Thursday, June 4, 2015

कुंडयांनी सजवा घरकुल..

बगीचाची हौस ही प्रत्येकाला असते. पर्यावरणप्रेमी आपापल्या परीनं जागा उपलब्ध करत आपली ही आवड जोपासतात, मात्र ही आवड जोपासताना कोणत्या प्रकारच्या झाडांना कोणत्या प्रकारच्या कुंडया आवश्यक आहेत, या कुंडया कशा लावाव्यात, त्याची काळजी कशी घ्यावी याचा घेतलेला आढावा.
PLANT IN HOME दुधाच्या पिशव्यांमध्ये, घरात रिकाम्या झालेल्या तेल-तुपाच्या डब्यांमध्ये झाडं लावण्याचे प्रकार प्रत्येकाने आपल्या बालपणी अनुभवले असतील. अर्थात तेव्हा कुंडया ब-याच महाग असायच्या, मात्र अलीकडे बाजारात स्वस्त आणि विविध प्रकारच्या कुंडया मिळायला लागल्या आहेत.
घरातील आपला ‘हिरवा कोपरा’ अधिकाधिक सुंदर बनवण्यासाठी योग्य प्रकारच्या आणि आकाराच्या कुंडया निवडणं सर्वात महत्त्वाचं आहे. मोठया कुंडीत झाडं लावल्यास ती मोठी होतात, हा सर्वसामान्य गैरसमज आहे. प्रत्येक वनस्पतीच्या वाढीसाठी कुंडीचा व्यास आणि खोली याचं सर्वसाधारण गणित ठरलेलं आहे. त्यामुळे कुंडया निवडण्याचं काम नियोजनबद्ध पद्धतीने केलं नाही तर मात्र पुढे झाडांच्या वाढीबाबत विविध समस्या निर्माण होतात. तसंच कुंडया भरताना कोणती माती, किती जैविक काडी-कचरा, संजीवक माती आणि सेंद्रिय खत वापरावर सर्व गणित अवलंबून असतं.
कोणती कुंडी कशासाठी
शहरी शेतीसाठी उपयुक्त कुंडया निवडताना विविध प्रकारच्या कुंडयांचे फायदे-तोटे समजून घेणं आवश्यक आहे. मिरची, वांगी, कारली, काकडी, भेंडी यांसारख्या वनस्पती ११ इंचाच्या कुंडयांमध्ये सहजपणे फोफावतात. तर कडीपत्ता, तोंडली, दुधी भोपळा, लाल भोपळा या वनस्पतींसाठी किमान १४ इंची कुंडीची गरज असते. पेपर मिंट पुदीना, तुळस या वनस्पती ८ इंची कुडयांमध्ये छान वाढतात. लिंबू, शेवगा यासारख्या वृक्षवर्गीय वनस्पतीसाठी मोठे कापलेले ड्रम वापरता येतील.
माती, सिंमेट की प्लास्टिकची कुंडी?
मातीच्या आणि सिमेंटच्या कुंडया जड असतात. त्यांना घरातील बाल्कनीत नेणं तसेच त्यांची हलवा-हलवी करणं जिकिरीचं असतं.     मातीच्या कुंडया स्वस्त असतात, मात्र त्यांची ने-आण करताना त्या तुटण्याचीही शक्यता असते. त्यामुळे अशा कुंडया जपून हाताळाव्या लागतात. सिमेंटच्या कुंडया महाग तर असतात आणि त्या जास्त जागाही व्यापतात. या सर्व बाबींचा विचार करता प्लास्टिकच्या कुंडया शहरी शेतीसाठी अधिक उपयुक्त ठरतात. हल्ली बाजारात छोटया-मोठया, गोल, चौकोनी अशा विविध आकारांच्या कुंडया उपलब्ध आहेत.
गोल कुंडयांची गरज?
