Tuesday, June 16, 2015

इंदोरेच्या वाटेने कळसूबाई

संदीप, तुषार आणि संकेतने तुफान वा-या-पावसात कळसूबाईच्या ५,४०० फूट उंचीच्या शिखरावर इंदोरेच्या अतिशय बिकट वाटेने चढण्याचं आव्हान लीलया पेललं. त्या थरारक अनुभवाचा वृत्तांत
 
ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वाहणा-या वा-याच्या झंझावातात उडून जाऊ की काय, अशी भीती वाटत होती. अंगावर पडणारे पावसाचे टपोरे थेंब बाभळीच्या काटयासारखे टोचत होते. यातच भर म्हणून की काय धुकं एवढं होतं की, समोरच्या दहा फूट अंतरावरसुद्धा दिसत नव्हतं. आम्ही एवढी वर्ष सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग करत आहोत, पण त्या दिवशी पहिल्यांदाच सह्याद्रीचं हे रौद्र रूप ‘याची देही याची डोळा’ पाहिलं. अशा या भयावह वातावरणात मी, संकेत आणि तुषार, इंदोरे रूटच्या अवघड वाटेवरून कळसूबाई शिखर चढत होतो.
अंदाजे ४ हजार फुटांवर आम्ही अतिशय तीव्र चढण चढताना कधी तुषार तर कधी संकेत रूट ओपन करत होते. प्रत्येक पाऊल अतिशय तोलून-मापून टाकत होतो. एक छोटीशी चूकसुद्धा इंदोरेच्या तीव्र खोल दरीत फेकले जाण्यामध्ये परिवर्तित झाली असती. आम्ही योग्य दिशेने जात आहोत की नाही, याचीसुद्धा कल्पना येत नव्हती. एव्हाना आम्हाला आपण कळसूबाईच्या धुक्यात हरवले असल्याची जाणीव झाली होती.
कळसूबाई हे ५,४०० फूट उंचीचं महाराष्ट्रातील सगळय़ात उंच शिखर. नगरमधील बारी गावातून कळसूबाईला जाण्यासाठी चांगली वाट आहे. या वाटेवर गावातील लोकांनी ठिकठिकाणी लोखंडी शिडया लावून चढणं थोडं सोपं केलं आहे, पण नेहमीच आडवाटा धुंडाळणं हा आमचा शिरस्ता असतो. त्यानुसार नाशिकमधील इंदोरे गावातील अवघड  वाटेवरून कळसूबाई चढण्याचं ठरवलं. सर्व तयारीनिशी आम्ही आदल्या दिवशी रात्री इगतपुरीला निघालो. मध्यरात्री तीन वाजता उतरलो. इंदोरे गावाला जाणारी बस पहाटे ६ वाजता असल्यामुळे इगतपुरी स्टेशनवरच दोन तास पहुडलो. पहाटे साडेपाचला तुषारने उठवलं. आम्ही डोळे चोळतच उठलो. गरमागरम चहाचा झुरका मारला. अहा..! तो एक स्वर्गीय आनंदच होता.
पहाटे सहाच्या सुमारास इंदोरेसाठी बस पकडली. रिमझिम रिमझिम पाऊस सुरूच होता. सकाळी सातच्या दरम्यान इंदोरे गावात उतरलो आणि आळस देत सभोवतालच्या निसर्गाकडे नजर टाकली. चहूबाजूला फक्त हिरवेगार डोंगर होते. ते पाहून आमचा आळस कुठे पळून गेला हे कळलंच नाही. असं वाटलं की, हा हिरवागार डोंगर म्हणजे एखादी नवी नवरी हिरवागार शालू लेवून बसली आहे.
संकेतच्या हाकेसरशी माझी तंद्री भंगली. मी त्यांच्याबरोबर गावाच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. तेवढयात तुषारने ‘कळसूबाई’ नावामागची आख्यायिका सांगितली. पूर्वी या शिखराच्या खालच्या गावात कळसूबाई नावाची एक अनाथ मुलगी राहत होती. बिचारी अनाथ असल्यामुळे सगळय़ांच्या घरची धुणी-भांडी करायची. कोणी देईल ते खायची. सगळे गावातले लोक तिला हिडीस-फिडीस करायचे. एके दिवशी ती सगळय़ांच्या त्रासाला कंटाळून या उंच शिखरावर आली आणि देवीची प्रार्थना करत बसली. तिला देवी प्रसन्न झाली. पुढे गावक-यांनी इथे देवीचं मंदिर बांधलं अणि तिच्या नावावरूनच मंदिराला ‘कळसूबाई’ असं नाव दिलं.
