Saturday, July 25, 2015

सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा कहर

ऐन लावणीच्या हंगामात महिनाभर दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी सावंतवाडी तालुक्यात दमदार हजेरी लावली.
Rains in Mumbaiसावंतवाडी- ऐन लावणीच्या हंगामात महिनाभर दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी सावंतवाडी तालुक्यात दमदार हजेरी लावली. गेला महिनाभर चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणारा बळीराजा यामुळे सुखावला असला तरी दिवसभर मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले.
ग्रामीण भागात नदीनाले दुथडी भरून वाहत असल्याने अनेक वाडय़ांचा संपर्क तुटला. वादळी पावसामुळे आंबोली घाटासह काही ठिकाणी पडझडही झाली. माजगाव येथे विद्युतवाहिनी घरावर पडली, मात्र सुदैवाने अनर्थ टळला.
महिनाभराच्या विश्रांतीनंतर पर्जन्यराजाने शुक्रवारी जोरदार पुनरागमन केले. सावंतवाडी तालुक्यासह जिल्हाभरात मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या. पहाटेपासून सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत अक्षरश: कोसळतच होता. यामुळे सर्वच परिसर जलमय झाला होता. ग्रामीण भागात शेती पाण्याखाली गेली. रस्त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
सखल भागातील पुलांवरून पाणी आल्याने ठिकठिकाणी वाहतूकही खोळंबली होती. मळेवाड, कोंडुरे, मळगाव, कोलगाव येथील कॉजवेवर पाणी आल्याने शाळकरी विद्यार्थीही काही काळ अडकून पडले होते. माजगाव येथील पुलावर चार ते पाच फूट पाणी असल्याने काही वाडय़ांचा संपर्क तुटला.
मुसळधार कोसळणा-या या पावसाने ठिकठिकाणी पडझड झाली. आंबोलीत रस्त्यावर भला मोठा वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक तब्बल चार तास खोळंबली होती. सायंकाळी उशिरा हा वृक्ष बाजूला करण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. घाटात अन्यही काही भागात लहान-मोठी झाडे रस्त्यावर आली होती.
तसेच दरडीतील लहान-मोठे दगडही रस्त्यावर कोसळले होते. वाहनधारकांनीच हे दगड बाजूला केले. तर पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने गुरुवारपासूनच मोठया प्रमाणात सुरू केलेले स्टॉल बंद करून स्टॉलधारकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून घरचा रस्ता धरला.
सिंधुदुर्गात शेतकरी सुखावला!
कणकवली- तालुक्यात गेले दोन महिने ऊन-पावसाचा सुरू असलेला खेळ शुक्रवारी दिवसभरासाठी संपला. संततधार पडलेल्या पावसाने पावसाळयाच्या दिवसांची आठवण करून दिली. जुलै महिन्यात आणि आषाढात ज्या पद्धतीने पावसाची रिपरिप अपेक्षित होती; तसा समाधानकारक पाऊस आज पडला. ठिकठिकाणी नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहू लागले. हरकूळ बुद्रुक भाट दुकान येथे झाड उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली.
दीड महिन्यात दीड हजार मि.मि. पाऊस कमी पडला होता. प्रतिवर्षी ज्या पद्धतीने पाऊस आपली सरासरी नोंदवत होता. त्यात या वर्षी तो फारच कमी प्रमाणात पडला. सकाळी ९.३० वाजल्यापासून पावसाने संततधार सुरू केली. ३.३० वाजेपर्यंत हा पाऊस न थांबता पडला. तालुक्यात आणि जिल्ह्यातही सर्वत्र अशाच पद्धतीने संततधारेने पडलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला. शेतीची लावणी करण्यासाठी त्याला पाणी उपलब्ध झाले.
डोंगर पठारावर असलेल्या शेतीच्या वापरात पावसाच्या पाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. सह्याद्रीच्या पायथ्याशी आणि देवगड, मालवण आणि वेंगुर्ले या पठारी भागात पाऊस नसल्यामुळे भात शेतीची लावणी रखडली होती. या पावसाने ती पूर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा आहे. आणखीन दोन दिवस अशाच पद्धतीने संततधारेने पाऊस पडल्यास शेतीची कामेही पूर्ण होतील.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home