Saturday, July 25, 2015

झाले आवार हिरवेगार!

रान, शिवार हिरवेगार झालेय.. पण  शेतकरी शेतीबाबत संकटात आहे. निसर्गाचा समतोल साधून तो यांत्रिक युगात आजही आपण राजा असल्याचे सिद्ध करू शकतो. मात्र भौतिक वादामुळे हल्ली तो आत्मभान विसरू लागला आहे. मजूर नाही, सहकार्य नाही परिणामी शेती नाही, अशी अवस्था शेतक-यांची झाली आहे. हा हंगाम लावणीचा.. मातीबरोबर एकरूप होण्याचा. एकदा का भाकरीचा प्रश्न मिटला की, मग आमचा मुलुख कलासंस्कृती जपायला मोकळा..!
kokan farm
पावसाळयात सृष्टी जशी हिरवीगार होते तशी शेतक-यांची लगबग कमालीची वाढते. ही गेल्या शतकानुशतकाची परंपरा आहे. वर्षगणिक यात बदल होत गेले असले तरी शेतीचा मूळ ढाचा कायम आहे. पूर्वी बैलांबरोबर शेतीत वावरण्यासाठी माणसांची जत्राच फुलायची. एकदा का पाऊस सुरू झाला की शेत गजबजून जायचे. आज ही स्थिती नाही. परंतु, शेतातून घेण्यात येणारे उत्पन्न कमी झालेले नाही.
मोठया कुटुंबाची संकल्पना जशी रोडावत गेली तसा शेतीतील माणसाचा आवाज कोमेजून गेला. आता बैलजोडय़ांबरोबर हिरीरीऽऽ पाप्पारीचा आवाज धडधडणा-या यंत्रांनी आपलासा केला आहे. पारंपरिक बियाण्यांची जागा संकरीत वाणांनी घेतली. कंपोस्ट खते अक्षरश: शेतात बरसायची आता ती जागा रासायनिक खतांनी घेतली. शेतीचे जसे धोरण बदलले तशी शेतीही बदलली.
सिंधुदुर्गात ७४ हजार ६४२ हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेतले जाते. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गचा विचार करता २ लाख ५८ हजार १८२ हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेतले जात असल्याची नोंद शासन दरबारी आहे. वस्तूत: ही नोंद १० वर्षापूर्वीची आहे.
गेल्या १० वर्षात कृषी तज्ज्ञांच्या मते, तब्बल १ लाख हेक्टर क्षेत्रात घट झाली आहे. या मागची कारणे विविध असून काही ठिकाणी शेतीसाठी असणारे अपुरे मनुष्यबळ तर काही ठिकाणी शेतीच्या जागेवर वाढलेली घरे, काही भागात बागायतीचे वाढलेले क्षेत्र या व अशी अनेक कारणे असतील..
शेतकरी शेतीपासून दुरावत चालला आहे का? हा एक वेगळा विषय आहे. पण आज घडीला शेतकरी शेती करतो आहे हेच महत्त्वाचे आहे. शेतीला सन्मान नाही. शेतक-याला किंमत नाही परिणामी युवा पिढीने शेतीकडे पूर्णत: पाठ फिरविली आहे. कोकणात शेती होते पण जोडधंदा म्हणून.
पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे पूर्ण वेळ शेती करणारी मंडळी काही अपवादात्मकच आहेत. कोकणातील शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग राबवित आहेत. काही जण यांत्रिक शेतीकडे वळले आहेत. ही एक समाधानाची बाब आहे. आता लावणीची लगबग सुरू आहे. राज्याच्या अन्य भागांप्रमाणेच कोकणातील पावसाळयाचे चित्र विहंगम तेवढेच दैनंदिनी बदलविणारे असते. शेतीच्या अवजारांची दुरुस्ती, नवे नांगर व इतर साहित्यांची गरज असल्याने ही अवजारे तयार करणा-या कारागिरांचीही हातघाई सुरू झाली आहे.
