६४ गावांची कायदा-सुव्यवस्था सांभाळणा-या पोलिसांची घरे ‘असुरक्षित’
कुडाळ पोलीस स्टेशन येथील शासकीय निवासस्थाने जीर्ण झाली असून येथील सोयीसुविधा बंदावस्थेत असल्याने पोलिसांना आर्थिक ताण पडत आहे.

कुडाळ पोलीस स्टेशन आवारात कर्मचा-यांसाठी
असलेल्या इमारतीही जीर्ण झाल्या असून त्यांचे वेळीच नूतनीकरण न झाल्यास
त्या कोसळण्याच्या स्थितीत आहेत.
कुडाळ पोलीस ठाण्यांतर्गत तालुक्यात एकूण
६४ गावे असून येथील कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस
कर्मचा-यांची संख्या कमी पडत आहे.
त्यामुळे असलेल्या कर्मचा-यांवर अतिरिक्त
ताण येऊन त्यांच्या आरोग्याबाबत वेळोवेळी वैद्यकीय सुविधा द्याव्या लागत
आहेत. मात्र ज्यांच्यावर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी दिली आहे त्यांच्या
कुटुंबीयांच्या सोयीसुविधाही पूर्ण करण्यासाठी पोलीस कर्मचारी व्यस्त होत
असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळू शकत
नाही.
कुडाळ पोलीस स्टेशन येथे सध्या पोलीस
निरीक्षकपदी हेमंतकुमार शहा हे कार्यरत असून सहा. पोलीस निरीक्षकपद रिक्त
असल्याने पोलीस निरीक्षकांवर कामाचा व्याप वाढत आहे. याशिवाय पोलीस
उपनिरीक्षकपदी ६ पुरुष अधिकारी तर दोन महिला अधिकारी कार्यरत आहेत.
कुडाळ पोलीस स्टेशनच्या नियंत्रणाखाली
तालुक्यात दोन ठिकाणी पोलीस दूरक्षेत्र असून त्या ठिकाणी ४ कर्मचारी
कार्यरत आहेत. त्यापैकी माणगांव पोलीस दूरक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात २७
गावे येत असून येथील दुर्गम भागात कार्यरत असलेल्या कर्मचा-यांना वाहन
व्यवस्था व जीर्ण असलेली पोलीस दूरक्षेत्राची इमारत नूतनीकरण झाल्यास
कर्मचारी व अधिका-यांनाही कायदा व सुव्यवस्था राखताना देण्यासाठी पुरेसा
वेळ मिळू शकेल. तसेच आवळेगाव पोलीस दूरक्षेत्राच्या कार्यक्षेत्रातही बरीच
गावे येत असून येथेही कर्मचारी व वाहन व्यवस्था झाल्यास पोलिसांना योग्य
समन्वय राखणे सुलभ होईल.
कुडाळ पोलीस स्टेशन येथे ७८ कर्मचारी
कार्यरत असून त्यापैकी ५ कर्मचारी हे ओरोस पोलीस कार्यालयाशी सलग्न
असल्यामुळे कुडाळ पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्राच्या मानाने कर्मचारी
संख्या कमी होते. अशामुळे एखादे वेळेस आंदोलने किंवा जनप्रक्षोभ झाल्यास
मुख्यालयावरून कुमक मागवावी लागते. त्यामुळे पोलीस कर्मचा-यांची संख्या
वाढवावी, अशी मागणी होत आहे.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home