एव्हाना आम्ही बोलत-बोलत मुख्य रस्त्यावरून इंदोरे गावात पोहोचलो. गावक-यांशी बोलून आम्ही आमचा चढणीचा मार्ग आखला. सुरुवात केली. थोडासा पाऊस होता, पण मजा येत होती. या भागात आंबा, जांभूळ, कडुनिंब सर्व प्रकारची झाडं आढळली. सुरुवातीचा टप्पा ओलांडून वर गेलो तसं खालच्या भागातील गावाचं दृश्य विहंगम वाटत होतं. हळूहळू आकाशात ढगांची रेलचेल वाढली. खूप काळोख पडला. असं वाटलं की, आता भरपूर पाऊस पडणार आणि तेवढयात रिप-रिप रिप.. करत जोरात पासाला सुरुवात झाली वारासुद्धा जोराने वाहू लागला. धुक्यामुळे दिसायचंही थोडं कमी झालं. आधीच कळसूबाई शिखर धुक्यात हरवलं होतं आणि आता आम्हीही.
चिंब भिजलेल्या शरीरावरून पाणी निथळत होतं. हात थरथर कापत होते. निसर्गाने असं आक्राळ-विक्राळ रूप दाखवलं होतं. अशा परिस्थितीतही आम्ही खंबीरपणे ४ हजार फुटांवरील चढण पूर्ण केली. आणि वरच्या पठारावर पाऊल ठेवलं, तेव्हा मी जे पाहिलं त्यावर माझाच क्षणभर विश्वास बसला नाही. माझ्यासमोर निरनिराळया रंगांच्या फुलांचा जणू काही गालीचा होता. हिमालयातील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ची आठवण झाली. पावलापावलावर बदलणारा निसर्ग हीच कळसूबाईची खरी ओळख आहे. याची प्रचिती आम्हाला आली. परंतु ताशी ८०-९० किलोमीटर वेगाने वाहणारा वारा चालू देत नव्हता. बोचऱ्या पावसात डोळेसुद्धा उघडता येत नव्हते. आम्ही एक मोठा दगड बघितला आणि त्याच्या आडोशाला बसालो. वारा, पाऊस आणि धुकं अशा भयंकर परिस्थितीत आम्ही अडकलो. कळसूबाई कुठे आहे? कुठलीच वाट दिसत नव्हती. परत जायचं म्हटलं तर ती वाटसुद्धा धुक्यात गुडूप झाली होती.
आम्ही तिथेच दगडाच्या आडोशाला अर्धा तास बसून बिस्किटं खाल्ली. एकमेकांचं मनोधैर्य वाढवून पुन्हा उभे राहिलो आणि अंदाजे एक वाट पकडून वा-याशी झुंजत वर चढत राहिलो. बरीच चढाई केल्यानंतर हळूहळू लोकांचा आवाज येऊ लागला. मंदिराच्या जवळपास पोहोचल्याची जाणीव झाली. पूर्ण त्वेषाने चढाई केली. आता फक्त एक सरळसोट दगड होता. वर मंदिर दिसत होतं. आम्ही ते दगडातील चिमनी क्लायंबिंग करून वर चढलो. एकच जल्लोष झाला. तिघांच्याही चेह-य़ावरून आनंद ओसंडून वाहत होता. तो आनंद होता धेयपूर्तीचा आणि जीव वाचल्याचाही..
आम्ही तिघंही मंदिरात गेलो. देवीची पूजा केली आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाणी येऊन आमच्या ‘अबॅरंट वाँडरर्स’ (www.aberrantwanderers.com) या साहसी ग्रुपचा संकल्प केला. तिघंही खूप आनंदी होतो. मला शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतलेल्या प्रसंगाची आठवण झाली. अशा रीतीने आमच्या ‘अबॅरंट वाँडरर्स’ या साहसी ग्रुपची प्रतिकूल परिस्थिती ऐतिहासिकरीत्या कळसूबाई शिखरावर स्थापना झाली. बोच-या थंडीमुळे जास्त वेळ वर राहणं शक्य नव्हतं.
थोडा वेळ मंदिरात घालवल्यानंतर आम्ही बारीच्या वाटेने खाली उतरण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशीच्या सर्व घटनाक्रमांमुळे आम्ही तिघंही वेगळय़ाच विश्वात होतो. आम्ही वा-याच्या वेगाने खाली उतरत होतो, तेव्हा अनेक जण वर येत होते. आमचा उतरण्याचा वेग पाहून बरेच जण आश्चर्यचकित होत होते. अबॅरंट वाँडरर्स निमित्ताने आम्ही अ‍ॅडव्हेंचरच्या नव्या पर्वाला सुरुवात केली होती. दिवसभरातील घटनाक्रमाने मन भारावून गेलं होतं. खाली उतरल्यानंतर नम्रपणाने सह्याद्रीला नमन करून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला, पण मन अजूनही कुठेतरी धुक्यात हरवलं होतं.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home