Monday, June 29, 2015

|

आनंदाचे आगार

सह्याद्रीतील ‘वर्षा पर्यटन’ म्हणजे निसर्गाचा हळवेपणा, प्रेमळपणा आणि थरार! अनेक रोमहर्षक अनुभवांची जाणीव करून देणारा. वा-याच्या झुळुकीबरोबर धुक्याची चादर ओढली जाऊन सर्वच अदृश्य झाल्याचा आनंद मिळतो, तो याच पावसाळयात. पावसाच्या येणा-या सरीवर सरी सुरूच असतात. निरव शांततेतही आपली बडबड चालूच ठेवत खळाळणारे ओढे, तर शुभ्र तुषार उडवत ओतणारे धबधबे म्हणजे निसर्गाची स्पंदनेच होय. या जाणिवा ओळखण्याची ज्याच्यात ताकद असेल, तोच ख-या अर्थाने वर्षा पर्यटनाचा आनंद लुटू शकेल.
maxresdefaultओल्या मातीचा नाकाला झोंबणारा गंध पावसाच्या येणा-या सरीबरोबर विरळ झाला. तहानलेल्या सृष्टीने आपली तृष्णा शमविली आणि नवे रूप धारण केले. नेत्रसुख देणारे अनोखे सौंदर्य संपूर्ण सह्याद्रीला परिधान करून निसर्गाने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. शुभ्र स्फटिकांच्या माळा सह्याद्रीने धारण कराव्यात, असे दृश्य कोसळणा-या धबधब्यांमुळे दिसू लागले आहे.
भूतलावरील दुसरा स्वर्ग अशीच या सौंदर्याची व्याख्या करावी लागेल. या सौंदर्याचे मुख्य आकर्षण असलेले धबधबे पर्यटकांना सुखावणारे पिकनिक स्पॉट ठरले आहेत. विकेंडची मेजवानी ठरणारे हे धबधबे जसे घाटमार्गावर आहेत, तसेच सह्याद्रीच्या कुशीत वावरणा-या अनेक गावांतही आहेत. पावसाळयातले रविवार धबधब्यांच्या सहवासातच आता संपू लागले आहेत.
सह्याद्रीतील ‘वर्षा पर्यटन’ म्हणजे निसर्गाचा हळवेपणा, प्रेमळपणा आणि थरार! अनेक रोमहर्षक अनुभवांची जाणीव करून देणारा. वा-याच्या झुळुकीबरोबर धुक्याची चादर ओढली जाऊन सर्वच अदृश्य झाल्याचा आनंद मिळतो, तो याच पावसाळयात. पावसाच्या येणा-या सरीवर सरी सुरूच असतात. निरव शांततेतही आपली बडबड चालूच ठेवत खळखळणारे ओढे, तर शुभ्र तुषार उडवत ओतणारे धबधबे म्हणजे निसर्गाची स्पंदनेच होय. या जाणिवा ओळखण्याची ज्याच्यात ताकद असेल, तोच ख-या अर्थाने वर्षा पर्यटनाचा आनंद लुटू शकेल.
रामघाट, अंबोली, फोंडाघाट, करुळ, भुईबावडा या घाटमार्गावर बहुतांश धबधब्यांची भेट होते. यापेक्षाही अनेक सुंदर धबधबे नैसर्गिक कलाकृती बनून वाहत आहेत. सावडाव, सैतवडे, शिराळे, नापणे अशा नामवंत धबधब्यांसह कुंभवडे, शिवापूर, रांजणगड अशा अनेक गावांतून हे शुभ्र स्फटिक ओतताना दिसतात.
गडद हिरव्या रानात व काळयाभोर खडकावरून कोसळणारे हे धबधबे आपली ओळख पाहणा-यांच्या हृदयापर्यंत पोहोचतात. फोंडाघाटातून पावसाच्या हलक्या सरीबरोबर घाट चढताना भेटणारे धबधबेही आपली अशीच ओळख सांगत आहेत.
आंबोली घाटात दरडीमुळे सुंदर अशा आंबोलीला दृष्ट लागल्यासारखी झाली आहे. घाटमार्गाच्या कडेलाच कोसळणारे धबधबे जसे आंबोलीत आहेत, तसेच ते फोंडाघाटातही मोठया प्रमाणात आहेत. दाजीपूरच्या अभयारण्याची हद्द संपते तेथेच फोंडाघाटाची खिंड कोकणातून येणा-या प्रवाशाचे स्वागत करते.
श्री देवी उगवाईचा आशीर्वाद याच ठिकाणाच्या एका वळणावर मंदिराच्या कळसाचे दर्शन होताच मिळतो. कारवीची हिरवीगर्द झालेली झुडपे एकाच उंचीवर समांतर उभी राहून नवागतांचे स्वागत करण्यास तिष्ठत असल्याचा आभास होतो. रस्त्यावरच्या प्रत्येक वळणावर धबधब्याचा भयंकर असा ऐकू येणारा आवाज आपली भयानकता सांगत असला तरी प्रत्यक्षात मात्र तो अधिकच सुकुमार वाटतो.
