Tuesday, May 10, 2016

कोंडमळा धनगर बांधवांनी पाण्यासाठी सोडले घरदार!

कोकणातील सह्याद्रीच्या कुशीत राहणा-या धनगर, कातकरी समाजाच्या पाचवीलाच दुष्काळ पुजलेला आहे, याचा विदारक अनुभव कोंडमळा धनगरवाडी घेत आहे. 
waterसावर्डे- विदर्भ, मराठवाडयातील दुष्काळाची नेहमीच चर्चा होते. त्यांना सरकार सर्वतोपरी मदत करते. मात्र, कोकणातील सह्याद्रीच्या कुशीत राहणा-या धनगर, कातकरी समाजाच्या पाचवीलाच दुष्काळ पुजलेला आहे, याचा विदारक अनुभव कोंडमळा धनगरवाडी घेत आहे. येथील ५० कुटुंबांना पाण्यासाठी आपले घरदार सोडून स्थलांतर करावे लागले आहे.
सावर्डे कोंडमळा येथील उघडया माळरानावर हे धनगर बांधव आपल्या पोराबाळांसह राहू लागले आहेत. मिळेल त्या पाण्यावर, प्रसंगी पाणी विकत आणून ते आपली गरज भागवत आहेत. मात्र, सरकारी यंत्रणा केवळ नियमावर बोट ठेवून या वस्तीमध्ये पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरले आहे. त्यामुळे विस्थापित झालेल्या या धनगर बांधवांना सरकारचा टॅँकरही मिळालेला नाही, हे दुर्दैव आहे.
कोंडमळा धनगरवाडी येथील पाणीप्रश्न अनेक वर्षापासून आहे. आता येथे तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे.धनगरवाडा येथे ५० घरांची वस्ती आहे. येथील वाडीला अनारी अडरे येथून नळपाणी योजनेचे पाणी मिळत होते. मात्र, त्या योजनेचे वीजबिल न भरल्याने ही योजना बंद झाली. त्यानंतर धनगरवाडीतील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन पैसे काढले आणि बोअरवेलसाठी प्रयत्न केला.
मात्र, तो अयशस्वी ठरला. मुलांच्या शिक्षणासाठी साठवून ठेवलेले पैसे पाण्यासाठी खर्च केले. पण दुर्दैवाने ते पाण्यातच गेले. मोलमजुरी करून जगणारा धनगर समाजाचा पैसा वर्षानुवर्षे पाण्यासाठीच खर्च होत आहे. पाणीटंचाई भागवण्यासाठी चिपळुणातून ३ हजार रुपये देऊन टॅँकर मागवावा लागत आहे. तरीही महसूल प्रशासन व पंचायत समिती धनगरवासीयांच्या दुष्काळाकडे कानाडोळा करत आहे.
अनेक राजकीय पक्ष येतात, केवळ आश्वासने देतात, असा आरोप येथील समाजबांधवांनी केला आहे. येथील धनगर बांधवांना पाणीटंचाई तीव्र जाणवत असून पाण्याचा पुनर्वापर करून गरज भागवली जात आहे. येथील ग्रामस्थांनी अनेक वेळा तहसील कार्यालयात टॅँकर सुरू करावा म्हणून फेऱ्या मारल्या. परंतु त्यांची कोणीच दखल घेत नाही.
अनेक सरकारी योजना धनगरवाडीत राबवल्या गेल्या नाहीत. हागणदारीमुक्त गाव योजनादेखील गावात पोहोचल्या नाहीत. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू लागल्याने धनगर बांधव कोंडमळा, सावर्डा माळरानावर आपले कुटुंब आणि जनावरांसोबत राहात आहेत. दरवर्षी हीच वेळ त्यांच्यावर येते. मात्र, प्रशासकीय यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यांचा हा पाण्यासाठी वनवास सुरू आहे. सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या अशा अनेक धनगरवाडया अशाच परिस्थितीत जीवन जगत आहेत.
दुग्ध व्यवसायावर आणि मोलमजुरी करून धनगर बांधव जगतात. त्यामुळे पाणी त्यांच्यासाठी जीवन आहे. मात्र, आता पाणीच मिळवण्यासाठी त्यांच्यावर घर सोडण्याची वेळ आली आहे. अशाच प्रकारे अडरे, अनारी, टेरव, सावर्डे येथील धनगर वस्त्यांमध्ये विस्थापन होणार आहे. या प्रकाराची महसूल यंत्रणा दखल घेईल का? आणि त्यांना दिवसातून किमान एकदा तरी सरकारी यंत्रणेकडून पाण्याचा टँकर मिळेल का? अशी अपेक्षा येथील धनगर ग्रामस्थ करत आहेत.

