शेती करणारी किंवा कृषी
व्यवसायाशी संबंधित असणारी अनेक कुटुंबे किंवा ग्रामीण भागात राहणा-या
लोकांना वर्षातून त्यांच्या नेहमीच्या कामातून फुरसतीचा वेळ मिळतो.

शेती
करणारी किंवा कृषी व्यवसायाशी संबंधित असणारी अनेक कुटुंबे किंवा ग्रामीण
भागात राहणा-या लोकांना वर्षातून त्यांच्या नेहमीच्या कामातून फुरसतीचा वेळ
मिळतो. त्यावेळी ते एखादा हस्तकला व्यवसाय करू शकतात.
पावसाची वाट पाहण्याच्या किंवा पीक तयार
होण्याच्या काळात ते आपल्या जमिनीतून मिळणा-या गोष्टींपासून कोणतीही वस्तू
तयार करण्याकडे सहज वळतात. अशा हंगामी आदिवासी कारागिरांमध्ये सर्वात
उल्लेखनीय कारागीर म्हणजे वेताच्या व बांबूच्या टोपल्या आणि तट्टे विणणारे
लोक.
पूर्वी बांबूपासून बनविण्यात येणा-या
वस्तूंना अधिक मागणी होती. काही वर्षापूर्वी या वस्तूंचा मोठय़ा प्रमाणात
घरगुती वापर होत असे. मात्र, आता रेडीमेडच्या जमान्यातही बांबूपासून हारे,
टोपल्या, तट्टे, खुराडे, कणगी वस्तू बनवून देणा-या उंब्रज येथील सुधीर माने
व जयसिंग जाधव यांचे कुटुंबीय चिपळुणात गेली २० वर्षे बांबूच्या सहाय्याने
बुरूडकाम करत आहेत. टोपल्या, रोवली, सूप, करंडा आदी वस्तूंचे विणकाम त्या
करत त्यांनी या व्यवसायातून आपल्या संसाराला हातभार लावला आहे.
सातारा तालुक्यातील उंब्रज येथे सुधीर
माने व जयसिंग जाधव यांचे मूळ गाव. हा व्यवसाय पारंपरिक असल्याने
लहानपणापासूनच बांबूपासून विविध वस्तू बनविणे हा त्यांचा व त्यांच्या
कुटुंबीयांचा व्यवसाय. अंकुश माने (उंब्रज), पत्नी शोभा माने, जयसिंग जाधव
(कराड-मलकापूर), राजू जाधव (उंब्रज-शिवडी) यांनी एकत्रित येऊन चिपळुणातील
शिवनदी येथे हा व्यवसाय सुरू केला.
गावोगावी फिरून या वस्तूंची विक्री करून
ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र, सध्या या वस्तूंची जागा
स्टेनलेस स्टील, प्लास्टिक पिंप यांनी घेतली असल्याने बांबूपासून बनविण्यात
येणा-या वस्तूंची मागणी घटली आहे.
पूर्वी आंबे बाहेरगावी पाठविण्यासाठी
टोपल्यांचा वापर होत असे. मात्र सध्या किमती लाकडाची खोकी वापरली जातात.
बांबूपासून टोपल्या, सूप, डाले, कोंबडय़ाचे खुराडे, तट्टे आदी वस्तूंची
निर्मिती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.
टोपल्या ३० रुपये, तट्टे ४०० रुपये, हारे
७० रुपये व खुराडे ४० रुपयांना विकले जात आहे. तर दुसरीकडे प्लास्टिक
टिनाची पर्यायी उत्पादने बाजारात आल्यामुळे त्यांच्या उत्पादनांची मागणी
घटली असल्याचे ते सांगतात. त्यामुळे बुरूड समाजाचा हा पारंपरिक व्यवसाय
नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सोनार, कुंभार, नाभिक अशा समाजांप्रमाणेच
बुरूड हा आपल्या पारंपरिक व्यवसायात गुंतलेला आहे.
परिपक्व ओलसर बांबूपासून घरी टोपल्या,
हारे, तट्टे, सूप आदी वस्तूंची निर्मिती करून त्यांना आठवडा बाजारात नेऊन
विकणे हा यांचा व्यवसाय आहे. याच व्यवसायाच्या जीवावर हा समाज कशीबशी
गुजराण करीत आहे. शासनाने या बुरूड समाजाकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्यामुळे
ही बिकट परिस्थिती दरवर्षी उद्भवत आहे. सध्या बांबूचे दरही दुपटीने वाढले
आहेत.
