Thursday, June 4, 2015

रानपिंगळ्याच्या शोधात

पक्षिमित्र संमेलनाचं सूप वाजलं. पण पक्षिमित्रांसाठी मेळघाटच्या जंगलातली सहल समृद्ध अनुभव देणारी ठरली. दुर्मीळ रानपिंगळ्याचा शोधही या जंगलातच संपला.
२६ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचा एक भाग असलेली एच्छिक सहल महत्त्वपूर्ण पक्षी अधिवास असलेल्या मेळघाटच्या जंगलामध्ये होती. फक्त पन्नास पक्षिमित्रांसाठीच प्रवास व निवासाची व्यवस्था होऊ शकल्यामुळे अनेकांना येता आलं नाही, याची आयोजक म्हणून आम्हाला खंत होतीच. रात्रीचे वनभोजन व मुक्काम सेमाडोह संकुलात होता. आमच्या चमूपैकी राकेश महल्ले, अल्पेश ठाकरे, गौरव कडू तेथील व्यवस्था चोख होईल, यासाठी तैनात होते.
रात्रीच्या वेळी हाडापर्यंत घुसणा-या कडाक्याच्या थंडीत, संकुलामध्ये सर्वानी ब्लँकेट्स व स्लीपिंग बॅग्जच्या उबेत रात्रभर आराम केला अन् भल्या पहाटे उठून सकाळी सहा वाजता सर्व जण पक्षिनिरीक्षणासाठी निघाले. पक्ष्यांची पोटपूजेसाठीची शोधाशोध एव्हाना सुरू झाली होती. गाडया संकुलाकडून कोलखासच्या रस्त्याने लागल्यावर थोडय़ाच वेळात चार-पाच मोरांचा थवा रस्त्याच्या कडेने चरताना सर्वाना दर्शन देऊन गेला. सुरुवात तर चांगली झाली. पुढे सातभाई, टकाचोर, बुलबुल, रॉबिन, हे सामान्य पक्षी अधूनमधून दिसू लागले. गाडय़ा सकाळच्या थंड-बोच-या हवेत डांबरी सडकेने धावत होत्या.
पुढे मुख्य रस्ता सोडून गाडया छोटया रस्त्याला लागल्या, रस्ता अरुंद व खडबडीत असल्याने वेगही मंदावला व थंडी कमी होऊन उन्हाची तिरीप दिसू लागले. पक्षी पाहण्याची ही खरी वेळ होती. गाडीच्या रस्त्याच्या डावीकडे एक पायवाट जंगलात गेली होती. या पायवाटेवर जंगली कोंबडयांचा थवा वाळक्या गवतात झुडपाआडोशाला चरत होता. गाडी थांबली सर्व जण डोळ्याला दुर्बिणी अन् कॅमेरे लावून सज्ज झाले. ओळख पटली. करडा जंगली कोंबडया (ग्रे जंगल फाऊल) होत्या त्या. पक्ष्यांच्या यादीत एकाची भर टाकीत गाडय़ा जेमतेम पुढे सरकल्या. पुन्हा छोटय़ा आकाराच्या जंगली कोंबडय़ांचा थवा. पहिल्यापेक्षा दिसायला वेगळ्या, काहींनी मादी कोंबडय़ा असाव्यात असं म्हटलं, परंतु सोबत असलेले पक्षी अभ्यासक डॉ. राजू कसंबे यांनी त्या रंगीत चाकोत्री (painted sburbow )असल्याचं स्पष्ट केलं. एव्हाना थंडीचा कडाका कमी झाला होता.
उन्हाची कोवळी पिवळी किरणं जंगलावर पसरली होती. गाडया रस्त्याच्या कडेने थांबवून पक्षिनिरीक्षणासाठी सारे खाली उतरले. पायी चालू लागले. गाडय़ांचा आवाज बंद झाल्यामुळे पक्षांचा किलबिलाट अन् काही विशिष्ट आवाज लक्ष वेधू लागले. पक्षिनिरीक्षण सुरू होतं, परंतु सर्वाना आस होता ती अतिदुर्मीळ, नष्टप्राय यादीमध्ये समावेश असलेला व पुनर्शोध लागलेला रानपिंगळा (forest owlet) दिसण्याची. रानपिंगळा दिसतो कसा, कुठल्या झाडावर व किती उंचीवर बसतो, याची माहिती असलेले डॉ. राजू कसंबे, अल्पेश ठाकरे, गौरव कडू, ऋतूजा कुकडे आदी पक्षिमित्र त्याला शोधण्यासाठी शोधक नजर सतर्क ठेवून चालत होते.
तोच समोर जाऊन शोध घेणा-या अल्पेशची नजर रानपिंगळ्यावर पडली. तो रानपिंगळाच आहे हे नक्की होईपर्यंत अर्धा गट तिथपर्यंत पोहोचला होता. उर्वरित गट दुस-या रस्त्याने निघालेला होता. वन्यप्राण्यांच्या अधिवासात आवाज व कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी घेत, सारे जण रानपिंगळा न्याहाळू लागले. दोन- चार जण सोडले तर बाकीचे सर्वच आज प्रथमच रानपिंगळ्याला पाहत होते. घुबड प्रकारातील छोटासा व दिवसा आढळणारा एकमेव व अतिदुर्मीळ घुबडपक्षी पाहून सर्वाच्याच आनंदाला पारावार उरला नाही.