गुहागरात या वर्षी आंबा उत्पादनात घट

नारळ-सुपारीबरोबरच आंबा उत्पादनही या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात घेतले जाते; मात्र गुहागरच्या इतिहासात या वर्षी आंब्याचे सर्वात कमी उत्पादन असल्याची प्रतिक्रिया तालुक्यातील आंबा व्यावसायिकांनी दिली आहे.
mango treeगुहागर- कोकणातील गुहागरचा हापूस आंबा सर्वत्र प्रसिद्ध आहे. नारळ-सुपारीबरोबरच आंबा उत्पादनही या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात घेतले जाते; मात्र गुहागरच्या इतिहासात या वर्षी आंब्याचे सर्वात कमी उत्पादन असल्याची प्रतिक्रिया तालुक्यातील आंबा व्यावसायिकांनी दिली आहे.
थंडीचे अचानक वाढलेले प्रमाण व ढगाळ वातावरणाचा फटका आंबा उत्पादनाला बसला आहे. त्यामुळे गुहागरी आंब्याचे दरही गगनाला भिडले असल्याने स्थानिक बाजारात आजही आंबा विक्रीसाठी आलेला नाही.
गेल्या दोन वर्षापासून कोकणातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणा-या आंबा पिकाला साडेसातीच लागली आहे. या वर्षी अवकाळी पाऊस व सतत बदलत असलेल्या हवामानामुळे बागायतदारांना फटका बसला होता.
त्यात अचानक वाढलेले थंडीचे प्रमाण आणि बदलत्या हवामानामुळे मुळात कमी प्रमाणात झालेली फळधारणा गळून पडल्याचे कृषी अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी सांगितले. त्यामुळे उरलीसुरली फळधारणा टिकवण्यासाठी बागायतदारांना अनेक प्रकारची औषधे फवारणी करावी लागली; परंतु उत्पादनावर त्याचा काही परिणाम झालेला दिसला नाही.
कमी उत्पादनामुळे या वर्षी बाजारात पाच डझनची पेटी सुमारे २५०० ते ३००० दराने विक्री केली जात आहे. आहे त्या दराने आंबा पेटीची मागणी केली जात आहे; मात्र गुहागरात आंबाच कमी असल्याने बागायतदार ही मागणी पूर्ण करू शकत नसल्याची शोकांतिका आहे.
गगनाला भिडलेले दर स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांच्या आवाक्याच्या बाहेरचे असल्याने आंबा व्यावसायिकांनी स्थानिक बाजारपेठेत आंबाच विक्रीला ठेवलेला नाही. मुंबई येथील दरांपेक्षा गुहागरात आंबा पेटी कमी दरात मिळतील, अशी अपेक्षा पर्यटकांसह मुंबई चाकरमान्यांना होती; परंतु खुद्द गुहागरातच आंबा विक्रीस नसल्याने त्यांची फार निराशा झाली.
गुहागरसह हेदवी, नरवण, पालशेत, अडुर या ठिकाणचा आंबा मुंबई-वाशी मार्केटमध्ये विक्रीस गेला आहे. आता झाडावर असलेल्या कै-या एप्रिल किंवा मेअखेपर्यंत होतील, असा अंदाज बागायतदार डॉ. अनिल जोशी यांनी व्यक्त केला आहे.

रत्नागिरी तालुका केवळ कागदावरच टंचाईमुक्त असल्याची बाब पंचायत समितीच्या मासिक बैठकीत उघड झाली. 
water problemरत्नागिरी- रत्नागिरी तालुका केवळ कागदावरच टंचाईमुक्त असल्याची बाब पंचायत समितीच्या मासिक बैठकीत उघड झाली. तालुक्यातील सहा गावांत भीषण पाणीटंचाई असताना या गावांनी टँकरची मागणी करूनही अद्यापपर्यंत या गावांना टँकर उपलब्ध झाला नसल्याची माहिती सभागृहात देण्यात आली. तहसील प्रशासनाकडून टँकर अधिग्रहण करण्यात विलंब झाल्याने टंचाईग्रस्त सहा गावांत अद्याप टँकर पोहोचलेले नाहीत.
रत्नागिरी पंचायत समितीची मासिक बैठक सभापती महेश म्हाप यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत रत्नागिरीत सहा गावांमध्ये सुरू असलेल्या पाणीटंचाईवरून सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मागणी करूनही या गावांना टँकर उपलब्ध झाला नसल्याने सदस्य अधिक आक्रमक झाले.
ज्या गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण होते त्या ठिकाणी पाहणी अहवालानंतर तहसीलदार टँकर अधिग्रहण करून देतात. यावर्षी सरकारी दफ्तरी रत्नागिरी तालुका टंचाईमुक्त असल्याची नोंद आहे. मात्र, प्रत्यक्षात तालुक्यातील साखरतर, टिके, फणसोप, कर्ला, खेडशी या गावांतून टँकरची मागणी करण्यात आली असल्याचे गटविकास अधिकारी साखरे यांनी सांगितले.
या गावात अद्याप पाणीसाठा आहे. लवकरच या गावांना टँकर उपलब्ध करून देण्यात येईल, असे साखरे म्हणाले. यावर सदस्य महेंद्र झापडेकर यांनी टिके गावात पाणीटंचाई मोठय़ा प्रमाणावर असल्याचे सांगितले. गावात सहा दिवसांतून एकदा पाणी येत आहे. यामुळे तहसीलदारांची तत्काळ भेट घेऊन टंचाईग्रस्त गावात तत्काळ टँकर सुरू करण्यासंर्भात नियोजन करावे, अशी मागणी सदस्यांनी केली.
तालुक्यातील पाणीटंचाई निवारणासाठी एक टँकर घेण्यात आला आहे. परंतु, या टँकरवर जीपीएस यंत्रणा नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. जीपीएस यंत्रणा बसवणे टँकर मालकांना परवडणारे नसल्याने टँकर मालक जीपीएस यंत्रणा बसवण्यास अनुत्सुक असतात.
तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी परटवणे येथील शिंदे यांच्या विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तीन दिवसांत ज्या ठिकाणाहून टँकरची मागणी आली आहे, त्या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. पाणीपुरवठा करताना साखरतर गावाला प्राधान्य देण्यात येईल, असे साखरे यावेळी म्हणाले.
या बैठकीत तालुक्यासाठी स्वतंत्र टँकर असावा, अशी मागणी स्वत: सभापती यांनी केली. जिल्हा नियोजनमधून तालुक्यासाठी टँकर उपलब्ध व्हावा, यासाठी मागणी करण्यात येईल. याशिवाय नळपाणी योजनांसाठी तत्काळ निधी मिळावा, यासाठी राज्य सरकारकडे मागणी पत्र पाठवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Friday, May 6, 2016