शेती ही कुणा एकटयाची मक्तेदारी नाही. शेतीसाठी निसर्गाचे जेवढे भान असावे लागते तेवढीच कुटुंबीयांचीही मदत अपेक्षित असते. एखाद्यावेळी नोकरदार होणे सहज शक्य आहे. एखाद्या कंपनीमध्ये दिलेले काम पूर्ण करणे आणि आपल्या घरी परतणे अशा चौकटी अनेकांनी आपल्या भोवती घातल्या आहेत. भौतिक सुखांच्या परिमाणांमुळे उद्याच्या गरजेपेक्षा आजची मजा महत्त्वाची प्रत्येकाला वाटू लागली आहे. परिणामी चंगळवाद सोकावला आणि शेतक-याचा सन्मान कमी झाला.
शेतीपासून मिळणा-या उत्पन्नाला प्रभावी मूल्य नाही. पारंपरिक ज्ञानाला भौगोलिक परिस्थितीमुळे तडजोड करता येत नाही. शेतीचे यांत्रिकीकरण करतानाही तुकडया-तुकडय़ांच्या शेतीचा अडसर. यात कुटुंबाची झालेली दुफळी. एकत्रित कुटुंबांचे झालेले विभाजन, नोकरी व्यवसायानिमित्त अनेकांनी गावे सोडली. काहींनी गावात फक्त सण-उत्सवापुरतेच एवढीच आपली मातीची नाळ टिकवून ठेवली. परिणामी शहरे दाटीवाटीने गजबजली. मजल्यावर मजले चढले. इकडे गाव ओस पडले.
पहिल्यांदा शेती बिघडली. नंतर गाव बिघडले. आता गावाची रयाच पालटून गेली आहे. कालपर्यंत गावात मृगनक्षत्रानंतर शेतात गजबज असायची, आज ही गजबज थांबली आहे. कुठे तरी एखादी बैलजोडी फिरताना दिसते. तर काही ठिकाणी एखादा पॉवर ट्रिलर धडधडत असतो. शेतात वावरणा-या घरातल्या मंडळींची जशी कमतरता भासते आहे, तशी मजुरांचीही संख्या रोडावली.
उद्योग क्षेत्रात मजुरांना मोठी मागणी असल्याने शेती क्षेत्राकडे मजूर मिळेनासे झाले. पूर्वी गाई-वासरांनी गोठा गजबजलेला असायचा. आज त्या गुरांना सांभाळणारा गुराखीच नसल्याने गोठा निस्तेज झाला आहे. शेतक-याला एक बैलजोडी सांभाळणेही कठीण झाले आहे. शेती करायची तर माणसे मिळत नाहीत. कुटुंबातून हवा तसा आधार मिळत नाही. बहुतांश जण नोकरी-व्यवसायात व्यस्त असल्यामुळे नियोजित वेळेत शेती करणे शक्य होत नाही. परिणामी शेतीचे प्रमाण कमी झाले.
एकीकडे शासनाच्या कागदपत्रांनुसार शेतीबाबतचा अभ्यास केला तर दारिद्रय़रेषेखालील मंडळींची संख्या आणि उपलब्ध जमीन याचा मेळ घालता येत नाही. कारण शेतीसाठी असलेली जागा आणि गावातील दारिद्रय़रेषेखालील मंडळी हे व्यस्त प्रमाण आहे. यात मजुरांची संख्या अधिक दिसते, पण मजूर शेतीकडे वळत नाही. १ रुपया किलोने धान्य मिळत असेल तर शेतकरी शेतात राब राब राबून उत्पन्न तरी का घेणार? असा सर्वसामान्य शेतकरी प्रश्न करतो.
शहरापासून लगतच्याच एका खेडेगावातील हा एक सत्य अनुभव आहे. शेतक-याने भात पेरणीपासून लावणीपर्यंतचाच खर्च मांडला. पेरणीसाठी त्याच्याकडे बैलजोडी असायची. पण कायमस्वरूपी त्यांचा सांभाळ करणे शक्य होत नव्हते. तसाच राखणीचा प्रश्न होता. परिणामी ती बैलजोडी त्याने विकून टाकली. आता बैलजोडी भाडयाने घ्यायची तर दिवसाला ४०० रुपये दर ठरलेला. भात पेरण्यासाठी नवीन वाण घ्यायचे तर १ किलोची किंमत सुमारे १५० ते ३०० रुपये. दोन दिवस पेरणी करावी नंतर लावणीपूर्व तयारीसाठी बैलजोडी भाडयाने घेणे आलेच.
