Monday, August 3, 2015

हळद लावूनी आले ऊन। कुंकूमाक्षता फुलांमधून।।

कवी बा. भ. बोरकरांच्या या काव्यपंक्तीची अनुभूती सध्या माळरानांवर सडय़ांवर अनुभवता येत आहे. हे सौंदर्य बघताना मन एवढं रमून जातं की, कोण कोणात हरवलं आहे तेच समजत नाही.
pink flowersहळद लावूनी आले ऊन।
कुंकूमाक्षता फुलांमधून।
झाडांमधून झडे चौघडा।
घुमते पाणी लागून धून।।
निळींतूनी हिरव्यात भुरळली।
पिवळी सोनपिसोळी।
रत्नांच्या गहिवरात न कळे।
कोण हरवले कुणात।।
कवी बा. भ. बोरकरांच्या या काव्यपंक्तीची अनुभूती सध्या माळरानांवर सडय़ांवर अनुभवता येत आहे. हे सौंदर्य बघताना मन एवढं रमून जातं की, कोण कोणात हरवलं आहे तेच समजत नाही. श्रावणातल्या निसर्गाने सृष्टीसौंदर्यच बदललं आहे. एरव्ही स्थितप्रज्ञाप्रमाणे असणारे सडे हिरवेगार होताना रानफुलांनी रंगीबेरंगी झाली आहेत. इथलं हे अनोखं सौंदर्य न्याहाळताना रंगांच्या उधळणीत मन हरखून जात आहे.
‘नको नको रे पावसा, असा घालूस धिंगाणा’, असं म्हणण्याची वेळ आणलेल्या आषाढाच्या धो-धो बरसणा-या पावसानं श्रावणाच्या आगमनाबरोबरच आपली धुसफूस सोडली. क्षणात सर सर क्षणात ऊन असा ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे.
पावसाच्या या खेळाबरोबरच सिंधुदुर्गात रस्त्याच्या दुतर्फा मोकळे सडे पिवळ्या रंगांनी झळाळून उठले आहेत. उन्हाळ्यात काळ्या भिन्न रामोशासारखा पडलेल्या राकट कातळालाही या श्रावणाने पुलकीत बनवतो. हिरवा पिवळा जांभळा पांढरा निळा किती रंग सांगावेत, फुलांची नक्षीही कितीतरी एक पाकळीच्या फुलापासून सात पाकळ्यांच्या फुलांपर्यंत अशा कितीतरी कलाकुसर पाहायला मिळतात.
विविध रंगांच्या उधळणीत कातळावरील खुललेलं सौंदर्य मन मोहरून टाकत आहे. हे न्याहाळताना काही क्षण तिथेच थबकतात. आयुष्य केवळ एका दिवसाचं घेऊन येणारी ही फुले.. तरीही सौंदर्यात कोणतीही कसर न ठेवणा-या या निसर्गापासून बरंच काही शिकता येण्यासारखं आहे. या इवल्याशा रानफुलांनी सडय़ावर फुलोत्सवच भरवला आहे. पावसाळ्यात दाखल होणारी ही विविध रंगी रानफुलं आपल्या नाजूक तरलतेनं सर्वाचं लक्ष वेधून घेतात.
पिवळी जर्द हरणं, त्यातच पांढ-या धनगराची पागोटी भुई आमरी, पांढ-या निळ्या रंगांच्या ऑर्किड्स, जांभळय़ा रंगांचे सीतेचे अश्रू अशा किती नि कितीक रानफुलं मनाला खिळवून ठेवतात. या रंगांच्या रंगातून सडय़ावर कधी निळे, जांभळे गाणं रंगतं. तर कधी सोन सळा येते, असे कितीतरी रंग ऊन-पावसाच्या खेळात सायंकाळी झळाळून उठतात.
पावसाने कातळावर साचलेल्या डबक्यानजीक गोंडा, जांभळी मंजिरी आणि धनगराचे पागोटे बहराला येते. टपो-या मोत्यांचीच उधळण व्हावी किंवा कातळाला पांढरे तुरे फुटावेत, असा भास निर्माण करतात. अशा रंगाता न्हाऊन निघणारे हे श्रावणाचं सौंदर्य आता मोकळ्या सडय़ावर बहरू लागलंय.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home