निसर्गनिर्मित अद्भुत‘रांजण-खळगे’
निसर्गाची अदाकारीच न्यारी
असते. डोळे उघडे ठेवून जर आपण निसर्ग पाहिला तर तो नवलाईनेच भरलेला दिसून
येईल. आपण आधुनिकतेच्या कितीही गप्पा मारल्या तरीही माणूस हा निसर्गापुढे
नेहमीच दुबळा वाटत आला आहे. निसर्ग त्याचे अस्तित्व हे नेहमीच दाखवून देत
असतो. कधी तो रौद्र रूप दाखवून माणसाला त्याची जागा दाखवून देतो तर
स्वत:च्या सुंदर रूपाने माणसाला मोहीत करीत असतो. म्हणूनच जेव्हा भवतालच्या
श्रेष्ठ कलाकुसरींबाबत जेव्हा चर्चा होत असते, तेव्हा आपसुकच त्यात
नैसर्गिक कलाकृती ओघाने पहिल्याच येतात.

निसर्गाकडून तयार झालेल्या सा-याच कलाकृती
या अवाढव्य आणि डोळे विस्फारणा-या आहेत. आपण सहयाद्रीच्या डोंगररांगांकडे
गेलो की, या जास्त ठळकपणे समोर येतात. मग आपलीही बोटे आश्चर्याने तोंडात
जातात.
मानवाच्या शक्यतेपलीकडच्या या कलाकृती
निसर्गाने तयार केल्या आहेत त्या विशेष आयुधांनी! एखाद्या मानवी
शिल्पकाराकडे ज्याप्रमाणे छन्नी, हातोडा वगैरे साधनसामग्री असते, तसेच
निसर्गाकडे पाणी, हवा, अग्नी अशी पंचमहाभुतांनी भरलेली वेगळी पण
वैशिष्टय़पूर्ण आयुधे आहेत. या आगळ्यावेगळ्या शस्त्रास्त्रांनी निसर्गाने
सा-या जगाला हेवा वाटावा, अशा कलाकृती निर्माण केल्या आहेत.
उदाहरणच द्यायचे झाले तर अहमदनगरमधील धडकी
भरवणारी सुप्रसिद्ध सांधण व्हॅली आहे, पुणे जिल्हयातील मुळशी तालुक्यात
असणारी ‘तैल-बैल’ या जोड डोंगराच्या भिंती आहेत, याशिवाय
डोंगर-पर्वतांमध्ये तयार झालेल्या सुंदर घळी, कपारी तर आहेतच, बुलडाण्यातील
लोणार सरोवरदेखील आहे. या अन् कैक कलाकृती निसर्गाच्या पोटातूनच बाहेर
पडल्या आहेत.
विशेष म्हणजे या सा-या कलाकृतींना
पर्यटनाबरोबरच विज्ञानाचीही झालर चिकटलेली दिसून येते. म्हणजेच ही ठिकाणं
पाहणं म्हणजे ज्ञानार्जनाचाही ‘बोनस’ ठरतो. हे सारे काही हवेहवेसे अन्
अनुभवावे असेच आहे. अशाच पंक्तीतले एक सुंदर ठिकाण म्हणजे पुणे आणि नगर
जिल्हयाच्या सीमेवरून वाहणा-या कुकडी नदीतील निसर्गनिर्मित आश्चर्य असलेले
रांजणखळगे! हे रांजणखळगे म्हणजेच ‘पॉट होल्स’ इतक्या संख्येने जगात
आपल्याला इतर कुठेही पाहायला मिळणार नाही.
पुणे जिल्हयातील शिरूर तालुक्याच्या शेवटी
टाकळीहाजी नावाचे गाव आणि नगर जिल्हयातील पारनेर तालुक्याचे निघोज गाव, या
दोघांच्या सीमेवरून कुकडी नावाची नदी वाहत गेलेली आहे. या कुकडी नदीच्या
दोनही काठावर बसॉल्ट खडक आहे. या खडकातच निसर्गाचा अद्भुत आविष्कार आपली
वाट पाहत उभा आहे.
कुकडी नदीच्या काठावर उभे राहिले की मग हे
रांजणखळगे आपल्याला खुणवायला लागतात. डोळे थकून जातील पण मन भरणार नाही,
इतके रांजणखळगे येथे निर्माण झाले आहेत. वेगवेगळ्या आकारांचे, उंचीचे,
खोलीचे, कमी-जास्त जाडीचे, एकमेकांत मिसळलेले हे रांजणखळगे जणू काही
भूतलावरचे अनोखे शिल्पसमूहच वाटतात.
तसे पाहिले तर या निर्मितीमागेही एक
विज्ञान दडलेले आहे. नदीने वाहून आणलेले दगड-गोटे हे या बसॉल्ट खडकावरील
छोटया भेगांत अडकले जातात. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगड गोटे याच
भेगांत जोराने फिरल्यामुळे तिथे गोलाकार खड्डे तयार होतात.
या प्रक्रियेला काही थोडकी वर्षे नव्हे तर
हजारो वर्षे जावी लागतात. हजार वर्षानंतर या छोटया भेगा रांजणासारख्या
खड्डयांचे रूप घेऊन दिसतात आणि हे विज्ञान समजले की मग हे ठिकाण आणखीनच
प्रेक्षणीय वाटायला लागते.
कुकडी नदीच्या दोन्ही तीरांना जोडणारा
झुलता पूलदेखील बांधण्यात आला आहे. त्यामुळे हा पूलदेखील पर्यटकांसाठी
विशेष आकर्षण बनला आहे. या पुलावरून रांजणखळगे पाहणे म्हणजे भटकंतीचा
उत्कर्ष बिंदूच ठरायला हरकत नाही.
कुकडी नदीतील या रांजणखळग्यांचे महत्त्व
ओळखून अनेक पर्यावरणप्रेमींची, संशोधकांची, विज्ञान अभ्यासकांची पावले इकडे
वळत असतात. आपणही भटकंतीला विज्ञानाच्या किमयेची जोड देऊन येथे वाट वाकडी
करायला हरकत नाही. कारण नेहमीचीच, सरावाची, भटकंतीची ठिकाणे पाहण्यापेक्षा
अशी निसर्गाने तयार केलेली व उच्च निर्मितीमूल्ये असलेली ठिकाणे पाहणे हे
केव्हाही ज्ञानात भर घालणारं असतं.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home