सह्याद्रीच्या कडेकपारींमध्ये एव्हाना रानमेव्याच्या खजिन्याची ताटे भरू लागली आहेत. त्याच्या दरबारात जायचे असेल तर ‘मी’ पणा सोडायला हवा.
काटय़ांचा आणि दगडांचा रोष मानून चालणार नाही. कुठची फांदी तुम्हाला अडवेल हे सांगता येणार नाही. तिला थेट सामोरे गेलात तर परिणाम भयानक होतील. त्या फांदीची हळुवार समजूत काढावी अथवा तलवार चालविल्याप्रमाणे हातातील शस्त्र चालवावे म्हणजे वाट मोकळी होईल. पण पाऊल जपून, कारण हे जंगल त्यांचं असतं, येथे फिरणाऱ्या प्राण्यांचा त्यावर हक्क असतो. आपण पाहुणे असतो, काही क्षणाचे! पावलापावलावर याचे भान ठेवून भल्या पहाटे सुटावे जंगलात.
कोकिळेची कुहुकुहुऽऽ जेथे सुरू असते. त्या ठिकाणी तुमचे सहज लक्ष जाईल. येथेच तोरणांचे माणिक-मोती तुमच्यासाठीच वाट पाहत असतील. तोरणे म्हणजे साखरेच्या पाकातले रसगुल्लेच..
काटेरी फांद्यांवर पाचूंप्रमाणे हे पांढ-या द्राक्षांचे घोस लगडलेले असतात. ही फळे चवीला फारच छान असतात. परंतु, ती मिळविताना काटय़ांचा विचार करावा लागतो. तोरणांच्या जाळय़ांप्रमाणेच हिरवे, पिवळे वाटाणेच काही झाडांवर पैंजन अडकवल्याप्रमाणे लोंबकळत असतात. हिला आटकन म्हणतात. तीही याच कुळाचारातली. फक्त चव आंबट-गोड..
सह्याद्री पार करायचा तर करवंदांना अव्हेरून चालणार नाही. माघ महिन्यापासूनच त्यांची लगबग सुरू होते. आता परिपक्व झालेली करवंदे रंग बदलू लागली आहेत. आंबट-गोड करवंदांचा आस्वाद पुढील पंधरा दिवसांपासून सुरू होईल. डोंगरची काळी मैना तिला का म्हणतात हे डोंगरात फिरत-फिरत रानातल्याच एखाद्या पानाचा खोला करून (पानाचा द्रोण) त्यात ती घ्यावीत आणि मनाप्रमाणे त्याचा आस्वाद घ्यावा.
आता या करवंदांचा हिरवा साज पाहायला मिळतो. खिरमटीच्या थाळीत केव्हा-केव्हा यांच्याही उभ्या-आडव्या भेशी पडतात. असं म्हणतातहिरडय़ांमधून येणारे रक्त करंवदं खाताच चटकन बरेही होते.  आताशी भ्रमंती करायची तर भूक क्षमविण्याचा प्रश्नच नाही. सह्याद्रीच्या भ्रमंतीत मीठ, मसाला, चवीपुरते गूळ घेतले म्हणजे झाले. बाकी काही नको. आपली जीभ भली की आपण.. खायचे किती आणि कसे हेच समजत नाही