वनस्पतीची मुळं ही चक्राकार पद्धतीने वाढतात हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे गोल आकाराच्या कुंडया या वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. कुंडीत वाढणा-या वनस्पतींची वाढ ही मातीत वाढणा-या केशमुळांच्या वाढीवर अवलंबून असते. कुंडीतील माती आणि कुंडीचा आकार हा केशमुळांना पुरक असणं आवश्यक असतं. त्यामुळे तळाशी खूप निमुळत्या असणा-या कुंडया निवडू नये. वनस्पतींच्या मुळांची वाढ योग्य होण्यासाठी कुंडयांच्या तळाचा व्यास आणि वरील व्यास यात एक ते दीड इंचापेक्षा जास्त फरक असणार नाही हे पाहावं.
घराच्या सजावटीसाठी इनडोअर प्लान्ट
हल्ली घरातच लहान कुंडयांमध्ये विविध प्रकारची रोपं लावून घराचं सौंदर्य वाढवलं जातं. इनडोअर प्लान्ट घराच्या सौंदर्यात भर घालतात, त्याचप्रमाणे घरात सुखकारक वातावरण निर्मितीही करतात. घराच्या दिवाणखाण्यातील सोफ्याशेजारी, जिन्यांच्या पाय-यांवर, डायनिंग टेबलवर इनडोअर प्लान्टची कुंडी ठेवून घराची सजावट केली जाते.
घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला लहान कुंडयांमध्ये बोगनवेल, मालती, मनी प्लान्टस अशी झाडं लावून घर सजवू शकता. घरात अथवा गॅलरीत कुंडया ठेवायला जागा नसेल तर प्लास्टिकच्या बास्केटमध्ये शोभेची रोपं लावून ती टांगू शकता. चायनीज पद्धतीने तयार झालेल्या निरनिराळ्या आकाराच्या, रंगांच्या कुंडया बाजारात मोठया प्रमाणावर उपलब्ध झाल्या असून त्याच्यात विविध रोपं लावून घरात ठेवण्याची आजकाल फॅशनच झाली आहे.
कुंडयांची रचना
»  कुंडया नेहमी स्टॅण्डमध्ये वा थोडया उंचावर ठेवाव्यात. यामुळे त्यातील झाडं अधिक आकर्षक वाटतात.
» कुंडयांमध्ये पाणी साचून देऊ नये. तसं झाल्यास मुळं कुजण्याची शक्यता असते.
» विनाकारण कुंडयांची जागा बदलू नये. त्यांना मानवणा-या वातावरणातच त्या ठेवाव्यात.
» झाडांना एकाच बाजूने ऊन मिळत असल्यास उन्हाच्या दिशेने झाडं वाकतात. अशा वेळी कुंडी फिरवून ठेवावी.
» कुंडयांमध्ये लावलेल्या झाडांच्या वाकडया आणि लोंबकळणा-या फांद्या कापाव्यात. कुंडयांमध्ये पिवळी आणि सुकलेली पाने लगेच काढून घ्यावीत.
» पावसाळयात दोन-चार वेळा चांगला पाऊस येऊन गेल्यानंतर कुंडया बदलाव्यात. कुंडीतील माती अति कोरडी किंवा अति ओली असताना झाडे काढू नयेत.
» कुंडीला जास्त दिलेले पाणी निघून जाण्यासाठी खाली छिद्रे असतात. ही छिद्रे लहान असल्यास किंवा नसल्यास खुरपीच्या, विळ्याच्या किंवा खिळ्याच्या टोकाने छिद्र मोठं करावं.
इनडोअर प्लान्टची काळजी कशी घ्याल?
» प्लास्टिकच्या कुंडया या आकर्षक असल्या तरीही यात रोपटी लवकर मरतात. त्यामुळे आधी मातीच्या कुंडीत रोपटं लावावं आणि ते जगल्यानंतर त्याला प्लास्टिकच्या कुंडीत ठेवावं.
» पाण्याची फवारणी करत झाडांच्या पानांची नियमित स्वच्छता करावी.
» वर्षातून एकदा कुंडीतील माती बदलून घ्यावी.
» सूर्याच्या थेट किरणांपासून इनडोअर प्लान्टची सुरक्षा करावी.
» महिन्यातून एकदा बोनमिल पावडर कुंडीत टाकावी.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home