कॅमेरावाल्यांनी पटापट फोटो घेतले. जवळ न जाण्याच्या सूचना अल्पेश देतच होता. पक्ष्याच्या दर्शनाने तृप्त झाल्यावर मग प्रश्न उपस्थित होऊ लागले! हा नर की मादी? याचं खाद्य काय? इत्यादी. राजू कसंबे यांनी त्याच्या पिसांच्या रंगावरून तो मादी पक्षी असल्याचे सांगितले. मग नर कसा असतो? पुन्हा प्रश्न! तिकडच्या रस्त्यातील गटालाही एक रानपिंगळा दिसला असल्याचा निरोप मिळाला, तो नर पक्षी होता मग तिकडचा गट इकडे अन् इकडचा तिकडे, नर कसा व मादी कशी दिसते याचे प्रत्यक्षच उत्तर मिळाले. अन् आणखी गंमत म्हणजे थोडया वेळाने नर पक्षी उडून मादीजवळ आला. सर्व पक्षिमित्रांनी दोघांनाही सोबत न्याहाळले अन् मेळघाटाच्या फेरीचे सार्थक झाल्याच्या भावनेने सारे तिथून परत निघाले.
काही वेळातच सारे जण कोलखास रेस्ट हाऊस परिसरात पोहोचले. गाडय़ा खाली वसंत संकुलजवळ उभ्या करून पदभ्रमण करीत सारे जण सिपना नदीकाठाने वरच्या रेस्टहाऊसकडे चालू लागलेत. रेस्ट हाऊससमोर इंग्रजी ‘एस’प्रमाणे वळणे घेत गेलेली सिपना व त्यापलीकडे दूपर्यंत थेट चिखलद-यापर्यंत दिसणारं जंगल सुंदर भासत होतं. दूरवर एक शिळ वाजली. हवेत घिरटय़ा घालणारा प्रचंड मोठय़ा आकाराचा शिकारी पक्षी नदीवर घिरटया घालीत होता. हवेतच ओळख पटली, मेळघाटातील पक्ष्यांचा सरदार असणारा सर्पगरूड होता तो. त्याचा पंखविस्तार अन् शिकार शोधण्याची हवाई फेरी पाहून नकळत सर्वाच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘‘बापरे – वाह!’’ त्याच्यावर सर्वाच्या नजरा होत्या.
तो खाली शिकारीकडे पाहत नसून एका उंच अर्जुनाच्या झाडाच्या शेंडयावर बसलेल्या दुस-या सर्पगरुडाभोवती त्याच्या फे-या होत्या. साऱ्यांच्या दुर्बिणी अन् कॅमेरे अर्जुनाच्या शेंडय़ावर रोखले गेले. सेमाडोहला परतता परतता दुपार झाली. सेमाडोह संकुलात काळटोप हळद्या, सिरी (nuthatch)) जंगल पिंगळा (जंगल आउलेट), टकाचोर दर्शन देऊन गेले. बाजूच्याच झाडांवर शेकडय़ांनी उलटी लटकलेली मोठी वटवाघुळं (flying foxes) पाहून सारे अमरावतीकडे परतीच्या प्रवासाला निघालो.
आगामी मोहिमा
भैरवगड ट्रेकिंग, क्लायंबिंग कॅम्प
२ आणि ३ फेब्रुवारी २०१३
संस्थेचं नाव : आयसोलेशन झोन
संपर्क : प्रकाश केळशीकर – ९८६९२०४०४१
तैलबैला रॉक क्लायंबिंग, रॅपलिंग कॅम्प
१९ आणि २० जानेवारी २०१३
शुल्क : १६०० रुपये
संस्थेचं नाव : एक्सप्लोर्स
संपर्क : आनंद केंजाळे – ९८५०५०२७२३, ९८५०५०४४३३
जीवधन किल्ला, नाणेघाट गुंफा टेक
२० जानेवारी २०१३
शुल्क : १००० रुपये.
संस्थेचं नाव : एक्सप्लोर्स
संपर्क : आनंद केंजाळे – ९८५०५०२७२३, ९८५०५०४४३३
अलंग-मदन-कुलंग ट्रेक
२५ ते २७ जानेवारी २०१३
शुल्क : १६०० रुपये
संस्थेचं नाव : एक्सप्लोर्स
संपर्क : आनंद केंजाळे – ९८५०५०२७२३, ९८५०५०४४३३
पक्षीनिरीक्षण, निलजे लेक, डोंबिवली
२० जानेवारी २०१३
शुल्क : छोटय़ांसाठी ५० रुपये
मोठय़ांसाठी १०० रुपये
संस्थेचं नाव : बीएनएचएस
संपर्क : इशा प्रधान-सावंत ९५९४९५३४२५

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home