८.३५ रुपयांना मिळणारा कमी प्रतिचा बांबू
१६.८० रुपये, ९ रुपयांना मिळणारा बांबू १८ रुपये तर ११ रुपयांना मिळणारा
बांबू २० रुपये किमतीत मिळत आहे. त्यामुळे बुरूड समाजाला आपल्या उत्पादित
वस्तूंचे दर वाढवावे लागत आहेत. पण वाढीव किमतीत ग्राहक त्यांच्या वस्तू
खरेदी करीत नाहीत. ग्राहकांची नाराजी असल्याने त्यांच्या व्यवसायावर विपरीत
परिणाम झाला आहे.
दुसरीकडे फायबर, प्लास्टिक, टीन, मेटलच्या
सूप, टोपल्या बाजारात आल्या आहेत. या वस्तूंकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.
या वस्तू बांबूपासून निर्मित वस्तूंपेक्षा स्वस्त दरात विकल्या जात
असल्याने बुरूड समाजाच्या उत्पादनाकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे
त्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. एक कुशल कारागीर असेल तर
चार सुपे व एक रोवळी होते.
बांबूच्या अनेक जाती आहेत. यामध्ये कळक,
कोंडा, बांबू, मेस, वेत या जातीच्या बांबूचा उपयोग केला जातो. मात्र,
सर्वसाधारण कापशी बांबूचा उपयोग अनेक ठिकाणी केला जात असल्याची माहिती
श्री. माने त्यांनी यावेळी सांगितली. या वस्तू विकून मिळणा-या पैशातून बचत
केली जाते व शेवटी रक्कम वाटून घेतली जाते.
फावल्या वेळेत बांबूपासून विविध वस्तू
बनविण्याचा व्यवसाय करून संसाराला हातभार लावणारे हे कुटुंब दर महिना दोन
हजार रुपयांपर्यंत कमाई करतात. परंतु प्लास्टिकचा वापर वाढल्याने या
व्यवसायाला फटका बसला असल्याचे त्यांनी सांगितले.
प्लास्टिक वस्तूंचा वाढता वापर, बांबू
मिळण्यातील अडचणींमुळे बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचा पारंपरिक
व्यवसाय करणारा बुरूड समाज अनेक समस्यांना तोंड देत आहे.
समाजातील तरुण मंडप व्यवसायाबरोबरच इतर
व्यवसायांकडे वळले आहेत. या समाजाच्या हक्क आणि अधिकारांसाठी लढण्याबरोबरच
समाजाचा आर्थिक व शैक्षणिक विकास व्हावा, यासाठी अखिल महाराष्ट्र राज्य
बुरूड समाज ही संस्था काम करत असली तरीही ग्रामीण भागातील हा समाज
विकासापासून वंचित राहिलेला आहे.
पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा,
कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र हा समाज विखुरलेला आहे. समाजाचा
बांबूपासून वस्तू बनविण्याचा परंपरागत व्यवसाय आहे. मात्र, सध्या
प्लास्टिकच्या वस्तू वापरण्याचे प्रमाण वाढल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ
आली आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना धान्य साठविण्याच्या कणग्या,
त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या बळद या वस्तू बुरूड तयार करून देत असत.
या वस्तू आता पाहावयासही मिळत नाहीत.
शेतकरी आता धातूचे हौद त्यासाठी वापरतात. महिला धान्य पाखडण्याचे सूपही आता
प्लास्टिकचे खरेदी करतात. मात्र, ग्रामीण भागात कोंबडय़ांची खुराडी बुरडाने
तयार केलेलीच वापरली जात आहेत.
याशिवाय टोमॅटोसाठी लागणा-या करंडय़ांना
ब-यापैकी मागणी असते. मात्र, बांबू लागवड ग्रामीण भागात फारशी कोणी आवर्जून
करत नाही. त्यामुळे बांबू मिळविण्यासाठी बुरूड समाजातील नागरिकांना
शोधाशोध करावी लागत आहे.
अगदी कोकणातून बांबू आणावे लागतात.
ज्यांच्याकडे बांबू आहेत, अशा शेतकऱ्यांना बांबूचे आगाऊ पैसे द्यावे
लागतात. तसेच जादा पैशांचीही मागणी होते. मात्र, त्या प्रमाणात तयार
केलेल्या वस्तूला दर देताना ग्राहक नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे
दिवसेंदिवस हा व्यवसाय अडचणीत आला असल्याचे श्री. माने यांनी सांगितले.
४० टक्के हा समाज पारंपरिक व्यवसाय करीत
आहेत तर ६० टक्के इतर क्षेत्रांत कार्यरत असून त्यातील काही बांबूशी निगडित
इतर व्यवसाय करीत आहेत. अनेक युवकांनी शिडय़ांसारख्या वस्तू तयार करून
देण्याबरोबरच मंडप व्यवसायात तसेच बांधकामासाठी बांबू आणि तत्सम लाकडे
पुरविण्याच्या व्यवसायावर भर दिला आहे. समाजातील अनेक मुले आता उच्चशिक्षण
घेत आहेत. मात्र, यांची मुले शिक्षणापासून अजूनही वंचित आहेत.
याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
विवाह कार्यात मुलीकडून वर पक्षास रुखवत दिला जातो. त्यामध्ये द्यायची
सूप-दुरडी बुरडाने तयार केलेली वापरली जाते. अगदी झोपडीत राहणा-यापासून ते
बंगल्यातील उच्चभ्रू व्यक्तीही या सूप दुरडय़ाच खरेदी करतात.
कोणीही प्लास्टिकची खरेदी करत नाही. तसेच
विवाह कार्यात देवक पूजतानाही बांबूपासून तयार केलेल्या सुपातच देवक
पूजतात. त्यामुळे बुरुडांनी बनविलेल्या या वस्तूंना किती मागणी आहे, असे
यावरून दिसून येते.
शासकीय सवलतीमध्ये बुरूड समाजाला बांबू
उपलब्ध करून द्यावेत, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये बांबू कला
प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत, मागासवर्गीयांसाठीच्या मोफत घरकुल योजनेमध्ये
बुरूड समाजाला प्राधान्यक्रम द्यावा, समाजातील व्यावसायिकांना बीज भांडवल
सवलतीच्या व्याज दरात द्यावे, बांबूू मजुरांना अर्थसहाय्य द्यावे, अशा
मागण्याही या समाजातून होत आहेत.
बांबूपासून विविध वस्तू बनविणा-या
कारागिरांचा हा पारंपरिक व्यवसाय आहे. ते आजही उपेक्षित जीवन जगत आहेत. या
मजुरांना त्यांचा न्यायहक्क मिळवून देण्यासाठी भारतीय बांबू मजदूर संघटनेची
स्थापना करण्यात आली. संपूर्ण भारतभर या संघटनेचे काम सुरू आहे.
सध्या कोकणातील बांबू व्यवसाय करणा-या
मजुरांच्या नोंदणीचे काम सुरू आहे. कोकणातील मागासवर्गीयांबरोबरच मातंग,
बुरूड, कैकाडी, कोटाळी, कांडी अशा जमाती व आदिवासी हे काम करीत आहेत. केवळ
वडिलोपार्जित कला नष्ट होऊ नये म्हणून या समाजाच्या लोकांनी हे
कौशल्यपूर्ण काम अद्याप सुरू ठेवले आहे.
मात्र, आता प्लास्टिकच्या अतिरेकी
वापरामुळे त्यांना हे काम सुरू ठेवणे अवघड जात आहे. त्यामुळे बुरूड कामाचे
मोलच हरवत असून मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. बुरूड हा समाज आजही
शैक्षणिक प्रवाहापासून दूर आहे.
या समाजात निरक्षरतेचे प्रमाण अधिक आहे.
समाजातील शिकलेले युवकही बेरोजगार असल्याने त्यांना नाइलाजाने पारंपरिक
व्यवसायातच अडकावे लागते. या समाजाच्या विकासासाठी शासनाने महामंडळाची
निर्मिती करावी, अशी मागणी बुरूड समाजातून होत आहे.
या माध्यमातून समाजातील तरुणांना
बांबूपासून विविध हस्तकलेच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण मिळावे, त्या
वस्तूंसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, सुशिक्षित युवकांना कर्ज देण्यात यावे
अशा मागण्या बुरूड समाज अनेक वर्षापासून करीत आहे. लहरी पावसामुळे शेतकरी
संकटात सापडला असताना त्याची झळ आता शेती व्यवसायाशी संबंधित असलेल्या
बुरूड व्यवसायालाही बसत आहे.
परंतु गेल्या काही वर्षापासून लहरी
पावसाचा फटका शेतीला बसत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. साहजिकच
त्याचा परिणाम या व्यवसायावरही झाला आहे. याशिवाय काही शेतकरी धान्य
साठविण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या बांबूच्या टोपल्या व कणगी धान्याच्या
बदल्यात घेतात. हा व्यवसाय पिढीजात आहे.
टोपलीच्या बदल्यात भात देणे असा व्यवहार
पूर्वी चालत असे. बांबूपासून शेतीपयोगी वस्तू बनविणा-या बुरूड समाजाला
ग्रामीण समाजव्यवस्थेत मानाचे स्थान होते. मात्र बदलत्या काळाबरोबर
व्यवहारांचे स्वरूपही बदलले. त्यामुळे बुरुडांनी बनविलेल्या वस्तूंची मागणी
आपोआप घटत आहे.