कचरा नकोच!
लहानपणी आपल्याला ‘कचरा करू
नको!’ असा सतत उपदेश ऐकायला मिळायचा. थोरामोठय़ांकडून मिळणा-या या उपदेशाचे
एक प्रकारचे संस्कारच आपल्यावर व्हायचे. आज असे संस्कार होण्याचे प्रमाण
अंमळ कमीच झाले आहे. मात्र, दुस-या बाजूला, कच-याचे प्रचंड वाढत चाललेले
प्रमाण पाहता कचरा करू नको असे कोणी कोणाला सांगायचे? इतकी परिस्थिती
कचरामय झाली आहे.
हवामान
बदलाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आजूबाजूला वाढणा-या कच-याची परिस्थिती
अत्यंत गंभीर बनली आहे. डंपिंग ग्राऊंडच्या आसपास राहणा-या लोकांनी तर
कच-याच्या गाडय़ा परिसरात येऊ देण्याविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

केवळ मुंबईचे उदाहरण घेतले तर या शहरात
दररोज ७००० मेट्रिक टन इतका घनकचरा निर्माण होतो. यापैकी, ५००० मेट्रिक टन
हा घरगुती कचरा असतो. या घरगुती कच-यापैकी १८५० मेट्रिक टन म्हणजे ३७ टक्के
हा ओला कचरा असतो ज्याचे कंपोस्ट खतात रूपांतर होऊ शकते. एका कुटुंबाकडून
दररोज १.०२ किलो ओला कचरा निर्माण होतो. त्यामधून ०.१८२ किलो कार्बन
डायऑक्साईड उत्सर्जित होतो. याचा अर्थ मुंबईत दररोज निर्माण होणा-या १८५०
मेट्रिक टन ओल्या कच-यातून ३,३५६,७०० किलो कार्बन डायऑक्साईड रोज उत्सर्जित
होतो आणि याव्यतिरिक्त, हा कचरा वाहून नेणे, साठवणे यासाठी लागणारी वाहतूक
आणि डंपिंग ग्राऊंडवर साठविलेल्या कच-यातून उत्सर्जित होणा-या मिथेन
वायूचे प्रमाणही प्रचंड असते.
दररोज हजारो टन कचरा साठवून त्याची
विल्हेवाट लावण्याच्या जागेच्या आणि प्रक्रियेच्या मर्यादा आहेत. उपयोगी व
चंगळवादी प्रवृत्तीमुळे कच-याचे प्रमाण अधिकाधिक वाढून विघटनाचा प्रश्न
गंभीर रूप धारण करीत आहे. म्हणून आज आपल्याला ‘कचरा नको’ हेच उद्दिष्ट
ठेवावे लागेल तरच परिस्थिती आटोक्यात येऊ शकेल. प्रत्येक व्यक्ती-समाज-शासन
अशा सर्वानी याबाबत जबाबदारी घेतली पाहिजे. प्रत्येक कुटुंबात रोज निर्माण
होणा-या कच-याचे पद्धतशीर विघटन आणि विल्हेवाट लावणे सुरू झाले तर कच-याची
व्याप्ती आपोआप कमी होईल. खरं म्हणजे आपल्या परिसरातील पालापाचोळा,
भाजीपाल्यातील न वापरलेल्या साली व देठ यांचा उपयोग जिथल्या तिथे खत
बनविण्यासाठी होऊ शकतो आणि अगदी महिन्याभरात या ओल्या कच-याचे विघटन होऊन
खतात रूपांतर झालेले दिसू शकते. आपल्या गावांमध्ये एके काळी सर्रास असलेले
उकिरडे म्हणजे सेंद्रीय खतनिर्मितीचे कारखानेच होते. आमच्या माहितीतील अनेक
शाळा आणि महाविद्यालयांनी या पद्धतीचा वापर करून शाळेत गोळा होणा-या ओल्या
कच-याचे विघटन करून खत बनविण्यास सुरुवात केली आहे.
जी गोष्ट ओल्या कच-याची तीच गोष्ट सुक्या
कच-याची आहे. सुका कचरा हा काच, पत्रा, कागद, प्लास्टिक, लाकूड अशा
वर्गवारीनुसार वेगळा केला तर त्यावर पुन्हा प्रक्रिया करून त्यापासून
हलक्या दर्जाची उत्पादने तयार करता येतात. आजही आपल्याकडे येणारे भंगारवाले
हे याच प्रक्रिया उद्योगातील भागीदार आहेत. घराघरातून फक्त रद्दी कागद
गोळा करून त्याच्या विक्रीतून आलेली रक्कम त्याच परिसरातील मुलांसाठी
वाचनालय सुरू करण्यासाठी वापरण्यात आल्याचेही उदाहरण आहे. दुस-या भाषेत
सांगायचे झाले तर कचरा म्हणजे एक प्रकारची दुर्लक्षित संपत्तीच जणू!
उत्खननात सापडलेल्या प्राचीन सिंधू
संस्कृतीचे अवशेष आपल्याला एका पर्यावरणपूरक नगररचनेच्या वारशाची ओळख करून
देतात. अशी कल्पना केली की, मुंबई शहर काही कारणाने जमिनीत गाडले गेले आणि
हजारो वर्षानंतर त्याचे उत्खनन झाले तर डंपिंग ग्राऊंडवरील अविघटनशील
कच-याचे ढीग व तुंबलेली गटारेच सापडतील ना? आपण कोणता वारसा येणा-या
पिढीकडे सोपवू इच्छितो?
