गड-किल्ल्यांचे संवर्धन
काळाच्या ओघात राज्यातील अनेक
वैभवशाली ऐतिहासिक गड-किल्ल्यांपैकी काहींची पडझड सुरू आहे. या
गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करणे आता गरजेचे आहे.

‘‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा’’
महाराष्ट्र हा राकट देश आहे, असे गोविंदाग्रज म्हणतात. अनेक कवींनी, शाहिरांनीही महाराष्ट्राचे वर्णन करताना अशाच आशयाचे काव्य रचले आहे. त्यामागची प्रेरणा म्हणजे आपल्या या महाराष्ट्रातील सह्याद्री आहे. या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभे असलेले कितीतरी गड-किल्ले आहेत.
सह्याद्रीवर कोठेही उभे राहून नजर फिरवली
तर, दर चार-दोन शिखरांआड एखादा गड-किल्ला दिमाखात उभा असलेला आपल्याला
पाहायला मिळतो. यातील बहुतेक दुर्गानी छत्रपती शिवाजीमहाराजांची चरणधूळ
आपल्या मस्तकी धारण केली आहे. या भक्कम गड- किल्ल्यांच्या आधारेच
शिवरायांनी परकीय आक्रमण पचवून धर्माध सत्ताधीशांना नामोहरम केले होते.
महाराष्ट्राला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा
लाभला आहे. अशा ऐतिहासिक वारसांमधून आपल्या महाराष्ट्राच्या पराक्रमाची,
लढवय्या बाण्याची ओळख पटते. राज्याच्या कानाकोप-यात असलेले गड-किल्ले
बघितले तर ही ओळख जास्त अधोरेखित होते. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभे
राहिलेले गड असोत, अथवा समुद्रकिनारी लाटांचा समर्थपणे सामना करत उभे
असलेले हे गड-किल्ले असोत.
ते आपल्या इतिहासाची साक्ष पटवून देतात.
वर्षानुवर्षे अंगावर ऊन, पाऊस, वारा झेलत हे गड-किल्ले आजही सक्षमपणे उभे
आहेत. ते सांगतात, या मातीतील मराठय़ांच्या पराक्रमाच्या गाथा, छत्रपती
शिवाजीमहाराज आणि त्यांच्या मावळय़ांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या गाथा..
मात्र काळाच्या ओघात आता या ऐतिहासिक गड-किल्ल्यांपैकी काही गड-किल्ल्यांची
पडझड सुरू आहे. या गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करणे आता गरजेचे आहे.
त्या दृष्टीने राज्य शासनाने पाऊल उचलले आहे.
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे मूळ
स्वरूपात जतन करणे, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व कायम राखणे तसेच या
किल्ल्यांची दुरुस्ती, संरक्षण-संवर्धन व देखभाल करण्यासाठी गड-किल्ले
संवर्धन समिती नेमण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे
यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या या समितीमध्ये प्रमुख मार्गदर्शक
म्हणून इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकर व पांडुरंग बलकवडे यांची नियुक्ती
करण्यात आली आहे. तसेच समितीमध्ये ऋषीकेश यादव, राजेंद्र टिपरे, राजेंद्र
शेळके, प्रमोद पाटील, भगवान चिले, बी. रा. पाटील, प्र. के. घाणेकर, सचिन
जोशी, प्रफुल्ल माटेगावकर, संकेत कुलकर्णी यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात आहेत तसे आणि तितके किल्ले
जगात अन्यत्र नाहीत. दोन हजार वर्षापूर्वीच्या सातवाहन राजवंशापासून ते
राष्ट्रकूट, चालुक्य शिलाहार, यादव, कदंब, बहमनी, मोगल, दक्षिणी पातशाहय़ा,
मराठे, पेशवे, हबशी, पोर्तुगीज, डच, इंग्रज अशा वेगवेगळय़ा काळातल्या वंश-
धर्माच्या सत्ताधीशांनी या देशात किल्ले बांधले. महाराष्ट्रातील दुर्ग आणि
छत्रपती महाराजांचे एक अतूट नाते आहे. परक्या, धर्माध, जुलमी सत्तांविरोधात
उभे राहून महाराजांनी जनतेला न्याय दिला. जुलमी सत्तेतून त्यांनी
महाराष्ट्र स्वतंत्र केला. त्यासाठी त्यांनी अनेक किल्ले ताब्यात घेतले.
पूर्वी बांधलेल्या किल्ल्यांपैकी काहींची डागडुजी केली. काहींची फेररचना
केली तर राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा, खांदेरी असे काही
किल्ले त्यांनी पूर्णपणे नवीनच बांधले.
तीन महिन्यांत दहा किल्ल्यांच्या दुरुस्तीबाबतचा कृती आराखडा
गड-किल्ले संवर्धन समिती स्थापन केल्यानंतर या समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये राज्यातील ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण अशा दहा किल्ल्यांच्या दुरुस्तीबाबतचा कृती आराखडा प्रायोगिक स्वरूपात ३ महिन्यांत तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सुमारे ३१७ किल्ले आहेत, या किल्ल्यांपैकी ४७ किल्ले राष्ट्रीय संरक्षित असून ते केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहेत.
गड-किल्ले संवर्धन समिती स्थापन केल्यानंतर या समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये राज्यातील ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण अशा दहा किल्ल्यांच्या दुरुस्तीबाबतचा कृती आराखडा प्रायोगिक स्वरूपात ३ महिन्यांत तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सुमारे ३१७ किल्ले आहेत, या किल्ल्यांपैकी ४७ किल्ले राष्ट्रीय संरक्षित असून ते केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहेत.