शेतक-याची मुले शहरात विविध व्यवसायानिमित्त स्थायिक असलेली. त्यांनी शेती करूच नका असे बजावलेले. परंतु, शेतक-याचा हट्ट म्हणून त्याने शेतीसाठी मजूर शोधायला सुरुवात केली. गावात मजूरच मिळेनात म्हणून शहरातूनच कामगार कट्टयावरून दिवसा ३०० रुपये मजुरी देण्याच्या बोलीवर लमाण्यांना शेतावर आणले. ८ दिवस शेती केली. दर दिवशी चार मजूर राबत होते.
सोबतीला बैलजोडी होती. म्हणजे पावसाच्या हंगामातच १२ हजार ८०० रुपये रोखीने खर्च झाले. याव्यतिरिक्त खत आणि शेतक-याची मेहनतही होतीच. एवढया खर्चानंतर शेती ही निसर्गावरच अवलंबून. पुन्हा पुढील सोपस्कार आहेतच. वर्षाला शेतक-याला रेशनवरून मिळणारे धान्य पाहता त्याला केवळ ६ ते ७ हजार रुपये खर्च येतो. मग एवढे उपद्व्याप का करावेत? शेतक-याचे हे गणित चुकीचे कसे म्हणता येईल?..
गावातल्या एका मजुराने आपले गणित घातले. त्याची जमीन घरापुरती आणि काही गुंठय़ांवरच मर्यादित. आजोबांची पाच एकर जमीन होती. त्यात वडील, काकांमध्ये जमीन वाटली गेली. यात आमच्या वडिलांच्या वाटयाला दीड एकर जमीन आली. वडिलांनी आमच्या त्याच जमिनीत छोटेसे घर बांधले. एकरभर जमिनीत ते शेती करायचे. वडिलांच्या निधनानंतर आम्ही तीन भाऊ तिघांनीही जमिनीचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. परिणामी काही गुंठय़ांत आम्हाला जमीन मिळाली. आता गुंठाभर जमिनीत पिकवायचे काय म्हणून मजुरीला जातो.
मजुरी २०० ते ३०० रुपये ‘रोज’ आणि दारिद्रय़रेषेखालील धान्य १० ते १५ रुपयांतच पुरेसे मिळते. मग शेती करत नसल्याबद्दल दु:ख वाटत नाही. गुंठाभर जमीन अलीकडे पडच असते, असे तो जेव्हा सांगतो तेव्हा येथील भीषण वास्तव पुढे येते.
शेतीला सहकार्य नसल्यामुळे शेती करता येत नाही. हे लक्षात घेता भविष्यात सामूहिक शेतीची संकल्पना कोकणात युद्ध पातळीवर राबविणे गरजेचे आहे. सामूहिक शेतीमुळे एकमेकांना सहकार्य करतानाच मोठया प्रमाणात उत्पन्न घेता येणे शक्य आहे. त्याचा फायदा एकूण गावविकासाला होईल. परंतु, सहकार्याची तत्त्वे अस्सल कोकणी मुलखात कितपत रुजतात याबाबत भाष्य करणे धिराचे होईल.
..आता लावणीची तयारी
आता पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी शेतक-याची लगबग सेकंद काटयापेक्षाही अधिक आहे. लावणीचे बेत सुरू झाले आहेत. हाकारे-कुका-यांची गजबज वाढली आहे. ही लावणी म्हणजे काही फडातला कार्यक्रम नव्हे तर हा मातीतला भुकेचा कार्यक्रम आहे. वर्षभरातील रोजी-रोटीचा प्रश्न सुटावा म्हणून पावसाळी हंगामातील हा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम असतो. हे लावणीचे दिवस म्हणजे मातीतली जत्राच असते. मातीबरोबर स्वत:ला सामावून घ्यावे आणि प्रत्येक आव्याबरोबर धान्याच्या राशीची स्वप्ने पाहवीत, असेच जणू..