अंगावर थंड पाण्याचे तुषार पडताच देहभान हरपून जावे व त्या निसर्गाशी एकरूप होऊन संसाररूपी व्यवहारातील दडपण झुगारून देण्याची गुर्मी निर्माण होते. अचानक स्फूर्ती निर्माण होऊन ओतणा-या त्या धबधब्याशीच स्पर्धा करावी, असे वाटू लागते. वाहणा-या या झ-याचे मूळ शोधण्याची इच्छा मनी निर्माण होते, असे हे शक्तिस्थान थंड पाण्याच्या त्या शुभ्र तुषारांत आहे.
फोंडाघाटातून पुढे जाताना ठिकठिकाणी दिसणारे हे धबधबे हे शिवशंकराच्या मस्तकावरील गंगेचे अंश असावेत, असेच वाटतात. काळया दगडातून वाट काढत धावतानाही ते पाण्याची निळाई दाखवून देत नाहीत.
निसर्ग हा नेहमीच अनोख्या सौंदर्याची उधळण करत असतो. वसंतात जशी विविध रंगांची फुले बहरतात, तशी मृग नक्षत्राच्या सुरुवातीपासूनच जमिनीतून वर येणा-या कोंबांनी व नव्याने येणा-या पालवीमुळे डोंगर चित्रांकित झालेले दिसतात आणि या गडद पोपटी रंगामुळेच धबधब्यांची ओळख ठासून भासत असते. वा-याचा जोराचा प्रवाह सह्याद्रीवरून कोसळणा-या या धबधब्यांना अनेक वेळा उलट दिशेला फिरवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतो, मात्र असे प्रयत्न विफल ठरवत धबधबे नित्यनेमाने कोसळतच असतात.
कधी तरी पावसाचा जोर वाढला आणि पाण्यात गढुळता आली तरच त्याची शुभ्रता मलीन होते. अन्यथा, स्वत:ला मलीन होऊ न  देणारे हे धबधबे आनंदाचे आगार बनून वाहत असतात. आंबोली घाटातील वर्षा पर्यटन आणि धबधब्याखाली उभे राहून स्नानाचा आनंद घेणे पर्यटकांना धोक्याचे वाटू लागल्याने फोंडाघाट मार्गावरील या धबधब्यांना पर्यटकांनी ‘विकेंड एन्जॉय स्पॉट’ बनवले आहे.
हाच पाऊस ज्येष्ठातून, पौष, माघ नक्षत्राकडे जाताना खळखळणा-या धबधब्यात नवा जोश निर्माण करतो. वातावरणातील गारवा अधिकच वाढवतो आणि सरीवर सरी येण्याच्या थांबल्या तरी झाडांच्या पानावरून व खोडावरून टप् ऽ टप् ऽऽ टपकणा-या पाण्यातून आपले अस्तित्व सांगत असतो. अशा या सह्याद्रीत वाळून गेलेला पाचोळा पावसाच्या धारेबरोबर कुजू लागला व खेकडयाच्या छोटया पिल्लांना आधार देत वाढवू लागला आहे.
अंकुरलेल्या शेंडवेली, करांदे, घोटा, वेठ यांच्या वेली मिळेल त्याला कवेत घेत वाढू लागल्या आहेत. आपल्या उथळ पानावरील गुलाबी तपकिरी रंग बदलून त्यावर पोपटी रंगाची झळाळी मिळत आहे. या रंगसंगतीतूनच सह्याद्री नव्या रंगाचा नवा साज पांघरून निसर्गप्रेमींना साद घालतो आहे.
सह्याद्रीतील पाऊस आणि त्या ठिकाणी ओतणारे शुभ्र धबधबे ही संकल्पनाच गिरीभ्रमण करणा-यांना सुखावणारी आहे. अशा या सिंधुदुर्गातील सह्याद्रीतील उंच टेकडय़ांवरून अनेक धबधबे कोसळतात. अशा गार पाण्याच्या धबधब्याखाली उभे राहून आंघोळ करण्याचा आनंद म्हणजे स्वर्गसुखाची अनुभूतीच होय.
सिंधुदुर्गात पावसाळी पर्यटकांनी आकर्षित करणारे आंबोली, फोंडाघाट, दोडामार्ग-आंबेली, गगनबावडा, सावडाव, नापणे अशी अनेक स्थळे आहेत. पावसाळयाचे चार महिने हे धबधबे ज्या जोशाने वाहतात; तोच जोश व धुंदी या ठिकाणी येणा-या पर्यटकाला मिळत असते आणि म्हणूनच या सह्याद्रीच्या कुशीत धाव घेणा-या पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
जागतिक स्तरावर जैवविविधतेने नटलेल्या या सिंधुदुर्गाला लाभलेली ही निसर्गशोभा अनुभवण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही पर्यटकांच्या पाऊलखुणा सह्याद्री भागात दिसू लागल्या आहेत. अनेक साहसी पर्यटकांकडून या डोंगरद-या सर करण्याचा चित्तथरारक विक्रम केला जातो. सिंधुदुर्गाचा सह्याद्री आपली वेगळी ओळख निर्माण करताना या ठिकाणची जैवविविधता पावसाच्या प्रत्येक थेंबाप्रमाणे जपत आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home