Tuesday, June 30, 2015


आधी शिक्षण मंडळाचा कारभार सुधारा;
मगच शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करा!
नगरसेवकांनी काढले अधिकार्‍यांचे वाभाडे

ठाणे, दि. २९ (प्रतिनिधी) - शिक्षकांची कमतरता.. शाळांच्या इमारतींची दुर्दशा.. झपाट्याने कमी होणारी पटसंख्या, विद्यार्थ्यांना अद्यापही शालेय वस्तूंचे न झालेले वाटप अशी परिस्थिती असताना शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची घोषणा आज महासभेत करण्यात आली. त्यामुळे नगरसेवकांनी संतप्त होऊन आधी शिक्षण मंडळाचा कारभार सुधारा आणि मगच शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करा, अशा शब्दात प्रशासनाला सुनावले. तसेच अधिकार्‍यांचे वाभाडे काढून त्यांच्या कारभारावरही जोरदार टीकास्त्र सोडले.
महापालिकेचे सचिव मनीष जोशी यांनी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याबाबतचे राज्य सरकारचे परिपत्रक वाचण्यास सुरुवात केली तेव्हा नगरसेवकांनी एकच गोंधळ केला. राष्ट्रवादीच्या नगरसेविका साळवी यांनी विद्यार्थ्यांची शाळा सुरू होऊन एक महिना होत आला तरी त्यांना अद्याप शालेय वस्तू मिळाल्या नाहीत असा आरोप केला. एवढेच नव्हे तर आधार कार्ड नसल्यामुळे मुलांना शाळेत बसण्याची परवानगी नाकारली जात असल्याचेही सांगितले. शिवसेनेचे नगरसेवक सुधीर भगत यांनी तर विद्यार्थ्यांना महापालिका शाळेत प्रवेश नाकारला जात असल्याची बाब निदर्शनास आणली. शिक्षक तसेच मुख्याध्यापिका वेळेवर येत नाहीत अशी स्थिती असताना सर्वेक्षण कशासाठी, असा सवाल मीनाक्षी शिंदे यांनी केला.
नगरसेविका मालती पाटील यांनी सांगितले की, महापालिका शाळा क्रमांक १६ मध्ये पहिल्या दिवशी १६० मुले होती. आता ही संख्या कमी होत असून तेथे इतिहास विषय शिकविण्यास दोन वर्षांपासून शिक्षकच नसल्याचे सांगितले. महापालिकेच्या शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती केली नसून कारभार ठप्प झाल्याचा आरोप अनेक नगरसेवकांनी केला. हिंदी व इंग्रजी शाळांच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून मराठीचा पट मात्र कमी होत असल्याचे महापौर संजय मोरे यांनी सांगितले. महापौरांच्या या विधानावरून सभागृहात बराच वेळ गदारोळ झाला.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
महापालिका सभागृहात शिक्षण मंडळाच्या कारभारावर चर्चा सुरू असताना कॉंग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी शिक्षण मंडळातील सुरक्षारक्षकांच्या पगारात झालेल्या कथित भ्रष्टाचाराबाबत भाष्य केले. तसेच महापौर संजय मोरे यांच्यावरही आरोप केले. सदर कथित भ्रष्टाचाराची फाईल अतिरिक्त आयुक्तांच्या टेबलावर तीन महिने पडून असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. याप्रकरणी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी माहिती घेऊन लेखी स्वरूपात कळवू अशा शब्दात सडेतोड उत्तर दिले.
 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home