तसेच ४९ किल्ले राज्यसंरक्षित असून ते
महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या
अखत्यारित आहेत. या किल्ल्यांची जतन, दुरुस्ती व संवर्धनाची कामे योग्य
रितीने व्हावीत यासाठी ती टप्प्याटप्प्याने करणे आवश्यक आहे. त्यासाठी एक
उपसमिती नेमून ऐतिहासिकदृष्टय़ा अधिक महत्त्वाच्या किल्ल्यांपासून याची
सुरुवात करण्याचे या समितीने ठरविले आहे.
गड-किल्ले संवर्धन, दुरुस्तीबरोबरच
राज्यातील किल्ल्यांबाबतचे स्वतंत्र गॅझेट काढणे, दुर्गप्रेमींचे संमेलन
भरवणे, सोयीनुसार जिल्हानिहाय समित्या नेमणे आदी उपक्रमही हाती घेण्याचे
गड-किल्ले संवर्धन समितीने ठरविले आहे.
राज्यातील रायगड हा किल्ला केंद्र
शासनाच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागांतर्गत येतो. तो राज्य
शासनाच्या पुरातत्त्व संचालनालयाकडे देण्यात यावा यासाठी पाठपुरावा करण्यात
येत आहे. तसेच सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी अधिकचा निधी केंद्र शासनाकडे
मागण्यात आला आहे. याशिवाय महाराष्ट्रातील किल्ल्यांचे महत्त्व पर्यटकांना
कळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्य शासनामार्फत रायगड
किल्ल्यावर महोत्सव आयोजित करण्याचा विचार आहे. राजगड हा किल्ला
ऐतिहासिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची
राजधानी असलेल्या या गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधीही आहे.
स्वराज्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा अनेक ऐतिहासिक घटनांचा हा गड
साक्षीदार आहे. त्यामुळेच अशा ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या
रायगडावर शिवकालीन इतिहास दाखविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. इथे येणा-या
पर्यटकांना त्यामुळे इतिहासाची उजळणी होईल आणि या किल्ल्याचे ऐतिहासिक
महत्त्व किती मोठे आहे हेही समजेल.
‘रामचंद्रपंत अमात्य’ या शिवकालीन
मुत्सद्याने शिवराजनीती सांगणारा ‘आज्ञापत्र’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे.
त्यात शिवछत्रपतींच्या किल्ल्यांसंबंधीच्या कल्पना मोजक्या शब्दात
मांडलेल्या आहेत. ‘संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. दुर्ग नसता मोकळा देश
परचक्र येताच निराश्रय, प्रजा भग्न होऊन देश उद्ध्वस्त होतो. देशच
उद्ध्वस्त झाल्यावरी राज्य असे कोणास म्हणावे?.. ज्यापेक्षा राज्यसंरक्षण
करणे आहे, त्यापेक्षा अधिकोत्तर साधनी स्वत: गडकिल्ल्यांची उपेक्षा न
करिता, परम सावधपणे असतील त्या गडकिल्ल्यांची थोर मजबुती करावी.. ज्यास
राज्य पाहिजे त्यांनी गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट
म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बल, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट
म्हणजे आपली वसतीस्थळे, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे
आपले प्राणसंरक्षण असे पूर्ण चित्तात आणून कोणाचे भरवशावर न राहता त्यांचे
संरक्षण करणे व नूतन बांधण्याचा हव्यास स्वत:च करावा. कोणाचा विश्वास मानू
नये..
राज्य संरक्षणाचे मुख्य कारण किल्ले, ते
देशोदेशी स्थळे पाहून बांधावे. किल्ल्यासमीप दुसरा पर्वत किल्ल्यासमुदायी
असू नये. कदाचित असला तरी सुरुंग लावून, पाडून गडाचे आहारी आणावा.. गडाची
इमारत गरजेची असू नये. तट, बुरूज, चिलखत, पाहारे, पडकोट जेथे जेथे असावे,
ते बरे मजबूत बांधावे. नाजूक जागे जे असतील ते सुरुंगादी प्रयत्ने करून
अवजड करून पक्की इमारत बांधून गडाचा आयब काढावा. दरवाजे बांधावे..
किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे. याकरिता गड पाहून, एक-दोन-तीन दरवाजे
तशाच चोरदिंडय़ा करून ठेवाव्या.
त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या
ठेऊन, वरकड दरवाजे व दिंडय़ा चिणून टाकाव्यास..गडास यावयाचे मार्ग असतील ते
सुगम नसावे. सुगम असले तर ते मार्ग मोडून त्यावर झाडी वाढवून आणखीकडे परके
फौजेस येता कठीण असे मार्ग घालावे. या विरहित बलकुबलीस चोरवाटा ठेवाव्यात.
त्या सर्व काळ चालू देऊ नयेत.. गडाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी गडांवर
आधी उदक पाहून किल्ला बांधावा.. पाणी बहुत जतन राखावे गडावरी
राजमंदिराविरहित थोर इमारतीचे घर बांधो नये.. तटोतटी केर कसपट किमपि पडो न
द्यावे.
ताकीद करून झाला केर गडाखाली टाकता,
जागोजागी जाळून ती राखही परसात टाकून घरोघर होईल ते भाजीपाले करावे. तटास
झाड वाढते ते वरचेवरी कापून काढावे. तटाचे व तटाखाली गवत जाळून गड नाहाणावा
लागतो.. गडावरी झाडे जी असतील ती राखावी.’ असे वर्णन रामचंद्रपंत अमात्य
यांनी केलेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या
गड-किल्ल्यांबाबतच्या या कल्पना खरोखरच अद्वितीय म्हणाव्या लागतील. त्यांनी
स्वराज्य स्थापनेसाठी जनत केलेला हा वारसा आता सांभाळण्याची, त्याचे
संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home