Wednesday, July 8, 2015

सिंधुदुर्गात १५० मुलांनी पाहिली नाही शाळा!

जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी शनिवारी दिवसभर मोहीम राबवली गेली. प्रत्येक घराघरात जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण झाले.
sindhudurg mapसिंधुनगरी- जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी शनिवारी दिवसभर मोहीम राबवली गेली. प्रत्येक घराघरात जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण झाले. यात सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक शाळाबाह्य ५० मुलांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण सरासरी १५० शाळाबाह्य मुले असल्याचे शनिवारी झालेल्या सर्वेक्षणात उघड झाले. परप्रांतीय मजूर आणि परराज्यांतील मुलांची संख्या यात सर्वाधिक होती.
सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत प्रत्येक घरात, वाडी-वस्तीत व तांडय़ावर जाऊन शाळेत जाणारी व शाळेच्या प्रवाहापासून लांब राहिलेल्या मुलांचे म्हणजे ६ ते १४ वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात सावंतवाडी तालुक्यात तब्बल ५० मुले, कणकवली तालुक्यात ३५ मुले, देवगड तालुक्यात २२ मुले, दोडामार्ग ६ मुले, मालवण ७ कुडाळ २८ तर वेंगुल्र्यात व वैभववाडीत प्रत्येकी १-१ च मूल आढळले.
१०० घरांच्या सर्वेक्षणासाठी १ पर्यवेक्षक अधिकारी असे २ हजार ५६३ कर्मचारी व एकूण २ हजार ७१५ अधिकारी तैनात करण्यात आले होते. या सर्वेक्षणात पालकांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर मार्कर पेनने शाई लावून निवडणुकीप्रमाणे ही मोहीम राबवण्यात आली. एकही मूल शाळेपासून वंचित राहून नये, असा उद्देश या मोहिमेमागे आहे. याबाबतची आकडेवारी प्रत्यके तालुक्याने उशिरापर्यंत संकलित करून त्याचा अहवाल जिल्ह्याकडे पाठवला आहे.
देवगड तालुक्यात २२ मुले शाळाबाह्य
देवगड तालुक्यात २२ मुले शाळाबाह्य आहेत. यातील पाच मुले कातकरी समाजाची असून; १७ मुले मदरशांत शिकणारी आहेत. पडेल येथे सर्वेक्षणात ५ कातकरी समाजाची मुले शाळाबाह्य आढळली. गिर्ये व चांदोशी येथील मदरशांत शिकणारे १७ विद्यार्थी शाळाबाह्य आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत तातडीने दाखल करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी नादाफ यांनी दिले आहेत.
पोईप, वायंगणीत सात मुले शाळाबाह्य
मालवण तालुक्यात सात मुले शाळाबाह्य आहेत. यातील तीन मुले पोईप तळी येथे असलेल्या कातकरी समाज वस्तीतील आहेत. तर चार मुले वायंगणी वेदशाळेत शिक्षण घेत आहेत, परंतु सरकारच्या नियमात त्यांचे शिक्षण बसत नसल्याने ही मुलेही शाळाबाह्य ठरली आहेत.
अनियमित मुलांचा भरणा
कातकरी वस्तीत तीनच मुले शाळाबाह्य आढळली असली तरी शाळेत नियमित न जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी जास्त आहे. शाळेत प्रवेश घेतलेला आहे, परंतु शाळेत जात नाहीत, अशी तेरा मुले आढळली आहेत. यातील काही मुलांजवळ शाळेचा गणवेशही होता. ही मुले पाचवीपासून पुढील वर्गात आहेत. शिकारी व मोलमजुरी निमित्ताने त्यांचे पालक आठ-दहा दिवस बाहेर असतात. त्यामुळे ही मुले नियमित शाळेत जात नाहीत.
‘त्या’ विद्यार्थ्यांचा प्रस्ताव जिपकडे पाठवणार
सरकारने मदरशांतील मुले शाळाबाह्य ठरवली आहेत. त्याप्रमाणे वेदशाळेतील मुलेही शाळाबाह्य ठरतात. त्यामुळे वायंगणी वेदशाळेत आढळलेल्या त्या चार मुलांच्या प्रवेशासाठी प्रयत्न केला जाणार आहे. हा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाजवळ पाठवण्यात येणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले. दरम्यान, रविवारी ५ जुलै रोजी शिक्षण विभाग कार्यालय सुरू राहणार असून; या दिवशी शनिवारी केलेल्या सव्‍‌र्हेची माहिती एकत्रित केली जाणार असल्याचे मुळीक म्हणाले.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home