख्रिस्ती धर्मासाठीचे कार्यक्रम प्रसारित करत आहे तर ‘पीस टीव्ही’ ही इस्लामी धार्मिक परंपरा सांगणारी वाहिनी आहे. देशात टीव्ही पाहणा-यांच्या संख्येत ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण लक्षणीय आहे. महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडणा-या या वर्गाला घरात केवळ करमणूक करून घेण्यात रस असतो. मनोरंजनाशिवाय त्यांचा आध्यात्मिक ओढाही या वाहिन्यांवरील कार्यक्रमांमुळे लक्षात घेतला जातो. त्यामुळे अध्यात्म, शांतीमार्गासाठीही हा गट या वाहिन्यांचा मोठा प्रेक्षक असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर अनेक आस्थापनांमधील कर्मचा-यांचा ताणतणावावरील उपाय म्हणूनही या वाहिन्यांवरच्या कार्यक्रमांचा उपयोग केला जातो.
या वाहिन्या चालवण्याचा पहिला फायदा म्हणजे, भारतासारख्या देशात या वाहिन्यांना कार्यक्रमाची कमतरता भासत नाही. या देशातल्या विविध भागांत अनेक धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. देशाच्या विविध ठिकाणी अगदी कानाकोपऱ्यांमध्ये अनेक धर्मगुरूंची प्रवचनं सुरू असतात. त्यांचं थेट प्रक्षेपण, सण-उत्सवांच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून या वाहिन्यांसाठी कधीही प्रसारित करायच्या कार्यक्रमांची कमतरता भासत नाही. करमणूक वाहिनींसाठी निर्माण करण्यात येणा-या कार्यक्रमांचा खर्च आणि या वाहिन्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा खर्च हा फार कमी असतो. अनेक कार्यक्रम हे आयोजकांमार्फत परस्पर आयोजित केले जात असतात. त्यांच्या निर्माणासाठी फी मोजावी लागत नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या निर्माणासाठी स्टेज वा इतर गोष्टींचा खर्चही आयोजकांनीच केलेला असतो. त्यामुळे या कार्यक्रमांसाठी केवळ चित्रीकरण करण्याची जबाबदारीच तेवढी या वाहिनीवर येते. त्यामुळे धार्मिक वाहिनींच्या एकंदरीत कार्यक्रम निर्मितीचा खर्च हा फारच कमी असतो. केवळ प्रसारण तसंच संकलन याचाच काय तो खर्च येतो. करमणूक वाहिन्यांच्या तुलनेत या वाहिन्यांसाठी कमी मनुष्यबळ लागतं. त्यामुळे तुलनेने ही वाहिनी चालवणं करमणूक वाहिनीपेक्षा सोपं असतं.
धार्मिक वाहिन्यांना केवळ भारतातच नव्हे तर जगभरात विविध चांगला प्रेक्षकवर्ग मिळतो. यात परदेशस्थ भारतीय प्रेक्षकांचा वाटाही मोठा असतो. आपल्या देशातल्या कार्यक्रमांविषयी त्यांना असलेली आस्था या वाहिनींना फायदेशीर ठरत असते. अर्थात, या वाहिन्यांचा पाहण्याचा वेळ हा तुलनेने कमी असला तरी त्यांच्याही बाबतीत प्राइम टाइम असतोच. त्यामुळे या वाहिन्यांना जाहिरात दारांचाही चांगला प्रतिसाद मिळतो. या वाहिनींसाठी असलेले जाहिरातींचे दर हे तुलनेने कमी असल्याने अनेक मध्यमवर्गीय उत्पादनांच्या जाहिराती या वाहिनींवर दिसून येतात. सध्या आपल्या देशात नशीब ‘खुलवणा-या’ अनेक उत्पादनांची मोठी चलती असलेली दिसून येते. त्यात विविध यंत्र, गंडे, दोरे, मूर्ती, विविध आयुर्वेदिक औषधे यांच्या जाहिराती या वाहिनींवर मोठय़ा प्रमाणात दिसून येतात. अनेक वेळा संकटनिवारणासाठी करावयाच्या विविध पूजाअर्चाची माहिती असलेली पुस्तके, सीडी, भक्तिगीतांच्या सीडी यांच्याही अनेक जाहिराती या वाहिनींवरून प्रसारित केल्या जात असतात. त्यांना असलेला पाठिंबा व त्यापासून मिळणारे उत्पन्न हे या वाहिनींच्या आर्थिक गणितात मोठा सहभाग नोंदवताना दिसून येत आहे.
या वाहिन्यांच्या बाबतीत विविध धर्मगुरूंनांही विशेष आस्था असल्याचं दिसून येते.
त्यामुळे या वाहिनींवर विविध धर्मगुरू एकाच वेळेस प्रवचन देऊ शकतात. त्यांनाही त्यांचा जनसंपर्क वाढवण्याची संधी या वाहिनींच्या माध्यमातून निर्माण होते. आपल्या जगभरातल्या अनुयायांशी एकाच वेळी संपर्क साधण्याची संधी त्यानिमित्ताने त्यांना प्राप्त होत असते. लोकांनाही त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी किंवा दर्शन घेण्यासाठी दूरवर किंवा गर्दीत जावं लागत नाही. त्याचप्रमाणे ही प्रवचनं वारंवार लागत असल्याने ती विस्मृतीत जाण्याची शक्यता नसते. त्यामुळे या वाहिन्यांना विविध धर्मगुरूंकडूनही चांगला पाठिंबा मिळत असतो. या वाहिनींवर वादविवाद, आध्यात्मिक गटांमधील असलेले मतभेद यांना स्थान देण्यात येत नसल्याने या वाहिनींच्या कार्यक्रमाबद्दल लोकांच्या मनातही नाराजी नसते. आपल्या प्रेक्षकांच्या मनाचा विचार करून तयार करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांच्या जोरावर आज हा कम्युनिटी टीव्ही भारतात चांगला रुजला असल्याचं दिसून येत आहे.
आध्यात्मिक किंवा धार्मिक वाहिन्या या केवळ भारतातच नव्हे तर जगभरात विविध ठिकाणी प्रसिद्ध आहेत. अगदी फार आधुनिक समजल्या गेलेल्या अमेरिकेतही त्या आहेत त्याचप्रमाणे चीन, थायलंड, जपान, अशा देशांमध्येही आहेत. ज्यू धर्मीयांसाठी असलेल्या एका वाहिनीला जगातल्या अनेक ज्यू धर्मीयांकडून मोठा प्रतिसाद मिळतो. काही धार्मिक वाहिन्या या सर्वसाधारण करमणूक वाहिन्यांप्रमाणे प्रसिद्ध असल्याची ही अनेक उदाहरणं आहेत.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home