ओल्या कच-यातून खतनिर्मिती
ओला कचरा म्हणजे आहारातील फळे व
भाजीपाल्याच्या साली, देठ, पानं, खरकटे अन्न, इ. टाकून दिलेला भाग! या
कच-यावर सूर्यप्रकाश, हवा, पाणी आणि सूक्ष्मजीवाच्या संयोजनातून घडणा-या
प्रक्रियेतून सेंद्रीय खत (कंपोस्ट खत) तयार करता येते. मुंबईतील गोरेगाव
येथील प्रज्ञाबोधिनी हायस्कूलने शाळेच्या गच्चीवर ‘मंथन’ या नावाने
खतनिर्मिती प्रक्रिया चालवली आहे. नाशिकमधील अभिव्यक्ती संस्थेच्या
अर्थकेअर डिझाइन्सने तयार केलेल्या खतनिर्मिती यंत्राचा (छिद्र असलेले व
एकमेकांना जोडलेले दोन ड्रम) वापर करून या शाळेने ओल्या कच-यापासून खत तयार
केले. यासाठी पुढीलप्रमाणे पद्धत वापरण्यात आली :-
प्रथम वरचा ड्रम पूर्णपणे भरेपर्यंत
त्यामध्ये नियमितपणे ओला कचरा टाकत राहणे. कचरा जास्त ओला असल्यास थोडा
लाकडाचा भुसा पसरणे किंवा खूप सुका असल्यास थोडे पाणी शिंपडणे आणि दर
आठवडय़ाने ड्रम खाली-वर फिरवून (हवा खेळती राहण्यासाठी) पुन्हा जागच्या जागी
आणणे. वरचा ड्रम ओल्या कच-याने भरल्यावर त्याला खालच्च्या बाजूला फिरवून
त्यामधील कचरा विघटनासाठी महिनाभर बंद करून ठेवणे आणि खालचा ड्रम वर घेऊन
त्यामध्ये कचरा टाकण्यास सुरुवात करणे. या प्रकारे दुसरा ड्रम कच-याने
पूर्ण भरेपर्यंत पहिल्या ड्रममधील कच-याचे विघटन होऊन त्याचे खतामध्ये
रूपांतर झालेले दिसते.
गच्चीवरील शेती
कालपरवापर्यंत जिथे गाव होते तिथे आज शहरे
वाढत आहेत. सिमेंट- काँक्रीटच्या इमारती, विषारी धूर ओकणारे कारखाने,
झोपडपट्टय़ा, डांबरी रस्ते, तुंबलेली गटारे, कच-याचे ढीग यामध्ये झाडे
लावण्याच्या जागाच आक्रसून गेल्या आहेत. मात्र अशा ठिकाणी काही वेगळ्या
जागा उदा. घरातील गॅलरी आणि इमारतीची गच्ची वृक्षारोपणासाठी वापरता येऊ
शकते ही कल्पना हळूहळू समाजात रुजत आहे. जशी गावातील घरांमागे परसबाग
असायची तशीच ही आधुनिक परसबागच जणू! आता तर गच्चीवरील शेती ही लागवडीची एक
शास्त्रशुद्ध पद्धत विकसित होत आहे. प्रत्यक्ष करायला लागल्यावर खूपच सोपी
वाटावी अशीच ही गोष्ट आहे.
आपल्या दैनंदिन जीवनातील भाजीपाल्याचा ओला
कचरा सुरुवातीलाच वेगळा साठवायचा. घरगुती कच-यातील ४० टक्के हिस्सा या
ओल्या कच-याचा असतो जो जैविकदृष्टय़ा विघटनशील असतो. या कच-याचे खत बनवून,
त्याचा उपयोग करून वनस्पतींची लागवड करता येते. बाल्कनी, गच्ची, अंगण, इ.
जागी आपल्याला फळे किंवा भाज्या लावता येतात. ओल्या कच-याचा स्थानिकरीत्या
विनियोग केल्याने कचरा उचलण्यासाठी लागणारी मनुष्यशक्ती आणि वाहतूक खर्च
यांमध्ये बचत होऊन पर्यावरणाची हानी कमी होते. प्लास्टिकच्या पिशव्या,
फुटके डबे, बादल्या, खोके, ड्रम, कोल्ड ड्रिंक्सच्या मोठय़ा बाटल्या, मोठे
टाकाऊ पाईप, इ. वस्तूंचा वापर होतो, त्यामुळे कचरा व्यवस्थापनावर पडणारा
ताण कमी होतो. या वस्तूंमध्ये पालापाचोळा, लहानसहान फांद्या, विटांचे लहान
तुकडे, नारळाचा काथ्या या सेंद्रीय गोष्टींचा तळाला वापर करून त्यावर
मातीचा ४ सें.मी. थर पसरून वांगी, मिरची, पालक, मेथी, टॉमेटॉ, इ.
भाज्यांच्या बिया पेरून शेती करायला सुरुवात करता येईल. इतकंच नव्हे तर
फुलपाखरांना आकर्षित करणा-या वनस्पती, फळ झाडं, औषधी वनस्पती यांचीही लागवड
करता येऊ शकते.
(सौजन्य- वसुंधरा संवर्धन अभियान आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई)
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home