Saturday, July 25, 2015

पेणमध्ये कुशल गणेशमूर्तीकारांची कमतरता

गणेशमूर्तीकलेचे माहेरघर असलेल्या पेण शहरातील गणपती कारखान्यांना कुशल कामगार मिळत नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
ganeshअलिबाग- गणेशमूर्तीकलेचे माहेरघर असलेल्या पेण शहरातील गणपती कारखान्यांना कुशल कामगार मिळत नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सवला दीड महिना उरला आहे. त्यामुळे गणेशमूर्ती साकारण्याची कामे सुरू झाली आहेत. कौशल्य असलेले कारागीर मिळत नसल्याने गणेशमूर्ती तयार करणा-या कारखानदारांना मोठी कसरत करावी लागत आहे.
पेण शहराला गणेशमूर्ती कलेचा मोठा वारसा लाभलेला आहे. आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती हे पेणमधील गणेशमूर्तीचे वैशिष्टय़ा आहे. त्यामुळे पेणच्या गणपतींच्या मूर्तीना केवळ महाराष्ट्रातच नव्हेतर देशभर आणि परदेशातूनही माणी वाढत आहे. पेण शहराला गणेशमूर्ती व्यवसायाच्या बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पूर्वी पेण शहरातच गणेशमूर्ती साकारण्याचे कारखाने होते. आसपासच्या परिसरातील कामगार या कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी यायचे. मागील काही वर्षापासून पेण शहराच्या जवळ असलेल्या हमरापूर, दादर, शिर्की, कणे आदी गावांमध्ये गणपती मूर्तीचे कारखाने सुरू झाले आहेत. या गावांमधूनही मोठय़ा  प्रमाणांवर गणेशमूर्ती बनवल्या जातात. पेण शहरात असलेल्या कारखान्यांमधू काम करणारे कामगार गणेशमूर्ती साकारण्याची कला शिकले व त्यांनी स्वत:चे कारखाने सुरू केले. तसेच आसपाच्या गावांमधून येणारे कामगार जवळच्याच गावात किंवा स्वत:च्याच गावात काम मिळत असल्यामुळे ते पेणमध्ये काम करण्यासाठी येत नाहीत.
परिणामी पेण शहरातील मूर्ती साकारणा-या कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी येणा-या कुशल कामगारांची संख्या कमी झाली आहे. पुरेसे कुशल कामगार नसल्यामुळे पेणमधील गणपती कारखान्यांच्या मालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पेण शहरातील सर्वच मूर्ती कारखान्यांना ही समस्या भेडसावत आहे.
पारंपारिक गणेशमूर्तीसाठी पेण शहर प्रसिद्ध आहे. परंतु आता भक्तांचा कल आणि मागणी लक्षात घेऊन दरवर्षी नवीन प्रकारच्या गणेशमूर्ती बाजारात आणण्याचा प्रयत्न येथील कारखानदार करत आहेत. या वर्षी अडीचशेहून अधिक प्रकारच्या गणेशमूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. असे असले तरी पेण हे सुबक मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे.
रंगकाम करणारे कामगार मिळतात. परंतु मूर्ती घडवणारे कुशल कलाकार मिळत नाहीत. साचे बनवले जातात. गणपतीची मूर्ती घडवणारे कारागीर तयार करण्यासाठी पेणमधील प्रथितयश मूर्तीकारांनी पुढाकार घ्यायला हवा.
माती, प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग यांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे यंदा गणपतीमूर्तीच्या किंमतींमध्येही वाढ झाली आहे. गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यावर आल्यामुळे गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. गणेशमूर्तीकार गणेशमूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यात व्यग्र आहेत.
पेणमधून तयार मूर्ती घेऊन त्या महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, गोवा या राज्यांमध्ये विक्रीसाठी नेल्या जातात. या मूर्ती वेळेत तयार कराव्या लागतात. कुशल कारागीर मिळत नसल्यामुळे गणेश मूर्ती वेळेत तयार करण्यासाठी कारखान्यांच्या मालकांना धावपळ करावी लागत आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home