गेल्या तीन आठवडय़ांपूर्वी पेरलेला तरवा आता डोलू लागला आहे. या तरव्याची योग्य प्रकारे लावणी व्हावी. या रोपांची योग्यती निगा आणि काळजी घेतली जावी. यासाठी शेतक-याचे नियोजन सुरू झाले आहे. पावसाच्या धारेबरोबर भरडी शेती व पावसाने उसंत घेताच पाणथळ शेतीत रोप लावणी करण्याचे त्याचे मनसुबे आहेत. तयार झालेल्या रोपांची पेंढी बांधावीत. अशा पेंढया चिखल केलेल्या वाफ्यात घेऊन जावे. तेथे पारंपरिक पद्धतीने दोन अथवा तीन काडय़ांचा ‘आवा’ लावावा. आवा म्हणजे दोन अथवा तीन काडय़ांचा एकत्र पुंजका करून लावण्याची पद्धत..
ही लावणी होत असताना दोन आव्यांमध्ये किती अंतर राखावे हे सर्व त्या-त्या भाताच्या वाणानुसार ठरते. पारंपरिक बियाणे असल्यास लावण्याची पद्धत वेगळी असते. तर संकरीत बियाणे असल्यास ती एक अथवा दोन काडय़ांबरोबरच कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार श्री पद्धतीने ती लावली जाते. चल चल पुढे धावान आवो..ऽऽ अशा आपल्या लगबगतीच शेतकरी सूचना करतो आणि लावनी करणारी मंडळी आपल्या रोपामध्ये अंतर ठेवतात. आमच्या मुलखातली मार्मिकता अशी आहे.
लावणीच्या हंगामात चिखल-मातीतील हा उत्सव पाहण्यास अथवा ख-या अर्थाने एन्जॉय करण्यासाठी अनेक चाकरमानी गावी येत असतात. अलीकडे कृषी पर्यटनाच्या माध्यमातून गावागावात काही संस्था लावणी महोत्सवाचे आयोजन करतात. हा लावणी महोत्सव म्हणजे थेट चिखलात जावे आणि मनसोक्त लोळावे. शेतीची गुंफन पाहावी आणि रात्री लोककलांचा आस्वाद घेत विश्रांती घ्यावी. असा कार्यक्रम ठरलेला असतो.
आजच्या शहरात वावरणा-या पिढीला आपल्या थाळीमध्ये राईस प्लेटचा जन्म कुठे होतो हे पालकांना सांगावे लागते. आपल्या गावच्या शेतात या तांदळाच्या राशी लागतात हे सांगितल्यानंतर या मुलांच्या चेह-यावरचा कौतुक मिश्रित भाव पाहण्यासारखा असतो. मुलांना गावागावातील हा लावणी महोत्सव समजायला हवा तर या हंगामात वाट वाकडी करून गावी पोहोचायला हवे. म्हणजे समजेल शेतीतले जगणे आणि शेतक-यांचेही!
चिंचवली गाव करतेय जपानी शेती..
मृग नक्षत्राच्या सुरुवातीच्या मान्सून पूर्व पावसात पेरणी झालेले भिजवणाचे करून भातपेरणी केलेली बियाणे चांगल्या प्रकारे वाढली आहेत. गेले आठ दिवस जोरदार झालेल्या पावसामुळे शेतकरी लावणीला लागला आहे. चिंचवली गावातील शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करतो.
सर्व गाव जपानी पद्धतीने लावणी करतात. गेले तीन दिवसांपासून भात लावणीस सुरुवात झाली आहे. वेळापत्रकाप्रमाणे शेतीचे नियोजन असते. जोरदार पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. सध्या या गावचे सरपंच आणि शेतीनिष्ठ शेतकरी अनिल पेडणेकर यांनी तसेच या गावातील अनेकांनी भात लावणीस सुरुवात केली. जोरदार पडणारा पाऊस हा शेतीला चांगला आहे. लावणीची रोपे ब-यापैकी तयार झाली असून पावसाने उसंत घेतल्यास ही कामे लवकर पूर्ण होणार आहेत.
या भागात शुभांगी जातीचे भाताचे बियाणांची लागवड होते. त्यामुळे चवदार आणि कोलम तांदळासारखा बारीक तांदूळ निघतो. खारेपाटण सुखनदीच्या काठावरचे हे चिंचवली गाव. तिन्ही हंगामात शेतीचे काम मोठया प्रमाणात सुरू असते. भाजीपाल्याचे शेती व ऊस शेती मोठया प्रमाणात करतात.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home